आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्तमान:नैतिक-अनैतिक, शील- अश्लील

अजय कांडर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेखक-कवी आणि एकूणच कलावंत नैतिक-अनैतिक, शील- अश्लील या गोष्टींचा कसा विचार करतो याला फार महत्त्व असतं. ते महत्त्व लेखक कलावंतांनी लक्षात घेतले नाही तर त्याच्या आयुष्यभराच्या लेखणीतून जे शब्द उतरले असतील त्या शब्दांना शून्य किंमत प्राप्त होते. कवी-लेखक नैतिक-अनैतिक, शील-अश्लील अशा विचारात अडकला की त्याने स्वतःच्या डोळ्यावर स्वच्छ न दिसण्याची पट्टी बांधून घेतली आणि स्वतःच्या मेंदुवर प्रश्न न पडण्याचा स्तर चढून घेतला असेच म्हणावे लागेल.

लेखन प्रक्रियेत लेखकाची मानसिकता महत्त्वाची ठरते. लेखक लेखनात जसा विचार करतो तसा तो प्रत्यक्ष जीवनात त्या विचाराचे अनुकरण करेलच असे नाही.परंतु त्याने तो तसा करायला हवाही. त्यामुळेच कवी-लेखकांना वेगवेगळ्या मानसिक स्थितीत जगताना आपल्याला पाहता येते. पण लेखक हा विचारी असतो. त्याला चांगल्या वाईट गोष्टी ठरवता येतात. जे परंपरेतून आपल्यापर्यंत आले आहे ते वाईट आणि चांगलं अशी विभागणी करून त्याला त्यातील अनिष्ट कोणतं हे ठरवता येतं. पण दुर्दैवाने आपल्याकडे लेखक हा विचारवंत मानला जात असला तरी ही विभागणी त्याला नीट करता येत नाही. हे आजवरच्या अनेक अनुभवातून उत्तम वाचकांच्याही लक्षात आले आहे. कवी-लेखक नैतिक-अनैतिक, शील-अश्लील अशा विचारात अडकला की त्याने स्वतःच्या डोळ्यावर स्वच्छ न दिसण्याची पट्टी बांधून घेतली आणि स्वतःच्या मेंदुवर प्रश्न न पडण्याचा स्तर चढून घेतला असेच म्हणावे लागेल. आज मुद्दा इथे चर्चेला आणण्याचे कारण एवढेच की, सोशल माध्यमांवर बऱ्याच लेखकांच्या नैतिक-अनैतिकतेचा मुद्दा चर्चेला घेऊन लेखकाचं जगणं किती पवित्र हवं याबाबतच्या चर्चा वाचायला मिळतात.आणि विशेष म्हणजे यात ओघानेच स्त्रीला शील-अश्लीलतेचे धडे गिरवायला लावणाऱ्याही चर्चा चवीने केल्या जातात.ज्या वस्तुतः फिजुल आहेत. त्यामुळे अशा चर्चेच्या मुळाशीजाणे आणि त्याची फेर मांडणी करणे हे कवी-लेखक म्हणून आपले कर्तव्यच ठरते.

लेखक आणि सामान्य माणूस जगतो यात मूलभूत फरक असतो. लेखक हा जे घडते त्याचा अन्वयार्थ लावून त्याच्या मुळाशी जाण्याचा सतत प्रयत्न करत असतो. त्यामुळे त्याला सत्य हे स्थिर नसले तरी त्यातली खरी गोष्ट काय आहे याचा शोध घ्यायचा असतो आणि सामान्य माणूस हा जे समोर येते तसेच स्वीकारण्याची मानसिकता बाळगतो. म्हणूनच सामान्य माणसासमोर लेखक खरी गोष्ट उलगडून दाखविण्याचा प्रयत्न करत असतो. पण आपल्याकडे अलिकडल्या काळात उलटचं होऊन बसलं आहे. अलीकडे लेखक का लिहितो? कवी एखाद्या गोष्टीवर भाष्य का करतो? हा मुळ विचारच अपवाद वगळता कवी लेखकांच्या मनातून गायब झालेला दिसतो. म्हणूनच आता अनुभवातून तावून सुलाखून निघालेला सामान्य माणूसच लेखक - कवीचा दिशादर्शक ठरतोय की काय असं वाटायला लागला आहे. म्हणजे ज्या समाजाचा आधार लेखक व्हावा, त्या समाजाचा आधार सामान्य माणूस होताना परंपरेलाच नवतीची वाट दाखवताना दिसतो आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर लेखक-कवी आणि एकूणच कलावंत नैतिक-अनैतिक, शील- अश्लील या गोष्टींचा कसा विचार करतो याला फार महत्त्व असतं. ते महत्त्व लेखक कलावंतांनी लक्षात घेतले नाही तर त्याच्या आयुष्यभराच्या लेखणीतून जे शब्द उतरले असतील त्या शब्दांना शून्य किंमत प्राप्त होते. तुम्ही कोणत्या आधारे बाईला पावित्र्याच्या बंधनात बांधून ठेवणार? तिच्या पावित्र्याचे निकष कोणते आणि असले तर ते सांगण्याचा तुम्हाला अधिकार काय? मुळात बाईच्या पावित्र्याचे निकष असण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. कारण तसे ते नसतातच. एकदा असतात असा समज करून घेतला की मग तिथूनच पुरुषी वर्चस्वाला प्रारंभ होतो. आणि हा प्रारंभ पुरुषसत्ताक वर्चस्वातून पितृसत्ताक वर्चस्वापर्यंत तो पोहोचतो. एवढचं नाही तर मग मध्ये मातृसत्तेचेही गोडवे आपण गायला प्रारंभ करतो.आणि मग पुन्हा स्त्री ही किती ग्रेट आहे, किती सोशिक आहे असे गुणगान गाऊन तिला अंतिमत: मातेचे रूप बहाल करून अखेर तिला देवीचे रूप देतो. एकदा स्त्रीला मातेचे आणि देवीचे रूप दिले की पुन्हा तिला पवित्र बंधनात अडकवायला आपण मोकळे होतो. याउलट भ्रातृभावाशी स्त्रीला जोडलं की पुरुष आणि स्त्री असा भेद आपल्याला करता येत नाही. पुरुष आणि स्त्री या दोघांकडे यातून प्रथम माणूस म्हणून पाहता येतं. आणि बाईकडे प्रथम माणूस म्हणून बघणेच आज गरजेचे आहे. असे झाले की पुरुषाबरोबरचे सगळे समान अधिकार तर तिला मिळतातच परंतु त्याहीपेक्षा बाईला नैतिक-अनैतिक, शील- अश्लिल अशा विचारातही आपण अडकू शकत नाही. तिला तिचं अवकाश मोकळे होत जातं आणि तिला जे जे हवे ते ते करण्याचे स्वतंत्र ती स्वतःहून स्वतःलाच प्राप्त करू शकते. स्वतःहून स्वतःलाच प्राप्त करणे ही गोष्ट स्त्रीच्या जीवनात अतिशय महत्त्वाची आहे. मात्र आपण याकडे आजवर पूर्णतः दुर्लक्ष केल्यामुळे तिच्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा मुद्दा घेऊन अजून एकविसाव्या शतकापर्यंत बोलत आहोत. खरंतर पुरुष म्हणून ही आपल्याला निश्चितच संकोच करणारी गोष्ट आहे!

