आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रंथार्थ:'कल्चरली करेक्ट' : स्त्रीमुक्तीचा लाँग मार्च

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्जुन जगधने

प्रागतिक पुरुषांना जसा बुद्धाचा वारसा आपला वाटतो आहे तसा विचारी स्त्रियांनाही बुद्धाच्या मार्गाने जाण्याची गरज वाटू लागली आहे. गेल्या वीस-पंचवीस वर्षात अशा अनेक महिलांनी हे उघडपणे सांगितले आहे. यापैकी निवडक स्त्रियांनी लिहिलेली विचारप्रवर्तक मनोगतं संदीप सारंग/डॉ. वंदना महाजन संपादित, ग्रंथाली प्रकाशित ‘कल्चरली करेक्ट’ या ग्रंथाद्वारे नुकतीच वाचकांसमोर आली आहेत. ही मनोगतं अंतर्मुख करणारी असून त्यातून त्यांचा वैचारिक, मानसिक, सामाजिक प्रवास उलगडला गेला आहे.

अलीकडे भारतीय समाजात एक नवी सांस्कृतिक चेतना निर्माण होताना दिसते आहे. ही चेतना आहे बौद्ध धम्माचा स्वीकार करण्यासंबंधीच्या जाणीवेची! गेल्या काही वर्षांपासून या जाणीवेला व्यापक चळवळीचे स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे. बुद्धिझम हा आपला खरा सांस्कृतिक वारसा आहे हे सत्य ओळखण्याची प्रक्रिया या चळवळीत आकार घेत असून ती आता भारतीय समाजाच्या सर्वच स्तरात विस्तारू पाहात आहे. त्याचाच परिणाम म्हणून बहुजन, ओबीसी, दलित, आदिवासी, भटके-विमुक्त आणि अभिजन समाजातील जागृत झालेले अनेक लोक बौद्ध धम्माकडे आकृष्ट होऊ लागले आहेत. या प्रक्रियेत पुरुष आघाडीवर आहेतच परंतु स्त्रियाही मागे नाहीत. प्रागतिक पुरुषांना जसा बुद्धाचा वारसा आपला वाटतो आहे तसा विचारी स्त्रियांनाही बुद्धाच्या मार्गाने जाण्याची गरज वाटू लागली आहे. मागच्या वीस-पंचवीस वर्षात अशा अनेक महिलांनी हे उघडपणे सांगितले आहे. यापैकी निवडक स्त्रियांनी लिहिलेली विचारप्रवर्तक मनोगतं संदीप सारंग/डॉ. वंदना महाजन संपादित, ग्रंथाली प्रकाशित ‘कल्चरली करेक्ट’ या ग्रंथाद्वारे नुकतीच वाचकांसमोर आली आहेत. ही मनोगतं अंतर्मुख करणारी असून त्यातून त्यांचा वैचारिक, मानसिक, सामाजिक प्रवास उलगडला गेला आहे. या स्त्रियांपैकी काहीजणींनी रीतसर बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे. काहीजणी लवकरच तो स्वीकारणार आहेत. काहीजणी दैनंदिन जीवनात बुद्धिझम अनुसरत आहेत, तर काहीजणी बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास आणि मांडणी करत आहेत. या महिला बौद्ध धम्माच्या आकर्षणाच्या बाबतीत वेगवेगळ्या टप्प्यावर असल्या तरी त्यांच्या मनात चाललेले वैचारिक-सांस्कृतिक स्थित्यंतरं अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि अभिनव असे आहे. त्यांच्या मनातली ही खळबळ हे एका अर्थाने सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेतले ऐतिहासिक पर्व असून ते समाजासमोर आणणे अत्यंत गरजेचे होते. हीच गोष्ट लक्षात घेऊन संपादकांनी हा महत्त्वपूर्ण ग्रंथ सिद्धीस नेला आहे. जाणीवपूर्वक धर्मांतर करून बौद्ध धम्म स्वीकारणे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही, हे अत्यंत धाडसाचे काम आहे. याच धाडसाचा शोध घेण्याची भूमिका या ग्रंथनिर्मितीच्या मुळाशी आहे आणि त्या प्रेरणेतूनच प्रस्तुत ग्रंथ साकारला गेला आहे.

