आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:पाताल लोक... हे फिक्शन नव्हे ही तर रिअॅलिटी...

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

(अजित अभंग)

"प्राईम'वर नुकतीच प्रदर्शित झालेली "पाताल लोक' ही वेबसिरीज. अनेकांनी त्याची तुलना सेक्रेड गेम्स आणि मिर्झापूरपेक्षा अधिक प्रभावी म्हणून केली आहे.  "पाताल लोक' जरी थ्रिलर असला तरी त्यात जात, वर्ग, धर्म, लिंग आणि धार्मिक ध्रुवीकरणावर भाष्य करण्यात आलेले आहे.  प्रश्न जातीचा असो वा वर्गाचा... भारतात हे दोन प्रमुख फॉल्टलाईन आहेत. सामाजिक-आर्थिक स्तरावर तुम्ही तुमच्या जात-वर्गापेक्षा वरचढ ठरू शकाल परंतू या देशातल्या जाती-धर्मापेक्षा तुम्ही कधीच वरचढ ठरू शकणार नाही, हे ही सिरीज पघताना पदोपदी जाणवतं...

स्पॉयरल अॅलर्ट...

"पोलिस-न्वार' हा वेब सिरीजचा जॉनर म्हणजे हमखास प्रेक्षक मिळवून देणारा प्रकार.  अलिकडे गाजलेल्या अशाप्रकारच्या किमान दहा सिरीज सांगता येतील. "न्वार' या शब्दाचा अर्थ म्हणजे गडद काळा, इंग्रजीत डार्कनेस... ज्यामध्ये नायक आणि खलनायकांची रचनाही उघडउघडपणे कळण्यासारखी, भडक आणि गुन्हेगारी स्वभावाच्या सगळ्या कंगोऱ्यातून फिरणारी अशी असते. सरळसाध्या भाषेत चांगल्या वाईटाचा उघड संघर्ष असतो. पांढरा-काळा रंग या माध्यमातून... "पोलिस-न्वार'या जॉनरमध्ये कधी काळ्यात पांढरे पोलीस तर कधी पांढऱ्यातले काळे पोलीस. सुपर कॉप, एजन्ट, रॉ, यूपी-बिहारच्या बाहुबलींचा तर अशा  सिरीजमध्ये सुकाळच. त्यातलीच एक असावी म्हणून पहायला सुरुवात केली ती काल-परवा प्राईमवर रिलीज झालेली "पाताल लोक'. रिलीज झाल्या झाल्या प्रेक्षकांकडून उचलली गेलेली ही सिरीज जिज्ञासेनं स्ट्रीम केली. पाताळ लोकाचे वर्णन करून नंतर ‘ये तो सब शास्त्रों मे लिखा है, पर मैने व्हॉट्सअप पे पढा है’ असे सागणारा जयदीप अहलावतचा "हाथी सिंग चौधरी'  दिसला. आणखी एक सेमी-रियालिस्टिक प्रकारचे काही तरी पहायला मिळेल म्हणून पहात राहिलो आणि ही सिरीज धक्के देत राहिली. अलीकडच्या नवनिषेधाच्या परंपरेने या सिरीजवर निर्माती अनुष्का शर्माच्या कौतुकाबरोबर लगोलग काही जातसमूहांचे निषेधाचे ट्रेन्ड्सही दिसू लागले.

एनएच १०, उडता पंजाब आणि सोनचिडिया यासारख्या चित्रपटांची कथा लिहिणारा या सिरीजचा लेखक सुदीप शर्मा म्हणतो की, "पाताल लोक' जरी थ्रिलर असला तरी त्यात जात, वर्ग, धर्म, लिंग आणि धार्मिक ध्रुवीकरणावर भाष्य करण्यात आलेले आहे.  प्रश्न जातीचा असो वा वर्गाचा... भारतात हे दोन प्रमुख फॉल्टलाईन आहेत. सामाजिक-आर्थिक स्तरावर तुम्ही तुमच्या जात-वर्गापेक्षा वरचढ ठरू शकाल परंतू या देशातल्या जाती-धर्मापेक्षा तुम्ही कधीच वरचढ ठरू शकणार नाही...

