आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशाचा वर्तमान ढवळून काढणाऱ्या अनेक घटना एकीकडे घडत असताना बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक रंगू लागली आहे. नेहमी ‘इलेक्शन मोड’मध्ये असणारा भाजप या निवडणुकीतही ताकदीने उतरला आहे. अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणून तो मैदानात उतरला असला तरी या आघाडीत संयुक्त जनता दलाशिवाय भाजपसोबत अन्य मोठा पक्ष उरलेला नाही. केंद्रातील रालोआ सरकारमध्ये असलेला रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष बिहारमध्ये आघाडीतून बाहेर पडला आहे. पासवान सध्या आजारी आहेत आणि पक्षाची धुरा त्यांचे पुत्र चिराग यांच्याकडे आहे. त्यांनी उघडपणे नितीशकुमारांच्या नेतृत्वाला आव्हान दिले आहे. जीतनराम मांझी यांच्या हम पक्षाला रालोआमध्ये घेण्यालाही त्यांचा विरोध आहे. मंगळवारी रालोआचे जागावाटप जाहीर होत असताना चिराग ट्विटरवरून नितीशकुमारांच्या कारभारावर शरसंधान करत होते. भाजपने मात्र नितीश यांचे नेतृत्व मान्य असलेल्यांनाच बिहारच्या रालोआमध्ये स्थान राहील, असे स्पष्ट केले आहे. प्रत्यक्षात केंद्राच्या सत्तेत राहून बिहारमध्ये रालोआशी काडीमोड घेणाऱ्या चिराग पासवान यांना भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाचे मूक पाठबळ असल्याचीही चर्चा आहे. पासवानांचा पक्ष बाहेर पडल्याने भाजपच्या वाट्याला जास्त जागा आल्या आहेत. जदयूच्या तुलनेत जास्त जागा लढवण्याचा भाजपला फायदा होऊ शकतो. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात मुंबईमध्ये झालेल्या दीर्घ खलबतांनंतर शिवसेनेने या निवडणुकीत मवाळ पवित्रा घेतला आहे. शिवाय, धनुष्यबाणाशिवाय हा पक्ष लढणार आहे. एका अर्थाने त्याचा भाजपला लाभच होईल. काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, भाकप आणि माकपच्या महागठबंधनाने लालूप्रसादांचे पुत्र तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार केले आहे. दुसरीकडे बहुजन समाज पक्ष, लोकतांत्रिक समाजवादी पक्षासोबत एमआयएमने हातमिळवणी केली आहे. लोकजनशक्तीप्रमाणेच या पक्षांचा प्रभाव नसला तरी ते मतांचे विभाजन करू शकतात. शिवाय, प्रत्येक पक्षाच्या विशिष्ट जातींच्या मतपेढ्यांचा प्रभाव राहीलच. या स्थितीत आघाड्यांतील बिघाडीतून होणारी मतविभागणी जास्त जागा लढवणाऱ्या भाजपच्या पथ्यावर पडू शकते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.