आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रंथार्थ:ग्रामीण वास्तवाचा कलात्म वेध...

अंजली कुलकर्णी7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या समकालीन कवितेचा एक स्वर आधुनिक जाणिवेतून ग्रामीण अनुभवविश्वाला मुखर करणारा आहे. या पार्श्वभूमीवर नामदेव कोळी यांचा "काळोखाच्या कविता' हा कवितासंग्रह आपल्या आकलनासह आणि अनोख्या आविष्कारासह मराठी वाचकांसमोर आला आहे. या संग्रहातील कवितांमधून प्रतीत होणारं गावातील विदारक अनुभवविश्व, त्या अनुभवांचे नामदेव कोळी यांनी मांडलेले व्यवस्थात्मक बंध आणि त्यांच्या अभिव्यक्तीतील नेमकेपण, सच्चेपण, नितळता यामुळे या संग्रहाने अल्पावधीत लोकमान्यता प्राप्त केली आहे. एकतर, राजू बाविस्कर यांचे अर्थवाही मुखपृष्ठ, जितेंद्र साळुंके यांची बोलकी रेखाटने, बर्टोल्ट ब्रेख्त यांचे आणि सबीर हका यांच्या कवितेचे उद्धरण या सगळ्यांतून संग्रहाचा एक विशिष्ट स्तर निर्देशित केला गेला आहे. डॉ. भरतसिंग पाटील यांनी अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने मार्क्सवादी चिकित्सेतून कवितांचे मूल्यमापन केलं आहे. कवितेच्या पुस्तकात हे सर्व घटक किती महत्वपूर्ण मूल्ययुक्त भर घालू शकतात याचं हा संग्रह म्हणजे एक चांगलं उदाहरण आहे.

कुठलीही साहित्यकृती ही एका अर्थानं त्याची आत्मकहाणीच सांगत असते असं म्हटलं जातं. या संग्रहातील कविता म्हणजे कवीचं एका टप्प्यापर्यंतचं जीवनचरित्रच आहे असं म्हणता येतं. आपल्या वाट्याला आलेलं काळोखाचं जीणं कवीनं मांडलं आहे. परंतु या कवितांना केवळ आत्मदुःखांच्या कथनाचं, स्वरूप प्राप्त झालेलं नाही. हे केवळ त्याचं एकट्याचं जगणं नाही तर, काळोखातलं जगणं जगाव्या लागणाऱ्या एका संपूर्ण समूहाचा तो प्रातिनिधिक सूर आहे, समाजाच्या एका सेक्शनचं जगण्याचं दर्शन ही कविता प्रभावीपणे घडवते. नामदेव यांचा जन्म १९८४ साली झालेला आहे. म्हणजे त्यांनी जे जग पाहिलं ते मुळातूनच ९० नंतरचं. ९० नंतर जागतिकीकरण आणि खाजगीकरण यांमुळे जग बदललं असं आपण म्हणतो. नामदेव यांच्या कवितेत मात्र ९० नंतरचं बदललेलं गाव नाही, तर त्या अगोदरचं जवळजवळ सरंमजामशाहीचेच अवशेष बाळगणारं असं जग आहे. आधुनिकीकरणाच्या अनुकूल वा प्रतिकूल वाऱ्यांची चाहूलही न लागलेलं "कडगाव' सारख्या गावातलं जग हे किती गच्च दाट काळोखात वावरत आहे याचा प्रत्यय या कविता देतात.

नामदेव कोळींच्या या कविता समाजातील विविध व्यवस्थांवर काव्यात्मक भाष्य करतात. त्या दृष्टिकोनातून या कवितांतील आशयद्रव्य तीन-चार स्तरांवर पाझरताना दिसते, कुटुंबातील कर्ता पुरुष, नवरा, बाप आणि नर म्हणूनसुद्धा असणारा पुरुष आणि बाई, बायको आई म्हणून येणारी स्त्री, कुटुंबातील विविध नातेसंबंधांची विणऱ्यांतून उलगडलेली कुटुंब नावाची व्यवस्था, तिच्यात असलेला स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन, तिचं स्थान यावर ही कविता बोलते. त्याचप्रमाणे मुलांना जगण्यामध्ये सक्षमपणे उभी करू न शकणारी, त्यांच्या जगण्याशी सुतराम संबंध नसलेली आणि अभावांचं जिणं जगता जगता शिकू पाहणाऱ्या बालकांविषयी संपूर्ण अनास्था बाळगणारी इथली शिक्षणव्यवस्था या कवितांमधून दिसते. आणि पिढ्यानपिढ्या शेतीमातीत राबूनही भुकेचा मूलभूत प्रश्नही सोडवू न शकणारी इथली अर्थव्यवस्था, शेतीतील विषमता, भूमिहीन शेतमजुरांच्या संदर्भात असलेली अन्याय्य आणि शोषक व्यवस्था-अशा विविध सामाजिक व्यवस्थांवर नामदेव कोळी पोटतिडीकेनं व्यक्त होतात. मात्र त्यांच्या अभिव्यक्तीत केवळ भावनिक आवेग नाहीत तर ही अभिव्यक्ती वास्तवाची नेमकी जाण, दुःखाची नेमकी जागा आणि प्रश्नांचं अचूक आकलन प्रगल्भपणे घडवते. त्याचबरोबर गावखेडे आणि महानगरीय संवेदनेचा एक तुलनात्मक धागाही त्यातील प्रचंड अंतरासह इथे सापडतो .

या संग्रहाची सुरुवातच काळोखाच्या व्यापक जाणिवेनं होते. इतिहासात दडलेले काळोखाचे संदर्भ आणि काळोखाचा इतिहास उलगडताना उजेडाच्या तिरीपेतून जे जे सापडतं ते शब्दप्रकट करण्याचा हा सुंदर प्रयत्न आहे. नामदेव यांच्या व्यक्तित्वाला गावखेड्याची अवघी संस्कृती वेटाळुन राहिली आहे. तोच प्रोटॅगोनिस्ट बनून कवितेत अवतरला आहे. हा कवितागत नायक वैय्यक्तिक विकासाच्या ओढीनं शहरात दाखल झालाय. त्याच्या अंतर्विश्वात गाव आणि शहरी मानसिकतेतील अंतरायामुळे होणारी ओढाताण आणि घालमेल व्यक्त झाली आहे. आपण शहराकडे आलो परंतु आपलं गाव, आपले तिथले सगळे भावबंध मात्र अजून तेच काळोखातलं जिणं जगत असल्याच्या विचारांतून येणारा अपराधभावही त्यात मिसळला आहे. एकूणच गावाच्या संस्कृतीत मुळे रुजलेल्या आणि जगण्याच्या अधिक चांगल्या संधींच्या शोधात शहरात आलेल्या शिक्षित तरुणांच्या भावस्थितीचं प्रतिनिधित्वच ही कविता करते . नामदेव म्हणतात , "शहरात घेऊन जातो दरवेळेस /गझनीचा महमूद बनून /हवं ते हवं तितकं / सुलतानी आविर्भावात / हजार स्वाऱ्या करूनही शिल्लक राहतं / सोरटी सोमनाथाच्या अक्षय संपत्तीइतकं / माझं बालपण ...

गझनीच्या महमूदाच्या अनोख्या प्रतिमेतून एक विलोभनीय कल्पना साकार झाली आहे. विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या अभावांनी विळखा घातलेलं बालपण कवीला मात्र सोमनाथाच्या अक्षय संपत्तीसारखं बहुमोल वाटतं. शहरात,शहरी जीवनाचं दर्शन झाल्यानंतर कवितागत नायक गावाकडे, माय बापाकडे शहरात मिळालेल्या नव्या डोळ्याने पाहू लागतो. त्यातून त्याला आपलं गाव, माय बाप जसे आकळतात त्या आकलनाच्या कविता मग वाचकांसमोर येत राहतात.