"पताल लोक' पाहताना या "बिटविन द लाईन्स' पदोपती जाणवतात. पहिल्या प्रसंगानंतर वेब सिरीजच्या पारंपरिक "पोलिस-न्वार'च्या पठडीतली स्युडो रिअॅलिटीवाली मसाला सिरीज म्हणून आपण पाहायला सुरूवात करतो आणि पुढच्या प्रत्येक भागात धर्मशास्त्रातील त्रिलोक "निओ-न्वार'पर्यंतचे कित्येक अडाखे धडाधड कोसळतात. वास्तवाचा अाभास म्हणून जरी घेतले तरी त्यातले सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक किड्यांचे जग आपला भवताल किळसवाणा करीत जातं असे लक्षात यायला लागतं.. आपल्याला ही सिरीज पाहाताना काही तरी उलगडलंय असं वाटत असतानाच डीसीपी भगत शेवटी आपला हा आडाखाही धुळीत मिळवतो. त्यानंतर आपण पठडीतले प्रेक्षक म्हणून गंडलो गेलो आहोत या जाणीवेनं अस्वस्थ होतो. सडलेल्या-किडलेल्या व्यवस्थेचा जांगडगुत्ता इतका थोडाच सुसंबद्ध असतो? व्यवस्थेपुढेच प्रश्न आहेत... जाती-धर्माचे तर प्रमुख. व्यवस्थाच नादुरुस्त आहे, ती दुरुस्त करायला हवी... मनात असल्या अागंतुक विचारांची टाकळी पिंजू लागते हेच ते स्वयंसिद्ध गंडलेपण "पाताल लोक' आपल्याला लख्ख दाखवते. व्यवस्था नावाची काही तरी गोष्ट कित्येक हजारो वर्षांपासून सुसंबद्धपणे काम करतेय, करीत राहणार आहे. प्रश्न तुमचा-माझा आहे. आपण त्या व्यवस्थेचं होण किंवा त्या व्यवस्थेचं न होणं. व्यवस्थेचं न होणं हे हमखास गंडणं, आणि भाग झालो तरीही आपणच गंडणार...

"आयएनए' या न्यूज चॅनलचा पुरोगामी विचारांचा संपादक  संजीव मेहराला टिपण्यासाठी चार शूटर्स दिल्लीत आल्याची टीप गुप्तचर विभागाला मिळाली आहे. डीसीपी भगतच्या नेतृत्वाखाली चौघांचा पाठलाग करून त्यांच्या मुसक्या वळवल्या जातात. घटनास्थळी उपस्थित असलेल्या टीव्ही चॅनलवाल्यांनी चौघांतल्या एकाला त्याच्याकडचा मोबाईल यमुनेच्या पात्रात फेकताना टिपलंय. पुलावर जमुनापार पोलिस स्टेशनचा वरिष्ठ पोलिस सब इस्पेक्टर हाथीसिंग चौधरी त्याच्या कार्यक्षेत्रातली घटना म्हणून रिपोर्ट करतो आणि त्याच्यावर अटकेनंतरची कार्यवाही सोपवली जाते. तपासाला सुरुवात होते तेव्हा हाथी सिंग दबकत डीसीपीकडे पहिला महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करतो ‘गुप्तचर विभाग अशा छाप्यांची बातमी स्थानिक पोलिस पोलिसांना देतात ती या प्रकरणात का देण्यात आली नाही?’ इथून प्रश्नांच्या मालिकेला सुरुवात होते व त्यांच्या उत्तरांचा शोध घेत हाथीराम चौधरी नावाचा "टाकावू' ठरवलेला इन्स्पेक्टर घेऊ लागतो. शेवटी आपल्याला घेऊन मूळ प्रश्नाच्या मुळाशी भिडू पाहतो. यात त्याला इम्रान अन्सारी हा काश्मिरी मुस्लिम पोलिस अधिकारी तहेदिलसे सहकार्य करतोय.

