आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्तमान:बलात्काराला जात असतेच...

अजय कांडर9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्याला विस्मरण होण्याचा रोग जडला आहे. या विस्मरणाने एकूण समाजालाच बधीर केले आहे. ज्या गोष्टीचा आपण आक्रोश करतो तीच गोष्ट काही काळाने आपण विसरतो. आपण हे आपल्या सोयीनुसार घेतो की आजच्या जगण्याची गती आपल्याला हे सगळं विसरायला लावते? तसं नसतं तर क्रूरपणे केल्या गेलेल्या बलात्कारासारख्या घटनेच्या विरोधात आवाज उठवाला जात असतानाही पुढील आठ-दहा दिवसातच आपण त्या घटनेपासून दूर जातो. मग पुन्हा एखादी अशी घटना समोर येईपर्यंत शांतच असतो. हा मधला जो शांततेचा काळ असतो ना त्या काळातच आपण स्वकेंद्रित झालेलो असतो.

बलात्काराची एखादी घटना घडली की आपण सहज म्हणतो अलीकडल्या काही वर्षात देशात बलात्काराच्या घटना वारंवार घडत आहेत. पण हे बोलणं सार्वत्रिक होण्याला आपल्या देशात अनेक स्त्रियांवर दिवसाला होणाऱ्या बलात्कारांची पार्श्वभूमी कारणीभूत असते. मात्र यातील काहीच बलात्कार चर्चेला येतात.आणि ज्या स्त्रीवर बलात्कार झाला आहे तिला न्याय मिळावा म्हणून देशभरातून सर्व स्तरातून आवाजही उठवला जातो. मग प्रश्न असा उपस्थित होतो की, दिवसाला अनेक बलात्कार होत असताना अपवादात्मक बलात्काराच्या घटना उजेडात येत असतील तर ज्या शेकडो घटना उजेडात येत नाही त्या सर्वांच्या न्यायाचं पुढे काय होतं? त्यांच्या न्यायाचं खरंतर काहीच होत नाही, कारण अशा अनेक बलात्काराच्या घटना वेगवेगळ्या कारणामुळे दडपल्या जातात आणि यातील प्रमुख कारण असतं ते म्हणजे बलात्कारित स्त्रीची जातीची उतरंड. अशा घटनांचा नीट अभ्यास केला की आपल्या लक्षात येईल जातीच्या उतरंडीनुसार बलात्कारी स्त्रियांची संख्या अधिक आहे. त्यामुळे बलात्काराला जात असतेच हे आपल्याला मान्य करावं लागतं आणि जे लोक मान्य करायला तयार नसतील त्यांच्यातील संवेदनशीलता जातीतच अडकली आहे. हे आपण एकदा कधीतरी समजून घ्यायला हवे.

आपल्याला विस्मरण होण्याचा रोग जडला आहे. या विस्मरणाने एकूण समाजालाच बधीर केले आहे. ज्या गोष्टीचा आपण आक्रोश करतो तीच गोष्ट काही काळाने आपण विसरतो. आपण हे आपल्या सोयीनुसार घेतो की आजच्या जगण्याची गती आपल्याला हे सगळं विसरायला लावते? तसं नसतं तर क्रूरपणे केल्या गेलेल्या बलात्कारासारख्या घटनेच्या विरोधात आवाज उठवाला जात असतानाही पुढील आठ-दहा दिवसातच आपण त्या घटनेपासून दूर जातो. मग पुन्हा एखादी अशी घटना समोर येईपर्यंत शांतच असतो. हा मधला जो शांततेचा काळ असतो ना त्या काळातच आपण स्वकेंद्रित झालेलो असतो. याची कारणे अनेक असली तरी आपल्यापेक्षा खालच्या वर्गाकडे आस्थेने न पाहण्याची आपली वृत्ती या सगळ्याला कारणीभूत असते. आणि त्यामुळेच जातीच्या उतरंडीवर वाढत जाणाऱ्या बलात्कारांच्या घटनांबद्दल आपल्या मनात तडफड निर्माण होत नाही.तसं नसतं तर बलात्कार झाल्याझाल्या बलात्कारित स्त्रीची जात शोधण्याचा प्रयत्न बलात्कारित घटनेच्या हजारो मैल दूर असणाऱ्या वर्गाकडूनही झाला नसता. अर्थात अशा घटनांमध्ये जात शोधली जाण्याची कारणे वेगवेगळी आणि ती सामाजिक पातळीवर आहेत. आणि ती सामाजिक न्यायासाठी आपल्याला मान्य करावी लागतात. पण प्रश्न असा आहे की त्या न्यायासाठी जात शोधणे वेगळं आणि जातीच्या उतरंडीवर खालच्या स्तरावर असणाऱ्या जातीतील एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाला तर त्या जातीच्या वरच्या जाती वर्गातील लोकांनी मुद्दामहून बलात्कार झालेल्या स्त्रीच्या जातीचा शोध घेणे वेगळे. असा शोध घेताना बलात्कार स्त्री आपल्यापेक्षा खालच्या जातीची आहे म्हणून त्या घटनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचा निर्दयीपणा अलीकडल्या काळात वाढतच जात आहे. हा सगळा प्रकार तीव्र संताप आणणारा आहे.

