आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:सर सलामत तो...

Aurangabad3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काेरोनाचा प्रादुर्भाव झालेली एक व्यक्ती तीस दिवसांत ४०६ लोकांमध्ये तो विकार संक्रमित करते

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार जनतेशी संवाद साधत आहेत. काेरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासनातर्फे युद्धपातळीवर फिव्हर क्लिनिक, काेरोना रुग्णालय यासारख्या ज्या योजना आखल्या जात आहेत त्याची व्यवस्थित माहिती देत आहेत, तरीही ज्या महाराष्ट्राने काेरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी देशात पहिले पाऊल उचलले त्याच महाराष्ट्रात विशेषत: मुंबई आणि पाठोपाठ पुण्यात काेरोना रुग्णांचा आकडा वाढतच जातोय, हे निश्चितच चांगले लक्षण नाही. राज्यातील रुग्णांचा आकडा हजारावर पोहोचला आहे, यावरून एकूण परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. अर्थात, त्यातील सातशेहून अधिक रुग्ण एकट्या मुंबई शहरातील आहेत. निजामुद्दीन येथून बाहेर पडलेल्या तबलीगींच्या काही मंडळींनी गोंधळ घातल्यानंतर आता परिस्थिती नियंत्रणात आली असली, तरी काेरोनाच्या रुग्णांचा आकडा काही कमी होत नाही. महाराष्ट्रात सर्वाधिक भीती होती, ती मुंबई शहराचीच. आर्थिक राजधानी मुंबईची गर्दी थांबवण्यासाठी मुंबई बंद करूनही काेरोनाच्या संसर्गाला आळा बसत नसल्याने महापालिका, पोलीस, आरोग्य विभाग आणि राज्य सरकारपुढे नवीनच प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईतील २४ वॉर्डपैकी ८ वॉर्ड हे डेंजर झोनमध्ये असून, याच भागात काेरोना पॉझिटिव्हच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. यातील बहुसंख्य भाग हे झोपडपट्टीचे असून, या झोपडपट्टीतील काेरोनाचा शिरकाव थांबवायचा कसा, असा प्रश्न यंत्रणांपुढे आहे. येथील झोपडपट्टी तसेच जुन्या वस्त्यांमध्ये अत्यंत दाटीवाटीने लोक राहतात आणि सोशल डिस्टन्सिंगच्या तत्त्वाचे पालन करणे त्यांच्यासाठी कोणत्याही पातळीवर शक्य नसते. धारावी झोपडपट्टीसह अन्यही काही झोपडपट्टी परिसरांत काेरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे, मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र सरकार यांची चिंता वाढली आहे. काेरोनाचा प्रादुर्भाव झालेली एक व्यक्ती तीस दिवसांत ४०६ लोकांमध्ये तो विकार संक्रमित करते, असे केंद्रीय आरोग्य खात्याने वारंवार स्पष्ट केले. सोशल डिस्टन्सिंग, तसेच मास्क लावणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले. एकूणच या काळात घरात राहणे हाच सुरक्षित राहण्याचा आणि काेरोनाशी मुकाबला करण्याचा सर्वाधिक प्रभावी मार्ग असल्याचे, अनेक आघाड्यांवरून सांगितले जात आहे. मात्र मुंबईकरांमधील बेशिस्त, बेफिकीरी आणि बेपर्वाई कमी होताना दिसत नाही.  मुंबईची लोकसंख्या १२० लाख असून त्यातील ९० लाख लोकसंख्या ही झोपडपट्ट्यांमध्ये राहते. त्यातील ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ही कच्च्या घरात राहते. अशा वस्तीत काेरोना रुग्ण आढळला तर किमान तीन किलोमीटरच्या परिघात किमान लाखभर लोकांची काेरोना टेस्ट करावी लागेल. आपल्याकडे असणाऱ्या पीपीई किट्सची कमतरता लक्षात घेता हे प्रकरण किती आक्राळविक्राळ रुप घेऊ शकेल याचा विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्यावेळी लॉकडाऊन उठेल तेव्हा लोकल, बस, रस्ते आणि सार्वजनिक वाहतुकीत सोशल डिस्टन्सिंग कसे पाळणार हाच मोठा सवाल आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर प्रथम आपला जीव वाचवणे आणि मग स्थिरसावर होण्यासाठी क्रमाक्रमाने पावले उचलणे यालाच प्राधान्य द्यावे लागणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...