आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Chandrasen Deshmukh Rasik Article | The New Classism Of Online Education ...

रिपोर्ताज:ऑनलाईन शिक्षणाचा नवा वर्गवाद...

चंद्रसेन देशमुख2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या ऑनलाईन शिक्षणाचा बोलबाला सुरू झाला आहे, त्यावर ग्रामीण भागात तीव्र नाराजी आहे. ज्या शाळा गाजावाजा करून डिजिटल झाल्या तेथे संगणक बंद पडले असून, कुणाचेही लक्ष नाही. आज जेथे शाळांच्या इमारती धड नाहीत त्यांच्यावर ऑनलाईन शिक्षणाची सक्ती तर अजिबात करू नये असाही सूर उमटत आहे. खेडीच नव्हे तर शहरी भागातूनही धडपणे वीज व्यवस्था नाही. इंटरनेटचा पत्ता नसतो. एका बाजूला अशी अवस्था असताना महागडे मोबाईल किंवा टॅब, दर्जेदार दूरचित्रवाणी संच आणण्यासाठी पैसे कुठून आणायचे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ज्या घरातील पालक कामासाठी बाहेर पडतील अशावेळी मुले घरात मोबाईल किंवा टीव्हीचा वापर केवळ अभ्यासासाठी करतील यावर कुणाचाही विश्वास नाही. अनेक पालक असे आहेत की त्यांना मोबाईलचा वापर धडपणे करता येत नाही, ते मुलांना कसे मार्गदर्शन करणार, याकडे लक्ष वेधले जात आहे.

दुपारी एकची वेळ... कौडगावच्या (ता.उस्मानाबाद) तांड्यावरील प्राथमिक शाळेला २५ मार्चला लागलेलं टाळं अजून उघडलेलं नव्हतं. १५ जूनचा मुहूर्तही सरून गेलेला. शाळेच्या बंद दरवाजासमोर साचलेल्या डोहात चिमुकली मुले मनसोक्त उड्या मारून पावसाचा आनंद लुटत होती. ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुटी मिळेल काय?’, या बालगीतांच्या ओळी अक्षरश: सत्यात उतरत होत्या. शाळा कधी सुरू होईल, याचा अंदाज लावण्यातही त्यांना रस नव्हता. मोबाईलवरच्या ऑनलाईन शिक्षणाबद्दल बोलताच गालात निरागसपणे खुदकन हसत मुले पळून जात होती. मोबाईलचा मोजकाच संपर्क आल्यानं असली ऑनलाईनवगैरे शिक्षणपध्दती त्यांच्या डोक्यातही जात नव्हती.

शाळा बंद, शिक्षण सुरू, या उपक्रमाची शासनाने घोषणा केल्यानंतर स्मार्टफोनच्या दुकानात प्रचंड गर्दी दिसेल, प्रत्येक विद्यार्थी हातात स्मार्ट फोन घेऊन  शालेय अभ्यासक्रमात रमून जाईल आणि जिकडंतिकडं नव्या ‘स्मार्ट’ शिक्षणाचा जन्म झालेला असेल, असं काहीसं चित्र रंगत होतं. अशा नेमक्या वातावरणात "दिव्य मराठी रसिक'च्या टीमने काही वाड्या-ताड्यांना, गावखेड्यांना भेट दिली, तेंव्हा भिन्न चित्र दिसलं. शासनाला अपेक्षित असलेल्या ऑनलाईन शिक्षणाच्या प्रयोजनासाठी मुलांच्या हातात स्मार्ट फोन तर नव्हतेच पण अनेकांना दरवर्षीप्रमाणे वह्या-पुस्तकेही मिळालेली नव्हती. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीची शिक्षणाची गंगा अजून तरी प्रवाही झाली नव्हती. तुळजापूर तालुक्यातील ७० कुटुंब असलेल्या हंगरगा बहुरूपी वस्तीवरील बसवराज विभूते म्हणाले, ‘दरवर्षी पोरांना त्यांच्या अाश्रमशाळेतून कापडं, वह्या, पुस्तकं मिळत्यात. त्यामुळं खर्चाचा विषयच नव्हता. यंदा पोरंही अजून घरीच हायेत. त्यांना अभ्यासाला काहीच नाही. त्यांच्या पुस्तक-वह्यासाठी आमच्याकडं पैसंबी नाहीत. पाेरांनी मोबाईल मागितला, पण एवढं पैसं कुठून आणायचं. न्हाई घेतला मोबाईल. त्याला पैसं टाकावं लागत्यात सारखं, असलं आमच्याच्यानं जमणार हाय का, सरकारनं तरी इचार करावा की.’ 

