आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विशेष संपादकीय:लढू या, जिंकू या!

दिव्य मराठीएका वर्षापूर्वीलेखक: संजय आवटे
  • कॉपी लिंक

आज तुम्ही सारे आपापल्या घरात सुरक्षित असताना, तुमच्यासोबत 'दिव्य मराठी' आहे. कारण, तुमच्या कुटुंबाचाच तो भाग आहे. तुमच्याशिवाय 'दिव्य मराठी'ला पूर्णत्व नाही आणि 'दिव्य मराठी'शिवाय तुमच्या कुटुंबाची व्याख्या परिपूर्ण होऊ शकत नाही. हे आपले नाते आहे. आज दहाव्या वर्षांत प्रवेश करत असताना हे आवर्जून सांगायला हवे! नऊ वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आम्ही दाखल झालो आणि अल्पावधीत तुम्ही आम्हाला अढळ स्थान दिलेत. आपला हा प्रवास आपण हातात हात गुंफून केला. आज काळ कठीण आहे. 'फिजिकल डिस्टन्सिंग' हा नव्या काळाचा नियम आहे. पण, आपण मात्र एकमेकांसोबत आहोत.

पत्रकारिता सातत्याने बदलत गेली आहे. आता तर 'कोरोना'नंतरचं जग आणखी वेगळं असणार आहे. अशावेळी तुमच्या- आमच्या नात्याचं काय होणार, असा प्रश्नही आमच्या मनात येत नाही. कारण, या नात्यामध्ये असणारा विश्वास खूप मोठा आहे. लोकशाहीमध्ये 'अंतिम सत्ता जनतेची' असते. केंद्रबिंदू असतो तो सर्वसामान्य माणूस. मात्र, लोकशाहीचे अपहरण करण्याचा प्रयत्न अनेक घटक सातत्याने करत असतात. अशावेळी, सर्वसामान्य माणसाला आवाजच नसतो. 'दिव्य मराठी' म्हणजे हा सर्वसामान्य माणसाचा आवाज आहे. आमचा केंद्रबिंदू आहे तो हा सर्वसामान्य माणूस. वाचक हाच आमचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळेच, २०११ मध्ये आम्ही औरंगाबादेत प्रवेश केला आणि वाचकांनी आम्हाला असे स्थान बहाल केले.

गेल्या काही वर्षांमध्ये जग सातत्याने बदलत आहे. माध्यमे तर आणखी बदलत आहेत. माध्यमांच्या विश्वासार्हतेचा मुद्दा चर्चेचा ठरत आहे. माध्यमविश्व झपाट्याने बदलत असताना पत्रकारितेचा क्षय होतो की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशावेळी 'दिव्य मराठी'ने मराठी पत्रकारितेला नवा आयाम दिला. जे चूक आहे, त्याला चूक म्हणताना आम्ही कधी मागे हटलो नाही. जे योग्य आहे, त्याचे कौतुक करतानाही आम्ही संकोच केला नाही. भवताली सातत्याने नकारात्मक घडत असताना, माध्यमे भय विकत असतात. माध्यमे असुरक्षितता आणि नकारात्मकता यांचीच विक्री करत असतात. आम्ही मात्र सातत्याने सकारात्मकता अधोरेखित करत राहिलो.

‘मंडे पॉझिटिव्ह’ हा असा प्रयोग आहे, ज्यामुळे जगण्यातील उमेद अधोरेखित झाली. असे अनेक प्रयोग आम्ही करत गेलो. त्याच्या मुळाशी एकच उद्देश होता- सर्वसामान्य माणसांचे जगणे आनंदी करणे. त्यासाठी आम्ही सरकारांशी भांडण केले, प्रशासनाला खडसावले, यंत्रणांना जागे केले. पण, एक मात्र खरे की सामान्य माणसाला उभे केले. मुक्त पत्रकारिता ही लोकशाहीची पूर्वअट आहे. निष्पक्ष पत्रकारिता नसेल, तर लोकशाही कशी असेल? आम्ही पक्ष घेतला तो सर्वसामान्य माणसांचा. श्रमिकांचा, शोषितांचा. देशातील सर्वात मोठा वृत्तपत्रसमूह असलेल्या ‘दैनिक भास्कर’ने पत्रकारितेत आपली मूल्यव्यवस्था तयार केली आहे. त्याच वाटेवरून ‘दिव्य मराठी’ धावत आहे.

औरंगाबाद म्हणजे ‘मेल्टिंग पॉट’! ‘आयडिया ऑफ इंडिया’ अधोरेखित करणारे शहर. सर्व धर्म, भाषा, जाती आणि वैविध्य असूनही एकात्म असणारे महानगर. इथे अजंठा आहे आणि वेरूळही. बुद्धाचा वारसा आहे आणि मलिक अंबरचा इतिहासही. अत्यंत वेगाने वाढणारे हे शहर मध्ये थोडेसे थांबले, थबकले आणि काहीसे मागे गेले. पण, आम्ही मात्र सतत यंत्रणांना जागे करत राहिलो. त्याला यश येत गेले. उद्याचे औरंगाबाद, उद्याचा मराठवाडा आश्वासक असणार आहे. नाशिक, जळगाव, धुळे यासह उत्तर महाराष्ट्र असो, सोलापूर असो की अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाण्यासह विदर्भ असो. ‘दिव्य मराठी’ ज्या ज्या ठिकाणी गेला, तिथे सर्वदूर वाचकांचा तो आवाज झाला. कारण, या मूल्यव्यवस्थेसह आम्ही पत्रकारिता करू पाहातो. म्हणून तर, आम्ही आवाज दिल्यानंतर लाखो रातरागिणी अंधाराला न जुमानता रस्त्यावर उतरतात. म्हणून तर, आमच्या बातम्यांनी व्यवस्था बदलतात. वाचकांच्या प्रेमातून आम्ही वर्धिष्णु झालो आहोत, हे आज मुद्दाम सांगितले पाहिजे.

आज तुमच्या घरात आम्ही पोहोचतो, कारण या अडचणीच्या काळातही आमचे एजंट एखाद्या सैनिकाप्रमाणे लढत असतात. असे वाचक, असे एजंट असल्यावर आणखी काय हवे? जाहिरातदारांचे योगदानही तेवढेच मोठे. खरे तर, दर वर्षी आपण जल्लोषात वर्धापनदिन साजरा करतो. हजारो वाचक या सोहळ्याला उपस्थित राहातात. आज चित्र वेगळे आहे. पण, ते बदलणार आहे. आपण असेच सोबत राहू. उद्याचा दिवस आणखी आश्वासक असणार आहे.

आज मनात एकच भावना आहे. ती आहे, कृतज्ञतेची आणि आश्वस्त करण्याची. वाचक, एजंट, जाहिरातदार, लेखक, हितचिंतक असा खूप मोठा परिवार आहे आपला! सर्वांचे अभिनंदन. शुभेच्छा. आज आश्वासन एवढेच, घेतला वसा टाकणार नाही. वाचकांना केंद्रबिंदू मानणारी पत्रकारिता कधीच थांबणार नाही!

काळ कठीण असला तरी, सुरेश भटांच्या या ओळी आज नवी उमेद देत आहेत...

हे असे आहे, तरी पण

हे असे असणार नाही

दिवस आमुचा येत आहे

तो घरी बसणार नाही!

बातम्या आणखी आहेत...