आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Amol Udgirkar Rasik Article On Scam 1992 The Harshad Mehata Story Web Series

रसिक स्पेशल:"बॅड बॉय' की "अँटी हिरो'?

अमोल उदगीरकर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्थशास्त्र हा विषय भारतीय मनोरंजन क्षेत्राने बाजूला टाकलाय असं मत बनत असतानाच हर्षद मेहता या स्टॉक ब्रोकरवर बनलेली "स्कॅम १९९२-द हर्षद मेहता स्टोरी' ही वेबसिरीज आणि "बॅड बॉय मिलेनियर्स -इंडिया ' ही एकेकाळी अत्यंत यशस्वी असणाऱ्या पण अनेक आर्थिक घोटाळ्यांमुळे अधःपतन झालेल्या उद्योगपतींवर प्रकाशझोत टाकणारी डॉक्युमेंट्री एका पाठोपाठ प्रदर्शित झाली. किचकट आर्थिक संकल्पना समजण्यास अवघड असल्याने प्रेक्षकांना या विषयावरच्या कलाकृती कळण्यास अवघड जातात हा समज मोडीत काढून या कलाकृतींना भारतीय प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

अर्थशास्त्र हा विषय भारतीय मनोरंजन क्षेत्राने बाजूला टाकलाय असं मत बनत असतानाच हर्षद मेहता या स्टॉक ब्रोकरवर बनलेली "स्कॅम १९९२-द हर्षद मेहता स्टोरी' ही वेबसिरीज आणि "बॅड बॉय मिलेनियर्स -इंडिया ' ही एकेकाळी अत्यंत यशस्वी असणाऱ्या पण अनेक आर्थिक घोटाळ्यांमुळे अधःपतन झालेल्या उद्योगपतींवर प्रकाशझोत टाकणारी डॉक्युमेंट्री एका पाठोपाठ प्रदर्शित झाली. 'बॅड बॉय मिलेनियर्स -इंडिया 'मध्ये किंगफिशर कंपनीचा मालक विजय माल्या, पंजाब नॅशनल बँकेला करोडोंची टोपी घालणारा नीरव मोदी आणि एके काळच्या पॉवर क्लबचे सदस्य (या क्लब मध्ये अमर सिंह, अनिल अंबानी,अमिताभ बच्चन यांचा समावेश होता) आणि सहारा ग्रुपचे मालक सुब्रतो रॉय यांच्या आयुष्याचा आढावा घेतला आहे. किचकट आर्थिक संकल्पना समजण्यास अवघड असल्याने प्रेक्षकांना या विषयावरच्या कलाकृती कळण्यास अवघड जातात हा समज मोडीत काढून या कलाकृतींना भारतीय प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. कारण दोन्ही कलाकृतीच्या निर्मात्यांनी आर्थिक संकल्पनांवर हवा तितकाच जोर देऊन, या उद्योगपतींच्या मानवी बाजूंवर आणि गुणदोषांवर भर दिला आहे . "स्कॅम 1992' हा फिक्शन स्वरूपातला आणि "बॅड बॉय मिलेनियर्स ' हा नॉन फिक्शन स्वरूपातला मनोरंजन प्रकार असला तरी, या दोन्ही कलाकृतींना जोडणारे अनेक समान धागे आहेत. या कलाकृती बदनाम उद्योगपतींबद्दल बोलतातच पण त्या विषयाच्या अनुषंगाने समाज, यंत्रणा, बँकिग व्यवस्था, अर्थव्यवस्था यावरही भाष्य करतात. या दोन्ही कलाकृतीमध्ये "उदात्तीकरण' किंवा "प्रतिमा मर्दन' यांच्या सापळ्यात न अडकता प्रत्येकाला आपली बाजू मांडता येईल याची काळजी निर्मात्यांनी घेतली आहे.