हाथी सिंगसारख्या डिपार्टमेंटमधल्या कुचकामी ठरलेल्या सिनियर अधिकाऱ्याकडे  विचारपूर्वक केस सोपवली गेल्याचं पहिल्या निम्या भागातच लक्षात येतं. हा हाथी सिंग मुळात लूझर नाही, पण महत्वाकांक्षेसाठी व्यवस्थेत आवश्यक ते छक्के-पंजे खेळण्यात रस नसल्यानं पिछाडीला पडलेला आहे. पंधरा वर्षांच्या सर्विसमध्ये त्याला त्याचं फारसं सोयरसुतक नसतं पण आता स्वतःचा मुलगाही त्याची किंमत न करू लागल्यानं तो अस्वस्थ होऊ लागलाय. हाथीसिंगचा बापही हरलेला पुरुष होता. आपल्या बापासारखंच आता आपल्या मुलापुढे आपलं अवमूल्यन होऊ नये असं त्याला वाटतंय. कधी नव्हे ती हायप्रोफाईल केस आल्यामुळे त्याला ती त्याच्या मुलासाठी स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी वाटते.

हाथीसिंग इम्रान अन्सारीसोबत ज्या चार संशयित मारेकऱ्यांच्या मागे लागतो, ते चौघे कोण असतात? हतोडा त्यागी : हाथीसिंग चित्रकूटमध्ये येतो तेव्हा समोरून रॅली जात असते. रॅलीतली घोषणा असते ‘दलित के दिल का राजा कैसा, जी वो है बाजपेयीजी जैसा.’ अशी राजकीय व्यवस्था असलेल्या गावातला वीरेंद्र तथा हतोडा त्यागी पापभिरू ब्राम्हण कुटुंबातला मुलगा. त्याचा मामा आणि त्यागीच्या कुटुंबातले जमीनीचे वाद विकोपाला गेले आहेत. मामानं सुपारी देऊन त्यागीच्या कुंटुंबातल्या मुलींवर ‘बडा काम’ घडवून आणलंय. स्टेट लेव्हलवर गोळा फेक खेळणाऱ्या या मुलींचा मोठा भाऊ वीरेंद्रने अतिशय क्रूरपणे मामाचा सूड उगावलाय. हाथीसिंगला त्यागीचा प्रशिक्षक हे सगळं सांगतो. त्यागीला रॉबीनहुड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुनलीया गुज्जरनं वाचवलंय. त्यागी त्याचं किलिंग मशीन बनलाय. दुनलीया गुज्जर तिथल्या स्थानिक राजकारणी वाजपेयीचा पाठीराखा आहे. चित्रकूटचा पोलिस अधिकारी राम अवतार हाथीसिंगला म्हणतो, ‘ये सब रक्तबीज है. प्रभुरामचंद्र इन्हें नही मिटा पाए तो ये एसएचओ राम अवतार क्या चीज है?’

व्यवस्थेला नेमकं काय मिटवायचंय?

तोपसिंग : जाट समाजाच्या तीन मुलांवर वार केले म्हणून सवर्णाच्या दहशतीनं तोपसिंगला त्याच्या कुटुंबाने गावातून पळवून लावलंय. तोपसिंगवर सतत त्याच्या गावातले सवर्ण जातीचे समवयस्क अत्याचार करत असतात. त्यातून तो सवर्णांच्या अरेला कारे करू लागलेल्या एका आक्रमक दलित तरुणांच्या ‘डेंजर मंजार’ जोडला गेलाय. लढण्याचं प्रशिक्षण घेतलंय आणि त्याला छळणाऱ्या सवर्ण पोरांची शरीरं उधडवून टाकली आहेत. त्यावर प्रतिक्रिया म्हणून गावच्या सवर्णांनी त्या चळवळीच्या नेत्याचं डोकं छाटून तोपसिंगच्या घरी आणलंय. सवर्ण पोराच्या बापानं तोपसिंगच्या कुंटुंबासमोर त्याच्या वयस्कर आईवर पाशवी बलात्कार केलाय.