वस्तीवरचा राहूल विभूते तसेच भूमिका विभूते यावर्षी दहावीला आहेत. भटके विमुक्त प्रतिष्ठानने उभारलेल्या यमरगवाडी (ता.तुळजापूर) सेवालयात शिकणारी वस्तीवरची ही मुलं कोरेानामुळं आणि शाळा सुरू करण्यासाठीचा मुहूर्त न उजाडल्यानं अजूनही वस्तीवरच आहेत. वस्तीवरची १५ मुले-मुली या सेवालयात शिक्षण घेतात. शाळेतील ८ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषय शिकविणारे शिक्षक बालाजी क्षीरसागर म्हणाले,‘शासनाच्या सूचनेनंतर आम्ही ऑनलाईन शिक्षणासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप काढला. मुलांच्या पालकांचे नंबर त्यात समाविष्ठ करण्यासाठी यादी तयार केली. तेंव्हा वस्तीवरच्या १५ पैकी फक्त पाच पालकांकडे स्मार्टफोन असल्याचं लक्षात आलं. त्यापैकीही १-२ पालकांचे मोबाईलच अॅक्टिव्ह आहेत. अन्य मुलांना पालकांकडून मोबाईल मिळू शकले नाहीत. ज्यांच्याकडे मोबाईल आहेत, त्यांना रिचार्ज करणंही शक्य होत नाही.शाळेतील ८ वी ते १० वी पर्यंतच्या एकूण ११८ पैकी ५१ मुलांच्या पालकांकडे स्मार्टफोन आहेत. त्यापैकी केवळ ५ पालकांचे व्हॉट्सअॅप चालू आहेत. ग्रुपमध्ये आम्ही नेहमी अभ्यासक्रमाशी संबंधित लिंक पाठवतो. मात्र, केवळ ५ विद्यार्थी अभ्यासक्रमाला प्रतिसाद देतात. अन्य मुलांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पाेहोचतच नाही. परिणामी त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेक पालकांना त्यांच्या दररोजच्या जगण्याची भ्रांत आहे. त्यांच्याकडे स्मार्टफोन घेण्यासाठी आणि रिचार्ज करण्यासाठी पैसे नसतात. मुलांची शिकण्याची मानसिकता असली तरी ऑनलाईन शिक्षणाद्वारे हे अशक्य आहे, असं आम्हाला नेहमी जाणवतं.’

देवदेवतांच्या पोस्टर्सची विक्री, भजनाचे कार्यक्रम, असा बहुरूपी समाजाचा व्यवसाय आहे. हंगरगा ग्रामपंचायतीने समाजातील लोकांना राहण्यासाठी गावाजवळ गायरान जागा दिली. या जागेवर कुणी पत्र्याचे शेड मारून तर कुणी पालात राहते. तुळजापूर शहरापासून जवळ असलेल्या या वस्तीवरील तरुण शहरात रोजगारासाठी येतात. मुलांना शिक्षण देण्यापेक्षा दररोजच्या जगण्यासाठी दोन पैसे मिळवायला मुलांचा हातभार लागावा, अशी सर्वसाधारण पालकांची अपेक्षा. पण, काही खासगी शिक्षण संस्था मुलांचा कपड्यांसह राहण्याचा, जेवणाचा खर्च भागवून शिकवत असल्याने पालक होकार देतात. पण, यावर्षी १५ जूनला शाळा सुरूच झाल्या नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांकडे पुस्तके-वह्या आल्या नाहीत. स्मार्ट फोन लांबची गोष्ट. पुस्तके-वह्याही न मिळाल्याने वस्तीवरच्या मुलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे.

