आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:बंडखोर नाओमी...

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अविनाश उषा वसंत
अमेरिकन खुली टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत दाखल होण्यासाठी सात सामने खेळावे लागतात. नाओमी ओसाका अंतिम फेरीदेखील जिंकली मात्र या सातही फेऱ्यात ती तोंडाला सात वेगवेगळे मास्क बांधून टेनिस कोर्टवर अवतरली. हे मास्क होते निषेधाचे... निषेध होता अमेरिकेच्या वर्णद्वेषाचा... आणि मास्कवर नावं कोरली होती अमेरिकेच्या पोलिस हल्ल्यात ठार झालेल्या आफ्रो-अमेरिकेन निष्पापांची...

ब्रेओना टेलर, एलिजा मॅक्लेन, अहमद अरबेरी, ट्रायव्होन मार्टिन, जॉर्ज फ्लॉईड, फिलांडो कास्टाईल,तामिर राइस... कोण आहेत ही लोकं...? यापैकी बहुतेकांना जॉर्ज फ्लॉईड हे नाव आता अनेकांना माहित झालयं. "आय कान्ट ब्रीथ' हे जॉर्ज फ्लॉईडचे शेवटचे शब्द. आफ्रो-अमेरिकन वंशाच्या जॉर्ज यांचा वर्णद्वेषी अमेरिकन स्टेटच्या पोलिसांनी संस्थात्मक हत्या केली. त्यानंतर "ब्लॅकलाईव्हमॅटर'चे आंदोलन संपूर्ण जगात उभे राहिले. फ्लॉईडसह वर उल्लेख केलेल्या या सातही जणांच्या अशाच संस्थात्मक हत्या झाल्या आहेत आणि जगाला याची पुन्हा एकदा दखल घ्यायला लावली ती टेनिस स्टार "नाओमी ओसाका' हिने.

टेनिस विश्वात ज्या चार ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धा असतात त्यापैकी महत्वाची मानली जाणारी एक म्हणजे अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा. अंतिम फेरीपर्यंत पोहचण्यासाठी स्पर्धकाला एकूण सात फेऱ्या पार कराव्या लागतात. या सातही फेऱ्यांमध्ये दरवेळी नाओमी ओसाकाने ब्रेओना टेलर, एलिजा मॅक्लेन, अहमद अरबेरी, ट्रायव्होन मार्टिन, जॉर्ज फ्लॉईड, फिलांडो कास्टाईल आणि तामिर राइस अशी अनुक्रमे सात जणांची नावे काळ्या रंगाच्या "मास्क' वर पांढऱ्या अक्षरात लिहिलेली होती. तिने अमेरिकन ओपनमध्ये सामना सुरू होण्यापूर्वी आणि सामना संपल्यानंतरच्या मुलाखतींवेळी हे मास्क घातले होते. याचा अत्युच्च बिंदू म्हणजे आर्थर एश स्टेडियमवरील अंतिम सामन्यात एक सेट पिछाडीवर असतानाही नाओमीने उमेद न हारता पुढचे दोन्ही सेट खिशात घातले. तिचे हे तिसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद, पण ह्या विजेतेपदापेक्षा तिच्या राजकीय कृतीची नोंद इतिहासात ठळक लिहिली गेली. यापूर्वी २०१८ मध्ये वयाच्या विसाव्या वर्षी याच अमेरिकन ओपन स्पर्धेत नाओमी जिला रोल मॉडेल समजायची त्या सेरेना विल्यम्सलाच सरळ सरळ दोन सेटमध्ये पराभूत करून पहिलेवहिले ग्रॅन्डस्लॅम पटकावले होते. नाओमी ओसाका जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी पोहचलेली पहिली आशियाई वंशाची खेळाडू ठरली. तशी ती बहुवांशिक आहे, तिची आई जापनीज तर वडील हैतीयन आहेत. ती तिच्या आजीशी हैतीयन क्रियोल भाषेत बोलते, अमेरिकेतच कायम वास्तव्य असल्याने जपानी भाषा तिला फक्त कळू शकते.

"ब्लॅकलाईव्हमॅटर' या आंदोलनाची आणि आफ्रो-अमेरिकन समुहांवर होणाऱ्या वर्णद्वेषी अन्यायाची संपूर्ण जगाला माहिती करून देणे ही गोष्ट नाओमीने फक्त यंदाच्या अमेरिकन स्पर्धेच्या वेळीच केलेली नाही तर या चळवळीमध्ये ती सुरुवातीपासून सक्रिय राहिली आहे. सोशल मीडियावर ती याबाबतीत कायम आघाडीवर असते. जूनमध्ये केलेल्या ट्विटमध्ये नाओमी म्हणते की, ज्यांचा काहीएक संबंध नाही ती व्यक्ती जेव्हा खेळाडूंनी राजकीय कृतीत सहभागी होऊ नये, खेळाडूंनी फक्त मनोरंजन करावे असे म्हणते तेव्हा मला राग अनावर होतो. त्यापुढच्या ट्विटमध्ये ती त्यांनाच प्रश्न विचारते की, "तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त बोलण्याचा अधिकार दिलेला आहे का?' एवढेच करून नाओमी थांबत नाही तर "ब्लॅकलाईव्हमॅटर' च्या आंदोलनात स्वत: रस्त्यावर उतरून भाग घेते. लॉस एंजलीस व मिसेनेओटा मधील "ब्लॅकलाईव्हमॅटर'च्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर अनेकांनी तिला प्रश्न विचारले होते. मात्र नाओमी आपल्या भूमिकेवर नेहमीच ठाम राहिली. "वर्णद्वेषातून अमेरिकेत आफ्रो-अमेरिकन समुदायावर जे अन्याय व शोषण होत आहे त्यावर मी नेहमीच आवाज उठवणार आणि ते जगासमोर आणण्यात कमी पडणार नाही' असे नाओमी म्हणते.

नाओमीची ही बंडखोर वृत्ती साधारणपणे खेळ, कला अशा ठिकाणी कारकिर्दीच्याबाबतीत घातक ठरू शकते. "भांडवल संपृक्त' बहुराष्ट्रीय कंपन्यांनी घेरलेल्या बाजार केंद्री टेनिससारख्या खेळात तिचे प्रायोजकत्व कधीही हिरावून घेतले जाऊ शकते. प्रायोजकांना घाबरूनच अनेक मातब्बर खेळाडू तोंडावर कायमची पट्टी बांधून असतात. मात्र नाओमी तिच्या तोंडावरची पट्टी ही निषेधाचे शस्त्र म्हणून वापरते. नाओमीची ही कृती अनेक खेळाडूंसाठी आदर्श ठरली आहे. नओमीचे प्रायोजक सिटीजन, योनेक्स, निस्सिन, निसान ह्या बहुराष्ट्रीय कंपन्या सध्या तरी नाओमीच्या ह्या कृतीवर काही प्रतिक्रिया देत नाहीत आणि हाच तिचा या लढ्यातील मोठा विजय आहे.

नाओमीने अमेरिकन ओपन स्पर्धेच्या सात फेऱ्यांमध्ये सात मास्क घालण्याची कृती ज्या स्टेडियमवर केली, ते स्टेडियम "आर्थर एश' यांच्या नावाने आहे. अमेरिकन डेव्हीस चषक संघात समाविष्ट होणारे आर्थर एश हे पहिले आफ्रो-अमेरिकन खेळाडू होते. तसेच टेनिसमध्ये ग्रँड स्लॅममधील विजेतेपद पटकवणारेही ते पाहिले आफ्रो अमेरिकन ठरले होते. त्यामुळे आर्थर एश स्टेडियम मधील नओमीचे कृत्य संपूर्ण आफ्रो-अमेरिकन समुदायाला प्रेरणादायी ठरणारे आहे. तिची ही कृती केवळ आफ्रो-अमेरिकन समुदाय नाहीतर जगातील सर्वच शोषित समुदायांसाठी प्रेरक ठरणारी आहे.

आफ्रो-अमेरिकन समुदायावर होणाऱ्या अत्याचारांबद्दल बोलणारी नाओमी ही पहिलीच खेळाडू नाही. याचा इतिहास १९६८ च्या मेक्सिको ऑलिम्पिकपर्यंत जातो. म्हणजे गेल्या बावन्न वर्षापासून अमेरिकेतील चित्र बदललेले नाही हेच दिसून येते. १९६८ च्या मेक्सिको ऑलिम्पिक मध्ये २०० मी. धावण्याच्या शर्यतीत अमेरिकेच्या टॉमी स्मिथने सुवर्ण, ऑस्ट्रेलियाच्या पीटर नॉर्मनने रौप्य, तर अमेरिकेच्या जॉन कोर्लोसने कांस्य पदक मिळवले. पदक प्रदान समारंभावेळी आफ्रो-अमेरिकन टॉमी स्मिथ व जॉन कोर्लोस हे दोघेही काळे मोजे घालून आले. दोघांनी एका हातात काळे ग्लोव्हज घातले होते आणि एका हातात बूट धरले होते. पदक समारंभानंतर अमेरिकचे राष्ट्रगीत सूरू असताना दोघांनी काळा ग्लोव्ह्ज घातलेला एक हात उंचावला आणि मान खाली घालून उभे राहिले. जागतिक स्तरावरचा हा खेळाडूंचा पहिलाच सांकेतिक निषेध होता. अमेरिकेत मानवी हक्कांची पायमल्ली होतेय यावरही बोट ठेवले गेले. सबंध जगाला स्वातंत्र्याची प्रेरणा देणाऱ्या अमेरिकेसाठी ही घटना नाचक्की करणारी ठरली. याच समारंभात ऑस्ट्रेलियाचा श्वेतवर्णीय पीटर नॉर्मनने देखील मानवी हक्काचा बिल्ला जॅकेटला लावून, जॅकेटची चेन उघडी ठेवून टॉमी स्मिथ आणि जॉन कोर्लोसच्या कृती बद्दल केवळ सहानभूती दाखवली नाही तर त्यांना सोबतही केली. या कृत्याबद्दल तिघांचेही पदक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने काढून घेतले. यात पीटर नॉर्मनची सोबत ही महत्वाची होती, नाहीतर शोषित समाजालाच उलटे प्रश्न विचारून त्यांच्या अन्यायाला बगल देणारेही भरपूर असतात. त्यानंतर महम्मद अलीने व्हिएतनाम युद्धाबद्दल अमेरिका सरकारवर ताशेरे ओढले होते.

यावर्षी इंग्लंड व वेस्ट इंडिज दरम्यानचा पहिला कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघातील सर्व खेळाडूंनी "ब्लॅकलाईव्हमॅटर' आंदोलनाच्या समर्थनार्थ दोन मिनिटे मैदानावर गुुडघे टेकले. वेस्ट इंडिज संघातील खेळाडूंनी टॉमी स्मिथ आणि जॉन कोर्लोस यांच्यासारखेच हातात काळ्या रंगाचे ग्लोव्हज घालून हात उंचावून गुुडघे टेकले होते. क्रिकेटच्या जन्मदात्या देशात "ज्यांनी वसाहतवादी राजवटीचा' पाया घातला, त्याच वसाहतवादी मानसिकतेतून त्यांनी गुलामी व इतर अत्याचारांची मालिका जगभर पसरवली. त्या देशात आफ्रो- अमेरिकन अत्याचारांबाबत सुरू असणाऱ्या "ब्लॅकलाईव्हमॅटर' आंदोलनाचे समर्थन आणि मानवी एकतेचा संदेश दोन्ही संघांनी दिला.

याच वेस्ट इंडिजच्या डॅरेन सॅमीने आयपीएलमध्येही त्यांच्यावर वर्णद्वेषी उच्चार काढले गेल्याचे सांगितले होते. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये त्यावर काय केले जाते हे बघणे उत्सुकतेचे ठरेल. लुईस हॅमिल्टन हे "एफवन रेसिंग'मधले अतिशय मोठे नाव... लुईसने "ब्रेयोना टेलर'च्या संस्थात्मक हत्येला कारणीभूत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला अटक करा, असा संदेश असणारा काळा टीशर्ट टस्कन ग्रांप्रिच्या पोडीयमच्या वेळेस घातला होता.

खेळांचा इतिहास बघता आदिम काळात खेळ मनोरंजनाचे साधन म्हणून सुरू झाले. प्राचीन काळात स्पेनच्या कलोजीयममध्ये गुलामांच्या कुस्त्या लावून मनोरंजन केले जाई. आजही खेळ हे मनोरंजनाचे सर्वात मोठे माध्यम आहे. आज अनेक खेळांत 'आफ्रो-अमेरिकन वांशिक समुदायातील खेळाडू सर्वोच्च स्थानी आहेत. तरी देखील "आम्हाला केवळ पळण्यासाठी आणि बॉल ड्रिबल करण्यासाठी तुम्ही पैसे देत नाहीत, आमचे हक्क ही तितकेच महत्वाचे आहेत' अशी त्यांची भावना आहे. खेळ हा मनोरंजनाचा भाग आहे आणि मनोरंजनापासून राजकीय कृती लांब असल्या पाहीजेत ही नेहमीच "राजकीय व्यवस्थांची' भूमिका राहिलेली आहे. मनोरंजन क्षेत्र हे सार्वत्रिक मानवी जीवनावर छाप पाडत असते, त्यातून राजकीय व्यवस्थांना मनोरंजन क्षेत्र हादरवू शकते ही भीती कायम वाटत आलेली आहे. पूर्वी राजे राजवाडे यांचे मनोरंजन करणारे खेळाडू आता बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तालावर जनतेचे मनोरंजन करतात. त्यामुळे राजकीय व्यवस्था अस्थिर करणाऱ्या कृतींना त्यांचा विरोध असतोच. २०२० च्या टोकियो ऑलम्पिक मध्ये देखील राजकीय चिन्ह , संकेतांना घालण्यात आलेली बंदी हे त्याचेच द्योतक आहे.

हे सर्व घडत असताना भारतातही जातवास्तवातून शोषण व अत्याचार होत असतात. अल्पसंख्याक समुदायावर मॉब लिंचिंगद्वारे हत्या केल्या जातात. स्त्री भ्रूण हत्या व स्त्रियांवर सामूहिक अत्याचार अशा घटना घडत असतात. पण यावर मोजकेच खेळाडू तेही मगरीचे अश्रू समाजमाध्यमांवर गाळत राहतात. क्रिकेटवेड्या देशात क्रिकेटचा मोठा आर्थिक बाजार आहे. कमीत कमी पन्नास कोटी क्रिकेटचे चाहते या देशात असतील. त्यामुळे खूप मोठ्या समाजावर क्रिकेटचे खेळाडू प्रभाव टाकू शकतात. पण क्रिकेटपटू अन्याय, शोषण, अत्याचारांच्या प्रश्नांबाबत आग्रही दिसून येत नाहीत. उलट राष्ट्रवादाचे प्रतीक असणारी "मिलिटरी टोपी' घालून मात्र खेळतात, राजकारण्यांच्या जेवणावळींना उपस्थित राहतात. कित्येक खेळाडू निवृत्तीनंतर जनतेचे प्रतिनिधीही होतात. पण सामाजिक प्रश्नांकडे काकुळतीने बघत नाहीत, त्याबद्दल त्यांची अनास्थाच असते.

या सगळ्याचा विचार करता "तुम्ही शांत राहिलात तर तुम्हाला उत्तरे मिळत नाही' अशी खंबीर भूमिका घेणाऱ्या अवघ्या बावीस वर्षाच्या नाओमी ओसाकाची प्रगल्भता दिसून येते. सामाजिक प्रश्न आणि मानवी मूल्ये हीच मानवी जीवनाच्या केंद्रस्थानी आहेत, हेच तिला दर्शवायचे आहे. महिला टेनिस मध्ये अनेक खेळाडू तिथल्या झगमगाटात अडकून जातात, त्या झगमगाटालाच आपले क्षेत्र समजतात... असे असताना टेनिसमध्ये उत्तुंग यश मिळवूनही त्या झगमगाटात न अडकता सामाजिक व राजकीय प्रश्नांची जाण असणाऱ्या नाओमीसारख्या अनेक खेळाडूची गरज आहे. त्यातूनच जगातील सर्वच अन्याय, शोषण, अत्याचारांविषयी वेळेत जागरूकता निर्माण होऊन मानवी हक्कांना बळ मिळेल.

संपर्क – ८८१०४५३६०४
avikinkar@gmail.com

बातम्या आणखी आहेत...