आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रंथार्थ:गांधी - आंबेडकर संघर्षाचा नव्याने विचार

प्रा. दत्ता भगत3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांचा ‘गांधी : पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा’ हा बहुप्रतीक्षित वैचारिक ग्रंथ लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित झाला आहे. तब्बल ८०७ पानांच्या या ग्रंथानिमित्त राज्यात वादळी चर्चा सुरू झाली आहे. गांधी या महात्म्याची नव्याने ओळख करून देणारा हा ऐतिहासिक म्हणावा असा ग्रंथ असला तरी यातील मांडणी ही गांधी-आंबेडकर संघर्षाचा नव्याने विचार करायला लावणारी आहे.

‘गांधी’ या शीर्षकाचा सुमारे आठशे पृष्ठांचा ग्रंथ तीन महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झाला. सदर ग्रंथाची पहिली आवृत्ती संपली ही सुखद बातमी येवून पोहचली. एखाद्या वैचारिक ग्रंथाची पहिली आवृत्ती अवघ्या तीन महिन्यांत संपावी ही महाराष्ट्राच्या वैचारिक संस्कृतीला साजेशीच गोष्ट आहे. तरीपण एक प्रश्न मनात येतोच या सुखद घटनेचे श्रेय कोणाला? ग्रंथ विषयाच्या नायकाला, लेखक रावसाहेब कसबे यांना की, ज्या प्रकाशन संस्थेने सदर ग्रंथ प्रसिद्ध केला त्या भूमिकानिष्ठ प्रकाशन संस्थेला. सदर ग्रंथ लोकवाङ्मयगृह या प्रतिष्ठित प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केला आहे. डॉ. कसबे हे चाकोरीबाहेर जाऊन लेखन करणारे विचारवंत आहेत, हे महाराष्ट्राला माहिती आहेच. त्यांच्या विचारशैलीचा महाराष्ट्राला विशेष परिचय आहे तो त्यांच्या वक्तृत्वामुळे. ‘विचार कशाचा करावा’, त्यापेक्षा ‘विचार कसा करावा’ या विषयाची एक आंतरिक ओढ कसबे यांच्या वक्तृत्व शैलीचे खास वेगळेपण आहे. त्यामुळे म. गांधी यांच्याबद्दल ते काय म्हणतात, या विषयीचे एक प्रचंड कुतूहल मराठी वाचकांच्या मनात होतेच.