बलात्कार होण्याच्या वाढत्या संख्येत सर्वच जातीच्या स्त्रीवर बलात्कार होत आहेत आणि ते निषेधार्थ आहे. कोणत्याही जातीच्या स्त्रीवर झालेल्या बलात्काराचे कधीच समर्थन करता येणार नाही. परंतु अलीकडल्या काळात जातीनुसार बलात्काराची विभागणी करून त्यानुसार त्या घटनेची वक्तव्य राजकीय लोकांकडून होताना दिसत आहेत. जातीच्या उतरंडीवर अतिशय शोषित समाजातील एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाला तर एवढ्या मोठ्या लोकसंख्येत असा एखादा प्रकार घडतो त्यात विशेष काही नाही असं म्हणण्याचे धाडस या राजकीय लोकांमध्ये निर्माण झाले आहे. पण तोच बलात्कार जर उच्चवर्गातील आणि प्रामुख्याने सामाजिक प्रतिष्ठा असलेल्या कुटुंबातील स्त्रीवर झाला असल्यास असं वक्तव्य करणारे राजकीय लोक उलट्या तोंडाने बोलू लागतात. त्या बोलण्यामध्ये समाजाबद्दलचा प्रचंड त्यांचा कळवळा दिसून येतो. पण प्रत्यक्षात ते एक राजकीय गणितच असते. त्याचबरोबर आपण वरच्या जातीतील असल्याचेही एक भान अशी वक्तव्य करणाऱ्या राजकीय नेत्यांना असते. "मनी आणि मसल पॉवर' मधून त्यांचा आत्मविश्वास एवढा वाढत गेलेला असतो की प्रसंगी शोषित वर्गातील स्त्रीवर वरच्या वर्गातील आणि त्यातही राजकीय लागेबांधे असणाऱ्या कुटुंबातील एखाद्या पुरुषाने बलात्कार केला तर त्याची पाठराखण खुलेआम ते करतात. अर्थात सगळेच राजकीय लोक अशा प्रकारचे असतात असं अजिबात म्हणता येत नाही. तरी लोकांनी लोकांच्या भल्यासाठी निवडून दिलेल्या कोणत्याही लोकप्रतिनिधीला असं वागणं अशोभनीय आहे, याची तरी लाज अशा राजकीय नेत्यांनी ठेवायला हवी. पण अशा त्यांच्या वक्तव्यावर किती हंगामा झाला तरी त्यांची मूळ वृत्ती बदलत नाही. हे त्यांनी पुढे केलेल्या अशा वक्तव्याच्या अनेक घटनांमधूनही दिसून येते. अशावेळी समाज म्हणून आपणच नालायक ठरलेलो असतो. कारण आपणच अशा नालायक लोकांना निवडूनही देत असतो!

