आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:अनलॉकचा आश्वासक ‘अर्थ’

दिव्य मराठी9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या जगभर कोरोनाने थैमान घातले आहे. त्यात बहुतांश क्षेत्रांची वाताहत होणार, काही कोटी नोकऱ्या जाणार, अर्थचक्र बिघडणार अशा बातम्या धडकू लागल्या. त्यामुळे अनेकांना धडकी भरली. मात्र, लॉकडाऊनमधून अनलॉक होताना या सर्व घटकांसाठी अाशेची सोनेरी किनार असल्याचे दिसते आहे. लोकांच्या हाती जास्तीत जास्त पैसा येऊन बाजारातील मागणी वाढावी, यासाठी जगातील प्रत्येक देश, त्या देशांची केंद्रीय बँक पावले टाकत आहे. ‘रेस्क्यू ते रिकव्हरी’ असा सर्व देशांचा पवित्रा दिसतो आहे. रिकव्हरीसाठी जगभरातील सरकारे आता खर्च दुप्पट करत आहेत. अनेक वित्तसंस्था, कंपन्या उद्योग-व्यवसायांसाठी स्वस्तात कर्ज देत आहेत. भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने अलीकडील काळात तब्बल १३ वेळा कर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने मेमध्ये प्रमुख व्याजदरांत ०.४० टक्के कपात करत व्यापारी बँकांना कर्ज स्वस्ताईचा मार्ग मोकळा करून दिला. सरकारनेही सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांची व्याख्या बदलली. त्यांना कर्ज सुलभ करून दिले. अर्थव्यवस्थेत रोख पैशाचा ओघ कायम राहावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होताना दिसताहेत. बँकांच्या कर्ज स्वस्ताईमुळे गृह, वाहन खरेदीला प्रोत्साहन मिळणार आहे. देशात ‘अनलॉक’मध्ये अनेक उद्योग, खासगी कंपन्या, मॉल, शॉपिंग सेंटर्स सुरू झाल्याने अर्थचक्राला गती मिळणार आहे. जगभरातही महामारीच्या पाठोपाठ दबक्या पावलाने येऊ घातलेल्या महामंदीचा सामना करण्यासाठी उपाय योजले जात आहेत. युरोपियन मध्यवर्ती बँकेने महामारी आपत्कालीन सहायता कार्यक्रमाची रक्कम ६७२ अब्ज डॉलरने वाढवून १.३५ ट्रिलियन युरो केली आहे. जर्मन सरकारने १३० अब्ज युरोच्या आणखी एका प्रोत्साहन पॅकेजला मंजुरी दिली आहे. जपान सरकारने रिकव्हरीला गती देण्यासाठी आणखी १.१ लाख कोटी डॉलर खर्चाची योजना आखली आहे. दक्षिण कोरियानेही ६३ अब्ज डॉलरची योजना जाहीर केली आहे. अमेरिकेत बेरोजगारीचा दर मेमध्ये घटून १३.३ टक्क्यांवर आला आहे. या महिन्यात अमेेरिकेत २.५ कोटी कामगारांना रोजगार मिळाला आहे. जगाच्या जीडीपीत एप्रिलच्या घसरणीनंतर मेमध्ये सुधारणेचे संकेत आहेत. भारतातही अनलॉकमध्ये बाजार आणि कारभार सुरू झाल्याने अर्थचक्राला वेग येण्याची आशा आहे.

बातम्या आणखी आहेत...