आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गेले काही दिवस महाराष्ट्राच्या चर्चाविश्वात बाॅलीवूडची पळवापळवी अग्रस्थानी आहे. भाजपने तर योगी येणार अन् कृष्णाने जसा पर्वत उचलला तसे बाॅलीवूड उत्तर प्रदेशात नेणार, असे वातावरण तयार केले होते. शिवसेना योगींना प्रतिआव्हान देत होती. मुळात बाॅलीवूड हा कला उद्योग असला तरी तो संघटित स्वरूपात नाही. एका छत्राखाली नियंत्रितही नाही. कलाकार मुंबईत जरूर राहतात, पण बाॅलीवूडचे सर्व काम मुंबईत होते, असेही नाही. तरीही योगींच्या दौऱ्याचा शिवसेनेने इतका धसका का घ्यावा? मराठी माणसाचा जीव सर्वस्वी मुंबईत नसला तरी शिवसेनेचा मात्र आहे. नोएडात फिल्मसिटी उभारून उत्तर प्रदेशच्या जनतेला खुश करण्याचा योगींचा जसा प्रयत्न आहे, तसे बाॅलीवूड मुंबईतून जाऊ देणार नाही, या शिवसेनेच्या भूमिकेमागे भावनिक राजकारण आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यासाठी हा पट मांडला जातो आहे. जिथे सलग १२ तास वीज मिळत नाही, रात्री आठनंतर एकटी महिला बाहेर पडू शकत नाही, हप्ता दिल्याशिवाय व्यवसाय चालवता येत नाही, सांस्कृतिक कार्यक्रमांना मोकळीक नाही, कायदा- सुव्यवस्थेत देशात सर्वात खालचा क्रमांक आहे, अशा राज्यात बाॅलीवूड स्थलांतरित होईल, हा प्रश्न मराठी माणसाला पडतो तरी कसा? बरे, हा विषय एकट्या बाॅलीवूडबाबत नाही. शेअर मार्केट, मुंबई पोर्ट ट्रस्ट, आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र, बीसीसीआय , रिझर्व्ह बँक, रेल्वे मुख्यालय, जीपीओ हे मंबईत राहण्याबाबत शिवसेना कमालीची काळजीत असते. मुळात व्यवसाय करण्यासाठी शांतता लागते. अराजकाच्या स्थितीत व्यवसाय गती घेत नाहीत, हा जगाचा इतिहास आहे. मराठी माणसाला मात्र मुंबईतली काही मुख्य कार्यालये कोणी तरी पळवत असल्याची स्वप्ने कायम पडत असतात. मुंबई महाराष्ट्राची आणि मराठी माणसांची आहे. ती तशीच राहणार आहे. उद्यमशीलतेला वाव असल्यास, कायदा-सुव्यवस्था चोख राखल्यास आणि उत्तम पायाभूत सुविधा दिल्यास बाॅलीवूड पळवून नेण्याइतकी ताकद कोणाकडे आहे? हे योगींना ठाऊक आहे. म्हणून त्यांनी पवित्रा बदलत, मुंबईचे बाॅलीवूड आहे तसेच राहील, असे स्पष्ट केले. अशा मुद्द्यांवरून राजकारणाचा ‘सिनेमा’ करणाऱ्यांना वास्तवाचे किमान एवढे भान असायला हवे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.