आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रंथार्थ:आमचे बाबासाहेब !

प्रा. दत्ता भगतएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजेंद्र भोसले यांनी संपादित व संकलित केलेले ‘आमचे बाबासाहेब’ हे पुस्तक भास्करराव भोसले यांनी वेळोवेळी सांगितलेल्या आठवणींचे संकलन आहे. सदर पुस्तक म्हणजे भास्करराव भोसले यांचे चरित्र नव्हे. असे असले तरी ओघाओघाने बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक आठवणी नोंदवता नोंदवता भास्करराव यांचे व्यक्तिमत्वही त्यात उलगडत जाते.

संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध गायक आणि मराठी नाट्य संगीताचे दिग्दर्शक मा. कृष्णराव फुलंब्रीकर यांची बुद्धवंदनेची रेकॉर्ड, एचएमव्ही कंपनीने प्रसिद्ध केल्याची माहिती कळल्यापासून मी ती रेकॉर्ड ऐकता यावी या शोधात होतो. याच शोधात माझी आणि राजेंद्र भोसले यांची ओळख झाली. त्यांनी लगेच ती क्लिप मला सोशल मिडिआवर पाठवली. पण त्याहीपेक्षा अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी संपादित व संकलित केलेले ‘आमचे बाबासाहेब’ हे पुस्तक पाठवून मला उपकृत केले. सदर पुस्तकात आंबेडकरी चळवळीतील महत्वाचे कार्यकर्ते, पुणे आकाशवाणी केंद्राचे संचालक (१९६८ ते १९७३) भास्करराव भोसले यांनी वेळोवेळी सांगितलेल्या आठवणींचे संकलन आहे. राजेंद्र भोसले हे भास्कररावांचे चिरंजीव असून २०१७ साली ते स्टेट बँकेतून मॅनेजर या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. हा तपशील देण्यामागचा हेतू असा की, पुस्तकातील सर्व आठवणी अत्यंत विश्वसनीय असून जबाबदारीने संकलित केलेल्या आहेत हे अभ्यासकांच्या लक्षात यावे. सदर आठवणीत असलेली स्फोटकता त्यांच्या संयमी शैलीमुळे बरीचशी सौम्य झाली आहे. सदर पुस्तक म्हणजे भास्करराव भोसले यांचे चरित्र नव्हे. असे असले तरी ओघाओघाने बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक आठवणी नोंदवता नोंदवता भास्करराव यांचे व्यक्तिमत्वही त्यात उलगडत जाते.

पुस्तक परिचयाची सुरुवात करताना मी जी आठवण सांगितली आहे तिचा तपशील असा की, भास्करराव पुणे आकाशवाणी केंद्राचे संचालक असल्यामुळे बुद्ध वंदनेची रेकॉर्ड तयार करून घेण्याची जबाबदारी स्वत: बाबासाहेबांनीच भास्करराव भोसले यांच्यावर सोपवली होती. ९ ऑगस्ट १९५२ रोजी मा. कृष्णराव आणि बाबासाहेब यांची भास्करराव भोसले यांनी निवासस्थानी भेट घडवून आणली. त्यानंतर लगेच काही दिवसानंतर एचएमव्ही कंपनीनेकर यांना आपले पॉकेट वॉच भेट दिले. पुढे नागपूरला धम्मदीक्षा सोहळ्यात ही रेकॉर्ड वाजवण्यात आली. इ.स. १९५० पासून बाबासाहेब धम्मदीक्षा समारंभाची कशी पूर्वतयारी करीत होते याचे अगणित पुरावे मी देऊ शकेन. त्या पैकी हा एक पुरावा. याच पुस्तकातील आणखी एक पुरावा सांगता येईल. तो असा की, बाबासाहेबांचे सुपुत्र भैय्यासाहेब यांचा विवाह १९ एप्रिल १९५३ रोजी मुंबई येथे झाला. या विवाहाची निमंत्रण पत्रिका या पुस्तकात छापलेली असून त्या विवाह पत्रिकेत ‘नमो बुद्धाय’ हे आशिर्वचन आहे. ‘भवानी प्रसन्न’ हे आशिर्वचन लिहिणाऱ्या बाबासाहेबांनी जाणीवपूर्वक केलेला हा बदल आपण कधी फारसा लक्षात घेत नाही.

