आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:आरोग्यमंत्री, आता ‘ऑपरेशन’ कराच !

दिव्य मराठी9 महिन्यांपूर्वीलेखक: संपादकीय
  • कॉपी लिंक

राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे बळी जाणाऱ्यांचा आकडा वाढत असताना प्रत्येक रुग्णाचा जीव कसा वाचेल, यासाठी सरकार आणि प्रशासनाला आटोकाट प्रयत्न करावे लागणार आहेत. मात्र, आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे कोरोनाबाधितांना उपचार सुरू असताना मरणयातना सोसाव्या लागत असतील आणि बाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत असेल, तर ते सरकारचे अपयश आहे. जळगावच्या कोविड रुग्णालयाचा कारभार हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला जोडलेल्या या सर्वोपचार रुग्णालयात कोविड हॉस्पिटल करण्यात आले आहे. तेथे दाखल असलेली एक वयोवृद्ध महिला बेपत्ता होते आणि तब्बल आठवडाभराने तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत शौचालयात आढळतो, हे किती महाभयंकर आहे. या वृद्धेची रुग्णालयात दाखल झाल्यापासूनच हेळसांड सुरू झाली. ती रुग्णालयातून बेपत्ता झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या, तरीही जिल्हाधिकाऱ्यांसह आरोग्य, पोलिस यंत्रणेने हा प्रकार गांभीर्याने घेतला नाही. अखेर या बेपत्ता वृद्धेचा शौचालयात तडफडून मृत्यू झाल्याचे उघड झाले. प्रशासनाला तिचा ‘शोध’ दुर्गंधीमुळे लागला. वयोवृद्ध महिलेचा असा मृत्यू होत असेल, तर अन्य बाधितांवर काय आणि कसे उपचार होत असतील, हे समजणे कठीण नाही. जळगावात १२० बाधितांचा मृत्यू झाला आहे आणि हे सर्व मृत्यू विविध वयोगटांतील स्त्री-पुरुषांचे आहेत. याचा अर्थ यातील अनेक बळी रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गेले असतील, या आक्षेपाला वाव आहे. वृद्धेच्या मृत्यूने या रुग्णालयातील अक्षम्य हलगर्जी आणि अनागोंदीचा पुरावाच हाती आला आहे. त्यामुळे यातील सर्व दोषींवर नेहमीच्या बदली आणि बडतर्फीच्या पुढे जाऊन कारवाई झाली पाहिजे. आरोग्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात याच रुग्णालयात बैठक घेऊन वाढत्या मृत्यूंबाबत संबंधितांना जाब विचारला होता आणि स्थिती सुधारली नाही, तर प्रशासकीय ‘ऑपरेशन’ करीन, अशी तंबीही दिली होती. ते बोलत होते तेव्हा कदाचित रुग्णालयातील बंद शौचालयात या असहाय वृद्धेने प्राण सोडला होता. मात्र, त्यानंतरही ना तिचा शोध लागला ना एकूणच स्थितीत फरक पडला. उलट ती आणखी चिघळत गेली. त्यामुळे आता ‘ऑपरेशनची’च वेळ आली आहे. ते झाले नाही, तर ‘काळ’ सोकावल्याशिवाय राहणार नाही.

बातम्या आणखी आहेत...