आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:योगी है तो यकीन है...?

अतुल माने3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

योगी आदित्यनाथ यांची वाढत जाणारी महत्वाकांक्षा ही पंतप्रधान मोदींसाठी चिंतेची बाब असू शकते. “मोदींचे उत्तराधिकारी कोण’ यावर जितक्या वेगाने योगींनी सुत्र हलवली ती पाहता पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या टप्प्यावर विराजमान होऊ पाहणाऱ्या मोदींना आता पक्षांतर्गतच काही संकेत दिसू लागले आहेत. “मोदी है तो मुमकीन है’ या टॅगलाईनला आता “योगी है तो यकीन है’ हे उत्तर मिळायला सुरुवात झाली आहे. हाथरसच्या घटनेनंतर योगी आदित्यनाथ यांना पक्षातूनच एकटे पाडणे आणि हाथरसचे पडसाद बिहार निवडणुकीवर उमटू नयेत यासाठी नव्याने मोर्चेबांधणी करावी लागणे हे योगींसाठी फारसे आश्वासक चित्र नसावे...

२०१२ मध्ये सबंध देशभर "गुजरात मॉडेल' हे अत्यंत पध्दतशीरपणे पसरविण्यात आले. या "गुजरात मॉडेल' मागे असलेला चेहरा म्हणजे नरेंद्र मोदी. भावी पंतप्रधान या रूपाने हा चेहरा देशासमोर आला. केंद्रातील आघाडी सरकार “कथित’ घोटाळे, लोकपाल बिलावरून अण्णा हजारे यांचे जंतरमंतर येथील आंदोलन आणि निर्भया प्रकरण... परिवर्तानाच्या महावादळाने काँग्रेससह सर्व पक्ष पालापाचोळ्यासारखे उडून गेले आणि देशाला नरेंद्र मोदी यांच्या रूपाने विकासाची स्वप्ने दाखविणारा एक आश्वासक चेहरा पंतप्रधानपदी मिळाला. "मोदी है तो मुमकीन है' असे म्हणत २०१४ आणि २०१९ च्या लाटेवर स्वार होत मोदींची घोडदौड आता २०२४ च्या दिशेने सुरू झाली आहे.

परंतू जरा थांबा... ही नवीन आलेली घोषणा ऐकू येतेयं का तुम्हाला? आणखी एक विकासाचे मॉडेल देशभरात पसरविण्यास सुरूवात झाल्याचे तुम्ही पाहिले का? २०२४च्या पंतप्रधानाच्या शर्यतीत भाजपच्या गोटातून मोदींच्या बरोबरीने आणखी एक नाव पुढे आल्याचं "वॉट्सअप'वर वाचलं असेलच तुम्ही...?

"योगी है तो यकीन है' ही ती घोषणा...

गेल्या आठवड्यात देशभरातील प्रत्येक वृत्तपत्रात विकासाचे नवे मॉडेल म्हणून चार-चार पानांची जाहिरात करणारे उत्तरप्रदेश हे ते राज्य...

अन् अजय मोहन बिश्त उर्फ योगी आदित्यनाथ हे ते २०२४ च्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीतले आणकी एक नाव...

"हिस्ट्री रिपिट्स' असे म्हटले जाते. नरेद्र मोदी यांचा उत्तराधिकारी शोधण्याची घाई प्रसारमाध्यमे आणि भाजपचे समर्थक यांना फारच लवकर होत असते. पंतप्रधान मोदी यांच्या बरोबरीने किंबहुना त्यांना वेळोवेळी सल्ला देणारे गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाची चर्चा अगदी अलीकडच्या काळापर्यंत होत असतानाच अचानक त्यांच्या प्रकृती बाबत उलटसुलट बातम्या येऊ लागल्या आणि त्याचा नेमका फायदा योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या समर्थकांनी उचलला. देशाला विकासाच्या वाटेवर घेऊन जात असतानाच कट्टर हिंदुत्ववाद जोपासणारा नेता म्हणजेच योगी आदित्यनाथ अशा पद्धतीने पुन्हा एकदा राजकीय पटकथा लिहायला सुरुवात झाली आहे. अशीच पटकथा २०१२ मध्ये लिहिण्यात आली होती. उत्तर प्रदेशात बस्तान बसविणासाठी अनेक औद्योगिक कंपन्यांना आवतन धाडण्यात आले, जसे २०१२ मध्ये गुजरातने केले होते. उत्तर प्रदेश राज्य स्वयंपूर्ण असण्यासाठी अनेक विकासाचे प्रकल्प घोषीत करण्यात आले. अगदी मुंबईत असलेल्या बॉलीवुडला टक्कर देण्यासाठी महाफिल्मसिटीची घोषणा युपीत करण्यात आली. राज्यातील युवकांना इथेच रोजगार उपलब्ध करून देण्याचे योगीनीं जाहीर केले. आणि हे करताना "योगी है तो यकीन है....' ही टॅगलाईन सातत्याने बिंबवण्यास सुरुवात झाली. "मुमकीन' आणि "यकीन'... शक्यता आणि ठाम विश्वास... म्हणजे बघायला गेलं तर नरेंद्र मोदींच्या टॅगलाईनपेक्षा योगींची ही टॅगलाईन अधिक आकर्षक आणि खात्रीलायक...

