आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवं कोरं:सत्ताकारणाची पोल-खोल करणारे पुस्तक... 'चेकमेट'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्राचे संसदीय राजकारण नेहमीच फिल्मी राहिलंय.

अविनाष उषा वसंत

22 नोव्हेंबर 2019 ते 27 नोव्हेंबर 2019 दरम्यान महाराष्ट्रात घडलेल्या  राजकीय भूकंपाच्या केंद्रस्थानी असलेल्या अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये नेमकं कधी आणि कसं सगळं ठरलं याचा घटनाक्रम सुधीर सूर्यवंशी यांनी त्यांच्या "चेकमेट : हाऊ द बीजेपी वन अॅंड लॉस्ट महाराष्ट्र' या पुस्तकात मांडला आहे.

महाराष्ट्राचे संसदीय राजकारण नेहमीच फिल्मी राहिलंय. महाराष्ट्राची सांस्कृतिक व सामाजिक व्यामिश्रता याला कारणीभूत असेल. त्यामुळेच सिंहासन, सामना, सरकारनामासारखे चांगले राजकीयपट मराठी सिनेमाला मिळाले. २३ नोव्हेंबर २०१९ ला बहुतांश महाराष्ट्र साखर झोपेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्राच्या संसदीय राजकारणाचा फिल्मीपणा अबाधित राखला गेला. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट फुटून भाजप बरोबर सत्ता स्थापन करणार आहे अशी बातमी "कट्टा न्यूज' या ट्विटर हँडलवरून २१ नोव्हेंबरलाच दिलेली होती. "कट्टा न्यूज' हे काही प्रस्थापित हँडल नसल्यामुळे अनेकांनी या बातमीकडे दुर्लक्ष केले. मात्र जेव्हा अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर भारतातील अनेक जेष्ठ पत्रकार, जेष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय विश्लेषकांनी "कट्टा न्यूज' या हँडलला फॉलो करायला सुरुवात केली. देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर सुरळीत सरकार स्थापन करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी "मिरची हवन' केले होते. या घटनेचेही ब्रेकिंग कट्टा न्यूजच्या माध्यमातून केले गेले. हा ब्रेकिंगचा सिलसिला "कट्टा न्यूज'कडून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेई पर्यंत चालू होता. कट्टा न्यूजच्या महितीकडे अख्खा देश लक्ष ठेवायला लागला.

कट्टा न्यूज हे ट्विटर हँडल सुधीर सूर्यवंशी हे पत्रकार चालवत होते. याच सुधीर सूर्यवंशी यांचे "चेकमेट : हाऊ बीजेपी वन अँड लॉस्ट महाराष्ट्र ' हे इंग्लिश भाषेतील पुस्तक अलिकडेच   प्रकाशित झाले. साहजिक महाराष्ट्रात घडलेल्या सत्तानाट्यासंदर्भात जनतेला अनेक प्रश्न पडले होते. म्हणजे अजित पवारांनी पवारांविरोधात बंड केले होते का? शरद पवारांच्या सांगण्यावरूनच अजित पवारांनी शपथ विधी उरकला का? शरद पवार सेना व भाजप दोन्ही पक्षांशी समांतर वाटाघाटी करत होते का? नितीन गडकरी मुख्यमंत्री होण्यास इच्छुक असते तर भाजप राष्ट्रवादी युती झाली असती का? पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या अधिकृत मुख्यमंत्री निवासस्थानी "मिरची हवन' सारखे तांत्रिक कर्मकांड झाले होते का? अशा अनेक प्रश्नांची केवळ उकलच नाही तर सविस्तर नोंद सुधीर सूर्यवंशी यांनी "चेकमेट' मधून केली आहे. ही सर्व माहिती देताना त्यांनी तटस्थ पत्रकारिता अबाधित ठेवलीय हे ह्या पुस्तकाचे विशेष म्हणावे लागेल.