‘यमगरवाडीच्या सेवालयात भटक्या समाजातील ३०० वर मुले शिक्षण घेत आहेत. संस्थेत शिकलेले अनेक विद्यार्थी मोठ्या हुद्द्यावरही गेले आहेत. ज्या समाजापर्यंत शिक्षणाचा गंधही नव्हता,अशा समाजातील मुले-मुली शासकीय, खासगी नोकऱ्या करून समाधानी जीवन जगत आहेत. पालावर, झोपड्यामध्ये जीवन जगणाऱ्या व आज इथं तर उद्या दुसऱ्या गावात, असं बिऱ्हाड पाठीवर घेऊन फिरणाऱ्या भटक्या समाजात कसंबसं शिक्षण सुरू झालं असताना आता ऑनलाईन शिक्षणाचा बोजा त्यांना झेपणार कसा’, असा प्रश्न संस्थेचे मुख्याध्यापक अण्णासाहेब कोल्टकर यांनी केला. संस्था उभारणीत ज्यांचे भरीव योगदान आहे, ते भटके विमुक्त प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आणि उस्मानाबादचे बालरोगतज्ज्ञ डॉ.अभय शहापूरकर यांनी ऑनलाईन शिक्षणपध्दती म्हणजे काहीच नसल्यापेक्षा काहीतरी असावं म्हणून काढलेला तोडगा आहे, अशी भूमिका मांडली. ते म्हणाले,‘कोरेानाच्या या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. ऑनलाईन शिक्षणपध्दती चांगली आहे, असं माझं अजिबात मत नाही. मात्र, दुसरा काहीही पर्याय नाही, म्हणून केलेली ही तडजोड आहे. अनेकार्थाने ही व्यवस्था अडचणीची आहे. सामान्य कुटंुबातील मुलांकडे स्मार्टफोन येणं अशक्यच आहे. आमच्या संस्थेत शिकणारा विद्यार्थी मुळातच भटक्या समाजातील आहे. पण, ग्रामीण भागात अशीच परिस्थिती असलेली ७० टक्के तरी कुटंुबं आहेत. त्यांच्यासाठी स्मार्टफोन असणं आणि त्याचा नियमितपणे वापर करणं आर्थिकदृष्ट्या अशक्य आहे. स्मार्ट फोनचा दुसरा धोकाही विचारात घ्यायला हवा तो असा की, सततच्या स्मार्टफोन वापरानं मुलांच्या डोळ्यावर, मानसिकतेवर दुष्परिणाम होतात. कोरोनाच्या आधी माझ्याकडे येणाऱ्या बालरुग्णांमध्ये मोबाईलच्या अतिरेकी वापराने मानसिकतेवर तसेच डोळ्यावर परिणाम झालेल्या रुग्णांची संख्या मोठी असायची. आता ती संख्या निश्चितच वाढेल असा धोका आहे.’

प्रत्यक्ष शिक्षक समोर असताना शिकण्याने आणि मोबाईलवर शिकण्यात मोठा फरक आहे. शिक्षक-विद्यार्थ्यांचं भावनिक नातं असतं. प्रचलित शिक्षणपध्दतीमध्ये दोन्ही बाजूंनी संवाद असतो. एखादा मुद्दा लक्षात आला नाही तर विद्यार्थी तत्काळ शिक्षकांना विचारू शकतात. त्यांच्या शंकांचं समाधान तातडीनं होतं. ऑनलाईन शिक्षणातून विद्यार्थी एकाग्रतेने शिकतीलच असं नाही. न समजलेले मुद्दे मागे पडत जातात. शिवाय ठराविक वेळेतच पाठ पूर्ण व्हायला हवेत, अशी बंधनंही शिक्षकांवर असल्यानं स्मार्ट फोन असलेल्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन शिक्षण म्हणजे निव्वळ औपचारिकतेचा भाग वाटत आहे. पण, ही औपचारिकता पूर्ण करायला तरी गावातील, तांड्यावरील, वस्तीवरील मुलं सक्षम आहेत का, हा खरा प्रश्न आहे. कोरोनाने अनेक कुटुंबाचा रोजगार हिरावला गेला आहे. अनेकांच्या पोटाचा प्रश्न आ वासून उभा आहे. हातावर पोट असलेली कुटंुबं रस्त्यावर आली आहेत. अशा परिस्थितीत ५-१० हजारांचा स्मार्टफोन घेऊन मुलांसाठी देणं, ही त्यांच्यासाठी अशक्यप्राय बाब आहे.

शाळा बंद असल्याने कौडगावच्या तांड्यावरील मुले शिक्षणापासून दुरावली आहेत. १२०० लोकसंख्या असलेल्या तांड्यावर चौथीपर्यंत शाळा आहे. या शाळेत ३३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापुढील शिक्षणासाठी मुलांना जवळच्या बावी आश्रमशाळेत किंवा उस्मानाबादला जावे लागते. बंजारा समाजाच्या या वस्तीवर दीडशेहून अधिक ऊसतोड मजूर आहेत. अन्य लोक शेतमजुरी करतात. साधारणत: ३० जण पुण्यात रोजगारासाठी गेले होते. तेही लॉकडाऊनमध्ये गावी आले. तांड्यावरील दीड-दोनशे कुटुंबापैकी १० ते १२ जणांकडं स्वत:ची शेती आहे. सगळ्यात जास्त म्हणजे ३ एकर शेती असलेला व्यक्ती तांड्यावरचा धनिक मानला जातो. अशातले एक रामदास पवार. मान्सूनचा पाऊस वेळेत सुरू झाल्यामुळं पेरणीच्या कामासाठी शेतात गेलेले रामदास यांना आम्ही शेतातच गाठलं. रामदास यांना ७ मुली, एक मुलगा. पृथ्वीराज सगळ्यात लहान. तो चांगल्या शाळेत शिकावा म्हणून उस्मानाबादेतील श्रीश्री रवीशंकर इंग्लिश स्कुलमध्ये प्रवेश घेतला आहे. २५ टक्के मोफत प्रवेशातून त्याची सोय झालेली. पण मुली १० वीपर्यंत बावीच्या अाश्रमशाळेत शिकल्या.

