आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंडकारण्य:विचार डावे अन् आचार मधले !

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वत:ला डाव्या पक्षांपेक्षाही अधिक डाव्या विचारांचे मानणाऱ्या ममतांनी सत्तेसाठी भाजपशी आघाडी करण्यात कधी वैचारिक भ्रष्टता मानली नाही. ज्याला झिडकारून आपला तृणमूल काँग्रेस स्थापन केला, त्या काँग्रेसबरोबरही त्यांनी सत्तेत भागीदारी केली आणि तितक्याच सहजपणे तोडलीही.

ore left than the left’ अशी स्वत:ची ओळख करून देणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनीही सत्ता हवी होती तेव्हा इतर प्रादेशिक पक्षांप्रमाणेेच विचारांशी फारकत घेत टोकाच्या विरोधी विचारांच्या भाजपशी हातमिळवणी केली. काँग्रेसच्या बाबतीतही त्यांनी तसेच केले. ज्या काँग्रेसच्या वर्तणुकीला विरोध करीत त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला, त्याच काँग्रेसशी सोयीच्या वेळी घरोबा करून सत्तेचा सोपान गाठला. अशा विचारपतित आघाड्या करून त्यांनी केंद्रात सत्तापदे भोगली आणि राज्यातही सत्ता मिळवली. हे सत्तेचे नाते गैरसोयीची वाटायला लागले की काही तरी कारण शोधायचे आणि नाते तोडायचे, असेही त्यांनी अनेकदा केले आहे.

काँग्रेसबरोबर बिनसले म्हणून ममतांनी १ जानेवारी १९९८ ला पश्चिम बंगालपुरता तृणमूल काँग्रेस पक्ष स्थापन केला, हा इतिहास आधीच्या भागांमध्ये आलाच आहे. त्यांच्या पक्षाच्या भ्रष्ट प्रतिमेबद्दलही आपण पाहिले. खरे तर, डाव्या पक्षांविरोधात लढण्यासाठी त्यांचा पक्ष अस्तित्वात आला. तरीही डावे विचार आपल्याला आवडतात, असे त्या कायम सांगत आल्या आहेत. आयुष्यातील उमेदीचा काळ काँग्रेस संस्कृतीत घालवलेल्या ममतांवर डाव्यांपेक्षाही काँग्रेसी विचारांचा पगडा अधिक आहे, हेच त्यांनी आतापर्यंत सिद्ध करून दिले आहे. आता कदाचित ममतांच्या तृणमूलचा प्रभाव काँग्रेसवर पडला असावा. त्यामुळेच महाराष्ट्रात काँग्रेसनेही शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी प्रादेशिक पक्षासोबत हातमिळवणी केली असावी. अर्थात, शिवसेनेसंदर्भातल्या लेखात त्याचा आढावा आपण घेणारच आहोत. पक्ष स्थापनेनंतर वर्षभरातच ममता भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील झाल्या. त्यावेळी त्यांनी रेल्वेमंत्रिपद मागून घेतले. त्यांच्या पक्षाचे अजितकुमार पांजा यांनाही मंत्रिपद मिळाले. पण, वर्षभरातच ममतांचे भाजपशी बिनसले. पेट्रोलियम पदार्थांच्या दरात केलेली मोठी वाढ मागे घ्यावी, अशी मागणी करीत त्यांनी राजीनामा दिला. नंतर काही दिवसांतच कोणतेही कारण न देता तो मागेही घेतला. अर्थात, हे नाते फार काळ टिकले नाहीच. २००१ मध्ये ‘तहलका’ वेबपोर्टलवर संरक्षणविषयक खरेदीतील भ्रष्टाचाराचे स्टिंग आॅपरेशन प्रसिद्ध झाले. त्याचा निषेध करीत ममतांनी एनडीएला सोडचिठ्ठी दिली. कारण ‘तहलका’चे असले तरी वास्तव वेगळेच होते. ममतांना २००१ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडी करायची होती. ही आघाडी आपल्याला राज्यात मोठे यश मिळवून देईल, असे त्यांना वाटत होते. झालेही तसेच. त्या निवडणुकीत तृणमूलचे ६० उमेदवार विजयी झाले. एकूण मतदानाच्या तब्बल ३०.६६ टक्के मतेही त्यांच्या पक्षाला मिळाली. काँग्रेसला ७.९८ टक्के मतांसह २६ जागांवर समाधान मानावे लागले. हे तर उलटे झाले. तृणमूलमुळे काँग्रेसला फायदा झाला, असे त्यांना वाटायला लागले. त्यामुळे त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि त्या पुन्हा एनडीएमध्ये सहभागी झाल्या. यावेळी त्यांना कोळसा आणि खणिकर्म मंत्रालय मिळाले. पण हे सत्तानातेही काही महिनेच टिकले. कारण लोकसभा निवडणूक झाली आणि अटलबिहारी सरकारचा पराभव झाला. यूपीए-१ सरकार स्थापन झाले. पश्चिम बंगालमधून त्या एकट्याच निवडून आल्या. मग त्यांनी मुख्यत्वे राज्यातच लक्ष केंद्रित केले. २००६ आणि २००८ मध्ये नंदीग्राम आणि सिंगूर जमीन अधिग्रहणाच्या मुद्यावरून त्यांनी जोरदार आंदोलने केली. पुढे लगेचच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना त्याचा लाभही झाला. यूपीए -१ चा कार्यकाळ पूर्ण झाला तेव्हा देशात सरकारविषयी समाधानाचे वातावरण होते. दुसऱ्यांदा मनमोहन सरकार येईल, अशी शक्यता होती. त्यामुळे ममतांनी पुन्हा दिशा बदलली आणि निवडणुकीपूर्वीच त्या यूपीएमध्ये आल्या. निवडणुकीत बंगालमधून त्यांचे १९ खासदार निवडून आले. मग केंद्रातल्या सत्तेतही त्या सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी पुन्हा रेल्वेमंत्रिपद मागून घेतले. दरम्यान मनमोहनसिंग सरकारविषयी नाराजी वाढत होती. भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. अण्णा हजारे यांनी आंदोलन सुरू केले होते. दिल्लीत प्रचंड अस्वस्थता होती. आता काँग्रेसबरोबर राहण्यात नुकसान आहे, हे ममतांनी ओळखले आणि पेट्रोल दरवाढीच्या आणि थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्याच्या मुद्यावरून त्यांनी यूपीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. २०११ मधील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला बहुमत मिळाले आणि त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या. पुढे २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी आणखी मोठा विजय स्वबळावर मिळवला. आता २०२१ मध्ये पुन्हा त्यांना विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचे आहे. यावेळी भाजपच्या जागा वाढतील, अशी चिन्हे आहेत. काँग्रेस शक्तिहीन झाला आहे. डाव्यांमध्येही काही चैतन्य नाही. त्यामुळे वादळासाठीच्या मदतीत आणि कोविड-१९ साठीच्या मदतीतही त्यांच्या लोकांनी भ्रष्टाचार केलेला असला, तरी पश्चिम बंगालच्या मतदारांसमोर तुल्यबळ पर्याय दिसत नाही. पाहूया काय होते ते. तोपर्यंत तृणमूलचा विषय इथे थांबवूया.

deepak.patwe@dbcorp.in दीपक पटवे

बातम्या आणखी आहेत...