आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:जातीच्या "विषा'णूचे जीवघेणे हल्ले...

दिप्ती राऊत10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे कोरोनाच्या विषाणूने बाधित बापाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लेक पुढे येत नाहीत आणि दुसरीकडे जातीयवादाच्या विषाणूने पछाडलेला बाप दुसऱ्याच्या लेकावर अंत्यसंस्काराची वेळ आणतो. एक विषाणू दुसऱ्या देशातून आलेला तर दुसरा इथे याच मातीत शतकानुशतके विसावलेला. एकाच्या प्रतिबंधासाठी मास्क, सॅनिटायझर, रुग्णालये आणि कोट्यावधींची तजवीज तर दुसऱ्याचा प्रतिबंध तब्बल चाळीस वर्षांनंतरही कायद्याच्या पुस्तकात क्वारंटाईन... जातीच्या खोट्या प्रतिष्ठेसाठी पोटच्या लेेकांचे किंवा लोकांच्या लेकरांचे जीव घेण्याच्या महाराष्ट्राच्या "पुरोगामी' परंपरेत आणखी एक अपमानाचा तुरा... 

दोन्ही विषाणूच... दोघेही जीवघेणे... एकाचा नायनाट करण्यासाठी संपूर्ण जग पेटून उठलंय तर दुसऱ्याचा नायनाट करण्यात कित्येक पिढ्या नष्ट झाल्या. कधीतरी नगरच्या सोनई गावात शौचालयाच्या टाकीत तिघांचे मृतदेह सापडतात, लष्करात सेवा बजावणारा त्यांचा भाऊ पंकज थनवार या अन्यायाविरोधात चिकाटीने लढत राहातो तेव्हा कुठे सहा वर्षांनी जिल्हा न्यायालयात आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली जाते. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय बाकीच... कुठेतरी कोल्हापूर जिल्ह्यातील निघोजमध्ये नवविवाहितांचे मृतदेह संशयास्पद पद्धतीने लटकलेले आढळतात आणि एकच खळबळ उडते. कधीतरी जामखेड्यातील सतरा वर्षांच्या लेकीचा बाप खून करतो आणि ब्रेकींग न्यूज फ्लॅश होते. कुठेतरी खर्डा प्रकरणावरून राजकारण पेटवलं जातंं आणि काही महिन्यात सारं काही शांत होतं. कधीतरी नाशकातील सात महिन्यांची गरोदर असलेल्या प्रमिला कुंभारकरचा गळा तिचा जन्मदाता बाप आवळतो आणि जातपंचायतींचा ससेमिरा संपवल्याच्या समाधानात गौरवाने पोलिस स्टेशनला जमा होतो.  पहिल्या दिवशी बातमी, दुसऱ्या दिवशी संताप, तिसऱ्या दिवशी निषेध, निदर्शनं, मागण्या, चौथ्या दिवशी अटक, पाचव्या दिवशी आरोप-प्रत्यारोप आणि सहाव्या दिवसापासून सारं काही शांत शांत... जणू काहीच न घडल्यागत... मग पुन्हा एका दिवशी नागपूर आणि पाठोपाठ पिंपरी चिंचवडची घटना घडते. "माणुसकीला हादरवून टाकणारी' या साचेबंद शब्दांची उजळणी होते. यावेळी राहूल, सचिन, आशा, नितीन, प्रमिला यांच्या जागी अरविंद बनसोड आणि विराज जगताप असतो एवढाच काय तो फरक. बाकी क्रिया- प्रतिक्रिया, आरोप-प्रत्यारोप, चर्चा आणि मोर्चा, घोषणा-आश्वासने बाकी सारे तेच ते तेच ते... इतकं की हा विषाणू शरीरातील पेेशींवर हल्ला करून थांबत नाही तर शरीरातील पेशीच बनून निपचित पडून राहातो. तुम्हाला वाटतं आपण बरे झालो, विषाणूचा नायनाट झाला. आणि एक दिवस अचानक तो उसळून वर येतो पुन्हा एखादा विराज संपवण्यासाठी...