पुरुष म्हणून तुम्ही बाईच्या नैतिकतेची कुठली गोष्ट तिला सांगत असता? अशा गोष्टी तुम्ही सांगता तेव्हा दुसऱ्या बाजूला तुम्ही पूर्णपणे नग्न उभे असता. याचा विचार स्त्रीला चौकटीत उभ्या करणाऱ्या समाजाने केलेला नसतो. याचं कारण स्त्री आणि पुरुष यांच्या दुजाभावाची जन्मापासून जपलेली मानसिकता. कोणताही अनुभव हा काय फक्त पुरुषांनीच घेण्याची मक्तेदारी निसर्गाने तुम्हाला दिली आहे का? नैसर्गिक दृष्ट्या तुम्ही विचार करणे, नैसर्गिक दृष्ट्या प्रत्येकाला जगायचा अधिकार देणे यातच स्त्री आणि पुरुषाच भलं आहे. मात्र बाईने नैसर्गिक रित्या जगणे म्हणजे तिने काहीतरी मोठा गुन्हा केला आहे अशा नजरा तिच्याकडे बघायला लागतात.पण या जगात ज्या स्त्रीने आपलं स्वातंत्र्य घेऊन स्वतःला हवी ती गोष्ट केली, तीच स्त्री सर्वाधिक यशस्वी झाली. आणि पुरुषाच्याही पुढे चार पावलं पुढे गेली. मग ते अगदी सेक्स एज्युकेशन असो किंवा कोणतीही कला, नेतृत्व गुण असो. तुमच्या मोकळ्या जगण्यातूनच तुमच्या बुद्धीचा विकास होतो हे विज्ञानाने सिद्ध केले आहे.याला जगातली कोणतीही स्त्री अपवाद ठरू शकत नाही.

बाईला तिच्या पद्धतीने अनुभव घेऊ द्यावा. तिचं माणूसपण त्यातूनच बहरणार आहे. कोणत्याही कोंडलेल्या भावनेतून माणूस अधिक लज्जास्पद गोष्टीचा विचार करतो. आणि असा विचार करणे विकसनशील समाजाच्या दृष्टीने हानिकारक असते. स्त्री आणि पुरुष नात्याची जी सभ्यता पाळायची असते ती सर्वाधिक उत्तम प्रकारे स्त्री पाळत असते. त्यामुळे तिला लज्जास्पद गोष्टी सांगण्याचा अधिकार खरं तर पुरुषाला प्राप्त होत नाहीच. उलट नैसर्गिकरित्या आपल्याला सगळेच अधिकार प्राप्त झाले आहेत अशा अविर्भावात राहून कृती करणाऱ्या पुरुषालाच लज्जास्पद नियम सांगण्याची वेळ आलेली आहे. एका बाजूला आपण बाईने सर्वस्वी आनंद घ्यावा असं मत व्यक्त करतो. तर दुसऱ्या बाजूला तिने तो घेताना कोणत्या मर्यादा पाळाव्यात याची आचारसंहिताही तिच्यावर लादतो. उलट तिला जो जो अनुभव घ्यायचा आहे तो तिने घ्यावा. यातूनच तिच्यातील प्रौढत्व अधिक मिरवणार ठरणार आहे. त्यामुळे स्त्रीला नैतिक-अनैतिक, शील-अश्लील याच्या तराजूत न जोखता तिला तिचा अनुभव घेऊ द्यावा!यातच स्त्री आणि पुरुषाचंही भल आहे!

ajay.kandar@gmail.com

बातम्या आणखी आहेत...