सूड उगावलाय तरी ‘आम्हा सवर्णांचं नाक कापलं’ म्हणून अजूनही डूख धरून असणारी गावं असे तोपसिंग कोणत्या व्यवस्थेसाठी घडवीत आहे?

कबीर एम : थिएटरमध्ये रिळ दाखवणाऱ्या कबीरच्या मुस्लिम वडिलांनी मोठ्या मुलाचा मॉब लिंचिंगमध्ये बळी जाताना पाहिलंय. आता कबीरचाही अशाप्रकारे बळी जाऊ नये म्हणून  वडलांनी त्याची मुसलमान म्हणून धार्मिक ओळख पुसण्याची केवीलवाणी धडपड केली आहे.  मुलाच्या खिशात कायम एक वैद्यकीय प्रमाणपत्र असतं ज्यात उल्लेख असतो की कबीरची "सुंता' केली गेली नसून ती एक शस्त्रक्रीया आहे.  वडिलांना मुलाला बाकीचं काहीही देता आलेलं नाही. ना शिक्षण ना स्वावलंबन. तू काहीही हो पण मुसलमान म्हणून बळी जाऊ नको फक्त जग... इतकंच तो कबीरला देऊ शकलाय. मुलगा चोऱ्यामाऱ्या करीत मोठा झालाय. आणि जेव्हा त्याच्यावरच पाकिस्तानचा हस्तक असल्याचा आरोप होतो तेव्हा हा व्यथित बाप म्हणतो, "जिसे मैने मुसलमान तक नही बनने दिया, आप लोगों ने उसे जिहादी बना दिया'...

ओळख लपवण्याची ही केवीलवाणी दहशत कोणत्या व्यवस्थेला हवी आहेे? ही कोणत्या धर्माला हवी असणारी व्यवस्था आहे?

मेरी लिंगडोह उर्फ चिनी : वर उल्लेख केलेल्या तिघांच्या टीमला कव्हर म्हणून नेमण्यात आलेली चौथी. "व्हाईटनर'च्या नशेत तर्र असणाऱ्या रेल्वे स्टेशनवरच्या नरकातल्या अनाथ पोरांतली एक... नेपाळी... आठ-दहा वर्षांची असताना आई-वडिलांच्या मृत्यूनंतर मामा तिला ट्रेनमध्ये सोडतो. दोन-चार समवयस्क मित्रांत वाढते. बाल लैंगिकशोषणापासून सारे गहिरे भोग भोगत संघर्ष करीत इतरांपेक्षा ‘आत्मनिर्भर’ होते. तिला पाच लाख जमवायचे आहेत. त्यासाठी हे ‘मोठं’ काम तिनं घेतलंय. तिला पैसे जमवायचेत ते लिंगपरिवर्तनाची शस्त्रक्रिया करून बालमित्रासोबत लग्न करायचंय म्हणून.

चुरगळलेल्यांच्या स्वप्नांना कुठलाही वाली-सुग्रीव न देणारी, अपंग स्वप्नांची व्यवस्थित वसालत लावणारी ही व्यवस्था कोणी- कशासाठी अव्याहतपणे सुरू ठेवलीय?

