आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:धंदे से बड़ा कोई धर्म नहीं होता...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका कागदाच्या चिटोऱ्यावर त्याची सगळी अर्थव्यवस्था चालायची.

अविनाश उषा वसंत

एका कागदाच्या चिटोऱ्यावर त्याची सगळी अर्थव्यवस्था चालायची. त्या कागदी चिटोऱ्याची जपलेली विश्वासार्हता हाच मटका व्यवसायाचा पाया होता. “कोई धंदा छोटा नहीं होता, और धंदा से बड़ा कोई धर्म नहीं होता...” रईस चित्रपटाचा हा डायलॉग तंतोतंत लागू पडणाऱ्या मटका किंग रतन खत्रीचे चार दिवसांपूर्वी निधन झाले. त्यानिमित्त...

प्रकाश उर्फ पक्या मुंबईच्या कुठल्यातरी झोपडपट्टीत राहणारा... एकदम दिलदर्या इंसान. गणपतीला, दहीहंडीला पक्याभाय कितीची पावती फाडणार हा वस्तीचा कायम चर्चेचा विषय. असा हा पक्या झोपडपट्टीत राहतो म्हणून नोकरीवरून काढून टाकला जातो. मग त्यानंतरच्या निराशेच्या काळात कुठल्यातरी कोपऱ्यात एका विशिष्ट वेळेला आकडा लावायला, बघायला जाणारा पक्या "खेळी' होतो. थोडी हुशारी, अकाऊंटचे बऱ्यापैकी नॉलेज, चांगले अक्षर या गुणांवर तो "रायटर' बनतो. धंद्यात आपल्या हुशारीवर त्याचे प्रमोशन होत मोठ्या "टेरिटरी'चा "सिंडिकेट' बनतो. आणि मग पक्याचा होतो पक्याभाई... मुंबईच्या गिरणगाव, झोपडपट्टी भागात अशा अनेक पक्याभाईंच्या स्टोऱ्या ऐकायला मिळतात. "कल्याण, मुंबई पाना' च्या जीवावर त्यांचा विकास होत राहतो. ते सगळे वेगळ्या जगाची सत्ता चालवत असतात. फक्त त्या तिसऱ्या जगाला सरकारी अधिमान्यता नसते.

कालपरवा दंतकथा बनलेल्या "रतन खत्री' चे निधन झाले आणि देशातील अर्थसुधारणेच्या आधी तारुण्यात आलेल्या अनेक जुन्या खोडांना आपला हा इतिहास आठवावा वाटला. त्याकाळात रतन खत्री हे नाव मुंबईत कोणाला माहीत नाही असे व्हायचे नाही. अगदी 'धर्मात्मा' नावाचा सिनेमा  रतन खत्री आणि मटका याविषयावर येऊन गेला. मटका किंग म्हणून नावारूपाला आलेल्या रतन खत्रीने मुंबईतील मटका जुगाराला लोकप्रिय केले. विशेषतः गरिबांत, श्रमिकांत, लुम्पेन वर्गात रतन खत्रीचा 'मुंबई मेन' चांगला माहीत होता.

मटक्याच्या इतिहासात डोकावून बघायचे म्हटले तर या जुगाराला मटका हे नाव का पडले या बद्दल ठोस काही मिळत नाही. पण याची सुरवात मसाल्याचा व्यापार करणाऱ्या एका कच्छी माणसाने केली. ह्या व्यापाऱ्याच्या देवांना दानधर्म करण्याच्या वृत्तीमुळे तिथले लोक "भगत'  म्हणू लागले. त्यानेच १९६० च्या दशकात "कल्याण' नावाने हा मटका जुगार वरळी भागात सुरू केला. आता वरळी भाग म्हटल्यावर ह्या मटक्याचे गिऱ्हाईक कोण असणार हे वेगळे सांगायला नको. मुंबईचा कापड उद्योग एका चरमसीमेवर पोहचलेला काळ होता तो... मटका लावला जायचा "न्यूयॉर्क कॉटन' बाजारातील ठोक कापसाच्या भावावरून. अमेरिकेत गुलामगिरीच्या प्रश्नावरून यादवी सुरू झाली तेव्हा जागतिक बाजारात कापसाचा तुटवडा सुरू झाला. मग भारतासारख्या देशातून कापूस मँचेस्टरला जायला लागला. भाव रोज वरखाली व्हायला लागले आणि न्यूयॉर्क कॉटन मार्केटच्या बंद भावावर सट्टा खेळला जाऊ लागला. न्यूयॉर्कच्या कॉटन एक्स्चेंजचे व्यवहार रोज खुलताना आणि बंद होतानाचे भाव पूर्वी मुंबईत टेलिप्रिंटरवरून कळवले जायचे. त्याविषयी असलेल्या स्थानिक व्यापाऱ्यांतील उत्सुकतेमुळे ही अनोखी सट्टेबाजी रतन खत्रीच्या कल्पक डोक्यातून सुरू झाली. बघता बघता मुंबईत त्या काळी भरभराटीला असलेल्या गिरणी कामगारांमध्ये हा नशिबावर आधारित खेळ प्रचंड लोकप्रिय झाला आणि त्यासरशी त्याची उलाढालही कोट्यवधींच्या घरात गेली. रतन खत्री हा अगोदर याच कल्याण भगतचा सहकारी होता. पण मटक्याचा धंदा रतन खत्रीने वाढवला.

