आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:मान्सूनचा ‘अर्थ’ अन् अन्वयार्थ

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मान्सूनचा ‘अर्थ’ अन् अन्वयार्थ

लहानपणीचे एक गाणे आठवते, ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा, पाऊस आला मोठा, पैसा झाला खोटा. सर्व जग कोरोनाविरुद्धच्या लढाईत गुंतले अाहे. त्यात हे गाणे आठवायचे कारण म्हणजे, भारतीय हवामान खात्याचा यंदाचा पहिला दीर्घकालीन अंदाज. देशाच्या दीर्घकालीन सरासरीइतका अर्थात ९६ ते १०४ टक्के पाऊस होईल असे हवामान खात्याने म्हटले आहे. हवामान खाते एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पहिला तर मे च्या अखेरीस दुसरा अंदाज प्रसिद्ध करते. यंदाचा लॉकडाऊनच्या काळातील हा पहिला अंदाज देशवासियांसाठी अनेक अर्थाने दिलासा देणारा ठरावा. कोरोनाच्या कहरामुळे देशातील अर्थव्यवस्था ठप्प असताना चांगल्या पावसाच्या अंदाजाने निराश मनावर चैतन्याचे तुषार पडले. आपली अर्थव्यवस्था मोसमी पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे मान्सूनच्या अंदाजाचा अन्वयार्थ समजून घेणे महत्त्वाचे ठरते. देशाला सर्वाधिक रोजगार देणाऱ्या कृषी क्षेत्रासाठी जेवढा हा अंदाज दिलासादायी आहे तेवढाच तो निर्मिती क्षेत्रासाठीही आहे. कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत एकूण २७ कोटी लोकांना रोजगार मिळतो. मात्र या २७ कोटी लोकांवर देशातील ६० कोटींपेक्षा जास्त लोक अवलंबून आहेत. शेतीचा खरीप हंगाम जूनपासून सुरू होतो. मान्सूनमध्ये चांगला पाऊस झाल्यास शेती क्षेत्राच्या विकास दरास चालना मिळणार आहे. कृषीनंतर सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र म्हणजे निर्मिती क्षेत्र. देशातील सुमारे १३% रोजगार या क्षेत्रात आहे. पाऊस चांगला झाल्याने निर्मिती क्षेत्राला तो उभारी देणारा ठरेल. कोरोनामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व आर्थिक कोंडीत मान्सूनचा पाऊस हा भारतासारख्या कृषीप्रधान देशासाठी आशेचा किरण आहे. प्रत्यक्ष पावसाला सुरूवात होईपर्यंत कोरोनाचे संकट दूर झालेले असेल अशी आशा तर आहेच. देशात पाऊस चांगला झाला तरच गावगाड्याला वंगण मिळणार आहे. नैऋत्य मान्सूनच्या प्रवासात खोडा ठरणारे अल निनोचे सावट यंदा नसेल असे हवामान खात्याने या अंदाजात म्हटले आहे. देशात सरासरीच्या ९० ते ११० टक्के पाऊस होण्याची शक्यता ९१ टक्के असून दुष्काळाची शक्यता फक्त नऊ टक्के आहे. हा सर्वात दिलासा देणारा भाग आहे. कारण दुष्काळ पडणार नाही, हे एकच कारण अनेक क्षेत्राला उभारी देणारे आहे.  कोरोनामुळे झालेले अर्थव्यवस्थेचे नुकसान अनेकपटीने भरुन काढण्याची ताकद मान्सूनमध्ये आहे. अंदाजाप्रमाणे मान्सूनने यंदा सरासरी गाठली तर सोन्याहून पि‌वळे. जग कोरोनामय झालेले अाहे. अनेक क्षेत्रापुढे उभारणीचे मोठे संकट अाहे. अनेकांना नैराश्येने ग्रासलेले असताना मान्सूनचा हा अंदाज या सर्वांसाठी आशेचा किरण घेऊन आलेला आहे. ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेचे ‘लॉक’ डाऊन करण्याची कळ मान्सूनच्या हाती आहे.  हाच या मान्सून अंदाजाचा खरा ‘अर्थ’ आहे.

बातम्या आणखी आहेत...