आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:नितीश की तेजस्वी?

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या विरोधातील विस्कटलेली नाराजी एकत्र करून लढायचे, की आपापसातील भांडणे चालू ठेवत भाजपसाठी भविष्यातील गणितं सोपी करत राहायचे? याचा कौल देणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीतील मतमोजणी मंगळवारी होते आहे. हा निकाल फक्त राज्यापुरता मर्यादित असला तरी अनेक अर्थांनी त्याकडे देशातील सगळे राजकीय डोळे लागले आहेत. बिहारमधील विकासाचे तुंबलेले प्रश्न, कोरोनामुळे घराकडे येताना स्थलांतरित मजुरांनी सोसलेल्या मरणप्राय यातना एकीकडे, तर दुसरीकडे धगधगत्या सीमेवरील चिनी आव्हानामुळे बिहारवासीयांच्या मनातील राष्ट्रभावनेला फुंकर घालण्याचे भाजपचे प्रयत्न, केंद्राच्या विविध विकास योजनांचा उच्चार करत मोदींचा उद््घोष, नितीशकुमारांचा विकासकामांचा दावा या सगळ्यांची खेचाखेच प्रचारात होती. बिहारवर तीन वेळा मुख्यमंत्री म्हणून राज्य केलेल्या नितीशकुमारांना चौथ्यांदा मुख्यमंत्री व्हायचे आहे. ‘माझी शेवटची निवडणूक, विजय पदरात टाका’, असे भावनिक आवाहन करत असताना पायाखालची वाळू सरकते आहे की काय? असेच नितीशकुमारांना वाटत असावे. अनुभवी, मुरब्बी विरुद्ध तरुण नेतृत्व असा नितीश विरुद्ध तेजस्वी सामना बिहारात रंगलाय. लालू का लाल तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व चार डाव्या पक्षांचा समावेश असलेले महागठबंधन एक वेगळेच समीकरण बिहारमध्ये मोदी व नितीशकुमारांच्या विरोधात तयार झाले आहे. सर्वच चाचण्यांमधून समोर आलेली आकडेवारी नितीशकुमारांना चिंतेत टाकणारी आहे. बहुतांश चाचण्यांचे कल तेजस्वीच्या बाजूने आहेत. विशेष म्हणजे जे चॅनल एरवी भाजपच्या बाजूने ओरडत जोरदार वकिली करत असते, त्यांच्याही चाचणीतील आकडेवारी तेजस्वीचे पारडे जड असल्याचे सांगते. दिल्लीमध्ये रामविलास पासवान यांनी सतत भाजपबरोबर राहात मंत्रिपद टिकवून ठेवले होते. त्यांचे चिरंजीव चिराग हे भाजपबरोबर राहतील, असा अंदाज होता. निवडणुकीच्या तोंडावर रामविलास यांच्या निधनानंतर चिराग यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली. काही चाचण्यांमधून त्रिशंकू विधानसभेचा अंदाज व्यक्त झाला आहे. त्या स्थितीत चिराग पासवान यांची भूमिका महत्त्वाची ठरेल. निकाल काही लागला तरी देशातील राजकारणासाठी तो दिशादर्शक असेल.

बातम्या आणखी आहेत...