योगी यांच्या राजधानी दिल्ली प्रवासाची ही सुरुवात असल्याची राजकीय कुजबूज आहे. देशातील सर्वात यशस्वी मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांना चमकविण्यात आले. उत्तर म्हणजे "उत्तम' प्रदेश च्या पानभर जाहिराती देशभरात असलेल्या सर्व भाषिक वृत्तपत्रामध्ये देण्यात आल्या. त्यासाठी सोशल मीडिया पूर्ण ताब्यात घेण्यात आला. परंतू राजकारण इतकं साधं सोपं नसतं... राजकारणात कधी कोण कोणाला चेकमेट करून पत्ता कापेल याचा नेम नसतो..राजकारण हे बेभरवशाचं असतंच आणि नेतेही बेभरवशाचेच असतात.. कोणताही त्याला पक्ष अपवाद नाही. बुद्धिबळाच्या पटावर असलेल्या मोहऱ्यामध्ये राजा हा सर्वश्रेष्ठ असतो. पण त्याच पटावरील वजीर किंवा अन्य कोणत्या मोहऱ्याने जर राजा होण्याची स्वप्ने पाहिली तर? मग सुरू होतो खेळ चेकमेटचा..

योगींसाठी सर्वकाही व्यवस्थित जुळून येत असतानाच हाथरस प्रकरण घडले आणि इथे पुन्हा सुरू झाला एक नवा खेळ... हाथरस घटनेमुळे उत्तर प्रदेश आणि पर्यायाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ माध्यमांच्या आणि जनतेच्या रडारवर आले. हाथरसच्या पिडीत मुलीचे निधन झाले आणि उत्तर प्रदेशच्या महाभारताचा रणसंग्राम हा मृत्यूच्या रात्रीच्या गडद अंधारात फुंकला गेला. आपल्या मुलीचा मृतदेह हा रात्रीच्या अंधारात परस्पर पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याचा आरोप दलित असलेल्या पिडीतेच्या कुटुंबातील सदस्यांनी केला आणि देशभर एकच गहजब माजला. माध्यमांचे सर्व प्रतिनिधी हाथरसमध्ये दाखल झाले पण त्यांना रोखण्यात आले. माध्यमांचे प्रतिनिधीच योगी सरकारविरुद्ध सत्याग्रहाला बसल्याचे अभूतपूर्व चित्र दिसू लागले. हा तोच मीडिया होता ज्यांच्यावर २०१४ नंतर "बिकाऊ मीडिया'चा शिक्का बसला होता. आणि आज हा तोच मीडिया आहे जो कधी नव्हे ते सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारताना कचरत नाहीये. सारेच कसे अनाकलनीय...पण यामागे काहीतरी राजकारण शिजतयं अशी शक्यता व्यक्त करण्यासाठी अनेक घटना घडल्या आहेत.

