आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:ओबामांमुळे ‘मुद्दे’ चर्चेत

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा जोर शिगेला पोहोचलाय. वातावरण खूप तापले आहे. माजी अध्यक्ष बराक ओबामा हे डेमोक्रॅट पक्षाच्या प्रचार मोहिमेत शांतच होते. पण गेल्या आठवड्यापासून ते जोमाने प्रचारात उतरले आहेत. व्हाइट हाऊसमधून आठ वर्षे अमेरिकेच्या कारभाराचा अनुभव असल्याने या निवडणुकीमध्ये ओबामा यांच्या शब्दाला अधिक महत्त्व आहे. त्यांनी ट्रम्प यांच्या चार वर्षांतल्या कारभारावर थेट हल्ला केला. त्या दृष्टीने फिलाडेल्फियातील त्यांचे भाषण गाजते आहे. सव्वादोन लाख अमेरिकन नागरिकांचे बळी घेणारी कोविड महामारी, उद्योग, व्यापार, रोजगाराचे प्रश्न हाताळण्यातील अपयश, घुसखोर मेक्सिकन लोकांना अमेरिकेतून हाकलून दिल्यामुळे निर्माण झालेले मानवी संवेदनांचे प्रश्न, अशा अनेक मुद्द्यांचा आधार घेत ओबामा यांनी, अध्यक्षपदी ट्रम्प येणे अमेरिकेला संकटाच्या खाईत नेणारे ठरेल, अशा शब्दांत टीका केली आहे. ओबामा प्रचारात उतरल्याने डेमोक्रॅट पक्षाच्या मोहिमेत जान आली. ओबामांची ही सभा आणि महाराष्ट्रातील राज ठाकरेंच्या सभा यांत एक साम्य होते. ते म्हणजे ‘लाव रे तो व्हिडिओ’ या प्रकाराचे. ओबामांचे भाषण तर गाजते-वाजते आहे, पण त्याचबरोबर सभेत त्यांनी जे दोन व्हिडिओ दाखवले, ते लोकांना अस्वस्थ करणारे होते. मेक्सिकन लोकांच्या हकालपट्टीमुळे जन्माने अमेरिकन असलेली अकरा वर्षांची मुलगी व तिच्या आई-वडिलांची ताटातूट दाखवणारा व्हिडिओ विनापरवाना अमेरिकेत आलेल्या लोकांचे प्रश्न भेदकपणे मांडणारा होता. दुसरा व्हिडिओ होता एका वेगळ्याच विषयाचा. अमेरिकेतील लोकशाही जवळपास २३१ वर्षांची जगात सर्वात जुनी आहे. पण लोकशाहीनंतरच्या १३१ वर्षांत स्त्री-पुरुषांमध्ये समानता नव्हती. महिलांना राजकीय अधिकार नव्हते. मताचा अधिकार नव्हता. अतिशय प्रगत अमेरिकेत महिलांना हे स्वातंत्र्य मिळण्यात असमानतेच्या लोकशाहीची १३१ वर्षे गेली. १९२० मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. यंदाच्या निवडणुकीचे विशेष हे की, या स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षात महिला हिरीरीने मतदान करतील. या दृष्टीने डेमोक्रॅटच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांची उमेदवारी महत्त्वाची. ट्रम्प यांनी भरकटवलेला प्रचार ओबामा यांच्यामुळे ‘मुद्द्या’वर आला आहे. आता या मुद्द्यांवर ट्रम्पना बोलावे लागेल.