आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'सत्यजित राय'जन्मशताब्दी...:सत्यजित राय यांचं 'जग'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटासारखा मोठा होईल. सत्यजित राय हे केवळ एक दिग्दर्शक नाहीत.

अशोक राणे

चित्रपटासारखा मोठा होईल. सत्यजित राय हे केवळ एक दिग्दर्शक नाहीत. ते एक विशाल असं विद्यापीठ आहे. ज्यांना चित्रपट किंवा कुठलीही कला किंवा जीवनविषयक तत्वज्ञान शिकून घ्यायचं असेल त्याला या विद्यापीठात सबंध आयुष्य घालवावं लागेल.  आजच्या पिढीतल्या, ज्यांच्यासाठी भूतकाळ अलीकडच्या पाचदहा वर्षांचाच आहे, अशांनी चित्रपट क्षेत्रात निर्माता, दिग्दर्शक, पटकथाकार, कलावंत, तंत्रज्ञ म्हणून येताना तसेच अगदी समीक्षक, अभ्यासकच काय तर रसिक प्रेक्षकाने देखील या त्यांच्या खऱ्या आणि समृद्ध भूतकाळाकडे पाहिलं पाहिजे. त्याला आत्मसात केलं पाहिजे. कारण हा भूतकाळ वर्तमानाचाच नव्हे तर भविष्यकाळाचाही नेमका वेध घ्यायला शिकवतो. जागतिक ख्यातीचे भारतीय सिनेदिग्दर्शक सत्यजित राय यांच्या गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष लेख... 

"आय वाँट टू मेक अ ग्रेटेस्ट फिल्म ऑफ द वर्ल्ड.'

जागतिक ख्यातीचे व्यासंगी चित्रपट समीक्षक आणि अभिजात दिग्दर्शक फ्रान्स्वा त्रूफो यांच्या "डे फॉर नाईट' या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा कथानायक असलेला दिग्दर्शक असं म्हणतो आणि जेमतेम अर्धाच चित्रपट पुरा होत येतो तेव्हा म्हणतो, "आय वाँटू गेट रिड ऑफ इट.'

जगातला सर्वश्रेष्ठ चित्रपट निर्माण करण्याच्या बाता करणारा निर्मितीच्या वेणा शेवटपर्यंत सोसू शकत नाही. पार कावतो. वैतागतो. सत्यजित राय यांच्या जन्मशताब्दीला २ मेला प्रारंभ झाला. यानिमित्ताने त्यांच्यावर लिहिण्यास सांगण्यात आलं, तेव्हा सर्वप्रथम मला "डे फॉर नाईट' मधला हा दिग्दर्शक आठवला. कारण १९४८ मध्ये सत्यजित राय यांनी देखील आपले मित्र चिदानंद दासगुप्ता यांना म्हटलं होतं,

"एक दिवस मी एक ग्रेट फिल्म बनवीन.'

अर्थातच दासगुप्ता हसले होते. कुठल्याही दोन तरुण मित्रांमध्ये घडतो तसा हा प्रसंग आहे. एकाने आपल्या महत्वाकांक्षेबद्दल बोलावं आणि दुसऱ्याने ते हसण्यावारी न्यावं. तसं हे स्वाभाविक म्हणावं असंच. काहींच्या बाबतीत ते त्याच योग्यतेचं असतं. परंतु काहींच्या बाबतीत ते तसं नसतं. सत्यजित राय यांनी हे म्हणावं त्यामागे नेमकं काय आहे हे तपासण्याआधी थोडं त्याआधीच्या इतिहासात डोकावणं आवश्यक आहे..

"सत्यजित राय यांचे चित्रपट ज्यांनी पाहिले नाहीत त्यांनी चंद्र - सूर्यच पाहिला नाही...'

