आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:‘बैरुत’चा इशारा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य-पूर्वेतील महत्त्वाचे व्यापारी केंद्र असलेले बैरुत मंगळवारी झालेल्या प्रचंड स्फोटामध्ये निम्म्याहून अधिक बेचिराख झाले. शंभराहून अधिक नागरिकांचा या दुर्घटनेत बळी गेला, तर शेकडो जखमी झाले आहेत. असंख्य लोक अजूनही बेपत्ता आहेत. बैरुतच्या समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या गोदामांमध्ये झालेला हा स्फोट ३.३ ते ४ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपाएवढा मोठा होता. अर्थात तो जमिनीच्या पृष्ठभागावर झाल्याने त्याची व्याप्तीही काही पटींनी अधिक होती. बैरुतच्या किनाऱ्यावरील गोदामात ठेवलेल्या सुमारे २७०० टन अमोनियम नायट्रेटमुळे हा भयंकर स्फोट झाल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, हे अमोनियम नायट्रेट सुमारे सात वर्षांपूर्वी बोटीने बैरुत बंदरात आले होते आणि तेव्हापासून एका गोदामात पडून होते. त्याकडे झालेले दुर्लक्षच या शहराच्या मुळावर उठले. सुमारे पाच हजार वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेले बैरुत गेल्या काही वर्षांत झपाट्याने विकसित होत गेले. केवळ लेबनॉनची राजधानी म्हणून ते मर्यादित राहिले नाही, तर युरोप आणि आफ्रिकेला जोडणारे प्रमुख व्यापार केंद्र बनले. त्यातूनच या शहराला ‘मध्य-पूर्वेचा मोती’ असा लौकिक मिळाला. बंदरमार्गे होणारा व्यापार आणि वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थानामुळे बैरुत देशाचा आर्थिक कणा बनले. या गतिमान, प्रागतिक वाटचालीत बंदराबरोबरच तेथील सुविधांच्या सुरक्षिततेकडे झालेला कानाडोळा घातक ठरला आणि युरोप- अमेरिकेतील महानगरांसारखे भरभराटीला आलेले हे शहर काही क्षणांत अर्धेअधिक उद्ध्वस्त झाले. बैरुतमधील ही दुर्घटना आर्थिक विकासासाठी धावणाऱ्या प्रत्येक शहराला मिळालेला सावधानतेचा इशारा आहे. मुंबईसारख्या बंदराच्या शहराला, सतत नैसर्गिक आणि मानवी आपत्तींना सामोरे जाणाऱ्या देशाच्या आर्थिक राजधानीला तर यातून धडा घ्यावाच लागेल. पायाभूत सुविधांची उभारणी, त्यांचे आधुनिकीकरण आणि सुरक्षितता याबाबतीत होणारी हलगर्जी मोठे संकट निर्माण करू शकते, हा या धड्याचा सारांश आहे. कोरोना महामारी, अंतर्गत राजकीय संघर्ष, भ्रष्टाचार आणि महागाई यामुळे त्रस्त असलेला लेबनॉन बैरुतमधील स्फोटामुळे पुरता खचला आहे. भारताच्या बाबतीतही हे घटक तितकेच परिणाम करणारे आहेत. त्यामुळे प्रगती साधताना होणारा थोडासा निष्काळजीपणाही आर्थिक, सामाजिकदृष्ट्या हानिकारक ठरू शकतो, याची जाणीव ठेवावी लागेल.

बातम्या आणखी आहेत...