आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पंतप्रधान पंडित नेहरूंनी जो विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारून काम सुरू केले, त्याला प्रतिसाद देणारे, आपल्या ज्ञानाचा फायदा मातृभूमीसाठी व्हावा, यासाठी विदेशांतील अभ्युदयाच्या उत्तमोत्तम संधी सोडून परत येणारे आणि विविध प्रतिकूलतांवर मात करत देशाची विज्ञाननिष्ठ जडणघडण करण्यात मोलाचे योगदान देणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व डॉ. गोविंद स्वरूप यांच्या निधनामुळे हरपले आहे. विज्ञाननिष्ठा, आधुनिक यंत्र-तंत्रस्नेही आचरण आणि वास्तवाकडे पाहण्याची तर्कसंगत दृष्टी, या त्रिसूत्रीच्या जोडीला डॉ. स्वरूप यांच्यातील प्रखर देशप्रेमाने त्यांच्या कार्याला वेगळीच झळाळी मिळाली. विज्ञानातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यावर डॉ. स्वरूप यांनी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पीएचडी संपादन केली. ऑस्ट्रेलियामध्ये रेडिओ दुर्बिणी उभारत असतानाच ते मायभूमीत परतले आणि आपल्या ज्ञानावरील मातृभूमीचा अग्रहक्क आनंदाने मान्य केला. देशातील पहिली आधुनिक रेडिओ दुर्बीण त्यांच्याच मार्गदर्शनाखाली उभारण्यात आली. पुढे पुणे - नाशिक महामार्गावरील खोडद येथे डॉ. स्वरूप यांच्या नेतृत्वाखाली साकार झालेला जीएमआरटी (जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप) हा तब्बल ३० अँटिना असलेला महाकाय प्रकल्प म्हणजे त्यांच्या कार्याचे स्मारक ठरावे. रेडिओ दुर्बिणींच्या उभारणीत ते जगातील नावाजलेले तज्ज्ञ होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणातील एनसीआरए (राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र) या संशोधन संस्थेचे ते संस्थापक- संचालक होते. ‘आयसर’सारख्या संशोधनाला प्राधान्य देणाऱ्या शैक्षणिक संस्था विकसित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील कित्येक संस्थांचे ते मार्गदर्शक, सल्लागार होते. त्यांच्या संपूर्ण संशोधनाचा, अभ्यासाचा केंद्रबिंदू विद्यार्थी होता. गेल्या काही पिढ्यांतील अनेक संशोधक-शास्त्रज्ञ या ना त्या रीतीने डॉ. स्वरूप यांच्याशी संबंधित आहेत. वैज्ञानिकतेसोबतच उत्तम नेतृत्वगुण व प्रशासकीय कणखरता यांचे मिश्रण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होते. त्यामुळे संस्थात्मक पातळीवरही ते यशस्वी ठरले. त्यांच्या व्यक्तित्वात, विचारांत जुने संदर्भ, मूल्य विवेक, निष्ठा यांचा संगम होताच, पण कालसुसंगतता हा दुर्मिळ गुण त्यांच्यापाशी होता. त्यामुळेच विशुद्ध, मूलभूत विज्ञान क्षेत्रातील त्यांचे योगदान पुढच्या पिढ्यांनाही दिशादर्शक ठरेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.