जपानी चित्रपटाला जागतिक पातळीवर सर्वप्रथम सन्मान मिळवून देणारे अभिजात दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांचे हे गौरवोद्गार आहेत. या कुरोसावांना चित्रपटक्षेत्रात यायचं नव्हतं. त्यांना व्हायचं होतं चित्रकार. त्यांची तशी धडपड चालली होती. या अशा धडपडीच्या काळात १९३५ मध्ये टोकिओच्या नोह स्टुडियोची जाहिरात आली, "सहाय्यक दिग्दर्शक पाहिजेत.' अर्जासोबत एक निबंध जोडणं आवश्यक होतं आणि त्याचा विषय होता, "जपानी चित्रपटांचा दर्जा सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे?' कुरोसावांना दुरूनही चित्रपटाचं आकर्षण नव्हतं, परंतु या निबंध विषयाची टेर उडविण्यासाठी त्यांनी अर्ज आणि अर्थातच निबंधही पाठवला. त्यांचा हा निबंध होता अवघ्या एका ओळीचा - "जपानी चित्रपटांचा दर्जा सुधारायचा असेल तर चांगले दर्जेदार चित्रपट केले पाहिजेत.'

आणि हजारभर उमेदवारातून त्यांचीच निवड झाली आणि कॅन्व्हासवर चित्रं काढण्याची स्वप्नं पाहणाऱ्या या तरुण कलावंताने रुपेरी पडद्यालाच आपला कॅन्व्हास बनवला. त्यावर अभिजात चित्रं चितारली. त्यांच्या १९५० च्या "राशोमान' ने जपानी चित्रपटाला जागतिक पातळीवर नेऊन ठेवलं. तीच किमया सत्यजित राय यांच्या "पाथेर पांचाली' ने भारतीय चित्रपटांच्या संदर्भात करून दाखविली. महत्वाकांक्षा प्रत्येकाला असते. तो ती बोलूनही दाखवतो. परंतु ती सिद्ध करण्याची ताकद, जिद्द मोजक्या लोकांतच असते. ती राय आणि कुरोसावा यांच्यात होती. बाकीचे "डे फॉर नाईट'च्या नायकासारखे केवळ बातेंबहाद्दर असतात. रायसाहेबांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने लेख लिहायला घेताना प्रश्न पडला की, आजवर त्यांच्यावर जगभर इतकं लिहून झालयं त्यावर आता नव्याने काय लिहायचं ? मुख्य म्हणजे ज्या पिढीसाठी भूतकाळ पाच, फार तर दहा वर्षांचाच आहे त्यांना, १९२१ मध्ये जन्मलेल्या, जन्मतः भलाभक्कम कलावारसा घेऊन आलेल्या, त्याबरहुकूम विलक्षण अशी जडणघडण घडलेला आणि मग १९५०च्या दशकात चित्रपटक्षेत्रात येऊन देदीप्यमान कारकीर्द गाजवून गेलेल्या भारतीयच नव्हे तर जागतिक चित्रपट जगतातील या महानुभवाबद्दल काही सांगायचं तर किती तरी मागच्या काळातली गोष्ट. त्यांनी जगाचा निरोप घेतला त्यालाही आता एकोणतीस वर्षे झाली. काल आलेला कॅमेरा आज आऊटडेटेड होतो अशा आजच्या पर्यावरणात वावरणाऱ्यांना सत्यजित राय यांच्याबद्दल सांगायचं तर चांदोबातल्या गोष्टीसारखीच सुरुवात करावी लागणार....फार फार वर्षांपूर्वी एक राजा होऊन गेला.....

...तर चित्रपट जगतातील सत्यजित राय नावाच्या या राजाची, नव्हे सम्राटाची गौरवपूर्ण कथा सांगताना त्याच्या साम्राज्याचा पसारा केवढा मोठा होता आणि त्याची कीर्ती कशी सर्वदूर पसरली होती हे सांगण्यापेक्षा हे सर्व या साधकाने साधलं कसं ते पाहणं आणि मुख्यतः समजून घेणं आवश्यक ठरेल.

भलाभक्कम कलावारसा असलेल्या घराण्याचा वारसा राय यांना जन्मतःच लाभला. त्यांचे आजोबा उपेंद्रकिशोर हे देशातले हाफ टोन प्रिंटिंगचे अग्रदूत होते, वादक, संगीतकार होते, बालसाहित्यातले महत्वाचे लेखक होते आणि त्या कथांसाठी उत्तम चित्रे, रेखाटने करणारे कलावंतही होते. राय यांचे वडील सुकुमार राय यांनी हाच वारसा पुढे चालू ठेवला. "संदेश' हे लहान मुलांसाठी आजोबांनी सुरू केलेलं मासिक पुढे खुद्द राय यांनीही चालू ठेवलं. बालसाहित्यातली ही परंपरा राय यांनी पुढे चित्रपट दिग्दर्शक म्हणूनही चालू ठेवली आणि  "गोपी गाये बाघा बाये', "शोनार केल्ल ', "जोय बाबा फेलुनाथ' सारख्या अभिजात कलाकृती निर्माण केल्या.

गुरुवर्य रवींद्रनाथ टागोरांशी राय यांच्या कुटुंबाची जवळीक होती. लहानपणी एकदा ते आईबरोबर टागोरांकडे गेले असताना त्यांनी सोबत नेलेल्या वहीत त्यांना टागोरांचा संदेश पाहिजे होता रवींद्रनाथांनी तो लिहिला आणि दिला. त्यात त्यांनी असं लिहिलं होतं की, "जेव्हा संपूर्ण जग पाहून येशील तेव्हा घरामागच्या अंगणात जा आणि तिथल्या वेलीवरचा दवबिंदू पहा.' त्या बालवयात त्याचा अर्थ कळणं शक्य नव्हतं, परंतु तरुणपणी मात्र त्यांना तो कळला.

टागोरांशी असा जवळचा परिचय असूनसुद्धाा राय काहीशा अनिच्छेनेच पदवीनंतर शांतिनिकेतनमध्ये गेले. कारण त्यांना चित्रकार व्हायचं नव्हतं. परंतु तिथल्या वास्तव्यात त्यांना बिनोद बिहारी मुखर्जी आणि नंदलाल बोस हे दोन महान गुरू लाभले आणि त्यांच्यामुळे कलेकडे, कलानिर्मितीकडे पाहण्याचा सखोल दृष्टीकोन त्यांना प्राप्त झाला. एखाद्या गोष्टीकडे लक्ष वेधत त्याचं चित्र काढा असं मास्तराने सांगितलं की मुलं एक डोळा बंद करून दुसऱ्या डोळ्यासमोर पेन्सिल धरून त्याचं "मोजमाप' करत चित्र काढतात. "हे चित्र नाही ही त्या गोष्टीची नक्कल आहे' असा फार मोठा संस्कार राय यांच्यावर या गुरूंनी केला. "जिचं चित्र काढायचं ती गोष्ट नीट पहा, न्याहाळा, तुमच्यात ती मुरू द्या आणि मग कुठेही बसून ते चित्र काढा.' असा तो मोलाचा धडा होता. "साहित्यकृतीवरून चित्रपट करताना ती अनेकदा वाचा, तुमच्यात ती गोष्ट, तिचा आशय, तिचा सर्व संदर्भ असलेला भोवताल तुमच्यात मुरू द्या आणि मग पटकथा लिहा. असा माध्यमांतरासंदर्भातला बहुमोल सल्ला पुढे जेव्हा राय यांनी जगभरच्या पटकथाकारांना - दिग्दर्शकांना दिला तेव्हा त्यामागे हाच शांतिनिकेतनमधला संस्कार होता.

त्यांनी दिग्दर्शित केलेल्या २८ चित्रपटातील निम्याहून अधिक चित्रपट हे साहित्यकृतींवर आधारलेले आणि माध्यमांतरासंदर्भातले उत्तम चित्रपट मानले जातात. त्यावर काही वाद झाले, परंतु ते सारं सविस्तर सांगण्यासाठी इथे पुरेशी जागा नाही. तरीही हा असा वाद का होतो हे मात्र सांगायला पाहिजे. साहित्य, नाट्यकृतीवर चित्रपट करताना काही प्रयत्न फसतात. कारण अशा पटकथाकारांना आणि दिग्दर्शकांना दोन्ही माध्यमांची आणि माध्यमांतराची पुरेशी जाण नसते. ज्यांना ती असते त्यांच्याही चित्रपटांबद्दल काहीची तक्रार असते. कारण साहित्य किंवा नाट्यप्रकाराच्या प्रेमात असलेल्या त्यांच्या चाहत्यांना कायमच मुळातली कलाकृती आणि तो कलाप्रकार श्रेष्ठ वाटत राहतो आणि मग त्यांना डोळसपणे या माध्यमांतराकडे पहाता येत नाही. दुर्गा भागवतांसारख्या विदुषीने, त्यांच्याविषयीचा सारा आदर व्यक्त करून म्हणतो की "पाथेर पांचाली' बद्दल अशीच आपली एकांगी प्रतिक्रिया नोंदवली. त्यांचं म्हणणं होतं की, चित्रपटापेक्षा मूळ कादंबरी श्रेष्ठ आहे. काहींना माझं हे विधान धाडसाचं वटेल पण इतर अनेक साहित्यप्रेमींसारखीच दुर्गाबाईंनाही चित्रपट माध्यमाविषयीची समज पुरेशी नाही.

सर्व पारंपारिक कलांकडून हवं ते आणि तेवढंच घेत चित्रपटाने एक आधुनिक कला म्हणून आपलं व्यक्तिमत्व सिद्ध केलं आहे. साहित्यकृतीत ज्याप्रकारचं तपशीलवार वर्णन येतं ते तसंच परंतु चित्रपटभाषेचा वापर करत राय यांनी "पाथेर पांचाली' मध्ये केलं आहे. बरेच महिने कुटुंबापासून दूर राहिलेला हरिहर गावाला परत येणार आहे ते कळवणारं पत्र आल्यानंतरचं ते संपूर्ण दृश्य पहा, म्हणजे राय यांची साहित्य आणि चित्रपट या दोन्ही माध्यामांची समज किती सखोल आणि समृद्ध आहे ते कळेल.

हे कुठून आणि कसं आलं राय यांच्यात ? त्यांच्या घडत्या वयापासूनच त्यांना साहित्य, चित्र, शिल्प, संगीत आदी कलांचं विलक्षण आकर्षण होतं. अभिजात साहित्याकडे त्यांचा कल होताच. त्याचा व्यासंगही ते करत होते. परंतु भारतीय संगीताबरोबरच त्यांना बाख आणि मोझार्ट हे पाश्चिमात्य संगीतप्रकार विशेष आवडीचे होते. "चित्रपट माध्यम हे पाश्चिमात्य संगीतातील सिंफनीसारखं आहे', असं राय म्हणायचे. सिंफनी ही जशी बंदिस्त असते तसा चित्रपटाचा आकृतिबंध असतो असं त्यांचं म्हणणं होतं. तो गणिती पद्धतीने बांधावा लागतो आणि तसं करताना त्यातला उत्स्फूर्तपणा, त्यातली सहजता, तरलताही जपता येते, अशी त्यांची धारणा होती आणि त्यांनी ती आपल्या एकूण एक चित्रपटातून सिद्ध करून दाखविली. त्यांची चित्र, शिल्प आणि स्थापत्य कलेतली जाणही त्यांच्या चित्रपटांत अनुभवता येते.

त्यावेळचे गाण्यांची भरपूर रेलचेल असलेले आणि तितकेच मेलोड्रेमेटिक चित्रपट या "वेगळ्या' चित्रपटांच्या शोधात असलेल्या तरुणाला मान्य आणि स्वीकार्य असणं शक्यच नव्हतं. परदेशी म्हणजे फक्त हॉलिवूडचे चित्रपट एवढीच सोय त्यावेळच्या या नव्याच्या शोधात असलेल्या भारतीय पिढीला होती. परंतु परदेशातून पुस्तकं मागवून राय चित्रपटाचा अभ्यास करत राहिले. १९४७ मध्ये चिदानंद दासगुप्ता या त्यांच्याइतकाच चित्रपटाचा ध्यास घेतलेल्या मित्राबरोबर त्यांनी "कोलकाता फिल्म सोसायटी काढली आणि जगभरचे चित्रपट मिळवत ते पहायला सुरुवात केली. हॉलिवूडचे चित्रपट पाहात असतानाच राय आणखी एक गोष्ट करायचे आणि ती म्हणजे तिकडे हॉलिवूड अमूक एका कादंबरीवर चित्रपट करतंय असं कळलं की ती कादंबरी मिळवून, वाचून त्यावर आपली पटकथा तयार ठेवायचे आणि यथावकाश तो चित्रपट कोलकात्यात आला की त्याच्याशी आपली पटकथा ताडून पहायचे. ही गोष्ट १९४२ नंतरची. "पाथेर पांचाली ' त्यांनी करायला घेतला १९५२ मध्ये. तो करायचा विचार आणि त्यासाठी करावी लागायची धडपड सुरू झाली ती १९४८ मध्ये. परंतु त्याआधीपासून हा झपाटलेला कलाकार ही अशी नेट पॅक्टिस करत होता.