भास्करराव भोसले यांचे वडिल पुणे शहराजवळच असलेल्या वाल्हे गावचे वतनदार, बलुतेदार आणि प्राथमिक शिक्षक होते. इ.स. १९२३ पासून ते बाबासाहेबांच्या संपर्कात आले. त्यामुळे भास्करराव यांना आंबेडकरी संस्काराचे बाळकडू घरच्या वातावरणातच मिळाले. पुणे येथील म. विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केलेल्या अहिल्याश्रमाच्या मैदानात आंबेडकरी विचारांची अतिशय तरुण मुलांची एक फौज निर्माण झाली. अशा काळात भास्करराव यांनी पुण्याच्या एस.पी. महाविद्यालयात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अहिल्याश्रमाच्या बोर्डिंगमध्ये भास्करराव दाखल झाले. तेव्हा शंकरराव खरात, बी. सी. कांबळे, एन. एम. कांबळे, डी. जी. जाधव, आर. आर. भोळे, पी. टी. बोराळे असे १९४०च्या आसपास उदयास आलेले नेतृत्वगुण संपन्न विद्यार्थी तेथे शिक्षण घेत होते. इ.स.१९३७ची सार्वत्रिक निवडणूक भारताच्या इतिहासातली आधुनिक काळातील पहिली सांसदीय स्वरूपाची निवडणूक होती. भास्करराव एस.पी. कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. एस.पी. कॉलेज गुणवत्तेसाठी प्रसिद्ध होते.

पुण्याचे नेतृत्व गांधीप्रणित काँग्रेसकडे सरकले होते. पण पुण्याच्या बौद्धिक वातावरणात धाक होता तो याच टिळकयुगातून पुढे आलेल्या ब्राह्मणी अस्मितेचा. अशा वातावरणात या तरुण आंबेडकरी विचाराच्या युवकांना सामना करावा लागत होता तो सनातनी अस्मितेशी. हा सामना करायचा तर वाचन, अभ्यास, वक्तृत्व आणि लेखन या क्षेत्रात आपल्या तेजाने प्रकट व्हायला हवे अशी एक महत्वकांक्षा या तरुण मंडळीत निर्माण झालेली होती. बाबासाहेबांसारखा बौद्धिक क्षेत्रात दरारा असणारा पहाड पाठीशी उभा होता. त्यामुळे या तरुणांत बौद्धिक आत्ममग्नता निर्माण झाली होती. त्यासाठी वाचन आणि अभ्यास क्षेत्रात मेहनत करणारी नवशिक्षित दलितांची नवी पिढी होती. आपल्या अध्यापकाचा वावटुक पद्धतीने अपमान न करता तेवढ्याच बौद्धिक सामर्थ्याने युक्तीवादाची शस्त्रे हाती घेऊन लढायला सिद्ध झालेल्या तरुण मुलांत भास्करराव भोसले हा तरुण होता.

अशा या भास्कररावांच्या महाविद्यालयीन काळातल्या काही आठ‌वणी ‘आमचे बाबासाहेब’ या पुस्तकात आलेल्या आहेत. वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिक मिळवणे, वर्गात आपल्या प्राध्यापकांना निरुत्तर करणारे अथवा विचार करायला लावणारे प्रश्न विचारणे, भर सभेत ‘गीता ग्रंथा’बाबत बाबासाहेबांच्या विधानाचा निषेध होत असताना गीता ग्रंथातील विषमता प्रतिपादन करणाऱ्या श्लोकांचे वाचन करीत ‘आता हा गीता ग्रंथ मी फाडू का?’ असा निर्भय प्रश्न विचारणे इत्यादी प्रसंगातून भास्कररावांच्या अभ्यासाची, निर्णय अभिव्यक्तीची आणि आंबेडकरी चळवळीच्या विकसित अवस्थेची कल्पना आजच्या वाचकांना येऊ शकते.

