आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:केवळ संधी नव्हे, आव्हान

दिव्य मराठी2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिनी अ‍ॅपवर घातलेल्या बंदीचे सर्वत्र स्वागत होत आहे. चीनची घुसखोरी व भारतीय जवानांच्या हौतात्म्याला उत्तर हे बंदीमागचे एवढेच कारण नाही. अ‍ॅपच्या माध्यमातून होणारी माहितीची चोरी ही भारताच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणारी आहे. ऑस्ट्रेलियातील संगणक प्रणालीवर सायबर हल्ल्याची घटना ताजी आहे. त्या हल्ल्याशी चीनचा संबंध आहे. अ‍ॅपच्या माध्यमातून त्या देशातील लोकांच्या अजाणतेपणी माहिती गोळा करायची. नंतर त्याचाच वापर त्या देशाच्या विरोधात करण्याची चीनची पद्धत ऑस्ट्रेलियातील सायबर हल्ल्यातूनच जगासमोर आली. अमेरिकेनेही हुवेई व झेडपीएक्स या दोन टेलिकाॅम कंपन्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घातक असल्याचे नुकतेच जाहीर केले. तामिळनाडू उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने एक वर्षापूर्वी टिकटॉकवर बंदी घातली होती. मुलांसाठी अत्यंत धोकादायक अ‍ॅप, हे बंदीचे कारण होते. त्यानंतर केंद्र सरकारच्या आदेशानुसार गुगल अ‍ॅपस्टोअरमधून टिकटॉक काढून टाकले होते. ‘बाइटडान्स’ या चिनी कंपनीच्या भारतातील कार्यालयाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने नेमलेले नि:पक्ष लवाद मुकुल दातार यांनी बंदीमुळे टिकटॉकचा योग्य वापर करणाऱ्यांच्या हक्कास बाधा येत असल्याचा अहवाल दिला. त्यानुसार उच्च न्यायालयाने बंदी उठवली. भारतातील न्यायालयीन प्रक्रिया किती वेळखाऊ आहे? हे सर्वश्रुत आहे. पण इथे मात्र सगळे न्यायालयीन टप्पे पार करून तीन महिन्यांतच बंदी उठली. जे अ‍ॅप एक वर्षापूर्वी मुलांसाठी धोकादायक होते ते देशाच्या सुरक्षिततेसाठीही घातक असल्याचे केंद्र सरकारच्या आता लक्षात आले. खरे तर बंदी अगोदरच घालायला पाहिजे होती. चीनच्या सरकारी प्रतिनिधीने यावर केलेले भाष्य हे प्रत्येक मानी भारतीयाच्या जिव्हारी लागणारे आहे. याला शब्दांनी उत्तर न देता भारतीय आयटी तंत्रज्ञांनी कृतीने उत्तर दिले पाहिजे. याकडे केवळ संधी म्हणून न बघता समर्थ पर्याय निर्माण केले पाहिजेत. टिकटॉकचा प्रसार होण्यापूर्वी आयआयटीमधील अभियंत्यांनी तसेच अ‍ॅप तयार केले होते. अशा प्रयत्नांना महिंद्रासारख्या उद्याेगपतींनी पाठबळ दिले पाहिजे. भारतातील अ‍ॅप बंदीने चीनचे फारसे नुकसान होणार नाही. पण भारताप्रमाणे अन्य देश बंदी घालतील, याची भीती चीनला आहे. या सगळ्या घडामोडींमुळे भारताची दिशा स्पष्ट झाली. गोळीला गोळीने उत्तर तर देऊच. पण भारतीय बाजारपेठेतील ताकदीच्या जोरावर उत्तर देण्याच्या दिशेनेही सरकार पावले टाकत आहे.

बातम्या आणखी आहेत...