आचार्य जावडेकर ते नलिनी पंडीत असा गांधीवादाचा उलगडा करणारा समृद्ध प्रवाह महाराष्ट्रात आहे. रावसाहेब कसबे हे या प्रवाहातले लेखक नाहीत. याचा अर्थ या सर्व विचार प्रवाहाला ते बाद ठरवतात असेही नाही. डॉ. रावसाहेब कसबे मार्क्सवादी नाहीत, अथवा गांधीवादीही नाहीत. आपली शाळेतील घडण अॅन्टी मार्क्सिस्ट आणि अॅन्टी गांधीवादी वातावरणात झाली हे त्यांनी या ग्रंथाच्या प्रस्तावनेत नमूद केले आहे. डॉ. रावसाहेब कसबे जसे गांधीवादी नाहीत, मार्क्सवादी नाहीत, तसेच ते सांप्रदायिक आंबेडकरवादी नाहीत हेही त्यांचे वेगळेपण आपण लक्षात घ्यायला हवे. शिवाय ते केवळ अभ्यासक नाहीत, माणूस आणि त्याच्या विकासाला कवेत घेणारा मानवी संस्कृतीचा इतिहास या विषयीचे चिंतन केंद्रस्थानी ठेवून ते आपले अभ्यासक्षेत्र विस्तारत नेतात. मूळात विचारवंत संवेदनशील असेल तरच त्याच्या अभ्यासाला चिंतनशीलतेचे परिमाण लाभते. असा चिंतनशिल अभ्यासक सर्व कलांचाही तेवढ्याच सह्रदयतेने विचार करीत असतो. म्हणून मी आरंभातच नमूद केले की, विचार कशाचा करावा यापेक्षा तो कसा करावा यात त्यांना विशेष रस आहे. आता याच त्यांच्या वैशिष्ट्याचा प्रत्यय त्यांनी जे ग्रंथनाम दिले आहे त्या आधारे उलगडा करता येईल. डॉ. रावसाहेब कसबे ह्यांनी ग्रंथाचे मुख्य शिर्षक गांधी एवढेच दिले आहे. पण या गांधीचा विचार कसा करावा यासाठी एका उपशिर्षकाचीही योजना त्यांनी केली आहे. ते उपशिर्षक आहे ‘पराभूत राजकीय नेता आणि विजयी महात्मा’ हे उपशिर्षक वाचल्याबरोबर मराठी माणसाला १४ ऑगस्ट १९३१ रोजी म. गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची झालेली पहिली भेट आठवल्याशिवाय राहणार नाही. म. गांधींना या पहिल्याच भेटीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ‘जगात अनेक महात्मे येतात आणि जातात ते फक्त जमिनीवरील धूळ उडवितात. परंतु तिची पातळी मात्र उंचावू शकलेली नाहीत.’ बाबासाहेब आंबेडकरांची अत्यंत धिटाईने केलेल्या या उद्गाराचा सांप्रदायिक आंबेडकरवादी अभ्यासक किती गौरवाने उल्लेख करतात याची माहिती आपल्याला आहे. पण डॉ. रावसाहेब कसबे हा उदगार नोंदवल्यानंतर पुढे लिहितात ‘हे ऐकून गांधीजींच्या आयुष्यात पहिल्यांदाच त्यांच्यातील महात्मा डळमळीत झाला असावा. ‘गांधीजी मला मायभूमी नाही, असा आघात करुन आंबेडकरांनी भारतातील राष्ट्रप्रेमाची वस्त्रे किती तकलादू आणि फसवी आहेत त्यांची लक्तरे करुन गांधीच्या मुखावर समोरासमोर भिरकावून दिली. जे मुळात कधी राष्ट्र नव्हतेच, आजही नाही त्यावरील प्रेम ही शुद्ध लबाडी आहे. राष्ट्रप्रेमासाठी भारताला राष्ट्र बनवावे लागेल याची जाणीव आंबेडकरांनी गांधींना करुन दिली.’ डॉ. रावसाहेब कसबे सुचवतात ते असे की, गांधी नावाच्या राजकीय नेत्याच्या ह्या टप्प्यावरुन सुरू झालेला प्रवास क्रमाने महात्मेपणाकडे सरकत जातो. आपल्या विवंचनाचे कुणी विपर्यस्त अर्थ घेवू नये म्हणून ‘गांधी आंबेडकर संघर्षात आंबेडकरही बदलले’ ही दिशाही ते सूचवितात, नव्हे या दिशेचा विस्तारही ग्रंथात नोंदवतात.

सदर ग्रंथातल्या ८०० पृष्ठांपैकी सुमारे चारशे पृष्ठांचा मजकूर गांधी-आंबेडकर संघर्षातील आकलन नोंदवणारा आहे. खरे तर गांधी-आंबेडकरांच्या संघर्षाचे हे आकलन नसून गांधी-आंबेडकरांच्या देवघेवीचा सह्रदयतेने केलेला विस्तार आहे. या देवघेवीचा गाभा मनुष्य मुक्तीच्या चिंतनाचा आहे आणि या चिंतनाचा दिसणारा पृष्ठभाग भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या घडामोडीचा आहे. गांधींच्या विकासाचे हे मर्म जागतिक किर्तीच्या चरित्रकारांच्या नजरेतून का निसटले असावे त्याचीही कारणे रावसाहेबांनी नोंदवली आहेत. ज्या ‘पुणे करारा’ची मराठी चरित्रकार आणि अभ्यासक चर्चा करीत आलेले आहेत, त्या घटनेच्या संदर्भात चर्चेचा प्रवाहात डेडलॉक निर्माण झाला होता. तो बांध रावसाहेबांनी अत्यंत संयमाने फोडला आहे. त्यासाठी उपलब्ध नव्या माहितीचा आधारही त्यांनी घेतला आहे. त्यांची ही मांडणी गांधी-आंबेडकर संघर्षाचा नव्याने विचार करायला लावणारी आहे. सुरुवातीचे २०० पृष्ठांचे प्रकरण ‘गांधीपूर्व भारत : ऐतिहासिक पार्श्वभूमी’ या नावाने आलेले आहे. सदर प्रकरणाच्या आरंभाला गांधींच्या राजकीय कार्याची दिशा कळावी म्हणून यंग इंडियातील उध्दरण देण्यात आले. या उध्दरणाचा दिनांक मला फार महत्वाचा वाटतो. तो आहे १७ सप्टेंबर १९३१. दुसऱ्या गोलमेज परिषदेला निघण्यापूर्वी १४ ऑगस्ट १९३१ रोजी गांधी आंबेडकरांची पहिली भेट होते. दुसरी गोलमेज परिषद सुरु झाल्यानंतर १३ सप्टेंबर १९३१ रोजी डॉ. आंबेडकरांचे वादळी भाषण झाले. तर महात्मा गांधीचे त्यानंतर २ दिवसांनी १५ सप्टेंबर १९३१ रोजी भाषण झाले. पण त्याआधीच यंग इंडियात जो मजकूर आलेला आहे तो वाचला म्हणजे गांधींच्या अंतरंगात काय चालू होते त्याचेच दर्शन या उध्दरणातून घडते.

सदर ग्रंथाच्या चौथ्या प्रकरणाचे शिर्षक आहे. ‘अंतर्विरोधाच्या भोवऱ्यात महात्मा’. या प्रकरणाच्या आरंभी जे उध्दरण देण्यात आले आहे. त्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजकारणात कोणते रेटे सुरु केले आहेत त्याची सूचना येते. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतले दोन्ही स्तर (१) सैद्धांतिक आणि (२) डावपेच हे एकमेकांना ताडून पाहत, पडताळणी करीत आपला स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास सांगितला जात नाही. सत्तांतरानंतर सत्ता कुणाच्या हाती येईल, यासाठी डावपेच लढवले जात होते. तर सत्तांतरानंतर सत्ता कुणाच्या हाती यावी, या स्वप्नसृष्टीतून सैद्धांतिक मांडणी केली जात होती. यात सुसंगती असती तरी भोवरे निर्माण झाले नसते. पण भारत हा विविध पातळ्यांवर दोन हजार वर्षांपासून गुलामी जपणारा देश होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य चळवळीतील सर्वच प्रवाहांसमोर ज्यांना इंग्रजांकडून सत्तांतर मिळविण्याची ओढ लागली होती - हा गुलाम भारताचा इतिहास नजरेस आणून देत होते. महात्मा गांधीचा वर्तमानकाळ असा होता की, ही वस्तुस्थिती ते नाकारु शकत नव्हते. गांधी संवेदनशील मनाचे अनुभवनिष्ठ डावपेच आखणारे नेते होते. त्यामुळे त्यांचे भोवऱ्यात सापडणे अटळ होते.

याठिकाणी डॉ. कसबे यांनी एक अत्यंत महत्वाचा निष्कर्ष अधोरेखित केला आहे. आधी राजकीय की आधी सामाजिक हा गांधीपूर्व राजकारणातला वरवर तात्विक अथवा सैद्धांतिक पृच्छा करणारा प्रश्न गांधी आणि डॉ. आंबेडकर या उभयतांनी निरर्थक ठरवला आहे. याचा अर्थ स्वातंत्र्य कशासाठी या मुद्यावर गांधी-आंबेडकर यांच्या संघर्षातील समांतररेषा एकत्रित येण्याची शक्यता निर्माण होत होती. What Gandhi and Congress have done for Untouchables हा बाबासाहेब आंबेडकरांचा गांधी व काँग्रेसवर आग ओकणारा ग्रंथ १९४६ चा. आणि हाच काळ संविधान समिती अस्तित्वात येण्याचा. अशा काळात सर्वांचा विरोध पत्करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान समितीचे सदस्यत्व देण्यात यावे, असा हट्ट गांधी धरतात. गांधींचा हा हट्ट मोडून काढावा एवढा वकूब असणारा नेताही भारतात नव्हता. संविधान निर्मिती आणि या संविधान लेखन समितीचे अध्यक्षपद या घटनेत गांधी-आंबेडकर विरोधाचा बिंदू विसर्जीत होतो.

डॉ. कसबे ह्यांनी सुमारे चारशे पृष्ठांचा मजकूरात गांधी-आंबेडकर संघर्षाची ही जी मांडणी केली आहे ती नाविन्यपूर्ण आहे. त्यासाठी त्यांनी मराठी भाषेत उपलब्ध असलेले अनेक पुरावे जाड टाइपात नोदवले आहे. नव्या उपलब्ध झालेल्या माहितीचा आधारही नोंदवला आहे. गांधींच्या इंग्रजी चरित्रकारांना मराठी भाषा येत नसल्याने या साधनसामुग्रीचा वापर करता आला नाही, हेही धिटाईने सांगून सदर ग्रंथाचे इंग्रजी भाषेत भाषांतर झाले तर गांधींच्या चरित्रातील ही उणीव दूर झाल्याशिवाय राहणार नाही असे एक महत्वाकांक्षी भाकितही त्यांनी नोंदवले आहे. गांधी हे धर्मश्रद्ध नेते होते... डॉ. बाबासाहेब आंबेडकर धर्म त्याज्य न मानता आपल्या कोट्यवधी अनुयायांना धर्म स्विकारापर्यंत आणून पोहचवणारे नेते होते. धर्मस्वीकार हा शब्द इथे मी जाणीवपूर्वक वापरला आहे. या साम्यस्थळाच्या संगतीचा उलगडा कसा करायचा? डॉ. कसबे मुळात धर्म आणि अध्यात्म या मौलिक संकल्पनांतला फरक नोंदवतात. हा फरक नोंदवताना डॉ. कसबे यांनी मार्क्सच्या मांडणीतला मूळ गाभा आधारासाठी स्विकारला आहे. प्राचीन भारताची जगाला ओळख आहे ती गौतम बुद्धांच्या धम्म विचारामुळे. त्यानंतर वर्तमानातला भारत आज ओळखला जातो तो गांधी या महापुरुषामुळे. असा हा गांधी-आंबेडकर संघर्षातील देवघेवीचा इतिहास या ग्रंथात आलेला आहे.

या ग्रंथातील निम्मा भाग गांधी-आंबेडकर संघर्षाचा उलगडा खर्च करण्यासाठी खर्च झालेला असला तरी आपण लिहितो आहोत ते गांधी चरित्र आहे हे डॉ. कसबे विसरलेले नाहीत. या ग्रंथाच्या तिसऱ्या भागात महत्वाच्या अशा दोन प्रश्नांचा उलगडा येतो. त्यातला एक मुद्दा गांधीचे कामवासनेचे चिंतन. सहसा गांधी चरित्रकार या विषयी उदासिन असतात. मुळात गांधी आपले ‘माणूस’ असणे कधीच नजरेआड न करणारा, अनुभवनिष्ठ विचार करणारा चिंतक आहे हे लक्षात घेऊन एकूण ‘गांधीवादा’शी या चिंतनाचा असलेला संबंध डॉ. कसबे विचारात घेतात. दुसरा प्रश्न हिंदु-मुस्लिम ऐक्याचे गांधीप्रणित स्वप्न विरून गेले आहे. या प्रकरणासाठी कसबे यांनी बॅ. जीनांचा उद्गार दिशादर्शक म्हणून वापरला आहे. अखेर स्वातंत्र्य मिळते ते फाळणीची वेदना देऊन. या ग्रंथाचा शेवट ‘वन मॅन आर्मी’ या प्रकरणाने झालेला आहे. या प्रकरणाच्या आरंभाला २९ जानेवारी १९४८ रोजी म्हणजे गांधींच्या खुनाच्या आदल्या दिवशी गांधींनी सायंकाळच्या प्रार्थनेत मनूला जो उपदेश केला त्या उपदेशाचे उध्दरण वापरले आहे. ते असे: मी कोणत्याही रोगाने गलितगात्र होवून अंथरुणावर खिळून मेलो तर तू लोकांच्या रागाची जोखीम पत्करुन जगाला हे ओरडून सांग की, या माणसाने दावा केल्याप्रमाणेच तो ईश्वराचा माणूस नव्हता. तू जर हे सांगितलेस तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. परंतु हेसुद्धा लक्षात ठेव उद्या जर एखादा माणूस मला गोळ्या घालून अथवा बॉम्बने उडवून मारण्यासाठी आला आणि जर त्याचा गोळीने मला झालेल्या वेदनेमुळे मी न कण्हताच ईश्वराचे नाव घेता घेता शेवटचा श्वास घेतला तर मात्र तू जगाला हे कंठरवाने ओरडून सांग हा खरा महात्मा होता.’ अशा या महात्म्याच्या खुनानंतर जागतिक पातळीवर उत्स्फूर्त स्वरुपाच्या अनेक प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. या प्रतिक्रियेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती : ‘It is not good, to be so good’ डॉ. रावसाहेब कसबे यांचे या ग्रंथाचे उपशिर्षक किती अर्थपूर्ण आहे, हे ग्रंथवाचकाच्या लक्षात येईल.

dattabhagat.playwright@gmail.com

बातम्या आणखी आहेत...