आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक:मीच माझा मोर…

अतुल पेठकर9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या राज्यात राजमान्यतेची मोहोर उमटलेला पक्षी सप्ताह सुरू आहे. अर्थात महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना त्याही पूर्वीपासून तसा तो साजरा करीत होतीच. जंगल वाचणारा माणूस अशी ओळख असलेले अरण्यऋषी मारूती चितमपल्ली यांचा ५ नोव्हेंबर हा जन्म दिवस आणि पक्षी तज्ज्ञ सलीम अली यांची १२ नोव्हेंबर ही जयंती, असा हा पक्षी सप्ताह आहे. या निमित्ताने साहित्यातील पक्षी विहाराचा घेतलेला हा धावता आढावा. फुलपाखरू एकाच फुलावर फार काळ बसत नाही. तसा हा आढावा आहे. त्यामुळे अनेक कवी, लेखकांचे केवळ नामोल्लेख आल्यास क्षमस्व!

विषय पक्षांचा आहे, म्हणजे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडणाऱ्या पक्षांचा नव्हे तर पंखांनी आकाश कवेत घेत उडणाऱ्या पक्षांचा आहे. त्यांचा आढावा घ्यायचा तर थेट ‘रामायण’ या अजरामर काव्यापासून सुरूवात करावी लागेल. कारण क्रौंच पक्षाच्या शोकात्म मरणानंतर वाल्याचा वाल्मिकी झालेल्या वाल्मिकी ऋषींच्या मुखातून अनुष्टुभ छंदातील श्लोक बाहेर पडला आणि त्यातून रामायण या महाकाव्याचा जन्म झाला…

माणूस अगदी आदीम अवस्थेत असतानाही निसर्ग, पशु, पक्षी, झाडे या प्रतिमांचा उपयोग आपले आनंद, दु:ख, राग आदी भावना व्यक्त करण्यासाठी करीत. आदिमानवाला शब्दातून व्यक्त होत नव्हते म्हणून तो कातळ शिल्पातून व्यक्त झाला. ही चित्रे त्याच्या काव्यात्मक अनुभूतीचे प्रगटीकरण होते, असे म्हटले तर हरकत नसावी. ‘वारली’ या आदिवासी चित्रकलेतील काव्यात्मक मांडणी पाहिली की ती चित्रात्मक कविताच वाटते. शब्दांऐवजी इथे तालबद्ध चित्रं फेर धरून नाचतात… तसे पाहु जाता कोणत्याही कवी वा लेखकाचे अनुभवविश्व त्याच्या भाषिक पर्यावरणाची अभिव्यक्ती असते. वृक्ष, वनस्पती, आभाळ, नदी, समुद्र आणि पक्षी या प्रतिमा कवितेत वा लेखनात खूप सामान्यपणे येतात. कितीही आधुनिक लेखक वा कवी असला तरी त्याच्या लेखनातून या प्रतिमा येतात.

आज पन्नाशीला असलेल्या पिढीचा संबंध पशुपक्षांशी त्यांच्या लहानपणापासून यायचा. शहरात तो येत नाही. कारण माणूस निसर्गाशी असलेली नाळ गर्भातूनच तोडून येतो. असे असले तरी एका पिढीचा संबंध काऊ चिऊशी आलेला आहे. ‘एक घास काऊचा, एक घास चिऊचा’ करीत आई बाळाला घास भरवित असे. ‘इथे इथे येरे काऊ, बस रे चिऊ, दाणा खा, पाणी पी’ म्हणत बाळाला घास भरवायलाही चिऊ काऊच लागत असे. ‘एक होती चिऊ, एक होती काऊ’, ‘चिऊच घर होत मेणाच आणि काऊच घर होत शेणाच’ ही गोष्ट न ऐकलेला माणूस विरळाच. इथून चिमणी कावळ्याशी आणि पक्षांशी आलेला संबंध त्याचे भावविश्व व्यापून राहिला. साहित्यातूनही पक्षी विहार करीत राहिले...

चकोर पक्षी चंद्रकिरणांचे सेवन करतो, अशी आख्यायिका आहे. ज्ञानेश्वरांनी त्याचे रूपक करीत त्या प्रमाणे मी काय सांगतो ते ग्रहण करा, अशी प्रार्थना केली,

जैसें शारदेचिये चंद्रकळें।

माजी अमृतकण कोंवळे।

ते वेंचिती मनें मौआळें ।

चकोरतलगें॥

तेयापरीं श्रोतां ।

अनुभवावी हे कथा ।

अति हळुवारपण चित्ता ।

आणुनियां॥

कुठलाही ॠतू नव्हे तर शरद ऋतु. लख्ख चादणं नाही, मंद चांदणं. संपूर्ण चांदणं नाही, फक्त त्यातील अमृत. संपूर्ण अमृतही नाही, त्यातील निवडक कण- कोवळे कोवळे कण. तेही सावडायचे नाही, वेचायचे. चिमटीने? नाही. मग चोचीने? नाही, मनाने. उडू नशकणाऱ्या, तळाशीच गमन करू शकणाऱ्या चकोरतलगाची कोवळीक साहित्य रसिकाकडून अपेक्षित असते. तर

पैल तो गे काऊ कोकताहे । शकुन गे माये सांगतसे ॥१॥ उडरे उडरे काऊ तुझे सोन्यानें मढीन पाऊ । पाहुणे पंढरीराऊ घरां कैं येती

या अभंगातून माऊलीने पंढरीराऊ पाहुणा म्हणून येत असल्याचा शकून कावळा आणणार असल्याचे सांगितले. इतर पक्षी कथा इसापनीतीमध्ये जास्त असल्या तरी मराठी साहित्य कावळा व चिमणीभोवती खूप फिरले हेही तितकेच खरे आहे.

आपल्या पिलाला परत न देणारा समुद्र टिटवी आपल्या चोचीने प्यायला निघाली, ही कथा सर्वांना माहिती आहे मर्ढेकरांनी आपल्या,

सुरात भरली टिटवीच्या कोणी

मृत्यूजयंता भोळी भगवी

आणि अचानक शिवली गेली

ध्रृवाध्रृवातील काही कडवी

या ओळीतून टिटवीचा निर्धार व्यक्त केला. संत, महात्मे, कवी, लेखकांनी आपल्या साहित्यातून पक्षांच्या प्रतिमा वापरल्या. त्यांच्या प्रतिकांचा वापर करीत कथा गुंफल्या. तर कबीराने,

उड जायेगा हंस अकेला

दुनिया दर्शन का मेला

असे सांगत मानवी मनाच्या तळाशी असलेला मूलभूत एकटेपणा गडद केला. म. म. देशपांडे यांनी -

हे पक्षी सुंदर

गाति निरर्थक गाणे

मी निरर्थकातील

भुलतो सौंदर्याने

म्हणत निरर्थकातील सौंदर्य शाेधले.

ग्रेसने ‘चिमण्या’ या कथेतून चिमण्यांचे जग उलगडताना अस्वस्थता व्यक्त केली.

कावळे उडाले स्वामी

तुम्ही भगवे अंथरले ना

आकाश राहुटीवरचे

मग थोडे ढकलूनी द्या ना

यातून काव्य निर्मितीची साद घातली. तर संत जनाबाईने

पक्षी जाय दिगंतरा। बाळकांसी आणी चारा ।।१।।

घार हिंडते आकाशी। झांप घाली पिल्लापासी ।।२।।

पिल्लासाठी आईचे हृदय किती तळमळते हे सांगीतले. तर -

झाड साेडते मौन,

शांत नीरव अंधारात

अशा पाऊस पाण्यातही

दोघे रात्रभर

काय बोलत बसतात?

