आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अग्रलेख:पाताळयंत्री चीन

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परराष्ट्र मंत्रालयाची वरिष्ठांची चर्चा लष्करी अधिकाऱ्यांच्या वाटाघाटींच्या फेरीनंतर लडाखजवळील ताबारेषेपासून सैन्य मागे घेणे चीनने थांबवले. बोलणे एक आणि कृती भलतीच, हा चीनचा नेहमीचा अनुभव. माघार कोणत्या मुद्द्यावर अडली, लष्करी कुमक जमवाजमवीचे काय कारण, याबाबत चीनकडून शब्द नाही. तणाव निर्माण होण्यापूर्वी दोघांचे सैन्य होते तिथपर्यंत मागे जायचे, हे ठरलेले. त्यानुसार माघार न होता नुसते नाटक झाले. लष्करी अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतरही स्थितीत सुधारणा नाही. चीनच्या या हालचालींमुळे कोणत्याही स्थितीला तोंड देण्याच्या जय्यत तयारीत भारत आहेच. पंतप्रधान, संरक्षणमंत्र्यांच्या ताबारेषेवरील भेटी, चिनी अॅपवरील, कंपन्यांवरील बंदीचे निर्णय, यामुळे भारतानेही कडक धोरणाचा संदेश चीनला व जगालाही दिला. सध्याचा तणाव निवळलेला नसताना संघर्षाची आणखी एक आघाडी चीनने उघडली. त्यासाठी त्यांनी त्यांच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत टीचभर असलेल्या भूतानचे नाक दाबायचे ठरवले आहे. भूतानच्या पूर्वेला असलेल्या साउकटेंग अभयारण्याच्या भूभागावर दावा केला आहे. अाश्चर्याची आणि संतापजनक गोष्ट म्हणजे हा भूभाग चीन-भूतानमधील ताबारेषेला चिकटून नाही. ताबारेषा ओलांडून एखाद्या बेटासारख्या जमिनीच्या तुकड्यावर हक्क सांगण्याचा हा प्रकार आहे. आजवर कधीही असा दावा चीनने केला नव्हता. त्यामागचे कारण चीनचा हेतू व त्यांच्या पुढच्या कुरापतींची दिशा स्पष्ट करणारा आहे. भारताच्या दृष्टीने चिंतेची बाब म्हणजे साउकटेंग अभयारण्य हे अरुणाचल प्रदेशला खेटून आहे. हा भूभाग मिळवण्यासाठी भूतानच्या उत्तरेकडील ताबारेषेवरचा काही भाग व पूर्वेकडील अभयारण्याचा तुकडा याची देवाणघेवाण करण्याचा प्रस्ताव चीनने भूतानसमोर नुकताच ठेवला आहे. चीनच्या या डावपेचामागचा अर्थ आणि हेतू स्पष्ट आहे. भविष्यात चीनला अरुणाचल प्रदेश गिळंकृत करण्याच्या दिशेने पावले टाकायची आहेत. २०१७ मध्ये डोकलाममध्ये भारत व चिनी सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्या वेळेस जाे संघर्ष झाला तीच स्थिती चीन नक्कीच पुन्हा निर्माण करणार. ते दोन गोष्टींची वाट बघताहेत. हिवाळा कधी सुरू होतोय? आणि कोरोनाचा संसर्ग वरचे टोक कधी गाठतोय? अशा बेचक्यात भारताला अडकवून चीन संघर्ष घडवेल, असा अंदाज आहे. त्या दृष्टीने भारताने डावपेच आखले पाहिजेत. जगातील लोकशाही मानणाऱ्या देशांची एकजूट चीनच्या विरोधात उभारणे गरजेचे आहे.