हाथरसची घटना ज्या चुकीच्या पद्धतीने हाताळली त्याबद्दल योगी सरकार टीकेचे धनी झाले. या घटनेमुळे काँग्रेसला जणू संजीवनी मिळाली. पोलिसांच्या झटापटीत राहुल गांधींचे जमिनीवर पडणे आणि लाठीहल्ल्यात कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी स्वत: संरक्षक भिंतीसारखे कवच उभारणारी प्रियांका गांधी वड्रा यांच्या या नव्या रुपाने मृतावस्थेत असलेल्या कॉँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्तेही सक्रिय झाले. भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद युपीच्या शोषित-वंचितांसाठी तारणहार बनू लागले. शिवसेना, तृणमूल कॉँग्रेससह विरोधी पक्षांनी बाह्या सरसावल्या. विकास यादव प्रकरण शांत होईस्तोवर पुन्हा एकदा युपी पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेमुळे देशभर संतापाची लाट उसळली. असं अजिबात नाहीये की योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यापासूनच उत्तरप्रदेशमध्ये सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. युपीचा क्राईम रेट हा देशात कायम सर्वाधिक असतोच आणि बलात्काराच्या घटनेच्या बाबतीत तर यापूर्वीच्या समाजवादी पक्षाच्या कालावधीत यापेक्षा अधिक घटना घडल्याची आकडेवारी जाहीर आहे. मात्र तरीही हाथरसच्या घटनेत योगी चक्रव्यूहात अडकले. विरोधकांच्या वादळाला एकट्यानेच अंगावर घेताना त्यांच्या मदतीला पक्षातील कोणीही सरसावले नाही. ना उच्चपदस्थ नेते ना भक्त संप्रदाय... देशातील सर्वात मोठे आणि महत्वाचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातील आपल्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना वाचविण्यासाठी कोणतीही रणनीती आखली गेली नाही उलट त्यांना चक्क वाऱ्यावर सोडले गेले. इतर वेळी माध्यमांसमोर येऊन आकांडतांडव करणारे नेते, राष्टीय प्रवक्ते यांची सोयीस्कर चुप्पी मात्र काही वेगळेच संकेत तर देत नाही ना? अशी शंका येत आहे. अखेर हाथरसच्या निमित्ताने युपीत दंगली घडवण्याचा काही समाजकंटकांचा नियोजित डाव असल्याचा गुप्तचर खात्याचा अहवाल योगी सरकारने मांडला आणि डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

या सगळ्या प्रकाराकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने पाहात होते त्याची चिकित्सा करणे गरजेची ठरते.काँग्रेसच्या कात टाकलेल्या या नव्या रुपाची मोदींना फारशी चिंता नाही. कारण काँग्रेस पक्षाला मोंदींइतके अन्य कुणीही ओळखत नाही. घटना घडली तेव्हा सपाचे अखिलेश यादव यांचा विरोध लंडनहून ट्विट करण्यापर्यंतच होता तर मायावतींच्या विरोधालाही पूर्वीइतकी धार राहिलेली नाही हे पंतप्रधान पुरते ओळखून आहेत. सामाजिक कार्यकर्ते, बॉलीवूडमधील काही सेक्युलर मंडळी आणि अन्य पुरोगामी संघटना यांच्या विरोधाची हवा कशी काढून घ्यायची हेदेखील त्यांना चांगले अवगत आहे. त्यांना चिंता आहे ती बिहारच्या निवडणुकीची. कारण हाथरसच्या घटनेचे पडसाद बिहार निवडणुकीवर हमखास पडणार आहेत. बिहारमध्ये १६ टक्के दलित मतदार असून नॅशनल इलेक्शन स्टडीजच्या अहवालानुसार २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये दलितांच्या एकूण मतदारांपैकी तब्बल ७६ टक्के दलित मतदारांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मतदान केले होते. यंदा नितीश कुमार यांना अगोदरच सरकारविरोधी लाटेचा सामना करावा लागत असताना त्यात हाथरसची घटना घडली आहे. हाथरस प्रकरणामुळे नाराज असलेल्या दलित समाजाची मते मिळाली नाही तर बिहार राज्य गमावण्याची भीती मोदी आणि शाह यांना आहे. म्हणूनच हाथरसच्या घटनेवर योगी यांना उघडपणे पाठीशी घालणे भाजपला परवडणारे नाही असा एक कयास व्यक्त होतोय. याचीच भरपाई म्हणून की काय एनडीएमधील जोनच दिवसांपूर्वी निधन झालेल्या रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाने बिहार निवडणूक आघाडीमध्ये सामील न होता स्वतंत्र निवडणुका लढविण्याचे जाहीर केलेे. पण हे करताना मात्र भाजपबरोबर निवडणूकीनंतर एकत्र येणार हेही सांगितले. याचा अर्थ सरळ आहे की दलित समाजाची मते जरी नितीशकुमार आणि भाजप आघाडीला मिळाली नाही तरी ती लोकजनशक्तीला निश्चितच मिळतील आणि पर्यायाने मग भाजपला सत्ता स्थापनेसाठी आकड्यांची रसद पासवान आरामात पोहचवू शकतात. मुस्लिम विरोधाची फारशी पर्वा नसलेल्या आणि सवर्णांचा पक्ष म्हणून अगोदरच टीका असलेल्या नरेंद्र मोदींना दलित-आदिवासींचा विरोध परवडणारा नाही. महत्वाचा मुद्दा एकच तो म्हणजे नाराज झालेल्या दलित समाजाची मते येनकेन मार्गाने आपणाला मिळणार याची चोख व्यवस्था आणि त्यासाठी मग एखादा राजकीय बळी हाही "योगा योगाने' त्यामुळेच.

योगी आदित्यनाथ यांची वाढत जाणारी महत्वाकांक्षा हीदेखील पंतप्रधान मोदींसाठी चिंतेची बाब असू शकते. "मोदींचे उत्तराधिकारी कोण' यावर जितक्या वेगाने योगींनी सुत्र हलवली ती पाहता पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या टप्प्यावर विराजमान होऊ पाहणाऱ्या मोदींना आता पक्षांतर्गतच काही संकेत दिसू लागले आहेत. मुळात योगी आदित्यनाथ यांची धाटणीच वेगळी आणि म्हणूनच तशाच पद्धतीने ते युपीचा गाडा हाकतात. राष्ट्रीय सुरक्षा कायदा,युएपीए कायदा देशद्रोह कायदा अशा अंत्यत टोकाच्या कायद्यांचा ते राज्य व्यवस्थेत मुक्तपणे वापर करतात. "अली बनाम बजरंग बली' या त्यांच्या कार्यपद्धतीवर विशेषत: पोलिस एन्काऊंटरवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कट्टर हिंदुत्ववादी या एकाच सुत्रावर राजकारणाचा प्रवेश त्यांच्या कामी आला. धर्म आणि विकास या दोन्ही बाजू सांभाळत योगी यांनी आपली एक वेगळी प्रतिमा तयार करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. उत्तर प्रदेशातील जातीय राजकारणाचे समीकरण जुळवताना त्यांनी त्यामध्ये आपला विकासवादी चेहरा असल्याचे सातत्याने भासवले. उत्तर हा “उत्तम’ प्रदेश असल्याचे योगी यांनी आपल्या भाषणात तसेच अनेक मुलाखतीत ठसवले. देशातील इतर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा आपण वेगळे आहोत याचे प्रोजेक्शन करण्यासाठी त्यांनी प्रसिध्दी माध्यमातील सर्व यंत्र तंत्र याचा मुक्तहस्ते वापर केला. पारंपारिक भगवी कफनी असा वेष असलेल्या योगी यांनी आपली लार्जर दॅन लाईफ अशी प्रतिमा व्यवस्थितपणे ठसवली आणि म्हणूनच कडवा हिंदुत्व मानणारा एक मोठा गट त्यांच्या पाठीशी राहिला.

याच कथानकाशी मिळताजुळता असलेला पूर्वार्ध पाहिला तर आपल्याला २००२ च्या गुजरातमध्ये जावे लागेल. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यावेळी नेमकं असचं घडलं होतं. मात्र त्यावेळी गुजरात दंगलीत अडकलेल्या त्या वेळी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी असलेल्या नरेंद्र मोदी यांना तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीं यांनी "राजधर्म' पालनाची आठवण करून दिली होती. मोदी यांचा राजीनामा वाजपेयी घेणार होते असेही बोलले जात होते. हे प्रकरण मोदी यांची दिल्लीवरील स्वारी साठी कायमचा कोलदांडा ठरेल असा राजकीय पंडीतांचा अंदाज होता. पण त्या सर्व प्रकरणातून यशस्वीपणे बाहेर पडलेले मोदी काही वर्षांनी पंतप्रधान झाले. आता हा फॉर्म्युला "योगी' यांनाही लागू होणार की नाही हे कोणीच ठामपणे सांगू शकणार नाही.

महाभारतात स्वकीयांविरुद्ध युद्ध खेळण्यासाठी श्री कृष्णाने अर्जुनाला प्रवृत्त केले. सत्तेच्या राजकारणात आणि कोणत्याही क्षेत्रात आपल्यापेक्षा कोणी वरचढ होऊ लागताच त्याला चेकमेट करून पंख छाटले जातात. उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये घडत असलेल्या या महाभारतात अर्जुन आणि त्याला मार्गदर्शन करणारा श्री कृष्ण यांचे सोयीस्कर मौनात जाणे हा या चेकमेटचाच प्रकार आहे का?

atulm2001@gmail.com

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser