आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अग्रलेख:बारीक डोळे… छद्मी नजर

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संसदेचे अधिवेशन सुरू झाले असताना सरकारपुढे दोन मोठे मुद्दे आ वासून उभे आहेत. एक म्हणजे, देशात वेगाने सुरू असलेला कोरोनाचा फैलाव, तो रोखण्यात येत असलेले अपयश आणि दुसरा, भारत आणि चीन यांच्यातील कमालीचे ताणलेले संबंध. या दोन्ही मुद्द्यांचा म्हटले तर परस्परांशी संबंध आहे आणि म्हटले तर तसा काहीही नाही. पण, चीनसोबतचे संबंध अत्यंत विचित्र वळणावर पोहोचले आहेत, हे मात्र खरे. भारतासह सारे जग कोरोनाशी लढत असताना चीनला त्याची विस्तारवादी वृत्ती स्वस्थ बसू देत नसल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे. चर्चेच्या टेबलावर सामंजस्याचा आव आणणारा चीन लडाख सीमेवर मात्र रोज कुरघोड्या करतो आहे. आता तर या कुटिल शेजाऱ्याचे नवे कारस्थान समोर आले आहे. भारताच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह देशातील अतिमहत्त्वाच्या हजारो व्यक्तींच्या हालचालींवर चीन गुप्तपणे नजर ठेवत असल्याचा गौप्यस्फोट एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांसह अनेक केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, न्यायाधीश, शास्त्रज्ञ, विद्यमान आणि निवृत्त उच्चाधिकारी तसेच गुप्तचर यंत्रणा व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील संस्थांचे प्रमुख, संशोधक, उद्योगपती, पत्रकार, खेळाडू यांची हेरगिरी गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. हे करणारी झेनुआ डाटा इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी चीनचे सरकार आणि लष्करासाठी हे काम करीत आहे. ओव्हरसीज की इन्फर्मेशन डाटाबेस या नावाने भारतासह अमेरिका, ब्रिटन, जपान, जर्मनी आणि अन्य काही देशांतील प्रमुख व्यक्ती आणि संस्थांची माहिती चीनने गोळा केली आहे. सर्वच प्रबळ देशांचे आर्थिक, राजकीय, लष्करी आणि शक्य त्या अन्य मार्गाने खच्चीकरण करुन जगावर राज्य करण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेने चीन झपाटला आहे. ही हेरगिरी सु्द्धा त्या कारस्थानासाठी सुरू असलेली बेगमी असावी. त्यातूनच पुढे संधी मिळेल तसे त्या देशात अराजक माजवून डाव साधण्याचा चीनचा इरादा असू शकतो. त्यामुळे सीमेवर दांडगाई करतानाच देशावरही छद्मीपणे नजर ठेवणाऱ्या या बारीक डोळ्यांतील कावा ओळखूनच भारताला आता पुढे पावले टाकावी लागतील.