एकीकडे कोरोनाच्या विषाणूने बाधित बापाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लेक पुढे येत नाहीत आणि दुसरीकडे जातीयवादाच्या विषाणूने पछाडलेला बाप दुसऱ्याच्या लेकावर अंत्यसंस्काराची वेळ आणतो. एक विषाणू दुसऱ्या देशातून आलेला तर दुसरा इथे याच मातीत शतकानुशतके विसावलेला. एकाच्या प्रतिबंधासाठी मास्क, सॅनिटायझर, रुग्णालये आणि कोट्यावधींची तजवीज तर दुसऱ्याचा प्रतिबंध तब्बल चाळीस वर्षांनंतरही कायद्याच्या पुस्तकात क्वारंटाईन... जातीच्या खोट्या प्रतिष्ठेसाठी पोटच्या लेेकांचे किंवा लोकांच्या लेकरांचे जीव घेण्याच्या महाराष्ट्राच्या "पुरोगामी' परंपरेत आणखी एक अपमानाचा तुरा... आरोपींना शिक्षा होईल की तक्रारदारांवर दबाव येईल, न्यायदेवतेच्या दरबारात तपासातील कच्चे दुवे सरस ठरतील की अमानुषतेविरोधातील एक निकाल दिला जाईल हा झाला उद्याचा विषय. आजच्या सामाजिक व्यवस्थेत तरी दुसऱ्या जातीच्या त्यातही तथाकथित "उच्च' जातीतील मुलीवर प्रेम केले हा अपराध ठरला आहे आणि त्यासाठी जीव गमवावा लागल्याची शिक्षा विराजला भोगावी लागली आहे. 

विद्यमान सामाजिक चौकटीत दुसऱ्या जातीतील मुलीवर प्रेम केलं हा विराजचा एकमेव गुन्हा नव्हता. पारंपरिक जाती व्यवस्थेतील आर्थिक चौकटी ओलांडून त्याने स्वत:चा भौतिक विकास केला, जातीच्या भिंतींपलीकडे  स्वत:च्या मनातील प्रेमाच्या भावनेला दाद देत भविष्यातील जोडीदाराची व आयुष्याची स्वप्ने बघू लागला, ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी स्वतंत्रपणे निर्णय घेऊ लागला हा त्याचा गुन्हा ठरला. आर्थिक-भौतिक आणि शैक्षणिक विकासानंतरही जातीय विखार कायम राहाणे हेच सामाजिक परिवर्तनाच्या प्रवासातील गंभीर आव्हान बनून आपल्यापुढे उभे आहे. आधुनिकतेची टिमकी मिरवत असताना वैयक्तिक - राजकीय आयुष्यात आधुनिकतापूर्व सामाजिक व्यवस्थेतील माणसाची व्याख्या, मानवी नातेसंबंध आणि सत्ताकारण कायम असल्याचे यातून सिद्ध होत असल्याचे समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. श्रुती तांबे मानतात. आधुनिकतेतून येणारे व्यक्तीचे सार्वभौम अस्तित्वच अद्याप नाकारले जात असल्याचे त्यांना यात दिसते. त्यामुळेच एकीकडे जातीभेद नष्ट करण्याच्या वल्गना होत असताना मनामनातील जातीयता आणि पुरुषसत्ताक मनूवादी विचारसरणी आपले अस्तित्व दाखवत असल्याकडे त्या लक्ष वेधतात. मुलीने दुसऱ्या जातीतील तरुणावर प्रेम किंवा लग्न करणे हा वडीलांचा, तिच्या भावांचा अपमान समजणे आणि त्या तरुणाला किंवा प्रसंगी आपल्याच मुलीलाही संपवणे ही स्वत:च्या कुटुंबासाठी गौरवाची बाब मानली जाणे हाच आधुनिक समाज व्यवस्थेचा पराभव ठरला आहे आणि जातीयवादाचा विजय. स्त्री असो वा दलित, व्यवस्थेतील दुय्यमत्व आजही कायम असल्याकडे त्या लक्ष वेधतात. त्यासाठी व्यक्तीगत पातळीवरील बदलांसोबत व्यवस्थेतील बदलही गरजेचे असल्याचे प्रा. तांबे मानतात.   

जातीवाद संपण्यासाठी मानसिकता बदलली पाहिजे, मानसिकता बदलण्यासाठी काळ जावा लागेल हे फसवे पालुपद प्रत्येक वेळी पुढे केले जाते. मुळात जातीयवादी मानसिकता बदलणे हा शासनकर्त्यांचा प्राधान्यक्रमच नाही याकडे प्रा. प्रियदर्शन तेलंग लक्ष वेधतात. "माणुसकी' या संंस्थेच्या माध्यमातून ते गेल्या दहा-पंधरा वर्ष महाराष्ट्रातील दलित अत्याचाराच्या प्रत्येक घटनेचा मागोवा घेत आहेत, त्याच्या शास्त्रशुद्ध नोंदी ठेवत आहेत आणि त्यात न्याय मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. ते सांगतात, १९८९ साली दलित अत्याचार प्रतिबंध कायदा मंजूर झाला. १९९५ साली त्याचे नियम आले. मात्र चाळीस वर्ष झाली तरी त्यासाठीची आकस्मित योजना तयार झालेली नाही. अमेरिकेतील जॉर्ज फ्राईडच्या हत्येनंतर संपूर्ण देश रस्त्यावर उतरतो, चारही अधिकाऱ्यांना शिक्षा सुनावली जाते. आपल्याकडे जातीय हिंसेविरोधात लढण्याची जबाबदारी हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या दलित कार्यकर्ते आणि सामाजिक संस्था-संंघटनांवर सोडली जाते. ना शासन म्हणून आपण याची जबाबदारी घेताना दिसत ना समाज म्हणून आपल्याला वेदना होत. दलित अत्याचारांच्या शेकडो केसेस प्रलंबित आहेत. विशेष सरकारी वकीलांच्या नियुक्त्या बाकी आहेत, खटल्यांचे कामकाज अडकून पडते याकडे ते लक्ष वेधतात. 

दलित अत्याचारांच्या घटनांपैकी अंतिमत: फक्त ५ टक्के खटल्यात शिक्षा सुनावल्याचे यावर काम करणाऱ्या संस्थांच्या अभ्यासातून  सिद्ध झाले आहे. जातीअंताच्या लढाईत सलोखा, संवाद असे अनेक महत्त्वाचे टप्पे आज दुर्लक्षिले गेले आहेत. आंतरजातीय विवाह हा प्रा. तेलंग यातील एक निकष मानतात. तेथपर्यंत पोहोचणे दूर, सलोखा आणि संवाद या टप्प्यांवर आपण समाज म्हणून, शासन म्हणून कोणतीही जबाबदारी किंवा कार्यक्रम नसल्याकडे ते लक्ष वेधतात. कनिष्ठ समजल्या गेलेल्या जातीतील तरुणाने तथाकथित वरिष्ठ जातीतील मुलीशी प्रेम वा लग्नसंबंध जुळवणे एवढाच हा राग नसतो तर त्याने मिळवलेले भौतिक यश डोळ्यात आग निर्माण करते आणि डोक्यात राग. त्यात घरातील मुलीसोबत त्याने नाते निर्माण करणे पुरुष म्हणून, कुटुंब प्रमुख म्हणून आणि उच्चवर्णीय पुरुष म्हणून तुम्हाला अपमान वाटू लागतो, त्याला संपवून टाकण्यात आत्मप्रौढी वाटते. 

जातीच्या खोट्या प्रतिष्ठेचे बीज शेवटी याच सरंजामी मूल्य व्यवस्थेत सापडतात. प्रमिला कुंभारकरच्या मृत्युनंतर दाभोलकरांच्या नेतृत्वाखाली जातपंचायतींच्या शोषणाविरोधात राज्यभर चळवळ उभी राहिली, कायदा झाला. भटक्या विमुक्त समाजातील अनेक जातपंचायती बरखास्त झाल्या. आंतरजातीय विवाह केल्यामुळे बहिष्कृत करण्यात आलेल्यांचा सन्मानाने स्वीकार करण्यात आला.  प्रमिलाच्या हत्येनंतर नाशिकमध्येच झालेल्या पहिल्या जातपंचायत मूठमाती परिषदेतील दाभोलकरांचे भाषण हे अखेरचं भाषण ठरलं. त्यात ते म्हणालेले, जात हीच सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. भटक्या जातीजमातींनी कायद्याचा बडगा मानला आणि आधुनिकतेचा निकष असलेले "व्यक्ती'पण आणि व्यक्तीचा अधिकार मान्य केला, मान्य करीत आहेत. भटक्या विमुक्तांच्या या समूहांना मागास म्हणणाऱ्या तथाकथित प्रगत जातींचे काय? किती ज्ञाती समाज आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन मिळणार? त्यासाठी विशेष अभियान छेडली जाणार? किती समूहात रोटी-बेटी व्यवहार सुरू होणार? किती कुटुंबात मुलांच्या लग्नाचा निर्णय त्यांच्यावर सोपवला जाणार? हे आजच्या पिढीपुढचे प्रश्न आहेत. अन्यथा बापाला शिकणारी मुलगी चालते पण मुलीचे प्रेम नकोसे वाटते, प्रेमासाठी मित्रमैत्रिणी चालतात, पण लग्नासाठी जातीचेच लागतात ही ढोंगी मानसिकता या विषाणूची सुप्त वाहक आहे. राजकीय जीवनात जातीअंताच्या मूल्यांचे पोवाडे गायले जाणे आणि वैयक्तिक आयुष्यात मात्र जातीच्या भिंती बळकट करणे ही या संसर्गाची लक्षणे आहेत. या सरंजामी  मानसिकतेचा परिपाक असलेल्या जातीव्यवस्थेत व्यक्तीच्या सार्वभौम अस्तित्वाला थारा नाही. लग्न, प्रेम यासारख्या आपल्या आयुष्याशी संबंधित निर्णय घेण्याचा अधिकार व्यक्तींना नाही, उलट तसा प्रयत्न केला आणि त्यात जातीच्या प्रतिष्ठेसाठी तुमच्या खांडोळ्या केल्या जातात. तुमच्या रक्ताचा सडा घातला जातो. तुमच्या मदतीला जातीतील झुंडी येतात. तुमचा जीव घेऊन हा खेळ संपत नाही. सचिन आणि राहुलच्या मृतदेहांचे तुकडे केले गेले.  विराजच्या तडफडणाऱ्या शरीरावर थुंकले गेले. ती थुंकी एकट्या विराजवर नव्हती... त्या थुंकीचे शिंतोडे आधुनिकतेचे बुरखे ल्यायलेल्या पण जातीयतेने पछाडलेल्या ढोंगी समाजावर उडाले आहेत आणि त्या बुरख्याआड लपून बसलेल्या तमाम सरंजामी, मनूवादी, जातीयवादी व्यवस्थेच्या विषाणूने पुन्हा एकदा आपले अस्तित्व दाखविले आहे. त्यासाठीही आज तरी कोणतीही लस नाही किंवा औषध नाही. पण एकमेव प्रतिबंधात्मक उपाय आहे तो म्हणजे जात-धर्म-पंथ-वर्ग-वर्ण-लिंग यापलीकडे जाऊन व्यक्तीला सार्वभौमत्वाचा अधिकार, अस्तित्व आणि आवाज देणारी भारतीय राज्यघटना... तिची मूल्ये अंगिकारली तरच दुसरा विराज होणे नाही.  

dipti.raut@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...