दोन्ही कलाकृतींचं "स्ट्रक्चर'देखील समान आहे. एका शून्य बिंदूपासून या उद्योगपतींचा सुरु झालेला प्रवास, त्यांच्या अंगभूत गुणांनी त्यांनी गाठलेलं प्रगतीचं शिखर आणि त्यांच्याच अंगभूत दोषांनी त्यांचं झालेलं अधःपतन अशा तीन टप्प्यांमध्ये या सगळ्यांचा प्रवास दाखवलेला आहे. यापलीकडे जाऊन या उद्योगपतींना जोडणारे काही रोचक,यापूर्वी फारसे प्रकाशझोतात न आलेले मुद्दे या दोन्ही कलाकृतींमध्ये दिसतात.

हर्षद मेहतामुळे "लेक्सस सिंड्रोम' नावाचा एक नवीन सिंड्रोम तयार झाला. त्याच्या सुगीच्या काळात हर्षद मेहताने गुंतवणूकदार, प्रसारमाध्यमं, सत्तावर्तुळ या सगळ्यांना एकदम खुश ठेवलं होतं .कुजबुजत्या आवाजातल्या चर्चा सोडल्या तर हर्षदविरुद्ध कुणी "ब्र' देखील काढत नव्हता. पण वरकरणी निरुपद्रवी वाटणाऱ्या एका घटनेनं हे चित्र बदललं. हर्षदला महागड्या गाड्यांचा शौक होता. स्वतःजवळ असणाऱ्या "लेक्सस' या लक्झरी गाडीचा हर्षदला प्रचंड अभिमान. सगळीकडे ही लक्झरी गाडी मिरवण्यात त्याचा इगो सुखावायचा. त्याकाळी ही गाडी भारतात फार कमी लोकांकडे होती. त्या गाडीसोबत "बिजनेस इंडिया' किंवा अशाच कुठल्या तरी मासिकाच्या कव्हरवर हर्षदचा फोटो झळकला आणि हर्षदची अमाप श्रीमंती लोकांच्या डोळ्यात खटकायला लागली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ऑफिससमोर सतत उभ्या असणाऱ्या लेक्सस गाडीनेच पत्रकार सुचेता दलालला (हिनेच पुढे जाऊन हर्षद मेहताने केलेला घोटाळा उघडकीला आणला) हर्षदचा संशय यायला लागला. एकेकाळी चाळीत राहणाऱ्या हर्षदकडे ही गाडी कुठून आली,या उत्सुकतेमधून हर्षदकडच्या पैशाचा सोर्स शोधण्याची शर्यत सुरु झाली . "स्कॅम 1992' मध्ये हे लेक्सस प्रकरण विस्ताराने दाखवलं आहे. "बॅड बॉय मिलेनियर्स' बघताना त्यातल्या उद्योगपतींच्या आयुष्यात पण हा लेक्सस सिंड्रोम दिसतो हा योगायोग असावा का ? 'किंगफिशर एयरलाईन्स ' च्या कर्मचाऱ्यांचे अनेक महिन्यांचे पगार थकलेले असताना आणि रस्त्यावर कर्मचाऱ्यांची आंदोलने चालू असतानाच विजय माल्याने स्वतःच्या मुलाच्या एकविसाव्या वाढदिवसाची अतिशय लॅव्हिश पार्टी दिली. या पार्टीचे फोटोग्राफ्स, पार्टीमधल्या उंची मद्यांचे ब्रँड, महागडे खाद्यपदार्थ यांच्या बातम्या बाहेर पडल्या आणि माल्याविरुद्ध गुंतवणूकदार, कर्मचारी, वेंडर्स यांच्या मनात रागाची ठिणगी होती, तिचं वणव्यात रूपांतर झालं. आपल्या देणेकऱ्यांच्या जखमेवर ही पार्टी देऊन माल्याने जणू मीठ चोळलं. या पार्टीनंतर सरकारी यंत्रणांनी माल्याच्या नाड्या आवळायला सुरुवात केली. सुब्रतो रॉय यांच्या सोबतही असंच घडलं. २००४ साली रॉय यांनी स्वतःच्या दोन मुलांच्या लग्नांमध्ये पाण्यासारखा खर्च केला. त्याचवेळेस पैशाच्या गुंतवणुकीवरचा परतावा न मिळाल्याने सहारा ग्रुपविरुद्ध आरडाओरडा सुरु झाला होता. ह्या लग्नात भारतातला जवळपास प्रत्येक लोकप्रिय माणूस आमंत्रित होता. या लग्नाच्या व्हिडीओ शूटिंगची जबाबदारी राजकुमार संतोषीसारख्या तत्कालीन आघाडीच्या दिग्दर्शकांकडे होती. हा आलिशान लग्न सोहळा गरीब लोकांच्या बचतीतून होत आहे, हे जे पर्सेप्शन तयार झालं होतं, ते सहाराश्रींच्या विरुद्ध गेलं आणि त्यांच्या अधःपतनाला सुरुवात झाली. 'स्कॅम 1992' मध्ये दिग्दर्शक हंसल मेहताने आणि 'बॅड बॉय मिलेनियर्स 'च्या निर्मात्यांनी ही 'लेक्सस मोमेंट' अचूक पकडली आहे.