"चेकमेट' या पुस्तकातून आपल्याला केवळ महाराष्ट्राच्या तत्कालीन सत्तानाट्याची जंत्री मिळत नाही. तर त्या घटनांची पार्श्वभूमी, त्या घटना घडण्यास कारणीभूत ठरलेल्या गोष्टींची सविस्तर माहिती दिलेली आहे. हे करताना महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचा गाळीव इतिहासच आपल्यासमोर लेखकाने ठेवला आहे. ज्यांना महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचा इतिहास जाणून घ्यायचाय त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक आहे. त्यात महत्वाच्या सर्वच घटनांची-घटकांची नोंद पुस्तकातून घेतली आहे. त्याच बरोबर त्यांच्या आंतरसंबंधाचीही माहिती करून दिली आहे, त्यासाठी महाराष्ट्राची भौगोलिक, सांस्कृतिक व सामाजिक परिस्थितीही समोर ठेवल्यामुळे त्या घटनांचा कार्यकारणभावही आपल्यासमोर ठेवला जातो. या पुस्तकाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे पुस्तक सामान्य माणसाच्या नजरेने सामान्य माणसांसाठी लिहलेले आहे, नाहीतर बहुतेक राजकीय विषयांवरील पुस्तकांतून सामान्यजनांच्या मनाचा ठाव घेत नाहीत. कोणालाही समजेल अशी साधी भाषा लेखकाने वापरली आहे.

ह्या पुस्तकात काही खुमासदार तर काही गंभीर किस्से सांगितले आहेत. त्यात राधाकृष्ण विखे पाटील भाजपात प्रवेश करून मंत्री झाल्यावर, मंत्रालयात एक फाईल सचिवांकडे मागितली होती. त्यानंतर आधी सचिवांनी फाईल देण्यास दिलेला नकार मग फाईल दिल्यावर मुख्यमंत्री कार्यालयाचा त्या फाईल वर असणारा 'अप्रुव्ह' चा शिक्का याने त्यांचा झालेला भ्रमनिरास अनेक गोष्टी स्पष्ट करणारा आहे. जयपूरमधल्या एका लक्झरी रिसॉर्टवर महाराष्ट्रातील सर्व काँग्रेसच्या आमदारांना ठेवण्यात आले होते. त्यात हिरामन खोसकर त्या सर्व आमदारांमध्ये कसे 'हिरो' झाले होते याची कहाणी...  महाविकास आघाडीच्या सरकारला कम्युनिस्ट पक्षाच्या विनोद निकोले यांनीही पाठिंबा दिला होता. त्यांनाही मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये ठेवण्यात येणार होते. पण त्यांनी तसे करण्यास स्पष्ट नकार देऊन साध्या लॉजवर राहण्यास पसंत केले आणि आम्ही आमच्या पक्षाचा आदेश मानतो, त्यामुळे इतर कोणत्याही पक्षाचे आमदार फुटले तरी आमच्या पक्षाचा पाठिंबा महाविकास आघाडीलाच असेल असे सांगितले. म्हणजे 'we are 162' मधील एकमेव आमदार निवांत होते ते म्हणजे विनोद निकोले. हे काही ठराविक किस्से महाराष्ट्राच्या सत्ताकारणातील वैविध्याचीही माहिती देतात. असे अनेक किस्से 'चेकमेट' मधून सांगितले आहेत.

महाराष्ट्रातील ह्या सत्ता नाट्यामध्ये दोन "सोनियांनी' महत्वाची भूमिका बजावली होती. ह्या दोन स्त्रिया महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यास कशा महत्वाच्या होत्या याचे तपशीलवार वर्णन पुस्तकात आले आहे. सोनिया गांधींच्या होकाराशिवाय काँग्रेस शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्यास अशक्य होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या सोनिया दुहान यांनी गुडगावमधील हॉटेलमधून भाजपा आश्रित राष्ट्रवादीच्या आमदारांना नाट्यमयरित्या मुंबईत पाठवण्याची जबाबदारी उचलली. शरद पवारांनीही दुहान यांची उद्धव ठाकरेंना ओळख करून देताना "या कथेतील हिरोईन' बोलून त्यांचे सत्तास्थापनेतील महत्व अधोरेखित केले, असेही पुस्तकात नमूद केले आहे. जेव्हा जेव्हा ह्या सत्तानाट्याच विषय निघेल त्यावेळी ह्या दोन स्त्रियांशिवाय पूर्ण होणार नाही.

"चेकमेट' या पुस्तकातून सुधीर सूर्यवंशी यांनी 'महाराष्ट्र एकीकरण आंदोलनाच्या' इतिहासाचा धांडोळाही घेतला आहे. तत्कालीन मराठी व गुजराती भाषिक संघर्ष, तसेच  पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची मुंबईसकट महाराष्ट्रावर असणारी करडी नजर याचीही माहिती मिळते. महाराष्ट्रातील सर्वच पक्षांचा "दलित प्रश्नांकडे' बघण्याचा दृष्टिकोनही लेखकाने सांगितला आहे. शेवटी रोहित पवार आणि आदित्य ठाकरे या दोघांवर दोन निबंध आहेत. महाराष्ट्राच्या सत्ताकारणात गेली पन्नास वर्षे पवार व ठाकरे कुटुंबियांचा दबदबा राहिला आहे. भविष्यातील महाराष्ट्राच्या सत्ताकारणात ह्या दोन्ही कुटुंबियांचे प्रतिनिधी म्हणून रोहित पवार व आदित्य ठाकरे यांच्या कडे बघता येईल का असे सूचक विधान केलय का हे निबंध वाचताना जाणवते.

"चेकमेट' हे सुधीर सूर्यवंशी यांचे पहिलेच पुस्तक आणि ते पुस्तक 'पेंग्विन' सारख्या आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थेने काढणे नक्कीच अभिमानास्पद आहे. यातूनच या पुस्तकातील नोंदींची विश्वसनीयता आणि विश्वासार्हता दिसून येते. पुस्तकाच्या शेवटी दिलेली संदर्भांची दीर्घ सूची त्याला अधोरेखित करते. सुधीर सूर्यवंशी यांनी अंमळनेर तालुक्यातील एका छोट्या गावातील "एक गाव एक शिक्षक' अशा शाळेत शिक्षण घेतले. मग पत्रकारितेसाठी मुंबईत दाखल झाले. इंग्लिश वृत्तसंस्थेत "पॉलिटिकल' बिट सांभाळणे, पुढे जाऊन राजकीय विषयावर इंग्लिश मधून पुस्तक लिहणे ही नक्कीच स्पृहणीय बाब आहे. "चेकमेट' हे अॅकॅडमीक पुस्तक नाही ही मर्यादा असली तरी महाराष्ट्राच्या इतिहास दस्ताऐवजीकरणात त्याला डावलून पुढे जाता येणार नाही. कोणत्याही सत्तानाट्यात राजकीय कार्यकर्त्यांची, प्रशासकीय अधिकाऱ्यांची वाताहत होते, त्यामुळे त्यांच्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक असेल. राजकीय विश्लेषक व राज्यशास्त्राच्या अभ्यासकांना नवीन माहिती मिळू शकते. तर राजकीय नेत्यांना यातील बऱ्याच घटना माहिती असल्या तरी भविष्यात अशा सत्तानाट्याचा आपण भाग व्हायचा की नाही यासाठी तरी पुस्तक वाचणे क्रमप्राप्त राहील.

"चेकमेट : हाऊ बीजेपी वन अँड लॉस्ट महाराष्ट्र

लेखक  - सुधीर सुर्यवशी

प्रकाशक - पेंग्विन पब्लिकेशन

मूल्य - ४९९ रु.

avikinkar@gmail.com

लेखकाचा संपर्क - ८८१०४५३६०४

बातम्या आणखी आहेत...