आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत बँकांना द्यायच्या व्याज दरात (रिव्हर्स रेपो रेट) २५ टक्के घट केल्याची घोषणा करताना बँकांनी शेअर होल्डरना लाभांश देण्यावर यंदा बंदी घालण्याचा निर्णयही जाहीर केला. बँकांकडील निधीमध्ये पैसा राहावा, हा त्यामागे उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. लाभांशाची एकुणात रक्कम फार नसली तरी रिझर्व्ह बँकेने शेअर होल्डरच्या खिशाला कात्री लावली. दास यांनी पत्रकार परिषदेत कोरोनानंतर २०२०-२१ या वर्षात भारताची स्थिती काय असेल, याबाबत भलतेच आशावादी चित्र रंगवले आहे. त्यांचे हे रंगकाम पाहताना भारतीय बँकिंग प्रणालीतील शिखर संस्थेचा सर्वाेच्च अधिकारी बोलतो आहे की, सरकारचा एखादा मंत्री बोलतो आहे, याची शंका वाटावी अशा प्रकारचे त्यांचे वक्तव्य आहे. मावळत्या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर १.९ टक्के असेल, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. मावळत्या आर्थिक वर्षातील विकासदराबाबत रिझर्व्ह बँकेचे अगदी अलीकडचे अंदाज हे बदलते राहिले आहेत. फेब्रुवारीमध्ये पतधोरण जाहीर करताना रिझर्व्ह बँकेने शेवटच्या तिमाहीत ६ टक्क्यांची वाढ अपेक्षित केली होती. तेव्हा भारतात कोरोनाची सुरुवात व्हायची होती. पुढे मार्चच्या अखेरीस कोरोना प्रारंभानंतर ४.७ टक्क्यांची वाढ राहील, अशी अपेक्षा दास यांनी व्यक्त केली होती. या वक्तव्यास तीन आठवडे झाल्यानंतर त्यांच्या बोलण्याची दिशा बदलली. आता विकासदराचा आकडा कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे होणाऱ्या परिणामावर अवलंबून असल्याचे बोलले जाते. २०२०-२१ या आर्थिक वर्षात कोरोनाचा वैश्विक परिणाम भारतावर व जगात किती काळ व किती तीव्र राहील, यावर ते अवलंबून असणार आहे. संकट लांबले आणि जागतिक आयात निर्यातीवर प्रतिकूल परिणाम झाला तर जागतिक मंदीचे संकट आणखीन तीव्र होईल, की ज्याचे पडसाद भारतावरही नक्कीच होणार. अशा स्थितीतही दास यांना अाशेचे किरण दिसत आहेत. त्याची चार कारणे सांगतात. मागच्या कृषी व रब्बी हंगामात अन्नधान्याचे भरघोस उत्पादन व साठा असतानाच हवामान खात्याने १०० टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचबरोबर औद्योगिक उत्पादन व निर्यात अगोदरच्या सात महिन्यांपेक्षा वाढली. महागाई वाढीचा दर ४ टक्क्यांपेक्षाही कमी राहील, अशी कारणे ते सांगतात. यामुळे भारताचा विकास दर ७.४ टक्के राहील, असे भाकित दास यांचे आहे. देशात जी क्षेत्रे वाढीची आहेत, असे ते म्हणतात ती खरीच वाढतील का? याची खात्री त्यांनाही देता येत नाही. अर्थात कोरोनाची पार्श्वभूमी त्यामागे आहे. असे असताना २०२०-२१ या वर्षात विकासदर ७.४ टक्क्यांपर्यंत वाढीचे वळण भारतीय अर्थव्यवस्था घेईल, हा दास यांचा आशावाद आता तरी सत्ताधाऱ्यांना सोइस्कर गोड वाटेल, असा आहे. देशभरातले अर्थतज्ज्ञ त्याचे कितपत समर्थन करतील, याची शंकाच आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.