"माय' या कवितेत मायच्या रूपाने आपल्या संपूर्ण पुरुषप्रधान व्यवस्थेत शतकानुशतके स्त्रीचं मुक्रर केलेलं स्थान दृग्गोचर होतं. माय म्हणजे इथल्या संस्कृतीत काय काय आहे हे सांगताना तो माय म्हणजे "बापाला आंधणासोबत मिळालेली वस्तू, "माय म्हणजे बांधलेलं जित्राब' असं संबोधतो तेव्हा तो आईकडे फक्त आपली "माय' म्हणून बघत नाही तर बापाची बायको,संपूर्ण व्यवस्थेच्या संदर्भात एक स्त्री म्हणून बघतो. इथल्या संस्कृतीत स्त्रीकडे कायमच सेवा आणि उपभोगाचं साधन, एक वस्तू म्हणून बघितलं गेलं आहे, तिला माणूस म्हणून जगण्याचा दर्जा दिला गेला नाहीय, या वास्तवाकडे ही कविता निर्देश करते. "शेतमजुराच्या पोरी' ही कविताही स्त्रियांच्या संदर्भात साऱ्या निमूट स्वीकाराचं करुण दर्शन घडवते. "त्यांना माहीत असतं सूत्र / मजुराच्या पोरी मजुराच्या घरात' असा पोरींच्या ठायी असलेला उपजत शहाणपणा आर्तपणे कवितेतून अधोरेखित होतो. "प्रिय वासंतीताईस' या कवितेतही मुलींच्या वाट्याला येणारं सगळं दुय्यमत्व "तू आहेस माझ्या अस्तित्वाचे कारण' सारख्या एका ओळीत कवी संपृक्तपणे मांडतो. "माय' आणि पोरीची ची ही गत तर बापाची फारशी वेगळी नाही. इथल्या वर्गीय व्यवस्थेत तळाशी असणाऱ्या, गुरं राखून, जमीन बटाईने घेऊन कष्टणाऱ्या भूमिहीन शेतमजुराचं जगणं या बापाच्या वाट्याला आलेलं आहे. फरक एवढाच की, पुरुष म्हणून जन्र्माला आल्यानं "बायको' नावाचा एक गुलाम या गुलामाला प्राप्त झालेला आहे. परंतु, एकूण समाजात मात्र त्याचं स्थान दुय्यमच आहे. "पाटलाचा निष्ठावान ढोरकी' असलेला बाप पाटलाच्या दारात किती राबतो अन त्याचं मोल यांतील व्यस्त प्रमाण त्याला जाणवत नसेल असं नाही, परंतु शोषणाशी टक्कर देण्याचं बळ त्याच्याकडे नाही, मात्र शिकून मोठा झालेला आपला मुलगा हिशेब बरोबर करू शकतोय याचं समाधान त्याला एकप्रकारे त्याच्या कष्टाचं मोल म्हणून मिळालंय. गावातील जमीनदारीचे, सरंजामशाहीचे अवशेष आजही शिल्लक असल्याच्या खुणा या कविता वागवताना दिसतात. शोषक आणि शोषित, मालक आणि मजूर या दमनाच्या व्यवस्थेसंबंधीचे अनेक उद्गार या संग्रहात सापडतात. "आपल्याच जमिनीत करतोय मजुरी /याचा मागमूसही नाहीये कुणाला / भुकेपोटी दुसऱ्याच्या घशात टाकलाय / सोन्यासारखा जमिनीचा तुकडा' ही जाणीव गावातल्या आजवरच्या मजूर पिढयांना नाही.पण शिक्षित झालेल्या कवितागत नायकाला मात्र या शोषण व्यवस्थेचं भान आलेलं आहे.

नामदेव कोळींची भाषा अलंकारिक नाही. पण अनलंकृत अल्पाक्षरांतून ती स्वगतासारखी काळजाच्या बोलीतून आपल्याशी बोलते, कित्येकदा न बोलताही बोलते तेव्हा तिच्यातील आशय द्राव्य होऊन आपल्या संवेदनांमध्ये झिरपतो. आशय नेमक्या शब्दांत सूचित करण्याकडे त्यांचा कल आहे. "काळोख /तुझ्या आधी / अन नंतरचाही / एक वफादार सोबती' असा तो सूचक बनतो. या भाषेला खानदेशी बोली भाषेचा सुंदर लहेजा, लय आणि शब्दकळा लाभली आहे. ग्रामीण भागातील भूमिनिष्ठ भाषेचा अनोखा पोत त्यातून ठसत जातो "जगणं नवती व्हावं म्हणून', गडायकाठी आणि विळा', "उलंगतीच्या दिवसांत', "रेटकं' असे कितीतरी अनोखे शब्द आणि वाक्प्रचार कवितेच्या सौन्दर्याचे वर्धन करतात.

नामदेव कोळी यांची भाषा परिस्थितीविषयी मोठा आक्रोश मांडत नाही. ती दारिद्र्याचा, अभावांचा दिखावा करण्यात रमत नाही. तर अत्यंत संयतपणे ती कौटुंबिक बंध, गाव पातळीवरील वस्तुस्थिती, मालक-मजूर संबंध या सगळ्यातील शोषणाच्या व्यवस्थेकडे आणि गावाकडून महानगराच्या एका व्यापक दिशेने सुरु असलेल्या प्रवासपटातील विषमता, अन्याय, शोषण,कष्ट, दारिद्र्य, अभाव या समाजाच्या कुरूप अंगांकडे लक्ष वेधत राहते. ही कविता विद्रोहाचे शिंग प्रत्यक्षपणे फुंकताना दिसत नसली तरीही समाजात शोषक आणि शोषित या दोन्ही नात्यांनी जगणाऱ्या समूहांपर्यंत वास्तवाची धग पोहोचवून, त्यांना जाग आणण्याचा प्रयत्न ती मनःपूर्वक करताना दिसते. विशेष म्हणजे वास्तवाचा कलाहीन पसारा न मांडता तरल आणि तीव्र, उत्कट कलात्मकतेमुळे उठून दिसते.

anjalikulkarni1810@gmail.com

बातम्या आणखी आहेत...