संपादक डॉ. वंदना महाजन यांच्यासह डॉ. रुपा कुळकर्णी, डॉ. गेल ऑमव्हेट, डॉ. संबोधी देशपांडे, डॉ. लता प्रतिभा मधुकर, डॉ. चैत्रा रेडकर, डॉ. लता छत्रे, डॉ. अर्चना गणवीर, डॉ. भावना राठोड, डॉ. मीनल कुष्टे, प्रा. वंदना भागवत, प्रा. पल्लवी हर्षे, प्रा. स्नेहजा रुपवते, अ‍ॅड. वर्षा देशपांडे, अ‍ॅड. केसरी मौर्य, नंदिनी दातार, प्रियांका उपरे, सीमा पाटील, गीता पांचाळे, मनीषा तोकले, सुप्रिया देसाई, कांचन नाईक, कविता मोरवणकर, शारदा नवले, छाया कोरेगावकर, रमा पाटील, सुषमा भड, वृषाली अय्यर-काश्यप, शारदा हजारे, शैला यादव, मंजुला प्रदीप, रेश्मा राणे, मनीषा जाधव या आपापल्या क्षेत्रात हिरीरीने कार्य करणाऱ्या मात्र ते करत असताना बुद्धविचार महत्त्वाचा असल्याचे लक्षात आलेल्या ३३ स्त्रियांनी या ग्रंथातून आपल्या भूमिका निर्भीडपणे मांडल्या आहेत. मुक्तीचा मार्ग शोधणाऱ्या स्त्रियांची ही मनोगतं मनापासून समजून घेतली पाहिजेत. त्यांच्या संघर्षमय प्रवासातील टप्पे आणि मुद्दे स्वच्छंद अवकाशाला गवसणी घालू पाहणाऱ्या स्त्रियांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतील. भारतीय स्त्रियांच्या मुक्तीच्या मार्गातील नेमक्या भूमिका काय आहेत, कोणते सिद्धान्त स्वीकारून, कोणती वैचारिक बांधिलकी मानून या मार्गावरचा प्रवास करता येऊ शकतो, निर्भय-मुक्त जगण्यासाठी कोणते सांस्कृतिक पर्यावरण योग्य असू शकते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या मनोगतांमधून मिळतात. धर्म या विषयाशी आपला काही संबंध नाही, असा अलिप्त विचार बऱ्याच महिलांच्या मनात असतो. वास्तविक, धर्माचा आणि महिलांचा अगदी जवळचा संबंध आहे. त्यामुळे पुरुषांपेक्षाही अधिक गांभीर्याने स्त्रियांनी धर्माचा विचार केला पाहिजे. स्त्रियांच्या चळवळी आज एका आवर्तात सापडल्या आहेत. मनुस्मृतीदहनासारख्या कार्यक्रमांवर भर दिला जात आहे. परंतु हे काही सकारात्मक आणि रचनात्मक कार्य नाही. मनुस्मृती जाळलीच पाहिजे. परंतु पुढे काय? आपले स्वत:चे धार्मिक- सांस्कृतिक विचारविश्व आणि अधिष्ठानविश्व कोणते असणार आहे हे ठरवायचं की जे नको आहे तेच आठवणीने वारंवार जाळत बसायचं? नष्ट करण्यात कोणता पराक्रम आहे? आता नवनिर्मितीचा, सृजनाचा पराक्रम केला पाहिजे, ही या पुस्तकाच्या संपादकांची भूमिका आजच्या गोंधळलेल्या स्त्रीचळवळींना नवा रस्ता दाखविणारी आहे. धर्म आणि स्त्रिया यांचे नाते बऱ्याच विरोधाभासांनी भरलेले आहे. धर्मांनी स्त्रियांना कायम लघुमानवाचा दर्जा दिला. स्त्रियांच्या जगण्याचे नियम ठरवून दिले. या नियमांचे पितृसत्ताक व्यवस्थेला अभिप्रेत असलेले ओझे स्त्रिया बिनतक्रार वाहत राहिल्या. वैदिक धर्मविचाराने स्त्रियांचे चूल-मूल हे स्थान पक्के करून योनिशुचितेच्या अवास्तव कल्पना त्यांच्यावर लादल्या. स्त्रिया म्हणजे विशिष्ट धर्माच्या आणि जातीच्या लोकसंख्येत भर टाकणाऱ्या घटक असे समजून त्यांचा वापर करण्यात आला. यात स्त्रियांचे माणूस म्हणून जगणेच संपून गेले. अशा वेळी तिच्यातल्या मनुष्यत्त्वाची आणि सामर्थ्याची खरी ओळख करून देण्याचे मूलगामी कार्य गौतम बुद्धांनी केले. त्यांची धम्म ही संकल्पना म्हणजे मानवी दु:खावरचा शास्त्रशुद्ध उतारा होता. धार्मिक अराजकतेत भरकटलेल्या हजारो जिवांना त्यांनी मुक्तीचा मार्ग दाखविला. पण नंतरच्या काळात वैदिकांनी बौद्ध धर्म नामशेष करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या देशातील बहुसंख्य समाज वैदिक संस्कृतीच्या गुलामगिरीत जगत राहिला. त्यांना ‘आपण माणूस आहोत’ याचाच विसर पडला. खरेतर, माणसाला

आपल्यातल्या मानव्याची जाणीव होणे आणि त्यातून त्याने मुक्तीच्या दिशेने मुखर होणे म्हणजेच बुद्धाच्या मार्गाने जाणे होय, ही संपादकद्वयींची भूमिका केवळ ऐतिहासिक वास्तवच अधोरेखित करत नाही, तर भविष्यकालीन दिशाही प्रकाशमान करते. आजपर्यंत समाजामध्ये आणि अगदी चळवळींमध्येही स्त्रियांचे स्थान परिघावरच राहिले. पितृसत्ताक व्यवस्थेच्या भरणपोषणासाठीच स्त्रियांची सर्व शक्ती खर्ची पडत आली. मात्र याची जाणीव फारशी कुणाला नाही. परिवर्तनाचा ध्यास घेतलेल्या पुरुषांनीसुद्धा स्त्रियांना आवश्यक असलेल्या मुक्त अवकाशाचा शोध घेतला असे चित्र दिसत नाही. फक्त फुले-आंबेडकर अपवाद आहेत. त्यामुळे स्त्रीमुक्तीच्या पाऊलखुणा शोधताना आणि भारतीय स्त्रियांच्या मुक्तीची वैचारिक मांडणी करताना फुले-आंबेडकरांच्या विचारांचे धागेदोरे तपासतच पुढे जावे लागते. अर्थात, हा धागा गौतम बुद्धाने केलेल्या मानवमुक्तीच्या सिद्धान्तनाशी जाऊन भिडतो. त्यामुळेच मुक्तीच्या दिशेने जाऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बुद्धमार्गाचे आकर्षण वाटते. या ग्रंथात लिहिणाऱ्या स्त्रिया वैदिक संस्कृती नाकारताना अगदी आपसूकपणेच फुले-आंबेडकरांचा आणि बुद्धविचारांचा पुरस्कार- स्वीकार करताना दिसतात ते त्यामुळेच! बुद्धविचार भारतात जन्माला आला आणि जगभर पसरला. आज धार्मिक पातळीवर त्यात काहीशी तांत्रिकता आलेली दिसत असली तरी तर्कशुद्ध चिकित्सा करायला शिकविणारा मूळ बुद्धविचार शबलित होत नाही. त्यामुळेच तो आता ग्लोबल विचार म्हणून जोमदारपणे पुढे येत आहे. जगातल्या अनेक बुद्धिवंतांनी या विचाराला आपलेसे केले आहे. विज्ञानाला प्रमाण मानणाऱ्या जगभरच्या नव्या पिढीला बुद्धविचार औचित्याचा वाटू लागला आहे. या पार्श्वभूमीवर मुक्तीच्या पाऊलवाटा शोधणाऱ्या या मैत्रिणी बुद्धमार्गाचा अवलंब करत आहेत, ही घटना पुरेशी बोलकी असून ती नव्या युगाची नांदी ठरल्याशिवाय राहणार नाही, हा या पुस्तकाच्या संपादकांचा आशावाद महत्त्वाचा आहे.

कल्चरली करेक्ट संपादक : संदीप सारंग/डॉ. वंदना महाजन प्रकाशक : ग्रंथाली, मुंबई पृष्ठे : 376 , मूल्य : 350 रुपये

arjunjagd@gmail.com

बातम्या आणखी आहेत...