आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

रसिक स्पेशल:काय कठीण आहे !

अजित दळवीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अजित दळवी हे राज्यशास्त्राचे  प्राध्यापक आणि प्रख्यात नाटककार, पटकथा-संवाद लेखक.... विचारांची पक्की मांड असल्यामुळेच  अजित दळवींची ‘डॉ. तुम्ही सुद्धा’, ‘गांधी विरुद्ध गांधी’ आणि ‘समाजस्वास्थ्य’ यासारख्या  नाटकांनी स्वत:ची एक वेगळी जागा निर्माण केली. कोरोनाच्या  लॉकडाऊन  काळात दळवींसारखा  संवेदनशील माणूस जो त्यांचा प्रांत नाही अशा कवितेच्या  प्रांतात  शिरतो आणि व्यक्त होतो. "दिव्य मराठी रसिक'साठी लिहिलेली त्यांची एक खास कविता...

काय कठीण आहे 

कोरोना बरोबर जगणं !

इतकी वर्ष फुकट्या मित्रांबरोबर, गळेपडू नातलगांबरोबर, 

सासूसुनांच्या  सिरीयल्सबरोबर,

कपाळावर गंध आणि आठ्या असलेल्या  बॉस बरोबर, 

दिवस काढलेच की आम्ही!

आम्ही म्हणजे इथे मी 

आदरार्थी बहुवचन वैगेरे...

काय कठीण आहे ?

अहो, असा कसा संसर्ग होऊ देऊ आम्ही! 

किती प्रभात फेऱ्या निघाल्या 

आम्ही कधी कुणाचा झेंडा हाती घेतलाच नाही 

लाठीमार  करणाऱ्यांना 

कधी जाब विचारला नाही 

सगळं जग लाल झालं,

आम्ही द्रवात पांढरे कपडे बुचकळत  राहिलो 

आकाश निळं झालं 

तरी त्याला घटनेच्या पुस्तकात 

कोंबत राहिलो 

काय सोपं असतं काय 

असा मेंदू लॉक करून जगणं 

आयुष्यभर ज्याला हे साधलं

तो अशी विचित्र लागण का लागू देईल

विचार असो की कोरोना

का जवळ फटकू देईल?

संस्कृतीनंच शिकवलं सोवळं ओवळं, शुद्ध अशुद्ध 

पवित्र अपवित्र 

शिकवलं की  दूर करायला अमंगळ स्पर्श 

प्रत्येकवेळी बुडी मारायला लागते नदीत! 

याच्या नावानं आंघोळ, त्याच्या नावानं स्नान- 

आपली संस्कृती महान! 

(बघा. जोडलेत की नाही सर्वांनी अभिवादनासाठी हात)

तेव्हा होती नदी, आता नळ, पाईपलाईन 

बेसिनबिसीन, टाईल्सवाईल्स, चोवीस तास पाणी 

वचनावर तर भाळून आली 

माझ्या घरची राणी!

लेकिन बिल्कुल नहीं डरनेका- 

स्पर्श को वॉश अँड गो करनेका! 

लाख लिटरची वर टाकी जोवर 

स्पर्शाची चिंता कशाला तोवर!        (शिवाय सॅनिटायझर , स्प्रे, हॅन्डवॉश आहेच )

हे आता आम्हाला शिकवतायत 

डिस्टंसिंग  सोशल 

आम्हाला -

ज्यांनी शतकानुशतके पाळलंय हे अंतर 

वंश आमचा, वर्ण तोच, उंचीबिंचीछातीबिती

सगळं तसंच 

तरी आम्ही करू शकतो इतरांना क्वारंटाईन 

सहज 

सांगा बरं, इतर कुणी जवळ आल्या आल्या 

कसं आत वाजत असेल बीप बीप 

कोणतंही सेतू अॅप  नसताना ?

श्यामची आई वाचलेले आम्ही 

मध्यंतरी खरंच थोडे उदारलो होतो 

उपरा, बलुतं वाचून थोडेसे शरमलो होतो 

लवकरच झालो जागे, उघडले डोळे 

आलं  भान 

समस्या आमचीही महान 

सगळा समुद्रच अश्रूंचा 

कुठेकुठे  नंतर रुमाल भिजवणार

वाटीवाटीनं पाणी घेऊन 

डी सॅलिनेट करीत बसणार! 

मजूर उत्तरेकडचे आणि उत्तर ध्रुवावरचे 

दोन्ही सारखेच आम्हाला 

ते ठेकेदारांचे, ठेकेदार त्यांचा 

आमचं काम झाल्याशी कारण 

त्यांचं काम शिफ्टमध्ये 

राहणं शिफ्टमध्ये 

सार्वजनिक स्वच्छतागृहातली उपस्थिती शिफ्टमध्ये 

अशा शिफ्टिंग पॉप्युलेशन विषयी 

काय बोलावं 

माय खाऊ घालत नव्हती  

मावशी पोटातला जाळ विझवतेय ना-

खूप झालं!

लोंढ्यानं येतात, लोंढ्यानं जातात 

बूच बसवलेल्या 

ओढ्या-नाल्यांच्या शहरात

कोसळत राहतात!

चरकात पिळलं जाण्याची वाट पाहत 

गावाकडच्या आठवणी काढत राहतात !

आम्ही त्यांचा का विचार करावा?

(त्यांच्या बायका कामावर येत नाहीत तेव्हा थोडीफार आठवण होते!)

तरीही ब्रेकिंग न्यूज कंबरडं मोडत असताना 

कधीकधी 

दारावरची आकस्मित थाप आठवते 

सोबत हाका 

मित्रांनी पोहे खाण्यासाठी केलेला हल्ला 

सर्वांनी 

काळाला सावकाश सरकू देत 

अबोलपणे घेतलेले सुखाचे घोट 

काही विशेष झालेले नसताना 

मैत्रिणींच्या ओठांवरलं हसू 

तेव्हा-  घड्याळ, फौजदाराप्रमाणे 

कुठे गेलो काय केलं, कुणाकुणाला भेटलो 

याचा हिशेब मागत नव्हते

      सहज होत होतं काही 

काही होत आहे 

याचीही जाणीव नव्हती 

इतिहासपूर्व काळच तो !

फक्त एवढेच खटकतं 

एरवी काय कठीण आहे 

कोरोना सोबत जगणं!

dalvi.ajit@gmail.com

(संपर्क - ९८२२८८४३७६)

0