असा प्रश्न तीर्थराज कापगते यांना पडला.

१९९० नंतर जागतिकीकरणाचे वारे वाहायला लागले. दळणवळणाच्या आणि संज्ञापनाची गतिमान साधने निर्माण झाली. मुक्त अर्थ आणि व्यापार व्यवस्थेमुळे जंगले पाडून तिथे सिमेंट काँक्रीटची जंगले उभी राहिली. तर निसर्ग अक्षरश: ओरबाडून नष्ट करण्यात आला. निसर्ग, शेती, पर्यावरणाचा ऱ्हास झाला. तर मोबाईल टाॅवरच्या किरणोत्सर्गामुळे पक्षी जीवन नष्ट झाले. त्यामुळे ९० नंतरच्या कविता तसेच इतर लेखनांत शेतकरी आत्महत्या, उद्धस्त जीवनाचे संदर्भ प्रामुख्याने येतात. त्यात शेती, बैल आदीचे संदर्भ येतात -

माझ्यातला शेतकरी संपत चाललाय हळूहळू

हे वावर उसासतंय

हे झाड मुळासकट पडतंय उपटून

ही विहीर चाललीय आटून

ही घराची भिंत आलीय अंगावर रेलून

हा बैल अकालीच होतोय म्हातारा

ही गाय गाभडलीय

आपण वाहून आणलेले दाणे

मुंग्या करतायत पसार…

या ‘भुईशास्र’ मधील कवितेतून ऐश्वर्य पाटेकरने दु:सह परिस्थितीला कंटाळून शेतकऱ्यांची नवी पिढी शेतीपासून कशी दूर जात आहे याचे वास्तव मांडले. मलिका अमर शेख, वर्जेश सोलंकी, अजय कांडर, दिनकर मनवर, हेमंत दिवटे, प्रकाश होळकर, अजीम नवाज राही, प्रवीण बांदेकर, श्रीधर नांदेडकर आदी कवींच्या कवितांमध्ये अशा प्रकारे उद्धस्त जीवनाचे प्रत्ययकारी चित्रण करणाऱ्या प्रतिमा येतात. विद्रोही कवीता या जातीची उतरंड, त्यामुळे होणारे दमन याविरूद्ध आग ओकणाऱ्या, शोषण करणाऱ्या व्यवस्थेला उखडून फेकण्याचे आवाहन करणाऱ्या. पण, तिथेही पक्षी प्रतिमा येतात. शरच्चंद्र मुक्तिबोध आपल्या ‘अंधाराला डोळा निघे’ या कवीतेत -

अशा लाल लाटेतून

पाठी पेटल्या धावती

त्यांना पहाड गिधाडे

खाली वाकून वेचती

असा विद्रोह व्यक्त करतात. तर ‘पाखरे’ कवीतेत केशव मेश्राम -

पाखरांनो मला सांगा

मी काय करावे तुमच्यासाठी?

मागू नका माझी चोच… बोथट…. विष्ठावलेली

अशी बोचरी सल व्यक्त करतात. माणसातील पशुत्वाचे आणि माणुसकीचे दर्शन कवीतेतून घडवणाऱ्या दया पवार यांनीही ‘चिमणी’मध्ये

देवांच्या भाकड कथांचा समुद्र

गढूळलेल्या अपरंपार लाटा

गुडघाभर पाण्यात उभी चिमणी

नाकाताेंडात जाते पाणी

अशी अस्वस्थता व्यक्त केलीय. ज. वि. पवार यांनी ‘तुरूंगातील पाखरे’ मधून पाखरे तुरूंगासह उडून जाणार नाहीत या भ्रमात राहू नका, असा इशारा दिलाय. तर नीलकांत चव्हाण यांनी ‘चित्रे’ मधून

मेलेल्या गायीला उघड्यावर

जशी गिधाड तुटून पडतात

आत ढेरपोटे बाहेर खोलपोटे

अशी खूप चित्र टांगली

असे म्हणत सामाजिक भेदभावाचे वास्तव मांडलयं. अतिरेकी सोयी सुविधांमध्ये निसर्ग चिरडला जातोय याचे भानही लोकांना राहिले नाही. लोक मातीलाही विसरले.

