आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:लोकल ते ग्लोबल... व्हाया "स्लम सॉकर'!

अतुल पेठकर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

"स्लम' अर्थात झोपडपट्टी हा शब्द ऐकताच चेहऱ्यावर तुच्छतेचे भाव उमटतात. मात्र इथे राहाणाऱ्या बिनचेहऱ्याच्या मुलांच्या जीवनात प्रा. विजय बारसे यांनी पहिले जगण्याची नवी उमेद जागवली...नंतर ती रूजवली...आता या उमेदीचा वड झालाय. या वडालाही आता नव्या आशा-आकांक्षांच्या पारंब्या फुटल्या आहे. विजय बारसे यांच्या "स्लम सॉकर' या संकल्पनेने झोपडपट्टीतील मुले फुटबाॅल स्टार झाली आहे. आज यातील अनेक खेळाडू जागतिक पातळीवर खेळत आहेत... ""आमच्यासाठी बारसे सर हेच परीस आहेत. त्यांचा स्पर्श झाला नसता तर आमचे जीवनही लोखंडासारखे गंजून गेले असते...'' अशा शब्दांत  विद्यार्थ्यांनी या "मिरॅकल मॅन'बद्दल गुरु पोर्णिमेनिमित्त आपली कृतज्ञता व्यक्त केली.

मलाच आली कीव खरोखर मजला हसणाऱ्यांची

हसतानाही त्यांचे हसणे केविलवाणे होते!

त्यांनी तर घरट्यातच चिवचिव दिव्यत्वाची केली

मी जगलो माणसांत, माझे क्षुद्र घराणे होते!

विजय स्टिफन बारसे या शारीरिक शिक्षकाने चेहरे हरवून बसलेल्या झोपडपट्टीतील मुलांना नुसते चेहरेच नाही तर त्या चेहऱ्यांना आपली एक स्वतंत्र ओळखही दिली. दरम्यान काळ खूप पुढे गेला आहे. आता मुले स्मार्ट झालीय. चोऱ्या करणारे, खिसा कापणारे, क्षुल्लक कारणावरून चाकू चालवणारे, आॅटो फोडणारे हात आता संगणकाशी खेळतात, सगळे शब्दच गोठून गेल्यासारखी असलेली मुले सफाईदार इंग्रजी लिहितात...आणि घर ते तुरुंग एवढाच प्रवास करणारी मुले आता विमानाने प्रवास करतात...विजय स्टिफन बारसे याच्या परीस स्पर्शाची ही जादू आहे...    

     "स्लम' अर्थात झोपडपट्टी हा शब्द ऐकताच चेहऱ्यावर तुच्छतेचे भाव उमटतात. इथे राहाणाऱ्या बिनचेहऱ्याच्या मुलांच्या जीवनात विजय बारसे यांनी पहिले जगण्याची नवी उमेद जागवली...नंतर ती रूजवली...आता या उमेदीचा वड झालाय. या वडालाही आता नव्या आशा-आकांक्षांच्या पारंब्या फुटल्या आहे. विजय बारसे यांच्या "स्लम सॉकर' या संकल्पनेने झोपडपट्टीतील मुले फुटबाॅल स्टार झाली आहे. आज यातील अनेक खेळाडू जागतिक पातळीवर खेळत आहेत... ११ वर्षांपूर्वी म्हणजे २००१ मध्ये अशीच काही झोपडपट्टीतील मुले ऊन-पावसाची तमा न बाळगता अनवाणी फुटबॉल खेळताना प्रा. विजय बारसे यांना दिसली. कुठलीही साधने नसताना तहानभूक विसरून फुटबाॅल खेळणारी मुले पाहून या मुलांमधून अव्वल फुटबॉलपटू घडविण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात शिरली. झोपडपट्टीतील टॅलेन्ट शोधणाऱ्या "स्लम सॉकर'चा जन्म हा असा झाला.

बारसे सर या मुलांच्या जीवनात आले नसते तर अंधाऱ्या वाटा तुडवण्यात त्यांचे आयुष्य संपले असते. पण, बारसे सरांचा परीस स्पर्श झाल्यानंतर या मुलांनी उजेडाची पावलांनी यशाची एकेक शिखरे काबीज केली. आज ७५ देशांनी स्पर्धेच्या माध्यमातून होणाऱ्या कार्याची दखल घेतली आहे.‘युनिसेफ’नेही झोपडपट्टीत राहणाऱ्या किंवा वंचित मुलांचा फुटबॉलच्या माध्यमातून विकास होऊ शकतो,हे सूत्र स्वीकारले आहे.

""आमच्यासाठी बारसे सर हेच परीस आहेत. त्यांचा स्पर्श झाला नसता तर आमचे जीवनही लोखंडासारखे गंजून गेले असते...''