सिनेमात किंवा सिरीजच्या लिखाणात 'कॉन्फ्लिक्ट' फार महत्वाचा समजला जातो. 'कॉन्फ्लिक्ट' नसेल तर कथानक सपाट बनेल त्यात अवघड वळण येणारच नाही. दोन्ही कलाकृतीच्या निर्मात्यांना हे पक्क माहित आहे आणि ही मोमेन्ट त्यांनी फार अचूक पकडली आहे . पण हा 'लेक्सस सिंड्रोम ' जितकं या उद्योजकांबद्दल सांगतो तितकंच आपल्या जनमानसाबद्दल सांगतो. आपल्या जनतेला श्रीमंतीबद्दल आक्षेप नाहीये, पण श्रीमंतीचं ओंगळवाणं प्रदर्शन कुणी करू लागलं की त्यांना ते खटकू लागतं. टाटा आणि नारायणमूर्ती यांच्याबद्दल जितका सन्मान सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे, तितका इतर उद्योगपतींबद्दल नाहीये हे वास्तव आहे. 'फकिरी ' पणाचे दाखले जाऊन समाजकारणात -राजकारणात मोठी झालेली कित्येक माणसं गेल्या दशकात झाली. आपल्या सरासरी भाबडेपणाचं हे उदाहरण. जनमानस पाऱ्यासारखं असतं हेच खरं...

अशीही एक थिअरी मांडली जाते की हे आर्थिक गैरव्यवहारांमध्ये अडकलेले 'बॅड बॉयज' हे एकतर आउटसाइडर होते किंवा प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देऊन स्वतःची नवीन व्यवस्था उभी करू पाहणारे होते. त्या अर्थाने ही लोक काळाच्या पुढे होती किंवा स्वतःचा छोटासा कळप बनवून बसलेल्या अन्यायकारी प्रस्थापित व्यवस्थेला आवाहन देणारी होती. या आव्हानवीरांची पद्धत भले कायदेशीर मार्गांमध्ये बसणारी नव्हती,तरी त्यांच्याकडे स्वतःची म्हणता येईल अशी व्हिजन होती. उदाहरणार्थ छोट्या उद्योगपतीचा मुलगा असणारा आणि शेअर मार्केटची कुठलीही पार्श्वभूमी नसणारा हर्षद मेहतासारखा बहिस्थ स्टॉक मार्केटमध्ये आणि मनी मार्केटमध्ये घुसू पाहत होता, तेंव्हा प्रस्थापित धेंडांनी हर्षदच्या मार्गात वारंवार अडथळे आणले. या उच्चभ्रू लोकांना, चाळीत राहणाऱ्या आणि श्रीमंत लोकांच्या मॅनर्सचा गंध नसणाऱ्या हर्षदबद्दल तिटकारा होता. आपल्या 'इलाईट क्लब' मध्ये या माणसाला येऊ देण्याची या प्रस्थापितांची तयारी नव्हती. त्यांनी हर्षदचे आर्थिक स्रोत कसे आवळले आणि त्याला आपल्या क्लबमध्ये येण्यात किती अडथळे आणले हे 'स्कॅम 1992-द हर्षद मेहता स्टोरी' मध्ये फार वास्तविकपणे दाखवले आहे. या प्रस्थापित व्यवस्थेने असहकाराचं धोरण स्वीकारल्यामुळे हर्षदला नाईलाजाने पैसा उभारण्यासाठी बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करावा लागला. हर्षदच्या डाऊनफॉलमध्ये या बड्या धेंडांनी मोठा वाटा उचलला. निरव मोदी आणि विजय माल्याला औद्योगिक वारसा असला तरी ते त्यांच्या क्षेत्रात अशा काही गोष्टी करू पाहत होते, जे देशातल्या काही शक्तींना रुचणारे नव्हते. सुब्रतो रॉय यांनी तर खेड्यापाड्यातल्या लोकांकडून छोट्या ठेवी स्वीकारून आपलं अवाढव्य आर्थिक साम्राज्य उभं केलं. प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देताना त्यांनी स्वतःचीच एक समांतर व्यवस्था उभी केली आणि उपकृतांचा नवीन वर्ग तयार केला.

अर्थातच प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देण्यामागे कुठलाही उदात्त, लोकांचं भलं करण्याचा हेतू नव्हता. हे आव्हान देण्याच्या मागे स्वतःला लाभ व्हावा हीच स्वार्थी प्रेरणा होती हे ही खरचं. हे सगळं करत असताना त्यांनी कायदे पायदळी तुडवले, बँकांचे सुरक्षितताविषयक नियम पाहिजे तसे वाकवले, आणि शेवटी त्यांच्यामुळे हजारो परिवार देशोधडीला लागले. पण याची सुरुवात बेड्या बनलेल्या व्यवस्थेला आणि स्वहिताच्या प्रेमात पडलेल्या प्रस्थापितांना आव्हान देण्यापासून सुरुवात झाली होती, ही गोष्टच या लोकांना आदर्श अँटी हिरो बनवते. भारतीय लोकांचं अँटी हिरो प्रेम तर जगजाहीर आहे. 'स्कॅम 1992' च्या पहिल्या पाच एपिसोड्समध्ये आपल्याला हर्षद मेहताबद्दल कुठंतरी सहानुभूती वाटतं असते आणि 'बॅड बॉय मिलेनियर्स' च्या प्रत्येक एपिसोडच्या पहिल्या अर्ध्या तासात सरकारी बँकाना यथेच्छ लुटणाऱ्या निरव मोदी,माल्या मंडळींबद्दल फारसा राग येत नाही,याचं कारण हेच असावं.

मणिरत्नमच्या 'गुरु ' सिनेमात (अधिकृतपणे कोणी कबूल करत नसलं तरी हा सिनेमा धीरूभाई अंबानींच्या आयुष्यावर आधारित आहे,असं मानलं जातं) एक प्रसंग आहे. धंदा उभा करताना नियम मोडले म्हणून गुरुभाईला (अभिषेक बच्चन) चौकशी समितीसमोर उभं केलं जातं. या सगळ्यांना उत्तर देताना गुरूभाई सांगतो ," मी माझ्या बायको आणि मेव्हण्यासोबत बिझनेस करण्यासाठी या शहरात आलो, तेंव्हा बिझनेस करण्याचे सगळे दरवाजे आमच्यासाठी बंद होते. ते दरवाजे उघडण्याचे दोनच पर्याय होते. एकतर लाथ घालून दरवाजा तोडायचा नाहीतर दरवाजाच्या रखवालदारांना सलाम करायचा. मी गरज पडली तिथं लाथ घालून दरवाजा तोडला आणि गरज पडली तिथं सलाम (पक्षी -लाचलुचपत, प्रलोभन इत्यादी) केला. आणि तुम्ही आज मला हे दरवाजे का तोडले असा प्रश्न विचारत आहात." 'स्कॅम 1992' मध्ये संयुक्त संसदीय समितीसमोर जबाब देताना हर्षद मेहता अगदी गुरुभाईंसारखाच युक्तिवाद करतो. आपली कुडमुडी भांडवलशाही ही तरुण उद्योजकांच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवू शकेल इतकी समर्थ आहे का? आपण एक उद्योगस्नेही व्यवस्था उभी करण्यात यशस्वी झालोय का? या प्रश्नांची उत्तर नकारार्थी आहेत हे या दोन कलाकृती बघताना सतत जाणवत राहतं.