तपास करता करता हाथीसिंग हे सगळं अनुभवतो. त्याच्या व्हॉटस्अपच्या ज्ञानापलीकडचं हे सगळं असतं. त्याच्यातला माणूस टप्प्याटप्प्यानं विद्ध होत गेलेला आहे. व्यवस्थेशी निगडीत काही जबर प्रश्न संवेदनशील प्रेक्षकाही विद्ध करू लागतात. हे असले पाताळ लोकातले विरेंद्र त्यागी ‘हतोडा’ म्हणून, तोपसिंग मंजार या दलित जातीतला ‘बंजारा दा मुंडा चाकू’म्हणून, बाबरी पतनाच्या उन्मादात कारसेवकांकडून मोठ्या भावाचं मॉबलिंचिंग झालंय म्हणून धर्म लपवणारा, धास्तावलेला कबीर, मेरी लिंगडोह हुडकून ती व्यवस्थेला इंधन म्हणून पुरवण्याची व्यवस्था...  समाजाच्या कोणत्या रचनेसाठी आहे? आणि हे चौघं आयएसआय पाकिस्तानचे हस्तक दाखवण्याची गरज कोणत्या व्यवस्थेला आणि कोणासाठी करायची आहे?

याचं उत्तर देण्याचा प्रयत्न शेवटी डीसीपी भगत करतो. तो हाथी सिंगला म्हणतो ''ये जो सिस्टिम है ना चौधरी, दूर से देखने से सडा-गला कचरे का ढेर लगता है. लेकीन अंदर घुस के समझोगे ना, वेलऑईल्ड मशीनरी है. हर पुर्जे को मालूम है उसे क्या करना है. और जिस को नही पता होता उस पुर्जे को बदल दिया जाता है. लेकीन ये सिस्टिम कभी नहीं बदलता.''

राहाता राहिलं आजच्या लोकशाहीच्या चौथ्या खांबाबद्दलचं हाथीसिंगचं निरीक्षण... तो जेव्हा प्रथमच मोठ्या वाहिनीचा स्टार संपादक संजीव मेहराला भेटतो तेव्हा तो त्याच्यातल्या मोठ्या संपादकाच्या प्रेमात असतो. प्रकरणाचा उलगडा झाल्यावर मात्र तो मेहराला त्याच्या दांभिकतेबद्दल सुनावतो. “आपसे जब पहली बार मिला था ना तो मुझे लगा था कितने बडे आदमी हो आप; और मैं कितना छोटा. इस केस में चाहे मैने कितनी भी मरवाई हो कम से कम यह गलतफहमी तो दूर हो गई है.” बस हीच आजच्या मीडियाची अवस्था, सर्वसामान्याच्या नजरेत येत असलेली. या क्षेत्रातल्या जबाबदार गणलेल्या लोकांचे कणे स्वेच्छेने खिळखिळे करण्याची संधी कोणती व्यवस्था तयार करतेय?

पन्नास कोटी योजनांचा विस्तार असलेल्या या भुमंडलात आताशा अस्मितांच्या निषेधातला निओ पाताळ लोक सक्रिय झालेला आहे. त्यातल्याच किड्यांना अस्मितेसारख्या भंपक गोष्टीसाठी चेतावणारी व्यवस्था नक्कीच अशक्त नाही, ती सर्वसमर्थ आहे. तिच्या अशक्तपणाचं चित्र तिनं सहेतूनक निर्माण केलंय आणि असल्या निओ पाताळ लोकांतल्या  रोगट किड्यांवर तिच्या सशक्तीकरणाची जबाबदारी सोपवली आहे

जाता जाता... "पाताल लोक'ने प्रश्न उपस्थित केलेले नाहीत. फक्त काही तरी दाखवलंय. ते पाहून मेंदूवर ताण पडतो. सगळी इन्स्टन्ट उत्तरं आज उपलब्ध असताना मेंदू-मनाला कशाला हा ताण? ही सिरीज ‘वेब सिरीज’ म्हणून घ्या किंवा डोक्याला शॉट म्हणून घ्या, निवडीचं असीम स्वातंत्र्य तूर्तास तरी अबाधित आहेच की.

संपर्क - ७७७५९५५८९०
ajitabhang@gmail.comबातम्या आणखी आहेत...