आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुलाखत:समलिंगी विवाह आणि हिंदू संस्कृती

देवदत्त पटनायक19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१९५५ च्या हिंदू विवाह कायद्यातंर्गत समलिंगी विवाह चौकटीत बसतात की नाही, नसता त्यात काय बादल करावे लागतील, हे येणारा काळ आणि कायद्याचे रक्षक ठरवतील. परंतु हिंदू धर्म आणि संस्कृती याबाबत काय सांगते, यासाठी या विषयाचे अभ्यासक, लेखक देवदत्त पटनायक यांच्याशी केलेली लेखक भुषण कोरगावंकर यांनी केलेली ही चर्चा...

आपल्या देशातली ‘कायदा आणि सुव्यवस्था’ विविध कारणांमुळे जगाच्या काटेकोर नजरेपुढे असतानाच, दोन आठवड्यांपूर्वी एक घटना घडली. १९५५ च्या हिंदू विवाह कायद्यातंर्गत समलैंगिक विवाहांना मान्यता देण्यात यावी, त्याचबरोबर नोंदणी करण्यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मात्र केंद्र सरकारच्यावतीने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून समोर आलेल्या याचिकेला नाकारत कायदा, समाज आणि त्यांचे तथाकथित मूल्ये परवानगी देत नाहीत अशी भूमिका दिल्ली उच्च न्यायालयात घेतली. हे करत असताना त्यांनी किंवा त्यांच्या खंडपीठाने कुठलेही सविस्तर कारण न देता कायदा, समाज, आणि मूल्ये... फक्त या तीन शब्दात नाकारले. १९५५ च्या हिंदू विवाह कायद्यातंर्गत समलिंगी विवाह चौकटीत बसतात की नाही, नसता त्यात काय बादल करावे लागतील, हे येणारा काळ आणि कायद्याचे रक्षक ठरवतील. परंतु हिंदू धर्म आणि संस्कृती याबाबत काय सांगते, यासाठी या विषयाचे अभ्यासक, लेखक देवदत्त पटनायक यांच्याशी केलेली लेखक भुषण कोरगावकर यांनी केलेली ही चर्चा...

> भुषण : हिंदू धर्माच्या ग्रंथांमध्ये समलिंगी संबंधांबद्दल, त्यांना मान्यता देणारे किंवा न देणारे काही उल्लेख आहेत का?

पटनायक: आपल्या समाजात पूर्वीपासून नात्यांना आणि लैंगिक निवडींना अनेक पदर आहेत. आपले ग्रंथ, शिल्प, देवळं सर्वच ठिकाणी समाजात अस्तित्त्वात असलेल्या या विविध गोष्टींचा अगदी मुक्तपणे समावेश केलेला दिसून येतो. बंधु, सखा, सखी हे निव्वळ शब्द नाहीत तर या संकल्पना आहेत आणि त्या मित्र किंवा पती-पत्नी यापेक्षा वेगळ्या आहेत. ऋग्वेदामध्ये इंद्र नेहमी अग्नि किंवा सोमासोबत असतो आणि हे तिघेही पुरुष आहेत. चामुंडा-चोटीला, नंदा-सुनंदा, तारा-तारिणी या सर्व स्त्रियांच्या जोड्या आहेत.

शिव-शक्ती, विष्णु-लक्ष्मी या रूढार्थाने पुरुष-स्त्री अशा जोड्या आहेतच. परंतु शिव हा शक्तीशी संयोग करून अर्धनारीनटेश्वर बनतो. तो विष्णुशी जोडी जमवून हरीहर बनतो. शक्ती किंवा पार्वतीच्या योगे तो गणेशास जन्म देतो तर मोहिनीरूपातल्या विष्णुच्या योगे तो अय्यपाला जन्म देतो. स्त्री-पुरुष, स्त्री-स्त्री, पुरुष-पुरुष, पुरुष-स्त्री रूपातील पुरुष देवांच्या अशा अनेक जोड्या आहेत.

> भुषण : तरीही आजच्या काळात या गोष्टी आपल्या धर्माबाहेरच्या आहेत, असं बहुसंख्य लोकांना का वाटतं?