एस. पी. कॉलेजमध्ये त्यावेळी श्री. म. माटे, के. ना. वाटवे, पु. ग. सहस्त्रबुद्धे, रा. वि. ओतुरकर या सारखे विद्वत्तेचा दरारा असणारे प्राध्यापक होते. यापैकी डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे यांच्यासारख्या प्राध्यापकाने शिफारसपत्र देताना भास्कररावांबद्दल ‘If proper opportunity is given he will become another Ambedkar’ असे कौतुक करणारे वाक्य लिहावे यावरूनच भास्कररावांच्या घडत जाणाऱ्या व्यक्तीमत्वाची वाचकांना कल्पना येऊ शकते. माझ्यासारख्या काळाच्या अंतरावरून पाहणाऱ्या वाचकाला दोन पिढ्यांच्या घडणीतील हे अंतर स्पष्टपणे जाणवते. १९४० – १९६० या काळातील आंबेडकरी चळवळीतील अनुयायी पुरेसे निर्भय होते. आणि या निर्भयतेची त्यांची घडण पायाभूत वाचन आणि अभ्यासाने सिद्ध झालेली होती. दादासाहेबांचा (गायकवाड) गौरव ग्रंथ, दादासाहेब रोहम यांच्या आठवणी, बी. सी. कांबळे यांचे लेखन, शंकरराव खरात यांचे तराळ अंतराळ हे आत्मचरित्र, भंडारे यांच्या चरित्रात्मक आठवणी या आधारे मी हे ठामपणे सांगू शकतो. ‘आमचे बाबासाहेब’ हे पुस्तक याच मालिकेतील आहे. खरे तर आंबेडकरी चळवळीचा हा वारसा त्याच दोन दशकात मार्गदर्शनाखाली १९६० नंतरच्या पिढीला उपलब्ध झाला असता तर १९६०च्या पिढीने समूहाचे संघटन पायाभूत समजून जे कार्य केले. त्यात रणांगणात होणाऱ्या वैचारिक लढाईचे विशेषसुद्धा कदाचित मोठ्या प्रमाणात आत्मसात केले असते.

दलितांच्या चळवळीच्या इतिहास लेखनाची सामग्री म्हणून जसे हे पुस्तक महत्वाचे आहे. तसेच बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध पैलूंचे या पुस्तकात संकलन येत असल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्र लेखनाची सामग्री म्हणून हे पुस्तक महत्वाचे आहे. पूर्णवेळ कार्यकर्त्याची निवड करताना काळजी घेणारे बाबासाहेब, त्यांच्या चरितार्थाची सोय व्हावी म्हणून आपली व्यक्तिगत प्रतिष्ठाही पणाला लावणारे बाबासाहेब, विश्वासू कार्यकर्ते दुरावले तरी त्यांच्यावर खुन्नस न बाळगता त्याच्याविषयी आदरभाव बाळगणारे बाबासाहेब, प्रतिस्पर्धी काजरोळकर यांच्या खुनाची अफवा पसरताच वेळीच खबरदारीच्या उपाययोजना करणारे बाबासाहेब अशी बाबासाहेब आंबेडकरांची अनेक रुपे या पुस्तकात आलेली आहेत.

खरे तर या पुस्तकात काही स्फोटक स्वरूपाची माहिती आलेली आहे. ती माहिती देतानासुद्धा भोसले यांनी संयम पाळला आहे. राजेंद्र भोसले यांच्या लेखनात आणखी एक सुप्त जाणीव आढळून येते. ती म्हणजे बाबासाहेबांच्या आठवणी सांगता सांगता आपल्या वडिलांचे मोठेपण सांगणे हे अटळ आहे हे त्यांना जाणवते आहे. पण हे मोठेपण सांगताना कुठेही ते अतिशयोक्त होऊ नये, अकारण गौरवाचा स्पर्श या लेखनास होऊ नये याची काळजी त्यांनी घेतली आहे असे जाणवते. हे सर्व लेखन करताना राजेंद्र भोसले यांच्या संकोची स्वभावाचीही वाचकांना जाणीव झाल्यावाचून राहत नाही. धनंजय कीर हे बाबासाहेबांचे अत्यंत महत्वाचे चरित्रकार. पुरावा म्हणून त्यांनी भरपूर कात्रणे जमा केली होती. टिपणे काढली होती. असे असले तरी बाबासाहेबांच्या हयातीत आपण चरित्र लिहित आहोत आणि राजकारणात जे सतत वादळी व्यक्तिमत्व म्हणून गणले गेले अशा प्रखर राष्ट्रभक्ताचे चरित्र आपण लिहित आहोत, याची अत्यंत विनम्र जाणीव कीरांच्या व्यक्तिमत्वात होती. अशा या कीरांना बाबासाहेबांनी त्यांचा चरित्रग्रंथ एकदा नजरेखालून घालावा, असे वाटत होते. पण त्यांचा आणि बाबासाहेबांचा प्रत्यक्ष परिचय नव्हता ही माहिती अनेक वाचकांना आश्चर्यचकित करणारी वाटेल. बाबासाहेबांची आणि डॉ. कीरांची भेट घालून देण्याचे महत्कार्य भास्कररावांनी केले. यात कुठेही मोठेपणाची तुलना माझ्या मनात नाही पण कीरांसारख्या चरित्रकारांना या कामी भास्कररावांची मदत घ्यावीशी वाटली आणि ती त्यांनी तेवढ्याच तत्परतेने केली हे त्यांच्या पत्र व्यवहारावरून आपल्या लक्षात येऊ शकते.

एखाद्या व्यक्तीचे, त्याच्या बुद्धीमत्तेचे, व्यक्तिमत्वाचे गुणविशेष कुठल्याही जातीने सिमित होणारे नसते. हे विधान तर्कदृष्ट्या बरोबर असले तरी प्रत्यक्षात समाज मानसन्मान आणि उच्चनीच भेदभावाने एवढा डागाळलेला असतो की त्याचा त्रास भारतीय समाज व्यवस्थेतल्या अत्यंत गुणी माणसांना होतो हे आपले सामाजिक वास्तव आहे. अशा या वास्तवाचे चटके जिथे गांधी-आंबेडकरांना बसले तसे भास्कररावांना बसणे यात नवल काहीच नाही. टिळकांच्या अंत्ययात्रेत खांदा देणाऱ्या महात्मा गांधींना ते ब्राह्मण नाहीत म्हणून विरोध करणारा एखादा सनातनी आपल्या परंपरेत आढळून येत असेल तर इतरांचे काय बोलावे? पण अशा सर्व जागा भास्कररावांनी अतिशय संयमाने हाताळल्या आहेत आणि राजेंद्र भोसले यांनी त्याहीपेक्षा अधिक संयमाने चित्रित केल्या आहेत. तेव्हा बाबासाहेबांच्या अनुयायांपैकी एक असा अनुयायी जो प्रखर बुद्धिमान आहे. अत्यंत आक्रमक भाषा शैलीत उत्तर देऊन प्रतिस्पर्ध्याला चितपट करू शकतो पण असे असले तरी आपल्या सुसंस्कृतपणाच्या चौकटीत राहू तो असे वागतो, याचे नवल करावे असे चित्रण असणारे हे पुस्तक आहे.

आमचे बाबासाहेब

राजेंद्र भास्करराव भोसले

रिपब्लिकन पब्लिकेशन, पुणे

पृष्ठसंख्या १७८, मूल्य २५० रुपये

dattabhagat.playwright@gmail.com

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser