आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. अजित मगदूम
कोरोनापूर्व जग आणि कोरोनोत्तर जग यामध्ये खूप अंतर असेल असा कयास आहे. कोरोनाच्या "स्टॅच्यु' ने जो पॉज सर्वानी घेतला या पॉजने जगाचं रूप अंतर्बाह्य बदलायला चांगलाच अवसर दिला आहे. अंतरंगातली जळमटं निघून सारे देश आणि माणसं एकमेकांकडे स्वच्छ नजरेने पाहू लागतील. त्यांच्यातला अहंकार,गर्व, पूर्वग्रह कमी झाला असेल. हिसकावण्याची, ओरबाडण्याची वर्चस्ववादी प्रवृत्ती कमी होऊन "वाट्याला आलेलं वाटून घेऊ या' ही वृत्ती बळावेल... एकमेकांप्रती संवेदना, सौहार्द, सद्भावना वाढीस लागली असेल.
तो "स्टॅच्यू' म्हणाला आणि माणसं , सारा देश नव्हे तर सारं विश्व जिथल्या तिथं थांबलं. सगळं काही ठप्प झालं. "स्टॅच्यू' म्हणणारा कोणी जग जिंकायला निघालेला कुणी योद्धा, सम्राट किंवा हुकूमशहा नव्हता, तर तो आहे कोरोना नावाचा विषाणू. मानवसमूह आपल्या निर्मितीपासूनच आपल्या बुद्धीच्या जोरावर प्रयोग करत राहिला. नवे शोध लावत आपली प्रगती करत राहिला. एका टप्प्यावर प्रगतीमधला "प्र' गळून पडला आणि केवळ गती राहिली. माणसाला या गतीचं वेड लागलं. होमरच्या ओडिसी या महाकाव्यातल्या प्रदीर्घ समुद्र सफरी, साहस, नव्याचा शोध आणि त्यातलं थ्रिल हे मानवाला लुभावत राहिलं. किंवा ओल्गा तुकरझूक या गतवर्षीच्या नोबेल विजेत्या लेखिकेच्या "फ्लाईट' या कादंबरीचा प्रवास गती, साहस यातील रोमांचकता हा आशयही माणसाला याविषयी असलेलं नितांत आकर्षण अधोरेखित करतं. त्यातूनच पुढे शर्यत, स्पर्धा आली. "थांबला तो संपला' पासून '"परफॉर्म ऑर पेरिश' असा चढता दबदबा माणसानं माणसावर निर्माण केला. बेभान होऊन तो सैरभैर कधी झाला हे त्याला कळलंच नाही. वेगाबरोबर आवेगही आला. शरीर, मन, बुद्धी भावना यांच्यातील संतुलन टिकवणं दुरापास्त होत गेलं. कामाच्या न संपणाऱ्या "बकेटलीस्ट'पुढे जिवाभावाचं मैत्र, जोडलेल्या आणि रक्ताच्या नात्यांची वीण तुटत गेली हे कळलंही नाही. मानवाच्या इतिहासात या एकविसाव्या शतकातल्या विसाव्या वर्षानं जगातल्या मानवजातीला भय आणि चिंतेनं हादरवून टाकलं. जगातल्या विविध विज्ञान क्षेत्रातील कुणाही तज्ज्ञ मंडळींना कोणतीही चाहूल न लागता कोरोना हा विषाणू अवतरला! विश्वाची गती टिपेला गेली असताना सारं काही बंद... कुलूपबंद. गतीचं प्रतीक असणारं चाक थांबलं. "जायंट व्हील' स्थिरावलं.