न्यूयॉर्क कॉटनचे भाव स्थिर झाले आणि आकड्यांमधली गंमत निघून गेली होती. रोजची बेटिंगची सवय लागलेले व्यापारी नव्या खेळाची मागणी करू लागले. आणि त्यातून जन्म झाला   मटक्याचा... शून्य ते नऊ या आकड्यांवर खेळला जाणारा हा नवा जुगार. पण आकडा कसा काढायचा, तर पत्त्यांच्या कॅटमधून तीन पत्ते काढायचे आणि जिंकणारा आकडा जाहीर करायचा. एक रुपया लावला असेल तर जिंकल्यावर नऊ रुपये. सकाळ संध्याकाळ दोनवेळा संधी... ओपन आणि क्लोज! हा नवा खेळ असल्याने त्याची विश्वासार्हता लोकप्रिय करण्यासाठी रतन खत्रीने त्याकाळी अनोखी मार्केटिंग स्ट्रॅटिजी वापरली. पत्त्यांच्या कॅटमधून राजा, राणी, गुलाम असे पत्ते वेगळे काढून उरलेले पत्ते पिसून एका मटक्यात टाकले जायचे. त्यातले पहिले दोन पत्ते हे लोकं काढायची आणि तिसरा पत्ता स्वत: खत्री काढायचा.... पाकिस्तानातील कराची येथून फाळणीनंतर मुंबईत स्थलांतर केलेला एक सिंधी तरुण. छोटे-मोठे उद्योग करता-करता मुंबईत ‘मटका किंग’ बनला. रतन खत्री याच्या मटक्याला ‘मेन बाजार’ म्हणून ओळख होती. पोलिस आणि समाजाच्या नजरेत ‘गुन्हेगार’ असलेला रतन खत्री मात्र कष्टकरी जनतेमध्ये खूपच विश्वास कमावून होता. सकाळी सहा वाजता मटक्यावर पैसे लावणार्या खेळाडूंची गर्दी धंद्यावर होत असे ती त्यामुळेच. साधारण सकाळी नऊ वाजता पहिला ‘आकडा’ जाहीर होत असे, याला मटक्याच्या भाषेत ‘ओपन’ म्हणून संबोधत. त्या काळात फोनव्यतिरिक्त कोणतीही आधुनिक सुविधा नसतानादेखील ही ‘खबर’ जाहीर झाल्या झाल्या, अक्षरश: काही सेकंदांत सगळ्या धंद्यावर पोहोचत असे. अगदी परदेशातसुद्धा...! आणि ताबडतोब त्याची वाटणीदेखील होत असे. त्यानंतर पुन्हा रात्री बाराच्या सुमारास ‘क्लोज’चा आकडा काढला जाई. रतन खत्रीचा आकडा सर्वात जास्त विश्वसनीय आहे असे मत तयार झाले. आकडा काढण्यासाठी खत्री कोणाकडूनही पत्ते काढून घ्यायचा. काळबादेवीच्या परिसरात किंवा दक्षिण मुंबईतील जिमखान्यात एजंटसमोर आकडा काढला जायचा. हा आकडा काढायचा मान रस्त्यावरून जाणाऱ्या कोणत्याही माणसाला, वेटरला, भिखाऱ्याला मिळायचा. त्यामुळे रतन खत्री च्या 'मुंबई मेन' चा बोलबाला वाढत गेला.

"रायटर' मटक्याचा आकडा हा कस्टमरला एक दोन इंची कागदाच्या चिटोऱ्यावर  लिहून द्यायचा. ह्या एक दोन इंचाच्या चिटोऱ्यात इतका विश्वास भरलेला असायचा की जगातल्या कोणत्याही विश्वासाला तोडून टाकेल. कोणत्याही भागीदारी व्यवसायात जेवढी जोखीम तेवढीच जोखीम, कोणतेही कायदेशीर मान्यता नसलेला तो चिटोरा द्यायचा. त्यातून फक्त जो कोणी सेवा देत आहे त्याचे कमिशन वगळून, रतन खत्रीने हा विश्वास जास्त मिळवला, त्याचीही कारणे होती. जुन्या लोकांच्या सांगण्यावरून रतन खत्रीला गरिबांनी पैसे जिंकावे असे वाटायचे. बहुतेक ग्राहक श्रमिक मजूर असायचे ते कोकणातले, उत्तर भारतातले, झोपडपट्टीत राहणारे असायचे. त्यामुळे सणावाराला त्यांना खुश करण्यासाठी "लकी नव्वा', "लकी मेंढी' हे आकडे नेहमी नक्की निघायचे. कॅलेंडरमध्ये असणारे शुभ दिनांकचे गणितही सणावाराला जमून येत असल्यामुळे हा वर्ग खुश व्हायचा. निदान त्या एका दिवशी चांदी होत असल्यामुळे ते पण खुश. तो रतन खत्रीच्या स्ट्रॅटेजीचा भाग होता हे कोणाला कळून यायचे नाही. मग कपडा खात्यात, चाळीत, झोपडपट्टीत अरे 'ते' लखपती झाल्याच्या बातम्या यायच्या पण नक्की 'ते' कोण हे कधी कळायचे नाही. घरदार, दागिने विकलेले मात्र लोकांना लगेच दिसून यायचे , यातून पुढे काय काय होत असेल हे तुम्हाला माहीतच आहे.

तिसऱ्या जगात रतन खत्रीचं प्रस्थ वाढत होते. तो सेलिब्रिटी झाला होता, त्याला भेटायला लोक लांबून लांबून यायचे. त्यातले बरेचशे 'सिंडिकेट' असायचे, म्हणजे एजंट. त्यांना त्यादिवशी आकडा कसा काढतात हे बघायला मिळायचे. नेमक्या कोणत्यातरी दिवशी त्या सिंडिकेटच्या गाडीचा नंबर आणि मटक्याच्या आकड्याचा नंबर सेम आला, कधी खत्रीने नवीन घेतलेल्या गाडीचा नंबर सेम आल्याच्या घटना घडल्या आणि लोक आता त्याच मागावर राहायला लागले. रतन खत्रीकडे आलेल्या पाहुण्यांच्या गाडीचा नंबर काय आहे, खत्रीने कोणत्या रंगाचे कपडे घातले, तो रंग कोणत्या आकड्याशी जुळतो, खत्री आज कितीला उठला, खत्रीच्या घरात आज किती माणसे आहेत वैगेरे वैगेरे अशा टीप टिपर सांगायला लागले. त्यांना ह्या टीपसाठी पैसेही मिळायला लागले. खत्रीच्या आजूबाजूला आकड्यांची असणारी मांडणी आणि त्यातून येणारी संभाव्यता याचे कधीतरीच जुळणारे गणित लावले जायचे. काही खास लोकांच्या सांगण्यावरून,'जे लोक ह्या आकड्यात गणित लावत बसतात त्यांना केवळ ह्या दुनियेत रमायचे असते. ह्या आकड्यांच्या स्वप्नात रमायचे असते. त्यांना उघड्या डोळ्यासमोर माणसे नाहीतर आकडे दिसायचे. ह्यातच दिवस ढकलायचा असतो. सकाळी पहिल्यांदा बघितलेली रिक्षा टॅक्सी त्यांचा नंबर, शाळेत जाणाऱ्या मुलाचा शाळेतला रोल नंबर असे विविध मार्ग ते काढायचे. हे सर्व आपल्या मनाचे समाधान करायला. रतन तीन पत्ते उघडे टाकायचा त्यात कोणतेच गणित नव्हते. पण त्याकाळी पेपरमध्ये कोणता आकडा कधी येणार याची भाकिते पानभर लेखात मांडलेली असल्याची. कधी अख्खा पेपर त्यावर असायचा. लोक  आकड्यात व्यस्त असायची. रतन मात्र ओपनची तीन आकडी संख्या, क्लोजची तीन आकडी संख्या एवढाच विचार करायचा. दिवसातले हे दोन्ही आकडे सेम काढण्याऱ्याला जॅकपॉट मिळायचा. एखाद दुसऱ्याला मिळाला असेल, पण रतनचा जॅकपॉट रोजच ठरलेला असायचा. रोजची कमाई आभाळाशी झटत होती.'

आता असा काळ आला की कोणत्याही एरियात 'रतन' वा 'खत्री' टोपणनावाचे कोणतरी असतच. बॉलिवूडच्या सिनेमातही रतन खत्री नावाचे पात्र असत, एवढी भुरळ पडली होती या नावाने. खत्रीची उठबस ही असे बॉलिवूडच्या लोकांच्यात. तो आडून सिनेमात पैसे ही लावी. 'रतन रंगीला' सिनेमा त्याने निर्मिलेला होता. अनेकांना तो रेसकोर्सवर ही दिसे. पण स्पर्धक भगत घराण्यापेक्षा रतन खत्रीची राहणी साधी होती. जास्त बडेजाव मिरवत नसे. नव्वदच्या दशकात एक मोठी 'मांडवली'  झाली, नेमकं काय झाले ते कोणाला माहीत नाही त्यात राजकीय सत्तेतील लोकही होते असे म्हटले जाते. मोठ्या रकमेवर रतन खत्रीचा 'मुंबई मेन' चा धंदा खालसा करून दुसऱ्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्याला पैसे मिळाले आणि खरा रतन खत्री त्यावेळी संपला. लोकांना नंतर तो दिसायचा पण जोवर सत्ता असते तोवर लोक सलाम करतात नंतर नाही, खत्रीचे तेच झाले.

दिवसात दोन विशिष्ट वेळेला पोस्ट ऑफिस मध्ये ट्रंक कॉलसाठी जमणारी गर्दी सगळ्या वर्गातली असायची. पण बहुसंख्येने इथले लुम्पेन, श्रमिक, मजूर, कामगार यांचीच संख्या जास्त होती. कारण त्यांनाही मोठे व्हायचे होते. आजूबाजूच्या अवकाशात दिसणारी चंगळ त्यांनाही करायची होती. बॉलिवूड जे स्वप्न दाखवते ते स्वप्न त्यांनाही बघायचे असते.  इथल्या व्यवस्थेत आठ तास कष्ट करूनही त्या स्वप्नाचा इवलुसा तुकडा संपूर्ण जन्मात प्राप्त होणार नाही हे त्याला माहित असायचे. श्रमातून आकळलेल्या परात्मतेतूनच ते अशा गोष्टींकडे वळायचे. श्रमिक बहुल भागात मटका, हौजी, सोरट, नक्का बॉक, उलटा पुलटा, तीन पत्ते, रमी अशा स्वप्नांना जवळ करण्यासाठीच अस्तित्वात असायचे. यात फक्त या गोष्टींच्या सेवा देणारे आणि भांडवल संचय असणाऱ्यांचा विकास व्हायचा. लाखात एखादाच कोणीतरी नशीब जोरावर असणारा त्यावर आयुष्य काढायचा, बाकी स्वप्ने चौपट!

रतन खत्रीने अशीच स्वप्ने दाखवली, खोटी. त्याच्या दर्यादिलीने एक दोन दसऱ्या पोळ्याला सुखायचे. पण त्याने धंद्यात चिटिंग केली नाही असे जवळपास सगळेच बोलतात. आता हेच आकडे कम्प्युटरवर येतात, कोणत्या आकड्याला पब्लिक मधून लोड आहे हे कळते. त्यामुळे तो आकडा येत नाही, डुबणारेच जास्त असतात. सरकारचा कर भरतो म्हणून कायदेशीर लॉटरी मागेही 'मटक्याचीच' आयडिया होती. म्हणजे त्यात कायदेशीर जोखीम, सरकारी करासह. मग आले 'लोटो' चे नंबर... अशा  भरपूर आयडिया निघत राहिल्या. कारण ह्या व्यवस्थेत सरळमार्गाने कोणाचीच स्वप्ने पूर्ण होणार नाही. मग अशी सोपी साधने येत राहतील स्वप्ने चेतवायला, अमर होऊन...

avikinkar@gmail.com

लेखकाचा संपर्क  ८८१०४५३६०४ 

बातम्या आणखी आहेत...