आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अग्रलेख:अभिनंदन करतानाच...!

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वप्रथम बारावी तसेच दहावीच्या सीबीएसई आणि आयसीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे ‘दिव्य मराठी’तर्फे हार्दिक अभिनंदन! लवकरच एसएससीचा निकालही अपेक्षित असून तिथली उत्तीर्णतेची टक्केवारीही उत्तम असेल, ही सदिच्छा. फक्त दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचेच अभिनंदन आणि सदिच्छा का, असा प्रश्न कुणी उपस्थित करेल. पण, आपल्या शैक्षणिक व्यवस्थेतले हे दोन अत्यंत महत्त्वाचे टप्पे असल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून त्यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. यंदा या सर्व परीक्षांतील उत्तीर्णतेची सरासरी ९० च्या घरात, तर ‘टॉपर्स’ ९५ टक्के वा त्यावर गुण मिळवणारे आहेत. महामारीच्या काळछायेतला हा एक झगझगीत पैलू म्हणायला हवा. कोविडच्या प्रकोपामुळे जीवनाच्या प्रत्येक अंगात बदल घडत आहे आणि येत्या काळातही ते घडतच राहतील. शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. या क्षेत्राने तर ‘न्यूू नॉर्मल’मधील हे बदल अंमळ लवकरच अंगीकारायला सुरुवात केल्याचे दिसते. केवळ इंग्रजी माध्यमाच्या उच्चभ्रू शाळाच नव्हे, तर अगदी दुर्गम भागातील सरकारी शाळांमध्येही ऑनलाइन पद्धतीने सुरू झालेले नवे शैक्षणिक वर्ष हे त्याचे द्योतक. अर्थात, काही तांत्रिक अडचणी वा अडथळे येत आहेत, हे खरे. पण, सांधा बदलताना असा खडखडाट होतच असतो, हे मान्य करून या क्षेत्रातल्या नव्या आयामांकडे पाहावे लागेल. आणि त्या दृष्टीतून तूर्तास सर्वांत मोठे आव्हान दिसते ते महाविद्यालयीन प्रवेशांचे. उत्तीर्णतेच्या संख्येएवढ्या जागा विविध विद्याशाखांमध्ये दिसत असल्या तरी इथे प्रश्न असतो तो चांगल्या संस्थांमधील प्रवेशाचा. कारण बहुसंख्यांना तिथेच प्रवेश हवा असतो. साहजिकच उत्तीर्णतेची आणि गुणांची टक्केवारी जशी वाढत जाते, तसा या ठिकाणच्या प्रवेशांवरील दबावही वाढतो. त्यासाठी प्रवेेश पद्धतीत आणि एकुणातच संबंधित यंत्रणेत सुसूत्रता असायला हवी. पण, आपल्या ‘सिस्टिम’चे नेमके तेच रडगाणे आहे. यंत्रणेतील मंडळींची तोंडे चार दिशांना असतात. अशा बारभाई कारभारामुळे प्रत्येक घटक आपापल्या सोयीने परस्पर निर्णय घेऊन गोंधळात भर टाकतो. अमरावतीतील एका कृषी महाविद्यालयाच्या गुणपत्रिकांवर ‘प्रमोटेड कोविड बॅच’चे मारण्यात आलेले शिक्के, हे त्याचे ताजे उदाहरण. परिणामी, आता असा ढिसाळपणा टाळून काटेकोरपणावर भर देणे अपरिहार्य ठरणार आहे.