आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:झुंज दोन वादळांशी

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: संपादकीय
  • कॉपी लिंक
  • या दोन्ही वादळांशी झुंजताना संत तुकोबारायांचा ‘महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती’ हा अभंग आठवतो

सध्या देशात दोन वादळे थैमान घालताहेत. कोरोनारूपी वादळाशी देश गेले ६० दिवस लढतोय, तर दुसरे वादळ बंगालच्या उपसागरातून घोंगावत प. बंगालच्या किनाऱ्याला धडकले. या दोन्ही वादळांशी झुंजताना संत तुकोबारायांचा ‘महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती’ हा अभंग आठवतो. या संकटांच्या काळात सर्वांनाच लव्हाळे व्हावे लागेल. सरकार, प्रशासन आणि सर्व यंत्रणा लव्हाळ्याप्रमाणे लवचिक झाल्या, वेळीच झुकल्या, हलल्या तर या दोन्ही वादळांचे विपरीत परिणाम फारसे होणार नाहीत. तशी देशाला चक्रीवादळे नवी नाहीत. गतवर्षीच आपण विक्रमी सात चक्रीवादळांचा अनुभ‌व घेतला. मात्र, आता आलेले अंफन हे महाचक्रीवादळ आहे. त्यात वाऱ्याचा वेग ताशी १६५ किमी आहे. प. बंगाल व ओडिशाला याचा सर्वाधिक फटका बसला. मात्र, यापूर्वी अशा वादळाचा दीर्घ अनुभव असलेले डॉ. मृत्युंजय महापात्रा सध्या हवामान विभागाचे महासंचालक असल्याने या महाचक्रीवादळात फारसे नुकसान होणार नाही, असा विश्वास आहे. गतवर्षी आलेल्या वादळावेळी हवामान विभागाने सातत्याने सतर्कचे इशारे दिले. फनी वादळावेळी हवामान विभागाने २.५ कोटी टेक्स्ट मेसेज पाठवत सर्वांना सावध केले होते. यंदाही सतर्कता दाखवत प्रशासनाने प. बंगालमधून ५ लाख, तर ओडिशातील १.५८ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. अंफन वादळामुळे नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचे आगमन लांबण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या वर्षीही मान्सून केरळात उशिरा दाखल झाला होता. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठ‌वड्यात अरबी समुद्रात वायू वादळ आले. या वादळाने सर्व बाष्प पळवल्याने मान्सूनच्या प्रगतीत अडथळा निर्माण होऊन तो दक्षिणेतच रेंगाळला होता. अंफननंतर असेच होण्याची शक्यता आहे. देश कोरोनारूपी वादळाशी लढत असताना मान्सून लांबणे देशाला परवडणारे नाही. कोरोनामुळे लॉकडाऊन, लॉकडाऊनमुळे जवळपास दोन महिने देशातील आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे अर्थचक्र थंडावले आहे. त्याला गती देण्यासाठी शेती पिकणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी मान्सून वेळेवर येणे व पावसाचे देशभरात सर्वत्र सारखे प्रमाण राहणे, हा कोरोनावर उभारीसाठी चांगला उतारा ठरू शकतो. कारण शेती पिकली तरच ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल. त्यातून देशातील दुय्यम व तृतीय क्षेत्राला रोकड मिळून अर्थचक्राला वेग येईल. आता दुसऱ्या वादळाविषयी. देशात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. स्थलांतरित मजुरांचा प्रश्न चिघळत असतानाच देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. देशात कोरोनाचा मृत्युदर कमी असणे, हीच काय ती समाधानाची बाब म्हणावी लागेल. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. देशात अशी स्थिती असताना विविध प्रश्नांवरून रंगणारे राजकारण सर्वसामान्यांना चीड आणणारे आहे. प्रशासन, राजकीय नेते, सरकारने लव्हाळ्याप्रमाणे लवचिकता अंगीकारली तर या दोन्ही वादळांत बरेच काही साध्य होईल. हे साध्य करणे आपल्याच हाती आहे. असे घडले तर भारताने दोन वादळांशी दिलेली झुंज जगासमोर आदर्श ठरेल.

बातम्या आणखी आहेत...