मन मातीचं मातीचं

लोक भुलले मातीले

सीमेटीच्या घरामंदी

अाता उल गेली त्याले

यातून यवतमाळच्या स्वर्गीय गजेश तोंडरेने ही वेदना ठसठशीतपणे मांडली. प्रफुल्ल शिलेदार यांचा ‘पायी चालणार’, प्रशांत असणारेचा ‘मीच माझा मोर’ कविता संग्रह वाचकप्रिय आहे. पु. शि. रेगे यांचा ‘दुसरा पक्षी’ कविता संग्रह व ‘सावित्री’ ही कादंबरी प्रसिद्ध आहे. ‘सावित्री’ची मध्यवर्ती प्रतिमाच मोर आहे. ‘एक झाड दोन पक्षी’ हे विश्राम बेडेकरांचे आत्मकथन वाचकप्रिय आहे. आपले दु:ख रमेश तेंडुलकरांनी ‘प्राजक्त’मधून संयतपणे मांडले आहे

पावसाळ्यात

एका मेघाच्छादित दुपारी

मी पाहिला सूर्य

रस्त्यावरच्या गढूळ पाण्यात

गोल, चंद्रसा,

किरणे मिटून पडलेला, मंद, विव्हल :

पाण्यात प्रतिबिंबित झालेल्या आकाशाच्या

खोल गर्तेतला जणू जखमी जटायू!

मनोज बोरगांवकर यांची ‘नदीष्ठ’ कादंबरी, प्रसाद कुमठेकर यांची ‘बगळा’, जयवंत दळवीचे ‘गिधाडे’ हे नाटक, गो. ना. मुनघाटे यांची ‘माझी काटेमुंढरीची शाळा’ ही आत्मचरित्रात्मक कांदबरी ही काही साहित्यातील उदाहरणे... दुर्गा भागवत यांचा ललित लेखसंग्रह ‘ऋतुचक्र’ मधून भारतीय महिन्यांतील निसर्गाची विविध रूपे टिपताना पक्षांविषयीचे निरीक्षण निसर्ग वाचन शिकवून जाते. दा. सु. वैद्य यांच्या ललित लेखनातही पक्षी मुक्तपणे बागडतात. महेश एलकुंचवार केवळ "उद्धस्त वाडा'च नव्हे तर पक्षांविषयी हळूवारपणे लिहितात.

आणि आता अभूतपूर्व असा कोरोना काळ आलाय. ९० नंतरच्या दशकात झालेला पर्यावरणाचा ऱ्हास आता भरून निघतोय. लाॅकडाऊनमुळे जखम भरून निघाली आहे. ‘फॅक्टरी रिसेट’ मारल्यामुळे निसर्गही पहिल्यासारखा ताजा तवाना झालाय. प्रदुषण कमी झाल्यामुळे जलसाठे व हवाही शुद्ध झालीय. फ्लॅट स्किमच्या कोपऱ्यावरील झाडावर पक्षी पुन्हा परतले आहे. ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ अशी साद घालूनही न येणाऱ्या चिमण्या परतल्या आहेत. सकाळी परत किलबिल सुरू झालीय. महानोरांच्या शब्दात सांगायचे तर हिरवीशी झालेल्या गर्द झाडांच्या रानात पक्षांची शीळ घुमते आहे. रानावनातच घुमणारी ही शीळ साहित्यातून परत घुमावी. कोरोनाने दिलेले दान आता करंटेपणाने गमावू नये. त्यासाठी नेहमीचे लाॅकडाऊन झाले तरी बेहत्तर.

pethkaratul09@gmail.com

बातम्या आणखी आहेत...