ते ज्या ब्रिटिश कंपनीत रेखाटनकार आणि कॉपीरायटर म्हणून नोकरीला होते तिने १९४८ मध्ये तीन महिन्यांसाठी त्यांना लंडनला पाठवलं. त्या तीन महिन्यांत त्यांनी ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये ९० चित्रपट पाहिले. सर्व प्रचलित संकेत मोडून त्यांना ज्याप्रकारचा चित्रपट करायचा होता तो करण्याची प्रेरणा त्यांना तिथे पाहिलेल्या इटालियन निओरिएलिझमचे दिग्दर्शक व्हितोरिओ डिसिका यांच्या "बायसिकल थीव्हज' ने दिली. त्यानंतर फ्रेंच दिग्दर्शक ज्याँ रेन्वा त्यांचा "द रिव्हर' हा चित्रपट करायला कोलकात्यात आले तेव्हा राय त्यांचे सहाय्यक बनले.

अकिरा कुरोसावा राय यांच्याबद्दल बोलताना एकदा असं म्हणाले होते, "समस्त मानवजातीविषयी असलेलं सखोल निरीक्षण, जाण आणि सहृदयता ही राय यांच्या चित्रपटांची वैशिष्ट्ये आहेत आणि त्यांनी मला खूप प्रभावित केलं आहे. या त्यांच्यातल्या वैश्विकतेमुळेच ते जागतिक चित्रपटातील दिग्गज दिग्दर्शक ठरले. " किती खरं होतं पहा. "पाथेर पांचाली' ला जेव्हा कान महोत्सवात पुरस्कार प्राप्त झाला तेव्हा त्याच्या गौरवार्थ (सायटेशन) म्हटलं गेलं होतं, " द बेस्ट ह्युमन डॉक्युमेंट."....

या एवढ्या लेखात हिमालयाएवढं व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व असलेल्या या महानुभवाबद्दल कसं लिहावं हा प्रश्नच आहे. "सत्यजित राय' या चित्रपटाचा ट्रेलरदेखील एखाद्या भव्य चित्रपटासारखा मोठा होईल. सत्यजित राय हे केवळ एक दिग्दर्शक नाहीत. ते एक विशाल असं विद्यापीठ आहे. ज्यांना चित्रपट किंवा कुठलीही कला किंवा जीवनविषयक तत्वज्ञान शिकून घ्यायचं असेल त्याला या विद्यापीठात सबंध आयुष्य घालवावं लागेल. वर म्हटल्याप्रमाणे आजच्या पिढीतल्या, ज्यांच्यासाठी भूतकाळ अलीकडच्या पाचदहा वर्षांचाच आहे, अशांनी चित्रपट क्षेत्रात निर्माता, दिग्दर्शक, पटकथाकार, कलावंत, तंत्रज्ञ म्हणून येताना तसेच अगदी समीक्षक, अभ्यासकच काय तर रसिक प्रेक्षकाने देखील या त्यांच्या खऱ्या आणि समृद्ध भूतकाळाकडे पाहिलं पाहिजे. त्याला आत्मसात केलं पाहिजे. कारण हा भूतकाळ वर्तमानाचाच नव्हे तर भविष्यकाळाचाही नेमका वेध घ्यायला शिकवतो. चित्रपटावर विपुल प्रमाणात लेखन करणारा हा एकमेव भारतीय दिग्दर्शक आहे. त्यांचं "अवर फिल्म्स देअर फिल्म्स ' एवढं एकच पुस्तक वाचलं तरी पुरेसं आहे.

"पाथेर पांचाली' मध्ये दूरवरच्या एका छोट्या खेड्यात राहणाऱ्या छोट्या अपूला गावाबाहेरून जाणाऱ्या आगगाडीद्वारा सर्वदूरच्या विशाल जगाशी जोडणारे सत्यजिय राय त्यांच्या अखेरच्या चित्रपटात - "आगंतुक' मध्ये - त्यातल्या छोट्या मुलाला - सात्यकीला - त्याच्या आई( ममता शंकर) च्या काका(उत्पल दत्त)कडून म्हणजे त्याच्या आजोबाकडून विश्वाच्या पसायाची गोष्ट सांगायला लावतात. सत्यजित राय यांचं "जग' हे त्या विश्वाच्या पसाऱ्याइतकं विशाल आहे.

ashma1895@gmail.com

(लेखक ख्यातनाम सिनेसमीक्षक आणि लेखक आहेत.)

बातम्या आणखी आहेत...