बऱ्याच वेळा अशा घटनांचा हंगामा केला जातो तेव्हा त्याचे बारीक तपशील पाहणे फार जरुरीचे असते. ते पाहिले की जातीच्या उतरंडीवर बलात्कारीत स्त्रीकडे मीडियापासून,मध्यमवर्गीय मानसिकता असणारा वर्ग आणि कायद्याची अंमलबजावणी करणारी व्यवस्थाही कशी पाहते हे लक्षात येतं. याबद्दल अलिकडच्या हाथरस येथील घटनेचे उदाहरण घेता येईल. मात्र येथील बलात्कार पीडित भगिनी दलित वर्गातील होती. काबाडकष्ट करणाऱ्या कुटुंबातील ही भगिनी आपल्या आई, भावाबरोबर शेतावर काम करत होती. तिच्यावर वरच्या वर्गातील काहींनी बलात्कार करून तिने त्या घटनेचे वक्तव्यही करू नये म्हणून तिची जीभ कापण्यात आली. आणि हे सर्व प्रकरण मीडियासमोर आले तेव्हा तिची जातही लगेच समाजासमोर आली. मात्र दुसऱ्या बाजूला दिल्लीतील निर्भया प्रकरणातील पीडित स्त्रीची जात कोणती? असा प्रश्न उपस्थित केला तर अनेक धुरीणांना त्या पीडित स्त्रीची जात अद्यापही सांगता येणार नाही. त्याचबरोबर हाथरस येथील घटनेचा एफआरआय पाच सहा ओळीत लिहिलेला एका कागदा पुरता मर्यादित होता तर निर्भया प्रकरणातील एफआरआय मीडिया मधूनच गाजत होता. यातून जातीच्या उतरंडीवर होणाऱ्या बलात्काराकडे कसं पाहिलं जातं हे स्पष्ट होतं!

आपल्याकडे जात आहेच कुठे? जातीयता नष्ट होत चालली आहे, असा म्हणणारा वर्ग सगळ्यात जास्त जातीयवादी असतो, ढोंगी असतो. त्या वर्गाला जातीयतेच्या झळा पोहोचलेल्या नसतात. जन्माने उच्च जात प्राप्त झाल्यामुळे स्वतःला सुरक्षित राखण्यात यश मिळवलेला हा वर्ग बंद दरवाजा आडून सगळं निरीक्षण करण्यात धन्यता मानत असतो. जातीच्या उतरंडीवरचा प्रत्येक वर्ग खालच्या वर्गावर नेहमीच अन्याय करत असतो. त्यामुळे वर्चस्ववादी वृत्तीतूनही बलात्काराची मानसिकता निर्माण होण्याची शक्यता असते.

बलात्काराचे कौर्य गुन्हेगार वेगवेगळ्या प्रकारे करत असतात. लहान बालकांवर होणाऱ्या बलात्कारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे त्यांचं बालपण तर हरवून जात आहेच परंतु आयुष्यभर त्याची सल अशी मनात त्यांच्या टोचून राहते की पुढे अशी स्त्री आयुष्यभर एकटीच जगण्याचा निर्णय घेते. बऱ्याच वेळा नात्यातील व्यक्तीच अशा बालिकांवर अन्याय करत असतात. त्याचबरोबर घर कामाला असणाऱ्या खालच्या वर्गातील मुलींवर असा अन्याय बहुतेक वेळा होत असतो. हे बाल बलात्कार अधिक धोक्याचे असतात. गुन्हा करणारा बलात्कारीत मुलीला धमकी देऊन किंवा कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे आमिष दाखवून घटनेची वाच्यता न होण्याची काळजी घेत असतो आणि वाच्यता झालीच तर अशा मुलींचे पालकही परिस्थिती आणि जातीने दुबळे असल्यामुळे तेही हा प्रकार सहन करण्यापलीकडे काहीही करू शकत नाहीत. आणि चुकून आवाज उठवला तर सारं कुटुंब संपविण्याचे षडयंत्र गुन्हेगारांकडून रचले जाते.तरीही या समाजात बलात्काराला जात नसते असा म्हणणार एक वर्ग कार्यरत आहे. आणि तोही वरच्याच वर्गातला आहे. अर्थात एवढे जरी समजून घेतलं तरी जातीच्या उतरंडी नुसार बलात्काराची संख्या कशी वाढत जाते हे लक्षात येऊ शकते!

ajay.kandar@gmail.com

बातम्या आणखी आहेत...