आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्धापनदिन विशेष:हम तो ठहरे 'स्वदेशी'...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • खरे तर स्वदेशी हा रूढ अर्थाने ‘ट्रेन्ड’ म्हणता येणार नाही.

दत्ता जोशी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांशी लॉकडाऊनच्या निमित्ताने साधलेल्या संवादात "व्होकल फॉर लोकल' अशी घोषणा करत ‘लोकल’ वस्तूंच्या वापराचा उल्लेख केला आणि हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला. पण सध्याच्या जगात स्वदेशी म्हणजे नेमकी कोणती पावले उचलावीत? आत्मनिर्भर होणे म्हणजे नेमके काय करणे? सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात एकेकाळची स्वातंत्र्य चळवळीतली स्वदेशीची व्याख्या लागू होईल का? आणि चिनी वस्तूंवर बहिष्कार इतकेच आपल्या स्वदेशीचे स्वरूप आहे का? 

खरे तर स्वदेशी हा रूढ अर्थाने ‘ट्रेन्ड’ म्हणता येणार नाही. त्या त्या परिस्थितीतील ती अपरिहार्यता म्हणणे अधिक योग्य ठरेल. स्वातंत्र्यपूर्व काळात सामान्य भारतीयाला स्वातंत्र्याच्या ईर्ष्येने प्रेरित करण्यासाठी आणि स्वातंत्र्योत्तर भारतात, जागतिकीकरणाच्या लाटेत आपल्या देशातील उत्पादनांवरील विश्वास वाढविण्यासाठी, माणसांतील सत्व जागविण्यासाठी स्वदेशीची हाक अनेक वेळा अनेकांनी दिली. त्यांना त्या त्या वेळी संमिश्र प्रतिसादही मिळाला. पण प्रत्येक वेळी ही ट्रेन्ड तत्कालिक ठरला, हेही तेवढेच सत्य आहे.

साधारण सन 1910 च्या सुमारास लोकमान्य टिळक यांनी आपल्या ‘केसरी’तून स्वदेशीचा जोरदार पुरस्कार केला. भारतातील कच्चा माल इंग्लंडमध्ये नेऊन तेथून पक्का माल भारतात आणून विकण्याचे ब्रिटिशांचे धोरणच होते. विशेषतः वस्त्रोद्योगात त्यांनी हे धोरण प्रकर्षाने राबविलेे. स्थानिक कुशल कारागिरांच्या हाताचे कामच या धोरणाने काढून घेतले त्यामुळे बारा बलुतेदारी उध्वस्त होण्याच्या मार्गावर गेली. शिवाय, मातीमोल खर्चाने खरेदी केलेल्या कच्च्या मालावरील प्रक्रियेतून तयार झालेल्या कापडावर बिटिश भरघोस नफा मिळवतात, हे वास्तव होते. ब्रिटिशांचा हा आर्थिक कणा खिळखिळा करणे आणि त्यातूनच भारतीयांच्या मनात देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतविणे हे टिळकांचे हेतू. याच हेतूतून स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी पुण्यात परदेशी वस्त्रांची होळी पेटविली. त्यांच्या या आंदोलनातून अनेकांनी स्फूर्ती घेतली. स्वातंंत्र्यप्राप्तीसाठी त्यांनी उभ्या केलेल्या आंदोलनाचा पाया परकीय वस्त्रांच्या होळीचाच होता.

त्यानंतरचा महत्त्वाचा टप्पा होता तो महात्मा गांधींच्या ‘खादी’चा. चरखा आणि खादी ही प्रतिके वापरून गांधीजींनी भारतीयांच्या मनात स्वदेशीचे बीज रुजविण्याचा प्रयत्न नव्याने केला. ‘चरखा चला चलाके, लेंगे स्वराज लेंगे’ हे गीतही त्यावेळी बरेच गाजलेले होते. टिळकांनी सुचविलेल्या परदेशी मालावरील बहिष्कारामुळे किंवा गांधीजींच्या चरखा, खादी आणि स्वतःचे वस्त्र स्वतः विणण्याच्या संकल्पनेतून भारताला स्वातंत्र मिळेल, ही कल्पना निश्चितच वेगडळपणाची म्हणता आली असती. पण याच संकल्पनेतून समाजमन निश्चितपणे प्रभावित झाले. आपल्याला  स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, ही ऊर्मी निर्माण करणे व ती कायम ठेवण्याची किमया स्वदेशीच्या मंत्रातूनच घडत राहिली.

आणीबाणीनंतर सत्तेत आलेल्या जनता सरकारच्या राजवटीच्या काळातही परदेशी ब्रँडवर बंदी घालण्याचा निर्णय झालेला होता. विशेषतः कोकाकोलावरील ही बंदी जास्त गाजली. या विषयात जॉर्ज फर्नांडिस यांचे नाव अधिक चर्चेत होते. कोकाकोलासह काही परदेशी ब्रँडवर बंदी घालून भारतीय उत्पादनांना मोकळा मार्ग करून देण्याचा या सरकारचा निर्णय फार काळ राहिला नाही. सरकारच गडगडले आणि निर्णयही आपोआपच मागे पडला.

मध्यंतरीच्या काळात 1991-92 मध्ये जागतिक व्यापार कायद्याने साऱ्या जगातील अर्थकारण बदलले. गॅट करार आणि मुक्त अर्थव्यवस्थेतून प्रत्येक निर्यातदार देशाला आपली आयातीची कवाडेही अपरिहार्यपणे किलकिली करावी लागली. ज्यांची धोरणे स्पष्ट होती अशा देशांनी त्यात आघाडी घेतली आणि जागतिक बाजारपेठेत त्यांनी आपापला टक्का वधारून घेतला. चिनी उत्पादकांचे उदाहरण या बाबतीत महत्त्वाचे मानावे लागेल. त्यांनी मोठ्या प्रमाणावर स्वदेशी उत्पादन सुविधा वाढविल्या, बाजारपेठेचे नियम प्रत्यक्षात आणले आणि कमीतकमी किमतीत जास्तीत जास्त चांगला माल बाजारात आणून अन्य देशांच्या छातीत धडकी भरविली. भारतात मात्र हे घडले नाही. स्वदेशीची अनेक आंदोलने होऊनही येथे ‘इंपोर्टेड’ मालाची क्रेझ कायम राहिली. 

या परिस्थितीत प्रारंभी (कै.) राजीव दीक्षित यांनी स्वदेशीची चळवळ मोठ्या जोमाने चालविली. ही फक्त उत्पादनांच्या खरेदीचा संदेश देण्यापुरती मर्यादित नव्हती, तर दैनंदिन आयुष्यातील प्रत्येक गोष्टीच्या, जीवनशैलीच्या स्वदेशीकरणाचा आग्रह त्यांनी धरलेला होता. अनेक परकीय उद्योगांवर ते थेट टीकास्त्र सोडीत. पण मध्यंतरी त्यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर या चळवळीतील जोम संपला. मात्र आजही यू ट्यूबवर राजीव दीक्षितांच्या भाषणाला मोठ्या प्रमाणावर हिट्स असतात. महत्त्वाचे म्हणजे राजीव दीक्षित यांनी स्वतःची अशी कुठली उत्पादने बाजारात आणलेली नव्हती.

या बाबतीत अलीकडच्या काळातील स्वामी रामदेव बाबा यांचे आंदोलन मात्र वेगळे ठरले. त्यांनी आधी योगासने, प्राणायाम आदींतून भारतीय जीवनशैली आणि योगशास्त्राविषयी रूची निर्माण केली आणि त्यानंतर त्याला संलग्न अशी उत्पादने आपल्या ‘पतंजली’ या उद्योगाद्वारे बाजारात आणली. ‘एफएमसीजी’च्या मार्केटमध्ये पतंजलीने केलेला शिरकाव आणि जबरदस्त वेगाने झालेली वाढ हा या क्षेत्रातील अभ्यासकांसाठी संशोधनाचा विषय ठरला. या विषयावर अनेक ठिकाणी व्याख्यानेही झाली. पण पतंजलीच्या उत्पादनांचा हा फुगवटा फार काळ टिकला नाही. त्यांचा खप बराच खाली आला. आता त्यांची काही निवडक उत्पादने बाजारपेठेत वरच्या पातळीवर आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांशी लॉकडाऊनच्या निमित्ताने साधलेल्या संवादात ‘लोकल’ वस्तूंच्या वापराचा उल्लेख केला आणि हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

प्रश्न पडतो - भारतात पुन्हा पुन्हा स्वदेशीचा आग्रह धरला जातो, जनजागृती होते. त्याला तात्कालिक यशही मिळते पण पुन्हा एकदा ते गाडे मूळ पदावरच येते. ग्राहक पुन्हा परदेशी -बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनांकडेच वळतो. यामागे एकीकडे जाहिरातींचा मारा हे एक कारण असले तरी ग्राहकांना चांगली वाटणारी या उत्पादनांची गुणवत्ता हे ही एक महत्त्वाचे कारण असतेच. टिळक - सावरकर - गांधी - दीक्षित - रामदेवबाबा - मोदी... घोषणा देणारे अनेक आहेत, पण प्रत्येकाचे हेतू वेगवेगळे आहेत. 

ताज्या संदर्भात विचार करायचा तर मोदी यांचा स्पष्ट हेतू चिनी उत्पादनांना रोखणे आणि भारतीय उत्पादने आधी भारतात आणि मग परदेशात पोहोचवून भारताच्या परकीय चलन गंगाजळीत वाढ करणे, हा दिसतो आहे. साहजिकच, आपल्या चाहत्यांना, मतदारांना आवाहन करण्याच्या त्यांच्या निर्णयामागे निश्चितपणे राजकीय कारणही असू शकेलच. पण उत्पादनांत गुणवत्ता असेल तरच स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळेल, कुणा एकाच्या आवाहनामुळे नाही, हे सत्य भारतीय उत्पादकांनाही लक्षात घ्यावे लागेल.

भारतात ‘पतंजली’सारखे काही ब्रँड स्वदेशी म्हणून बऱ्यापैकी स्थिरावले आहेत पण त्याशिवायही अनेक ब्रँड स्वदेशीची प्रतिमा जपतात. ‘एफएमसीजी’मध्ये विको, डाबर, बबूल, रुपमंत्रा, गोदरेज, व्हि जॉन अशी काही उत्पादने समोर येतात. गोदरेजचे ‘गुडनाईट’ हे डासप्रतिबंधक, सिंथॉल, फा आदींसारख्या टाल्कम पावडर, झंडू बाम - हिमालया आदींसारखी डोकेदुखीवरील औषधी, विविध स्थानिक टोमॅटो केचप, वाटिकासारखी हेअर ऑईल, वाडीलाल - अमूल सारखी आईसक्रीम, निप्पो - गोदरेज जीपीसारखी टॉर्च बॅटरीज, डिटर्जंट पावडर व बारमध्ये ससा आणि निरमासारखे ब्रँड, आमरसयुक्त फ्रूटी ही आणि अशी काही प्रसिद्ध नावे आपल्यासमोर येतात. पण अनेक नावे अप्रसिद्ध आहेत. पण स्थानिक पातळीवर स्पर्धेत उतरलेले आणि जाहिरातींचा चेहरा नसलेले अनेक ब्रँड स्थानिक पातळीवर बाजारपेठ कमावतात. 

महाराष्ट्राचा विचार कराल तर इचलकरंजी, जयसिंगपूरसारख्या गावात तुम्हाला जगातल्या कुठल्याही मशीनचा भारतीय रिमेक तयार करून मिळेल तो सुद्धा तुलनेत 75 टक्के स्वस्तात. रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या बळावर चीनने आघाडी घेतली पण भारतही या कलेत कमी नाही. रिव्हर्स इंजिनिअरिंग हे एक शास्त्र आहे. त्यात भारताची प्रगती वाखाणण्याजोगी आहे. ही भारतीय उत्पादने जागतिक पातळीवरील ब्रँडेड उत्पादनांना चांगली टक्कर देतात. त्यांना प्रोत्साहन देणे ही ‘स्वदेशी’ची मध्यवर्ती भूमिका असावी.

कोरोनामुळे बदललेल्या जागतिक अर्थव्यवस्थेत आज चीन बर्यापैकी लक्ष्य ठरतो आहे. चीनला भारताचा प्रतिस्पर्धी मानता येणार नाही, इतका त्याचा अर्थविस्तार बलाढ्य आहे. पण सारे जग आर्थिक दृष्ट्या चीनच्या विरोधात गेले तर उत्पादन आणि विक्री या दोन्ही दृष्टीने भारत सार्या जगाचा ‘ब्लू आय’ ठरू शकतो. अशा स्थितीत भारतीय अर्थव्यवस्था भक्कम ठेवायची तर मूळ भारतीय कंपन्यांना बळ देणे गरजेचे आहे, असा ‘व्यापारी’ मोदींचा दृष्टीकोन दिसतो. त्याचे मूळ त्यांनी केलेल्या याआधीच्या आवाहनात दिसते. एकेकाळी गांधी टोपी आणि नेहरू शर्टने खादी ग्रामोद्योग विभागाला तारलेले होते. मोदींच्या खादीच्या आवाहनानंतर मोदी जाकीटाला तर मागणी आलीच पण खादीच्या विक्रीतून खादी ग्रामोद्योग विभाग देशभरातच फायद्यात आला. हे त्यातील एक सकारात्मक चित्र.

भारतातील स्वदेशी आंदोलनात नेहेमीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका महत्त्वाची ठरलेली दिसते. ते या विषयात नेहेमीच आग्रही राहिले आहेत. या संघटनेचे सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांनी स्वदेशीबाबत खूप साधे विवेचन केले आहे -‘‘मी माझ्या घरी जे तयार करू शकतो ते बाजारातून आणणार नाही, जे आमच्या गावात किंवा शहरात तयार होते आणि बाजारात मिळते ते मी बाहेरून आणणार नाही, जे माझ्या राज्यात तयार होते त्यासाठी बाहेरच्या राज्यात जाणार नाही, जे माझ्या देशात तयार होते आणि मिळते ते मी परदेशातून आणणार नाही. जे माझ्या देशात तयार होत नाही, तयार करूही शकत नाही पण ते जीवनावश्यक आहे, तर मी ते परदेशातून घेईन. पण ही खरेदीही माझ्या अटींवर असेल. कोणताही व्यापार एकतर्फी असू शकत नाही. तेवढी देवाण घेवाण करावी लागेल. जे माझ्या देशासाठी फायदेशीर असेल तेच मी करेन, कोणत्याही दबावाखाली मी ते करणार नाही...’’ 

स्वदेशीच्या ‘ट्रेन्ड’मागील अन्य राजकीय, सामाजिक, आर्थिक दृष्टीकोन काहीही असले तरी एक भारतीय म्हणून हा आत्मसन्मानाचा आणि व्यापारात आदर्श समजल्या जाणाऱ्या ‘विन - विन सिच्युएशन’चा मुद्दा नक्कीच सर्वाधिक महत्त्वाचा ठरावा.

dattajoshis@gmail.com

लेखकाचा संपर्क - 9422 25 25 50

बातम्या आणखी आहेत...