पटनायक: याचं कारण अज्ञान... वास्तविक कुठल्याही धर्माचं प्रयोजन हे जंगल-राज मोडून, सर्वसमावेशक आणि सर्वहितवादी व्यवस्था निर्माण करणं हेच असतं. त्यातही, हिंदू धर्म ही हजारो वर्षं चालत आलेली संस्कृती आणि संकल्पना आहे. तिचं प्रमुख वैशिष्ट्य हे आहे की ती स्थीर नसून विकसित आहे. ख्रिश्चन आणि इस्लामसारखे धर्म हे एकल विचारी आहेत. त्यात लिहून ठेवेलेले नियम किंवा कायदे हे काळ्या दगडात ओढलेली रेघ असते. ते आजही पाळावेत अशी अपेक्षा असते. हिंदू संस्कृतीत मात्र देश-काल-गुण यांच्यापरत्वे अनेक बदल झालेले पहायला मिळतात. हिंदू धर्मात घटस्फोट ही संकल्पना नाही. (आदिवासी आणि कष्टकरी वर्गामध्ये ते पूर्वीपासून होत होते.) हिंदू विवाह कायद्यात मात्र त्याला मान्यता आहे. मग आता तुम्ही धर्मात ज्याचा उल्लेख नाही अशा गोष्टीची आपल्या प्रथांमध्ये आणि पुढे कायद्यात तरतूद कशी केलीत? हिंदू धर्मात एका व्यक्तीचे एकाच वेळेस अनेक, ‘समाजमान्य जोडीदार’ असल्याचे उल्लेख आहेत. पण आजच्या काळात, हिंदू कायद्यानुसार एका व्यक्तीस एका वेळेस एकाच स्त्रीशी किंवा पुरुषाशी विवाह करता येतो. काळाला अनुसरून कायद्यात बदल झाल्याची अशी अजून बरीच उदाहरणं देता येतील.

आता थोडं पुराणाबद्दल - हिंदू पुराणांमध्ये ‘diversity’ किंवा ‘विविधते’चा जागोजागी सोहळा झालेला दिसून येतो. मेनकेसारखी अप्सरा मुलांना जन्म देऊन त्यांना जंगलात सोडून देते. कणवासारखा एकटा राहणारा पुरुष या मुलांना वाढवतो. जटीलासारख्या स्त्रियांना अनेक नवरे असतात. भृंगीसारखे पुरुष शक्तीला नाकारून एकट्या शिवाचीच पूजा करतात. योगिनी लग्न न करता, स्वतःसारख्या इतर स्त्रियांसोबत जगणं पसंत करतात. अशी अजून बरीच उदाहरणं देता येतील. मुद्दा हा आहे, की आपण आजच्या या काळामध्ये, आपल्या परंपरांनुसार, कायद्यात आणि सामाजिक प्रथांमध्ये सर्वांच्या हिताचे बदल करणार आहोत की झापडं लावलेल्या बैलांसारखे, काही ठराविक व्यक्ती आणि प्रवृत्तींना सोयिस्कर अशा गोष्टींना चिकटून बसणार आहोत?

> भुषण : खरंय! आता थोडा वेगळा मुद्दा. एक मतप्रवाह असा आहे की जो विवाह-संस्थेलाच आव्हान देतो. त्यांच्या मते ही फार जाचक संस्था आहे आणि ती व्यक्ती-स्वातंत्र्यावर, विशेषतः स्त्रियांवर अनेक बंधनं घालते. असं असताना जे या संस्थेपासून मुक्त आहेत ते, म्हणजे "एलजीबीटीक्युए' हा समुदाय, या संस्थेत स्वतःला समाविष्ट करायच्या इतका मागे का आहे?

पटनायक : अगदी योग्य प्रश्न आहे. मुळात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की, विवाह-संस्था ही एक मानवनिर्मित व्यवस्था आहे. आई-मूल, वडील-मूल, भाऊ-बहीण यासारखी ती नैसर्गिक नाही. परंतु कुणा एका व्यक्तीसोबत आयुष्यभराचं नातं जोडणं, तिच्याबरोबर सहवास करणं, नवीन पिढी जन्माला घालून (किंवा दत्तक घेऊन) तिचं संगोपन करणं ही बहुसंख्य व्यक्तींची प्रेरणा असते. आणि या प्रेरणेला विवाहामुळे एक प्रकारचं कायदेशीर आणि सामाजिक कवच प्राप्त होतं. आजचा जमाना कागदी पुरावे मागतो. वारसा-हक्क, एकत्र घर खरेदी करणं, विम्याचे पैसे मिळणं, अशा अनेक जीवनावश्यक गोष्टींमध्ये कागदी पुरावे आवश्यक असतात. साधं हॉस्पिटलमध्ये मरणाशी झुंजणाऱ्या व्यक्तींच्या ऑपरेशनसाठी परवानगी देण्याचा हक्क हा रक्ताचे नातेवाईक आणि लग्नाचा जोडीदार यांनाच असतो. हे सगळे हक्क "एलजीबीटीक्युए' मधील व्यक्तींना प्राप्त व्हायचे असतील तर त्यासाठी विवाह किंवा तत्सम कायद्यांच्या प्रमाणपत्रांची गरज आहे. आपण अशी आशा करूया की ती लवकरच मिळेल.

मुलाखतकार – भुषण कोरगावकर