आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थर्ड आय:कस्तुरी : सुगंधाचा शोध घेणारा सिनेमा

अमरनाथ सिंगएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनाची कुरूप बाजू आपल्याला नेहमी झाकून ठेवावीशी वाटते. समाजजीवनातील अभद्र बाजूंकडे आपण कायम कानाडोळा करत असतो. दुर्गंधी नको तर आजूबाजूला सतत सुगंध दरवळावा असेच प्रत्येकाला वाटते. पण ‘कस्तुरी’ हा सिनेमा तर सुरूच होतो दुर्गंधीपासून. त्याचे अंग अंग व्यापणारी, अशी दुर्गंधी जी काही केल्या त्याचा पिच्छा सोडत नाही.

स्वाभाविकपणे सत्यं-शिवं-सुंदरमकडे आपला ओढा असतो. जीवनाची कुरूप बाजू आपल्याला नेहमी झाकून ठेवावीशी वाटते. समाजजीवनातील अभद्र बाजूंकडे आपण कायम कानाडोळा करत असतो. दुर्गंधी नको तर आजूबाजूला सतत सुगंध दरवळावा असेच प्रत्येकाला वाटते. पण ‘कस्तुरी’ हा सिनेमा तर सुरूच होतो दुर्गंधीपासून. त्याचे अंग अंग व्यापणारी, अशी दुर्गंधी जी काही केल्या त्याचा पिच्छा सोडत नाही.

तो म्हणजे शाळा शिकणारा किशोरवयीन मुलगा गोपी. या सिनेमाचा नायक. १४ वर्षांचा गोपी एका सफाई कामगाराचा मुलगा आहे. दारुड्या वडिलांना कामात मदत करायला गोपीला त्यांच्या सोबत जावे लागते. कधी संडास सफाई तर कधी सरकारी हॉस्पिटलमध्ये मृतदेहांची चिरफाड करण्याचे काम त्याला करावे लागते. शाळेत त्याचे वर्गमित्र त्याला जातीवरून हिणवतात. त्याचा दुस्वास करतात. अभ्यासात हुशार असूनही आपल्याशी दुर्व्यवहार केला जातोय, ही गोष्ट कायम त्याला डाचत असते.

गोपी हीन भावनेने ग्रस्त असतो. त्याला वाटते की मानवी मलमूत्र आणि मृतदेहांची दुर्गंधी त्याच्या संपूर्ण अंगालाच चिकटलीय जणू. वारंवार आंघोळ करून आणि अत्तर लावून त्या दुर्गंधीपासून पिच्छा सोडविण्याचा तो प्रयत्न करत असतो. पुढे त्याला कस्तुरीबद्दल कळते. अंगाची दुर्गंधी जाऊन आपण सुगंधी झालो तर लोकं आपला स्वीकार करतील असे त्याला वाटू लागते. कस्तुरी मिळविण्यासाठी तो अस्वस्थ होतो. कस्तुरीबद्दल त्याला कसे कळते? ती मिळविण्याचा विचार त्याच्या मनात का येतो? त्यासाठी तो काय करतो? अपार कष्ट उपसून आणि जंग जंग पछाडून शेवटी गोपीला कस्तुरी मिळते का? त्यातून त्याला त्या बालवयात काय बोध होतो? हे प्रत्यक्ष पडद्यावर बघणे म्हणजे प्रेक्षकांच्या दृष्टीने एक वेगळा अनुभव ठरतो.

कथा खूप मोठी नाही. तिचा परीघ तसा लहानच आहे. पण त्यातून जे सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ पुढे येतात त्याचा परीघ मात्र खूप व्यापक आहे. जातव्यवस्था हे आधुनिक भारतीय समाजाचे दुख:द वास्तव आहे. दिग्दर्शक विनोद कांबळे कुठेही आक्रस्ताळे न होता, संयमित पद्धतीने त्यांच्या विशिष्ट शैलीत हा प्रखर सामाजिक विषय हाताळतात. हा चित्रपट म्हणजे अगदी लहान लहान दृश्यांची काव्यात्मक मालिका आहे. रोजच्या जीवनातील साध्या वाटणार्‍या घटना कथासूत्रात ओवून दिग्दर्शकाने वेगळी चुणूक दाखविली आहे. इराणी सिनेमात माजिद माजिदी जे प्रयोग करतो, त्या शैलीची सहज आठवण येते. इराणी सिनेमाच्या शैलीचा हा भारतीय आविष्कार प्रेक्षकाला बांधून ठेवतो.

साधेपणा हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे प्रेक्षकाला तो आपलासा वाटू लागतो. कमीत कमी संवाद आणि छोट्या-छोट्या दृश्यांमधून छानपैकी कथा उलगडत जाते. हा चित्रपट सबटेक्स्टचा आणखी एक उत्तम नमुना आहे. सिनेचौकटीचा गर्भित अर्थ असलेल्या दृश्यभाषेमुळे ही कलाकृती अनोखी ठरते. सिनेमाटोग्राफर मनोज काकडे आणि एडिटर श्रीकांत चौधरी यांनी उत्तम कामगिरी केली आहे. पटकथा आणि विशेषतः शॉट डिव्हिजनवर विनोद कांबळे आणि सहलेखक शिवाजी करडे यांनी व्यवस्थित काम केलेले दिसते. पटकथेची मांडणी गतिमान आणि कथनशैली प्रवाही आहे. प्रत्यक्ष वास्तविक स्थळांवर केलेले चित्रण प्रभावी आहे. दिग्दर्शकाच्या मते सर्व चित्रण प्रत्यक्ष वास्तविक लोकेशनवर केलेले असून, फक्त पोस्टमार्टमच्या रूमचा सेट-अप तेव्हढा उभा केला गेला होता. तो सेट एकदम वास्तविक वाटतो. यात कला दिग्दर्शक अतुल लोखंडे यांचे कौशल्य लक्षात येते. पोस्टमार्टमची दृश्ये किळसवाणी न वाटता मनात प्रचंड कालवाकालव निर्माण करतात. जयभीम शिंदे यांच्या पार्श्वसंगीताचा आवश्यक तिथे मोजकाच वापर दृश्यांना खुलवतो. साऊंड रेकोर्डिस्ट शोएब मणेरी यांनी पकडलेले अঁबियन्सचे आवाज उत्तमप्रकारे वातावरण निर्मिती करतात.

एकूण निर्मितीमूल्यांचा विचार केला तर काही कमजोर्‍या पण जाणवतात. उदाहरणार्थ, पौगंडावस्थेतील गोपीचा भावनिक कोंडमारा अधिक गहिरा दाखविता आला असता. तसेच त्याचा बाप अगदीच नकारात्मक रूपात रंगविला आहे. खरंतर तो सुद्धा या जात-वर्ग व्यवस्थेचा बळी आहे. तो असा का बनला याची उकल कलात्मक पद्धतीने करता आली असती. काही ठिकाणी कॅमेरा अधिक कल्पक पद्धतीने वापरता आला असता. मेक-अप व प्रकाश योजनेकडे अधिक लक्ष द्यायला हवे होते. मात्र अवश्य अनुभवावी अशी ही कलाकृती नक्कीच आहे.

या सिनेमाचा नायक गोपी आहे. कथा त्याच्या भावनांशी निगडीत आहे. परंतु सिनेमा फक्त त्याच्यावर केन्द्रित नाही. त्याच्या आसपास एक जग आहे. आपण ते लांबून पाहिलेले असते. परंतु त्याचे अंतरंग आपल्याला तितकेसे माहीत नसतात. विनोद कांबळे विविध पात्रांच्या माध्यमातून ते जग हळुवार उभे करतात. समर्थ सोनवणे(गोपी), वैशाली केंदळे (आई), जन्नत (दादी) आणि श्रवण उपलकर (आदिम) हे त्यांची भूमिका अक्षरशः जगले आहेत. अनिल कांबळे यांनी भ्रष्टवृतीचा तिरसट कंपाउंडर, कुणाल पवार यांनी तुसड्या स्वभावाचा पारधी कमी दृश्यात छान उभे केले आहेत. अत्तरवाला मामूच्या भूमिकेत लालाभाई आणि वडिलांच्या भूमिकेत मलसिद्ध देशमुख काही सेकंदांच्या फ्रेम असूनही कायमचे लक्षात राहून जातात. यातील दोन कलाकार सोडले तर बाकी सर्व पहिल्यांदाच कॅमेराला सामोरे गेले आहेत. ते ‘नॉन अॅक्टर’ आहेत म्हणून अगदी वास्तव आणि प्रभावी वाटतात. त्यांच्या सहज वावरामुळे आणि विशिष्ट बोलीभाषेमुळे सिनेमाला रसरशीतपणा आला आहे. सिनेमात मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा प्रामुख्याने असल्याने या सिनेमाला कोणत्याही एका भाषेच्या चौकटीत टाकता येणार नाही. या सिनेमात एकही गाणे नाही. केवळ जगणे आहे. कष्टकरी माणसांचे जगणे. ज्यांचे श्रम समाजाला हवे आहेत. पण त्यांच्या मनात डोकावायला कोणी तयार नाही. सगळीकडे ते उपरे बनून वावरतात. दिग्दर्शक विनोद कांबळे त्यांच्या मनाची कवाडे हळुवार उघडत प्रेक्षकाला वेगळी काव्यात्मक अनुभूती देतात. ही कथा सत्य घटनांवर आधारित आहे. दिग्दर्शक विनोद कांबळे म्हणतात की, “माझे वडील बार्शी नगरपालिकेत सफाई कामगार आहेत. लहानपणापासून आपल्या आसपास जे पहात आलो त्यालाच मी चित्रपटकथेचे रूप दिले. सर्व लोकेशन बार्शीतील वास्तविक ठिकाणे आहेत. आणि जवळपास सर्व कलाकार इथले स्थानिक लोक आहेत”

विनोद कांबळेंनी कोणत्याही इंस्टिट्यूटमध्ये चित्रपट निर्मितीचे धडे घेतलेले नाहीत. ते वाचन, निरीक्षण आणि अनुभवातून विकसित झाले. बार्शी सारख्या छोट्या गावात राहून साधनहीन अवस्थेतला त्यांचा प्रवास खूप खडतर होता. असे नव्या दमाचे लोक आपल्या दमदार कलाकृती घेऊन आता सिनेमात पदार्पण करतायत. यांच्या प्रवेशाने सिनेमाच्या कक्षा अधिक रुंदावणार आहेत. त्याचे सौंदर्यशास्त्र अधिक उन्नत होणार आहे. पण केवळ प्रतिभा असून चालत नाही. चित्रपट निर्मितीच्या खर्चीक प्रक्रियेत आर्थिक पाठबळ महत्वाचे असते. या सिनेमाच्या निर्मात्या आठ महिला आहेत. हे आणखी एक वैशिष्ट्य. या निर्मात्यांनी विनोद कांबळेंच्या मनातील आंदोलने आणि त्याच्यातील सुप्त गुण जोखले. ‘इनसाईट फिल्म्स’ या संस्थेच्या माध्यमातून त्या खंबीरपणे विनोद कांबळे यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. ही जाण असलेले निर्माते आगामी काळात सिनेमाचे परिदृश्य बदलू शकतील. प्रतिभावान पण साधनहीन असलेल्या तरुण दिग्दर्शकांच्या दृष्टीने ही आशादायक बाब आहे. सांस्कृतिक क्षेत्रावर पुण्या-मुंबईचा वरचष्मा असला तरी आडगावात राहणारे दुर्लक्षित कलाकार सुद्धा आता जोमाने पुढे येऊ शकतील.

वास्तववादी सिनेमाचे उत्तम उदाहरण असलेल्या 'फँड्री'ची आठवण जागी करणारा हा सिनेमा आहे. प्रत्येक फ्रेममधून काहीतरी वेगळे मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. तो आपल्या सुप्त संवेदनांना जागं करतो. हा सिनेमा आपल्याला जीवन जसे आहे तसे दाखवतो. हे या सिनेमाचे शक्तिस्थळ आहे. एका सामान्य मुलाच्या रोजच्या जगण्यातून समाजव्यवस्थेचे विविध कंगोरे पुढे आणत दिग्दर्शकाने नाकारले गेलेल्या समुदायाची कथा अत्यंत संयत पद्धतीने मांडली आहे.

स्वच्छतेचे काम करणारा एक मोठा समुदाय आपल्या आसपास आहे. उत्तरेकडच्या राज्यातून स्थलांतरित होऊन आलेले मेहतर समाजाचे हे लोक महाराष्ट्रभर आढळतात. आपले आरोग्य राखण्यासाठी ते रात्रंदिवस झटत असतात. त्या समाजातील गोपीसारखी मुले परिस्थितीने जखडलेली आहेत. त्या असहाय अवस्थेतही सुंदर जीवनाचे स्वप्न ते पाहतात. त्या स्वप्नांचा हा सिनेमा आहे. दिग्दर्शक वेदनेचे गार्‍हाणे मांडत नाही. तर तो माणसातला माणूस उलगडून दाखवतो. अशा प्रकारे दुर्गंधीची कथा सांगणारा हा चित्रपट उदात्त विचारांच्या सुगंधावर संपतो.

या चित्रपटाने मुंबई, दिल्ली, औरंगाबाद, धर्मशाला, त्रिशूर, बঁगलुरू आणि न्यूयॉर्क आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘बेस्ट चाइल्ड अॅक्टर’ आणि ‘स्पेशल मेंशन ज्यूरी एवार्ड’ आतापर्यंत त्याला मिळाले आहेत. लवकरच ‘इनसाईट फिल्म्स’ तर्फे तो भारतभर प्रकाशित केला जाणार आहे.

amarlok2011@gmail.com

संपर्क - 8975780384

बातम्या आणखी आहेत...