या दोन्ही कलाकृती बघितल्यावर दोन अस्वस्थ करणारे निष्कर्ष समोर येतात. या दोन्ही कलाकृतींमध्ये एक विस्तीर्ण काल पट आहे. शेअर मार्केटशी संबंधित अनेक गुंतवणूकदार, सटोडीए, बेयर्स, बुल्स, सेबीचे अधिकारी, रिझर्व्ह बँकेचे अधिकारी, अनेक राष्ट्रीयकृत बँकामधले महत्वाचे अधिकारी, विदेशी बँकांमधले लोक, दिल्लीच्या सत्तावर्तुळामधली माणसं, अनेक सरकारी तपास यंत्रणांमधले अधिकारी, तत्कालीन माध्यमांमधले पत्रकार अशी भरपूर पात्र/ खरीखुरी माणसं यात आहेत. पण महाराष्ट्राच्या राजधानीत घडणाऱ्या एवढ्या महत्वाच्या आणि देशाला हादरवून सोडणाऱ्या घटनाक्रमामध्ये एक दोन ओझरते अपवाद वगळता मराठी माणूस औषधाला पण दिसत नाही.आताही परिस्थिती फारशी वेगळी नसावी ही खंत जाणवत राहते. आंदोलनं, संकुचित विश्वात वावरणारी साहित्यनिर्मिती, आयुष्यात सुरक्षितता शोधण्याच्या नादात मराठी माणसाला या महत्वाच्या आर्थिक जगात डोकवण्यास वेळच मिळाला नसावा.

दुसरा निष्कर्ष अजूनच अस्वस्थ करणारा आहे. हर्षद मेहताच्या आयुष्याचा काही काळ जेलमध्ये गेला आणि मृत्यू पण जेलमध्येच झाला. एरवी हर्षद आपलं श्रीमंत आयुष्य चवीने जगला परंतू त्याच्यामुळे देशोधडीला लागलेले अनेक सामान्य परिवार रस्त्यावर आले. काहींनी आत्महत्या देखील केल्या. निरव मोदी आज लंडनमध्ये आहे पण पंजाब नॅशनल बँकेचे अनेक खातेदार मुळापासून हादरले. पंजाब नॅशनलच्या एका साध्या क्लर्कला निरपराध असूनही आयुष्यभरासाठी नरकयातना भोगाव्या लागत आहेत. सुब्रतो रॉय आज जामिनावर बाहेर आहे, पण सहारामध्ये पैसे गुंतवणारे अनेक गरीब परिवार उध्वस्त झाले आहेत. घोटाळे करणारे, त्यांना मदत करणारे, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे राजकारणी हे सुशेगात आहेत आणि नेहमीप्रमाणे सर्वसामान्य माणूस यात खपला आहे, त्याला कुणीही वाली नाही. निरव मोदीच्या एपिसोडमधला तो बँकेचा क्लार्क, सुब्रतो रॉयच्या एपिसोडमधली ती पैसे गोळा करणारी सहाराची एजंट, निरव मोदीच्या कंपनीत काम करणाऱ्या आणि आता बेरोजगार असणाऱ्या दोन बाया या नाव गाव नसलेल्या आणि आयुष्यातून उठलेल्या लोकांचे विझलेले चेहरे बघणं हे आपल्या व्यवस्थेचं दारुण चेहरा बघण्यासारखं आहे.

amoludgirkar@gmail.com

बातम्या आणखी आहेत...