‘मुलाच्या शाळेनं फी माफ केली पण,स्कुलबस,दप्तर-वह्याचा खर्च भागविणं आमच्याच्यानं अडचणीचं होतंय.परिस्थितीच नाही तर कसं शिकवायचं, मालकीन म्हणली मुलाला तरी चांगल्या शाळेत पाठवा, म्हणून त्याला उस्मानाबादला शिक्षणासाठी पाठवितोय. नाहीतर खर्च भागविणं कठीण हाय, अशी हतबलता रामदास यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘तांड्यावर अवघ्या ५-१० लोकांकडं चांगला मोबाईल असंल. मलाही मुलाच्या शाळेतून फोन आला होता. आम्ही मोबाईलवर अभ्यास पाठवितोय म्हणाले. मुलाला सांगून मोबाईलमध्ये बघितलं पण त्यात काहीच आलं नव्हतं. तांड्यावर सगळी माणसं अडाणी हायेत.चार-दोन शिकलेली पोरंबी शेतमजुरी करत्यात.’ आम्ही तांड्यावर पोहोचल्यानंतर प्राथमिक शाळेच्या मोकळ्या जागेत पावसाच्या पाण्याने डोह साचले होते. त्यात शाळेतील चिमुकली मुले हंुदडत होती. गप्पा मारत बसलेल्या काही तरुणांकडं चौकशी केल्यानंतर त्यांनी शाळेचे शिक्षक नाईकवाडी यांचा नंबर दिला. संवाद साधल्यानंतर नाईकवाडी यांनी पालक तसेच विद्यार्थ्यांची शिक्षणाबद्दलची तळमळ सांगितली.

‘मुलांमध्ये शिक्षणाची गोडी आहे, पालकांनाही आपली मुले शिकावीत,असं प्रामाणिकपणे वाटतं. म्हणून तर एरवी उसतोडीवर जाणारे मजूरही आपली मुले आजी-आजोबा किंवा चुलत्यांकडे ठेवून जातात. ३३ मुले चौाथीपर्यंत शिक्षण घेत आहेत. तर ५० वर मुले आजबाजूच्या गावांमध्ये जाऊन पुढचे शिक्षण घेत आहेत. प्रशासनाने ऑनलाईन शिक्षणाबद्दल माहिती भरायला सांगितली होती. त्यात स्मार्ट फोन किती पालकांकडे आहे, असं विचारण्यात आलं होतं. ३३ विद्यार्थ्यांपैकी १० पालकांकडे स्मार्टफोन आहेत. आम्ही विद्यार्थ्यांसाठी ग्रुप काढला आहे. त्यापैकी दोनच पालक अॅक्टिव्ह आहेत. आम्ही उर्वरित पालकांना याबद्दल बोललो. पण त्यांनी आर्थिक अडचणी सांगितल्या. रिचार्ज करायला पैसे नाहीत, रेंज नाही, मुलांच्या हातात मोबाईल कसा द्यायचा, असा प्रश्न काही पालकांनी केला. काही पालकांनी मुलांच्या डोळ्याला त्रास होत असल्याचं कारण सांगितलं. मी काही पालकांच्या मोबाईलमध्ये दीक्षा अॅप डाऊनलोड करून दिलं. त्याचा काही दिवस वापरही झाला. पण पालकांसोबत मोबाईल बाहेर गेल्यानंतर त्यातही खंड पडतो. यातून एकच गोष्ट ध्यानात आली ती म्हणजे मुलांना शिकविण्याची मानसिकता असली तरी पालकांची परिस्थिती नाही. मुलांनाही शिकण्याची भरपूर आवड आहे. शाळा सुरू असताना मी बरेच शिक्षण मोबाईलवरून देतो. मी सात वर्षापासून अनुभवतो आहे. परिस्थितीअभावी शिक्षणाकडं दुर्लक्ष होत आहे.’

chandrasen.d@dbcorp.in

लेखकाचा संपर्क - ९८२२५९३९८०

बातम्या आणखी आहेत...