आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्तमान:कवयित्री करुणाची करूण कहाणी...

अजय कांडरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शोषणकर्ते नि शोषित सर्वत्र दिसतातच. पण त्यातही स्त्रीचं शोषण पिढ्यानपिढ्या होत आलेल आहे. कधी समाजाकडून, कधी घरच्यांकडून, नवऱ्याकडून, सासऱ्याकडून आणि बाई असून सासूकडूनही. यात लग्न झाल्या नंतर ज्या घरात एखादी स्त्री उत्तम संसार करू पाहते त्या घरातील माणसांचं अज्ञान, हेकेखोरपणा, घरची हलाखीची परिस्थिती यातून तिला होणाऱ्या त्रासातून आत्महत्येसारखा पर्यायही निवडावा लागतो. अशाच परिस्थितीला सामोरे गेलेल्या मराठीतील उच्चशिक्षित परंतु कायमस्वरूपी नोकरीच्या शोधात असणाऱ्या एका उत्तम कवयित्रीने अलीकडल्या काळात दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला.

अर्थात शिक्षित समाजाच्या दृष्टीने ही अतिशय खेदजनक घटना आहे. त्या कवयित्रीचा जन्मापासून आतापर्यंतचा प्रवास जाणून घेतल्यावर मन अगदी उद्विग्न झालं. परंतु या कवयित्रीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करूनही जगलेल्या तिच्या पुढील जीवनाचा संघर्ष ऐकल्यावरही ती पुन्हा आत्महत्या का करणार नाही? या कल्पनेनंच मन भयभीत झाले!

करुणाची (नाव बदललेले आहे) कविता अस्सल मातीतील आहे.तिला मानव्याची ओढ आहे. शेती-पाणी ग्रामीण भाग हा तिच्या आस्थेचा विषय असला तरी कवितेतून समष्टीसाठी व्यक्त व्हायला हवं.असा काव्य लेखनामागील विचार ती स्पष्ट करते. तिला प्रतिष्ठितमानसन्मान प्राप्त झाले आहेच. परंतु तिच्या कविता मराठीतील काही नियतकालिकांमधून वाचल्यावर असे जाणवते की तिला नेमकं काळाचं भान आहे. कोणत्याही स्तरातील स्त्री असो तिचं शोषण वर्षानुवर्ष होत असताना तिचा श्वास मुक्त होण्यासाठी स्त्रीला स्वतःलाच निर्णयक्षमता प्राप्त करावी लागते.हा विचार अग्रक्रमाने ती कवितेत मांडते.तेव्हा तिच्या अशा काव्य जाणिवेच्या प्रगल्भते बदल आपल्या मनात आस्था निर्माण होते. ती स्वतःला भूमीची कन्या समजते. भूमी हीच आदिम स्त्री आहे.लेखक-कवीच भूमीशी, पाण्याशी नातं पक्क असत तेव्हाच तो आपल्या कलेतील सत्व व्यापकपणे मांडू शकतो. हा विचार स्वतःच्या कवितेबद्दलही तिच्या मनात रुजलेला आहे.ती एके ठिकाणी आपल्या कवितेत म्हणते,

"उरलसुरल आयुष्यही बेचव झालं

तेव्हा तर मी डोंगर दऱ्यातून वाहणाऱ्या पाण्यागत

वेडी वाकडी वळणे घेत

कवितेच्या ओळी ओळीतून

बागडत राहिले

पिसाटल्या सारखी!"

अस साहित्याच स्वतःच चिंतन असताना, जीवनाचे अनेक चढउतार सहन केलेले असताना करुणाने इतक्या टोकाचा निर्णय का घेतला ? हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

करुणाची कहाणी ऐकूण मन सुन्नचं झाले. तिला मोठ्या मुश्किलीने बोलतं केलं तेव्हा तिच्या रोमारोमात भिनलेली आजवरच्या आयुष्यभराची वेदना दबक्या आवाजात मोकळी करण्याचा तिने प्रयत्न केला.तेव्हा तिच्या आतली घुसमट बाहेर पडू लागली. जन्मा पासूनच इतकं दुःख कोणाच्या पदरी नसावं. हाताच बोट धरून चालण्या आधीच बापच छत्र हरवलं. आईला 32 व्या वर्षीचं वैधव्य प्राप्त झालं. त्यानंतर जमिनीवर रांगणाऱ्या करुणाला सासूकडे ठेऊन तिची आई लोकांच्या शेताबांधाला मोल मजुरी करून कुटुंब पोसू लागली. वडील वारल्यावर वर्षाच्या आत मोठया बहिणीच ती नववीत असताच लग्न केलं.पण नियती खूप मोठी चेटकीण असते. असच काहीस झालं आणि तिच संपूर्ण कुटुंब विस्कळीत झालं.करूणाच्या आईने सासूला स्वतःच्या भावाकडे ठेवलं. मुलगा खूप शिकला नाही.त्याला बहिणीकडे ठेवलं. खरं तर करुणा जन्मापासूनच उपरी. वडिलांच्या धक्याने आई आजारी पडायची. त्यामुळे छोट्या करुणाला आईने शिक्षणासाठी आपल्या बहिणीकडे ठेवलं.

या संदर्भात बोलताना करुणा म्हणते, मावशीकडे मी शिक्षणाला गेले खरे पण मावशीची छोटी मुले सांभाळणे हेच मुख्य माझं काम होत. अधून मधून शाळेत जायची. भातुकलीचा खेळ काय हे कळण्याआधीच मी बालवयातच मोठी झाले. त्याच वयात मावशीच्या घरी भाकरी भाजून हात तव्यावर पोळत होते.बाल वयात कोणाचा मायेचा ओलावा।मिळाला नाही. कोरडवाहू जमिनी सारख माझं अंतःकरण सतत मायेसाठी शोध घेत राहिलं. पण खूप लहानपणीच पडेल ती काम करावी लागली. नाही केली तर कोणी माझ्याशी नीट वागणार नाही ही असुरक्षितपणाची भावना मला आतून पोखरत गेली. आणि मी बालपणापासूनच स्वतःपेक्षा इतरांच्या भावनांचाच विचार करू लागले. ज्या मावशीकडे मी राहत होते, तेही फार लांबचे नव्हते.तरी त्या घरच्या लोकांनी मला साधं नावानेही हाक मारली नाही. 'ए पोरी' म्हणून फक्त काम सांगितलं जायचं. मी फक्त त्यांच्या घरी जेवण जेवायची. माझ्या वह्या, पुस्तक, शाळेची फी सगळं आई मोलमजुरी करून मिळवलेल्या पैशातून द्यायची. मला 10 वी पर्यंत कोणी कपडे देखील घेलेले आठवत नाही. मावशीकडे सणासुदीला घरात सगळ्यांना कपडे यायचे. पण मला घेतल्याचं कधी आठवतही नाही. शाळेतून मी गरीब म्हणून मला दोन ड्रेस मिळायचे.तेच मी घरी पण वापरायची. किंवा इतरांनी दिलेले कपडे मी घातलेत. मग आताही सणाचं फार अप्रूप राहील नाही. बऱ्याचदा मला शिळी भाकरी खावी लागायची.पण शाळा खूप चांगली होती. शिक्षक मला खूप जीव लावायचे. मी हुशार होते. सकाळी मावशीच्या घरची भांडीधुण करून मग स्वतःच आवरून शाळेत जायची. शाळा सुटली की वाटायचं घरी जाणेच नको. घरात सतत उपरे पणाची भावना. अभ्यासाला वेळ नव्हता. रात्रीचा जागून अभ्यास करायची. खूपदा पाटीवर गणिताचा अभ्यास करताना आवाज व्हायचा. त्यावरून खूप बोलणी खावी लागायची.मग मी लग्न पत्रिकांचे कोरे कागद साठवून त्यावर गणिताचा सराव करू लागले. मला कधीच दप्तर मिळालं नाही. ज्या घरात रहात होते ते पाहुणे स्वतः शिक्षक असून आईला सांगायचे लग्न करून टाका कशाला शिकवता हिला. ते स्वतः सामाजिक काम करायचे पण त्याचा हा ढोंगीपणा अजूनही मनातून जात नाही. याचं काळात आई दवाखान्यात झाडू, फरशीच काम करू लागली. ते करून दिवसभर शेतात मोल मजुरी करायलाही जायची. अस करून तिने पुन्हा कुटुंब एकत्र आणलं. आणि मलाही घेऊन गेली. मग रोज चार किलोमीटर प्रवास करून मी 12 पर्यंतच शिक्षण घेतलं. याच दरम्यान मी पुण्यात दोन महिने दत्तो वामन पोतदार ह्यांच्या घरी राहिले. नंतर म्हात्रे ब्रिज ते अरण्येश्वर असा रोज पायी प्रवास करत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. त्यावेळी दिवाळीत घरी येण्या ऐवजी मेस मध्ये दिवाळीचा फराळ करण्याचं काम करू लागायची. त्यातून फीसाठी पैसे साठवले. पण खूप प्रयत्न करूनही नोकरी लागली नाही.

करुणाला लग्ना आधीच नोकरी करायची होती पण आईचा एकच हट्ट तू लग्न कर. शेवटी आईच्या आग्रहाखातर तिने लग्न केलं आणि आधीच्या आगीतून बाहेर येण्या ऐवजी फुफाट्यातच ती पडली. लग्नानंतरच्या सुखी संसाराची खूप चांगली स्वप्ने तिने रंगवली होती पण तिथेही तिचा स्वप्नभंग झाला. लग्नाच्या वेळी नवरा पुणे विद्यापीठाचा गोल्ड मेडलिस्ट आहे हे तिला कळलं तेव्हा तिला वाटलं आपला होणारा नवरा खूप चांगला विचार करणारा असेल. सहजीवना विषयी आस्था दाखवणारा असेल.पण उलट झालं. तो नोकरीला आहे हे खोटं तिला सांगण्यात आलं. आणि लग्न झाल्यावर एक महिन्याच्या आतच कळलं घरात दारिद्र्य तर आहेच. परंतु घरच्या माणसांनाही काम नको आहे. शेवटी सासू-सासरे आणि नवऱ्याने तूच कमव आणि आम्हाला पोस असा तगादा लावला. नवरा काही काम करत नाही, घरात सासू सासरे म्हातारे,त्यांचं आजारपण. पुन्हा आयुष्यात निराशाच. स्वतः काम केल तरच खायला मिळणार अशी परिस्थिती. लग्नाचे नवेपणाचे चार दिवसही करुणाच्या वाट्याला आले नाहीत. दोन वेळच पोटभर जेवायला मिळणे हेच तिच्या लेखी मोठे सुख झाले.मग सगळ्या संवेदना तिने बासनात गुंढाळून फेकून दिल्या. आणि निर्जीव प्राण्यासारखी जगत राहिली. कधी घराबाहेर, कधी वळचणीला. पण कोणाला सांगण्याची हिम्मत केली नाही. सांगून तरी काय करणार ती. आईला उगीच त्रास होईल. या भीतीने पोटातल दुःख ओठावर येऊ दिलं नाही.तिला आई शिवाय अधाराला कोण नव्हतं. भाऊ दारुडा. तोच करुणाच्या आधाराची अपेक्षा बाळगायचा.सासरी आपणच कमवलं तरच खायला मिळणार अस लक्षात आल्यावर करुणाने एका महाविद्यालयात तासिकेवर नोकरी मिळवली.त्या तासिकेंचे पैसे घरात कधी येतात याकडे नवऱ्यासह घरच्यांच लक्ष.पैसे पाच ते सहा महिन्याने एकदम मिळायचे, वेळेवर मिळायचे नाहीत त्यामुळे नवरा, सासरा, सासू यांच्याकडून कानावर पडणाऱ्या शिव्यांनी करुणाचा जीव नकोसा होतोय. प्रसंगी नवऱ्याकडून मारही खावा लागतो. पै-पाहुण्यांसमोर सतत अपमान तिचा केला जातोय. किती सहन करायच या जाणिवेने तिच्या जीवाचा त्रागा त्रागा होतोय.यात ती जगणंच हरवून बसली आहे. नवरा उच्चशिक्षित आहे परंतु काहीच करायला नको. बायकोने कमवावं नाही कमवलं तर तिला शिव्या ठरलेल्याच. आयुष्यातला जोडीदार चांगला असावा, दोन वेळच जेवण करण्या एवढतरी त्याने कमवाव. तो फक्त आईच ऐकणारा, प्रचंड सनातनी विचाराचा. परंपरेला चिकटलेला, बाई म्हणजे पायातील वहाण अस समजणारा. आपण काय करायला हवं ह्याच भान नाही. पण सतत घाणेरडं बोलून बायकोचा पदोपदी अपमान करणारा. माणूस कोणत्याच जबाबदाऱ्या अंगावर घेऊ शकत नाही. यामुळे करुणाच्या मनाचा संताप होतो आणि त्यातून अजून असुरक्षित असल्याची भावना बळावत जातेय. या सगळ्यातून तिला निराशा येऊन तिने दोन वेळा विहीरीत उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अशावेळी दुध कोवळ्या ओठांच्या दोन मुलांचे रडणेही तिला मागे परत बोलावू शकले नाही. यातच तिच्या आजवरच्या आयुष्याची होरपळ स्पष्ट होते!शेवटी शिक्षित बाई असो की अशिक्षित असो, उत्तम कवयित्री असो की सामान्य कलावंत बाई असो तिला जीवघेण्या शोषणाला सामोरे जावे लागतेच!

ajay.kandar@gmail.com

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser