आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:चंद्रावरचे ‘जीवन’

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

“चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु” संत ज्ञानेश्वरांचे सात-आठशे वर्षांपूर्वीचे पसायदान. जे चंद्रासारखे आहेत, पण ज्यांच्यावर कलंक नाही आणि सूर्याप्रमाणे असूनही ज्यांचा ताप जगाला होत नाही, त्यांच्याशी सर्वांचे नाते जुळावे, असे मागणे संतश्रेष्ठ माऊलींनी मागितले होते. संपूर्ण सृष्टीप्रमाणेच मानवी जीवनाशी आणि त्याच्या उन्नतीशी चंद्र-सूर्याचे नाते असे जोडले गेले आहे. त्यामुळेच त्यांच्याविषयी माणसाला कमालीचे कुतूहल वाटत आले आहे. त्यातही चंद्राचे खास असे आकर्षण कायम राहिले आहे. त्यातूनच चंद्रावर पाणी आहे का, याचा शोध जगातील प्रगत देश सातत्याने घेत असतात. ‘चांद्रयान-१’ने पाठवलेल्या माहितीच्या आधारे भारताने २००९ मध्येच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाणी असल्याचे म्हटले होते. आता अमेरिकेच्या ‘नासा’ने ही चंद्रावर पाणी असल्याचे म्हटले आहे. हे पाणी थेंब, तलाव किंवा समुद्राच्या स्वरुपात नाही, तर तेथील खनिज संपत्तीत पाण्याचे अंश आहेत. म्हणजेच हे पाणी शुद्ध रुपात अस्तित्वात नाही. चंद्रावरच्या एक टन मातीतून सुमारे अर्धा लिटर पाणी हाती लागेल, असे ‘इस्त्रो’च्या शास्त्रज्ञांनी म्हटले होते. ‘नासा’च्या संशोधकांना चंद्रावर सूर्यप्रकाश येणाऱ्या भागात पाणी आढळले आहे. आता चंद्राच्या दुसऱ्या भागावरही पाण्याचा शोध घेतला जाणार आहे. तेथे पाण्याची निर्मिती कशी होते, त्याचा साठा कसा निर्माण झाला, प्रवाह कसा आहे, यांसारख्या अनेक गोष्टींचा शोध घेतला जाईल. या पाण्याचा वापर करता येऊ शकतो का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. ‘नासा’च्या आर्टिमिस मोहिमेत यावर संशोधन होईल. २०२४ मध्ये या मोहिमेअंतर्गत एक महिला आणि एक पुरुष अंतराळवीर चंद्रावर पाठवण्यात येणार आहे. चंद्रावर मानवी वस्ती करण्याच्या दिशेने हे प्रयत्न सुरू आहेत. आपले भावविश्व व्यापून राहिलेल्या चंद्रावर पाण्याचे अस्तित्व आढळणे, ही मानवी मनाला सुखावणारी आणि उन्नतीची आस लावणारी घटना आहे. कदाचित या भावनेमुळे येत्या कोजागिरीला दुधात चंद्र पाहताना त्याची शीतलता अाणखी अधिक जाणवेल! चंद्रावरील ‘जीवना’च्या केवळ संकेतांमुळे इथले कष्टप्रद जीवन प्रवाही व्हावे, हेही कमी नाही.

बातम्या आणखी आहेत...