स्वत:चा अंगठा देणारे गुरू  - होमकांत सुरंदसे

विजय बारसे यांच्या परीस स्पर्शाने अनेकांचे जीवनच बदलले. त्यातला मीही एक आहे, असे होमकांत सुरंदसेने सांगितले. यवतमाळ जिल्ह्यातील नेरपरसोपंतचा. नाथजोगी समाजाचे हे कुटुंब भटकत भटकत नेरला येऊन थांबले. अंगापिंडाने मजबूत असलेला तेजतर्रार होमकांत एका संघटनेत काम करायला लागला. दोन मोठे भाऊ पोटापाण्याला लागल्यानंतर होमकांत मात्र भटकत राहिला. दोन वेळ जेवणे, मस्त भटकणे, संघटनेचे काम करणे आणि सायंकाळी शेजारच्या मुस्लिमपुऱ्यातील मुलांसोबत फुटबाॅल खेळणे एवढेच त्याचे जीवन होते. एक दिवस रागाच्या भरात घर सोडून सरळ नागपूर गाठले. नागपुरला एका मित्राने चहाच्या टपरीवर लावून दिले. तिथे असलेल्या आजीच्या झोपडीतच होमकांत राहायला लागला. एक दिवस विजय बारसे टपरीवर चहा प्यायला आले. झोपडपट्टी फुटबाॅल खेळत असल्याने होमकांतला ओळखत होते. "तू इथे कसा?' या प्रश्नानंतर होमकांत बारसे यांच्या सोबत त्यांच्या घरी आला. तिथून त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. फुटबाॅलसोबत शिक्षणही सुरू झाले. आज तो पीएच.डी करीत आहे. तर होमलेस वर्ल्डकपसाठी जाणाऱ्या फुटबाॅलसंघाचा प्रशिक्षक आणि निवडकर्ता आहे... एकलव्याच्या गुरूने त्याला त्याचा अंगठा मागितला होता. बारसे सर शिष्याला स्वत:चा अंगठा देणारे गुरू आहेत. माझ्यासाठी मित्र, मार्गदर्शक, तत्वज्ञ, गुरू, आई वडील सर्व काही आहेत. ते नसते तर अाज गुंडगिरी करीत जेलच्या दगडी भिंतीत आयुष्य चिणल्या गेले असते. पण, त्यांच्यामुळे जीवनात बरकत आली आहे. ते माझे रोल माॅडेल आहेत. संवाद व कला त्यांच्याकडून शिकलो. शिक्षण सोडून टवाळक्या करीत फिरणाऱ्या मला त्यांनी  शाळेत पाठवले. शाळा ते डाॅक्टरेटपर्यत मदत केली. माझ्या आयुष्यात त्यांचे स्थान गुरूपेक्षाही वरचे आहे.

फुटबाॅल नसता तर कुख्यात गुंड झालो असतो... - पंकज महाजन

पंकज महाजन हा नागपूरपासून जवळच असलेल्या गोधनीचा. गोधनी म्हणजे एकदम खतरनाक वस्ती. इथे मरायलाही क्षुल्लक कारणही पुरते. पंकजकडे कोणाचेच लक्ष नव्हते. पान, तंबाखू, गुटखा सुरू झाले. फुटबाॅल नसता पंकज कदाचित कुख्यात गुंडच व्हायचा. होमकांत सुरंदसे यांच्या संपर्कात आल्यानंतर पंकज फुटबाॅल खेळायला लागला. तिथून आयुष्याला कलाटणी मिळाली. २०१३ मध्ये तो पोलंडला जाऊन हाेमलेस वर्ल्डकप खेळून आला. आता बारसे यांच्याकडे तो शक्ती नावाचा प्रकल्प चालवतो. ग्रामीण भागातील मुलींमध्ये फुटबाॅलची आवड रूजवून त्यांच्यातून उत्तम खेळाडू तयार करण्याचे काम करतो. बारसे सर नसते तर गुंडच झालो असतो. माझ्याकडे लक्ष द्यायला कोणाकडेच वेळ नव्हता. ११ वी नंतर ड्राॅप आऊट झालो. काॅलेज बंद झाले. तेव्हा कोणत्याही शिक्षकांनी वा नातेवाईकांनी काही म्हटले नाही. पण, बारसे सरांनी आस्थेने विचारपूस करून बारावीत नाव घातले. माझ्यासाठी तेच आई वडील झाले. शाळेतल्या भिंती पल्याडच्या जीवनाच्या शाळेतले शिक्षण त्यांनी दिले. आतापर्यत दहापेक्षा जास्त स्पर्धा खेळलो. त्यातील पाच आंतरराष्ट्रीय आहे. २०१३ मध्ये होमलेस वर्ल्डकप पोलंड, त्यानंतर व्हिएतनाम आणि २०१७ मध्ये बेल्जीयम पीस फूटबाॅल खेळलो.  

"पप्पा की बेटी' - - शिबा मार्कस  

बारसे सरांच्या संस्थेत "पप्पा की बेटी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिबा मार्कस फूटबाॅल कोच आहे. ते माझ्यासाठी वडीलच आहेत. त्यांचे व्यक्तिमत्वच असे आहे की, माझ्या तोंडून एकदा उत्स्फूर्तपणे "पप्पा' निघाले. तेव्हापासून ते माझे वडील आहेत. येथे रूजू होण्यापूर्वी मी त्यांना दादा म्हणत होते. ते उत्तम शिक्षक आहेच. पण, ते सर्वांचे वडील होऊन राहातात. भविष्याचा वेध घेतात. स्पष्टवक्ता व रोखठोक स्वभाव खूप आवडतो. समोरच्याला ओळखून पैलू पाडण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. समोरच्यावर विश्वासाने जबाबदारी टाकणे आणि त्यातून नवे शिकण्याची संधी देणे सरांकडून शिकले. फूटबाॅल कोच म्हणून काम करताना त्यांच्याकडून शिकलेल्या गोष्टींचा खूप फायदा होतो.  

नागपूर सेंट्रल जेल ते मेक्सिको.. व्हाया "स्लम सॉकर' - विकास मेश्राम

िवकास मेश्राम हाही नागपूरपासून जवळच असलेल्या गोधनीचा. तोंडात ब्लेड घेऊन फिरणे आणि रेल्वेत पाकिटमारी व चोऱ्या करणे एवढेच त्याला माहिती होते. वस्तीने त्याला बहिष्कृत केले होते. तर २०११ ते २०१९ पर्यत वडील त्याच्याशी बोलत नव्हते. सहा महिने नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये राहून आलेला विकास मेश्राम एक दिवस मेक्सिको येथे आयोजित होमलेस फुटबाॅल वर्ल्डकप खेळेल, असे कोणाच्या गावीही नव्हते. पण, विजय बारसे नावाच्या परिसाने या दगडाचेही जीवन बदलले. विकास अतिशय कृतज्ञ भावनेने बारसेंविषयी बोलत होता. एक दिवस असाच भटकत स्लम साॅकरमध्ये मित्रासोबत आलो. आणि हळूहळू येत गेलो. एक दिवस सरांना माझ्या बॅकग्राऊंडविषयी माहिती झाले. त्यांनी माझ्याकडून माझी संपूर्ण माहिती समजून घेतली. माझ्या पाठीवर विश्वासाने हात ठेवला. तिथून जीवन बदलले...सेंट्रल जेलच्या वाटेने पडत असलेली पावले फूटबाॅल खेळायला लागली... मला कोणते व्यसन नव्हते, असे विचारावे इतका मी व्यसनी होतो. आज मी निर्व्यसनी आहो. आता बारावीची परीक्षाही दिली. सरांनी पोटच्या पोराप्रमाणे वागवले. लाॅकडाऊनच्या काळात वस्तीत श्रमदान करीत आहे. एकेकाळी नाकारणाऱ्या वस्तीने आता हातात हात घेतले आहे, ते केवळ बारसे सरांमुळे, असे सांगताना विकास फोनवर मध्येच थांबला. तेव्हा त्याने प्रयत्नपूर्वक दाबलेला हुंदका ऐकू आला. सर त्यांचे अनुभव आमच्यासोबत शेअर करतात. चुक झाली तरी स्पष्ट सांगतात. आजही मी स्लम साॅकरमध्येच झोपतो.

बारसेंच्या भूमिकेत साक्षात बिग बी!

विजय बारसेंवर‘सैराट’फेम नागनाथ मंजुळे "झुंड' नावाचा हिंदी चित्रपट करतोय. अलिकडेच झुंडचा टिझरही प्रदर्शित झाला. त्यात बारसे यांची भूमिका साक्षात अमिताभ बच्चन साकारणार आहेत.पण त्यामुळे बारसे यांच्या जगण्यात काहीही फरक पडलेला नाही.ते अजूनही मोबाइल घरीच विसरूनच समोरच्याच्या हृदयाचे ठोके वाढवतात.त्यांच्याजवळ १९९९ मध्ये घेतलेली‘बजाज चेतक’ही स्कूटर आहे.चित्रपटाबद्दल विचारले असता,ते फक्त हसले.म्हणाले,यापूर्वीही एकदा माझ्यावर चित्रपट निर्मितीचा प्रयत्न झाला होता.अनेकांनी संपर्कही केला होता.पण योग आला नाही.मुलं म्हणाली सर ते डाॅक्युमेंट्री करतील,दोन दिवसही चालणार नाही.त्यामुळे फारसा रस घेतला नाही.पण मंजुळे यांच्या बोलण्यात आणि कथेतही आश्वासकता अाहे.अमिताभ बच्चन माझी भूमिका करणार आहे,असे म्हणतात.माझ्या आयुष्यावर कधी चित्रपट निर्मिती होईल,असा विचारही कधी केला नव्हता...

pethkaratul09@gmail.com

(लेखकाचा संपर्क - 9284809267)

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser