आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:झाडं, कंपाऊंड वॉल आन् मिथ

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रस्त्यानं येताजाता जे काय दिसतं ते वाचायची आपल्याला आदत आस्तीच

बब्रूवान रुद्रकंठावार

यक लंबा सलग रोड व्हता. त्याच्या साईडला झाडं लावले व्हते. प्रत्येकाला ज्याचे त्याचे स्वतंत्र ट्रीगार्ड व्हते. रोड आन् झाडाच्या पल्याड जी काय यक सलग कंपाऊड वॉल व्हती त्याच्यावर मान्सांसाठी सूचना ल्हेलेल्या व्हत्या. येथे आमूक करूने एक्स्टेट्रा एक्सेट्रा.

रस्त्यानं येताजाता जे काय दिसतं ते वाचायची आपल्याला आदत आस्तीच. त्याबाबतीत आपन तहहयात नवसाक्षर आस्तो. तं तिथून रेग्युलर जानाऱ्यांना त्या सूचना हाळूहाळू पाठ झाल्या व्हत्या. खरं तं त्यात पाठ करावं आसं काई नव्हतं. सूचना तशी यकच व्हती, येथे लघुशंका करूने; फकस्त क्यालिग्राफीमंदी चेंज व्हता. ल्हानमोठ्या निरनिराळ्या आक्षरामंदी ती भिंतीवर विराजमान व्हती.

तं काय की, जानाऱ्या येनाऱ्याच्या डोक्यामंदी मंग आसं चालायचं की, आता आमूक आक्षरातली सूचना आली की, पुढे धा पावलावर आपल्याला वळायचंय. सूचना ल्हेनारा त्यो जो कोनी पेंटर व्हता, त्याचं आक्षर आसं व्हिज्युअल व्हवून प्रत्येकाच्या डोक्यात पक्क बसलं व्हतं.

...संध्याकाळी लोकं या रस्त्यानं रेग्युलर फिरायला जायचे. उन्हाळ्यात तं त्यांची संख्या जास्त आसायची. आसाच यकदिवस व्हता. यक कपल लांबपत्तोर फिरत गेलं आन् त्यांना परतायला रात्र झाली. लोकांची आवकजावक कमी झाली व्हती. आंधुकसा उजेड व्हता. रस्ता सुनसान व्हता. त्यांना जराशीक भिती वाटली. त्यांनी मनातल्या मनात रामरक्षा सुरू केली. चालायची स्पीड वाढवली. पुढं आल्यावर त्यांना कंपाऊंड वॉलकडं तोंड करून कुनी तरी उभं दिसलं. त्यांना जरा हायसं वाटलं. पुडंबी कुनीतरी तिकडं तोंड करून सूचनेचा अनादर करीत व्हतं. त्याच्याबी पुडं आजूक कुनीतरी. लोकांना आर्जंट आस्तं. शिवाय आंधारात सूचना कुठं दिसत आस्तेत?

भिंतीवर मोकळं होनाऱ्या लोकांवर ए-ही कुनीबी नाकं मुरडले आस्ते; पन कवाकवा ह्या लोकांचा आधारबी आस्तो ही नवीच गोष्ट कपलच्या ध्यानात आली. पुढं दोनेक दिवसांनी हीच गोष्ट रिपीट झाली. त्या कपलला परतायला रात्र झाली. रस्ता सुनसान झाला व्हता. पुडं सेम लोकं सेम भिंतीकडंला त्यांना दिसले. त्यांना पुन्यांदा हायसं वाटलं. यकेदिशी तर त्यांना फिरायला जायलाच उशीर झाला. तं रस्त्यात सेम जागेवर सेम लोक उभे. त्यांना पुन्यांदा हायसं वाटलं. ते फिरून परत आले तं सेम लोक सेम जागेवर उभे. म्हंजे त्यांची लघुशंका आजून संपली न्हाई? की हे दुसरे लोक हायेत? कपलला मंग घाम फुटला. बरं, जे कोनी लोकं भिंतीकडं तोंड करून विधी उरकत आस्तेत, ते कवा ना कवा परत रस्त्याला लागत आस्तेत. इथं तेबी नव्हतं. त्यातला यकबी मानूस परत रस्त्यावर येतांना त्यांना दिसला नव्हता. हीबी नवीन गोष्ट त्यांच्या ध्यानात आली. कपलला लागलीच ताप भरला. त्यांनी आंथरूण धरलं. ही गोष्ट सांगोवांगी पसरत गेली.

बरं ह्या मान्सांनी कंदी कुनाला त्रास दिल्याची न्यूज नव्हती. कुनाला लुटल्याची, हल्ला केल्याची न्यूज नव्हती. कुनाचा विनयभंग केल्याची न्यूज नव्हती. तरी पन रिस्क कोन घेनार? लोकांनी मग रात्री फिरायचा रस्ताच बदलला. आमूक टायमानंतर त्या रस्त्याला जायचंच न्हाई आसं ठरून गेलं. साऱ्यांनीच ते एकदिलानं पाळलं. पन गावामंदी यखांद्याला आस्तोच किडा, तसा यकाला व्हता. तं त्यानं मंग पाळत ठिवली. त्यानं यक ठेपा ठरवला आन् उजेड असतानाच त्यो तिथं दबा धरून बसला.

हाळूहाळू आंधार पडत गेला. रात्र वाढत गेली. मधेच कंदीतरी चाहूल लागल्यावानी वाटायचं, पालापाचोळा तुडवल्याचे आवाज यायचे; पन दिसायचं कुनीच न्हाई. तं आशीच मध्यरात्र झाली. त्यो मंग उठला आन् परतीच्या रस्त्याला लागला. रस्ता सुनसान व्हता. त्यो जरासंक आंतर चालून आला आन् त्यानं वळून बगितलं. त्यो डचकला. घामाघूम झाला. स्सालं आतापत्तोर तं कुनीच येताना दिसलं न्हाई, मंग हे आले कुठून आचानक? लगोलग भिंतीकडं तोंड करून उभे कशे -हायले? त्यो मनातनं टरकला; पन मागं हाटला न्हाई. त्यानं छडा लावलाच. लोकांनी त्यो पॉझिटिव्ह  घेतला.

तं झालं आसं व्हतं की, उन्हाळ्यात पान्याची बोंबाबोंब आसल्यानं झाडान्ला पानी कमी पडू लागलं व्हतं. मंग यका भाद्दरानं जबरा आयडिया लढवली व्हती. ‘माणुसकीची भिंत’ आसं मोठ्या आक्षरात ल्हेलेली यक भिंत गावात व्हती. तिथं टाकणाऱ्यांनी टाकलेले आन् नेणाऱ्यांनी रिजेक्ट केलेले लै कपडे खुंट्याला लटकून व्हते. ते सारे कपडे आणून त्यानं ट्री गार्डला गुंडाळले व्हते. म्हंजे काय तं झाडान्ला डायरेक्ट उनाचा फटका बसनार न्हाई आन् पान्याचं जादा इव्हापरेशनबी व्हनार न्हाई. आयडिया लढवणारा मानूस कलावंत व्हता. त्याच्या कपडे पहेनवण्यात नजाकत व्हती!  

तं तवापास्नं पंचक्रोशीत यक मिथ पसरली. आमूक गावात यक लंबालचक रस्ता आसून उन्हाळ्याच्या रात्री आमूक आमूक वाजेनंतर तिथं ओळीनं झाडं मुततेत. तवा पाचोळ्याचे आवाज घुमत -हातेत. त्या पर्टीक्यूलर टायमाला त्या रस्त्यानं कुनी जात न्हाई. गावकरी पर्यावरणप्रिय आसल्यानं त्ये सोताहून रस्ता अव्हाईड करतेत आन् झाडांना प्रायव्हसी देतेत. पेपरवाल्यांनीबी पुडं त्याचं फिचर छापलं. गावगोष्ट आजूकच पसरत गेली. गावकऱ्यांचं कौतुक व्हवू लागलं. गावात कुनाकडं पाव्हना आलाच तं लोकं आभिमानानं त्याला रस्ता दाखवू लागले. स्टोरी सांगू लागले. तं आसंच मंग यकेदिवशी गावाचं नाव झाडमुत्या पिंपळगाव म्हनून पडलं. तेबी गाववाल्यांनी पॉझिटिव्ह घेतलं.

दोस्त म्हन्ला, बबऱ्या, आपल्याकडच्या मोस्टली कंपाऊंड वॉल ह्या पब्लिकच्या लघुशंकेची सोय म्हनूनच बांधलेल्या आस्तेत, हे आता आपन ग्रहितमंदी धरलं पायजेल. म्हंजे मंग भिंतीवर जागोजागी आक्षरांच्या लघुशंका रेखाटायचा टाईम आपल्यावर येनार न्हाई. क्यालिग्राफीवाले पेंटर आन् लोकल फ्याशन डिझायनर लैच गुणाचे आस्तेत. त्यांना आजूक मोठं स्टेज मिळवून देण्याची कोशीश आपणच केली पायजेल. त्यातच गावाचं भलं हाये. बबऱ्या, पुडं मागं यखांद्या दिशी मार्केटिंगवाले तिथं पैदा झाले आन् ह्यांना त्यांनी हाताशी धरलं तं जागोजागी थळे साचवून पब्लिकला त्याच्या निशाण्या दाखवणारे गाईड आपल्याला बघायला मिळतील. फुकनीचं, झाडाखोडांची किती बदनामी व्हती राव, आसल्या स्टो-यांनी.  

(ता. क. - दोस्त म्हन्ला, बबऱ्या, आपन इकत आनले आन् आपल्या जागेवर लावले म्हनून आपन झाडाशी कशीबी छेडाछेडी न्हाई करू शकत. झाडं म्हंजे पाळलेला अ‍ॅनिमल नस्तो की, त्यानं आपल्या फांद्या लांबवून पाव्हन्याला चेंडू आनून दाखवावा. जरा काय पानी पाजलं म्हंजे  झाडांच्या स्वांतत्र्यामंदी खोडा घालायची पावर आपल्याला मिळालेली नस्ती. त्यांच्या दिसन्याकडं तं मान्सानं फुकाच ध्यान देवूने. त्यांच्या डेव्हलेपमेंटसाठी जी काय छाटणी-प्रुनिंग व्हत आस्ती तेवडी सोडली तं त्यान्ला नटवायला झाडं म्हंजे फॅशन शोमंदल्या ललना नस्तेत. कायबाय चित्रइचित्र कापडं नेसून त्या ललना एवढ्या आवगडून जातेत की, त्यांचे पानं कंदी गळून पडतील सांगता येत न्हाई. झाडंबी आशेच आवगडून जात आसनार आन् आपली बेंगरुळ बॉडी बगून ते भनकत असनार. यखांद्या दिशी ते कुणाच्या ना कुणाच्या टाळक्यात दणकावून हान्नारैत, यवडं पक्कं. आन् तेबी टणक फांदीनं!

बातम्या आणखी आहेत...