जलमार्ग, हवाईमार्ग, रस्ते- हमरस्ते, वाटा - पाऊलवाटा सारं शांत, निर्जन. रहदारी, ट्राफिक जॅम, प्रदूषण यांना दूषणं देणाऱ्यांना आत्मज्ञान झालं की यातून आपण स्वत:ला वगळत होतो हे खरे नव्हते. या विषाणूंनं प्रगतीचा डंका पिटणाऱ्या मानवाची चांगलीच दमछाक केली. गेल्या शतकातील जागतिक महायुद्धात मोठी मनुष्यहानी झाली असली तरी त्यात एकूण ३० देशांचा संबंध होता. आज कोरोना जगभर म्हणजे १९३ देशात मृत्यूचं थैमान घालत आहे. ते महायुद्ध तर ही महामारी. काही राष्ट्रांच्या गटांविरुद्ध दुसऱ्या काही राष्ट्रांचा गट यांच्यात हे महायुद्ध जुंपलं होतं. इथं या इवल्याशा, उघड्या डोळ्यांना न दिसणाऱ्या विषाणूंनं संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. म्हणून या संसर्गजन्य रोगाला 'कोरोनाविरुद्धचे युद्ध' असे सर्रास संबोधले जात आहे. जगातल्या महासत्ता ज्यांनी महायुद्ध जिंकलं होतं त्यांनाच या युद्धात कोरोनानं नामोहरम करत आणलं. महायुद्ध झाल्यावर काळाची युद्धपूर्व आणि युद्धोत्तर अशी काळाची विभागणी झाली तशी आता कोरोनापूर्व आणि कोरोनोत्तर अशी आता काळाची विभागणी केली जाईल. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले आहेत. कोरोनाची सुरुवातच चीनसारख्या बलाढ्य देशात झाली. पुढारलेल्या युरोपातील सगळ्याच देशात मोठ्या प्रमाणात लागण झाली. अमेरिकेने काकुळतीला येऊन भारतासारख्या गरीब देशाकडे औषधांची मागणी केली. कोरोनाचं संकट भयावह आहेच. पण त्याकडे सकारात्मकतेने पाहिल्यास जगात या रोगाने स्वत:ची एक लोकशाही आणि समानता प्रस्थापित केली असे म्हणता येईल. बलाढ्य, श्रीमंत, अहंमन्य, तसेच दुबळे, गरीब, पिचलेले देश आणि माणसं यांना एकाच पातळीवर आणले. त्यामुळे या काळापुरते का होईना सर्वाना अंतर्मुख होऊन ज्यांच्याजवळ काहींच नाही त्यांचा विचार करायला भाग पाडले हे मात्र खरे. पहिल्यांदाचअसे घडले की श्रीमंत, परदेशी प्रवास करणारे, कार्पोरेट जगतातले उच्चभ्रू इ. या विषाणूचे प्रामुख्याने वाहक झाले. हा विषाणू वरून खाली झिरपत आहे. सामान्य, कष्टकरी, गरीब (शहरी सोडून ) माणूस, गावखेड्यातला, माणूस तसा बिनघोर आहे.
कोरोनापूर्व जग आणि कोरोनोत्तर जग यामध्ये खूप अंतर असेल असा कयास आहे. अर्थव्यवस्था सर्वथैव संकटात आल्याने काटकसर, minimalism अवलंबावे लागेल. कोरोनाच्या "स्टॅच्यु' ने जो पॉज सर्वानी घेतला या पॉजने जगाचं रूप अंतर्बाह्य बदलायला चांगलाच अवसर दिला आहे. अंतरंगातली जळमटं निघून सारे देश आणि माणसं एकमेकांकडे स्वच्छ नजरेने पाहू लागतील. त्यांच्यातला अहंकार,गर्व, पूर्वग्रह कमी झाला असेल. हिसकावण्याची, ओरबाडण्याची वर्चस्ववादी प्रवृत्ती कमी होऊन "वाट्याला आलेलं वाटून घेऊ या' ही वृत्ती बळावेल. एकमेकांप्रती संवेदना, सौहार्द, सद्भावना वाढीस लागली असेल.
संबंध जगभराउच्चंभ्रूतील देशांची आर्थिक घडी विस्कटल्याने त्याचे पडसाद सामाजिक जीवनावर, एकंदर मानवी नातेसंबंधावर झालेले दिसतील. नातेसंबंधांच्या कसोटीचा हा काळ आहे. नातेसंबंध जर सुख आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करू शकणार नसतील तर भ्रमनिरास, भय आणि भ्रांत मनाचा कब्जा घेतील व मानसिक समस्यांचे पेव फुटतील. पाश्च्यात्त्य देशांच्या तुलनेत भारतात कुटुंबव्यवस्थेचे फॅब्रिक अजूनही टिकून राहिल्याने पाठबळ व्यवस्था (support system) अशा समस्यांवर लीलया फुंकर घालू शकेल.
नव्या जगात विशेषतः आपल्या देशात विवेकवाद, उदारमतवाद, सहिष्णुता, बंधुभाव, भगिनीभाव, एलजीबीटीक्यूप्रति समभाव या मूल्यांची नव्याने रुजवण होईल असा आशावाद आहे. आज पोलीस, नर्सेस, डॉक्टर्स, सफाई कर्मचारी इ. जीव धोक्यात घालून बाधितांना रोगमुक्त करण्यासाठी झटणाऱ्या लोकांविषयी जनतेच्या मनात अनुकंपा आणि आदराची भावना व्यक्त होताना दिसते. संकटकाळी मंदिरे, प्रार्थनास्थळे कुलूपबंद तर अनेक नव्या ठिकाणी रुग्णालये उभारली जात आहेत. "मंदिरे माणसाचा प्राण वाचवू शकत नाहीत, रुग्णालये वाचवताहेत' समाजमाध्यमांतून अशा संदेशातून पुढील काळात आरोग्यसुविधांना प्रचंड महत्व येईल. विशेषतः तरुणाईला हे अधिक पटलेले असेल त्यामुळे आरोग्यसासुरक्षेबाबतीत ते आग्रही राहतील. आरोग्यव्यवस्था उत्तम करण्यासाठी दान वा प्रायोजक हा नवा दानधर्म ठरेल. यासाठी धनिक लोक पुढे येतील जसे की अमेरिकेत या रोगावर लस तयार करण्याच्या संशोधन प्रकल्पाचा येईल तो खर्च बिल गेट्स यांनी प्रायोजित केला आहे. कोरोनाच्या सुरुवातीला तोंडाला मास्क लावणं, सॅनिटायजर वापरणं, हात धुणं इ. खूप कटकटीचं वाटायचं. पण माध्यमांनी चहुबाजूनी त्याबाबत लावून धरल्याने लोकांना पटायला लागले. यापुढे आता या बाबी अंगवळणी पडतील. सॅनिटायजर आणि हात धुणं हे तर नित्याचं होऊन जाईल. माणसाच्या हालचालींवर पाळत ठेवणाऱ्या सी सी टी व्ही, सेन्सर, ड्रोन इ. प्रणाली अधिक अद्यावत आणि सक्षम केल्या जातील. सध्या अनेक रुग्णालयात प्रवेश करताना प्रत्येकाला स्पर्शविरहित इन्फ्रारेड तापमापक गनद्वारे शरीराचे तापमान नोंदवून आत सोडले जाते. मास्कप्रमाणे येत्या काळात हृदयाचे ठोके व शरीराचे तापमान मोजणारे ब्रेसलेट प्रत्येकाच्या मनगटावर दिसले तर नवल वाटू नये. संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे आवश्यकही आहे. परंतु हा वैयक्तिक डेटा अन्य काही कारणांसाठी वापरला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेकदा असा डेटा वापरून माणसाच्या खासगी जीवनाच्या स्वातंत्र्यावर गदा आणल्यावरून त्या व्यक्तीने न्यायालयात धाव घेतल्याची उदाहरणे आहेत.
सार्वजनिक आरोग्याबाबत आपल्या देशात असलेली अनास्था यापुढे चालणार नाही असा दबाव जनतेने निर्माण करण्याची वेळ आली आहे. खाजगीकरणाच्या माध्यमातून इन्शुरन्सच्या दावणीला बांधलेल्या सार्वजनिक आरोग्याची सोडवणूक करवून घेतली पाहिजे. संसर्गजन्य आजार झाल्यावर उपचार यंत्रणा भागदौड करून उभी करणं ही तेव्हढ्यापुरती मालमपट्टीच होय. संसर्ग, आजार होऊ नये म्हणून सुसज्ज अशी प्रतिबंधात्मक यंत्रणा असणं याला शाश्वत उपाययोजना म्हणतात. सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, पर्यावरण यांचा सार्वजनिक आरोग्याशी संबंध आहे हे ओळखून पाऊले उचलली पाहिजेत. तशी ती सरकारकडून उचलली जातील अशी आशा धरू या. तरुणवर्ग पर्यावरणाच्या संवर्धनाबाबत सजगता दाखवतो आहे हे अलीकडील काही घटनांवरून दिसले आहे. ग्रेटा थन्बर्गचं उदाहरण कुमारवयीनांना खुणावत आहेच. आरोग्य, पर्यावरण एव्हढचं नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात झालेल्या तथाकथित विकासाच्या हमरस्त्यातून पायी चालणारा सामान्य माणूस खूप दूर लोटला आहे. या दृष्टीने कारोनोत्तर काळ हा जगातल्या विद्वानांना आणि धुरिणांना डोकी लावून बसायला लावेल असे दिसते. भारताच्या भूमिकेला अनन्यसाधारण महत्व असेल. कोणतंही संकट एकटं येत नसून त्याच्याबरोबर नव्या संधी घेऊन येतं असं म्हटलं जात.आज भारतात युवकांची संख्या त्रेसष्ट कोटी आहे. संबंध जग या समृद्ध मनुष्यबळाकडे डोळे लावून बसला आहे. भारतातच यांच्या हाताला काम देण्याची एक योजना आखली तर अर्थव्यवस्था बळकट व्हायला वेळ लागणार नाही. पुढील काळात भारताची विश्वासार्हता व परिश्रमी मनुष्यबळ यामुळे जगातले अनेक मोठे उद्योगधंदे भारतात येण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल. संभाव्य जागतिक अर्थव्यवस्थेच्या पडझडीत भारतीय लोक आणि देश मूळच्या (Inherent) क्षमतांमुळे तुलनेने लवकर सावरेल असे म्हणता येईल.
लेखकाचा संपर्क - ७५०६०६७७०९
ajitbalwant@gmail.com
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.