आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अग्रलेख:ट्रम्पच्या बुद्धिबळातलं प्यादं

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवडणुका जिंकण्यासाठी प्रत्येक देशातला सत्ताधारी कोणतेही हातखंडे वापरतो. अमेरिकेत सध्या हेच सुरू आहे. ‘अमेरिका फर्स्ट’ म्हणत अमेरिकेला ‘ग्रेट’ बनवताना ट्रम्प यांना अमेरिकेला ‘व्हाइट’ करायचे आहे. श्वेत व कृष्णवर्णीयांत ट्रम्प यांनी ‘पेटू’ दिलेला संघर्ष त्याचेच द्योतक आहे. वर्ष अखेरीस होणाऱ्या निवडणुकीत दुसऱ्या खेपेस निवडून येण्यासाठी श्वेतवर्णीयांची ‘व्होट बँक’ पक्की करताना सध्याचा वर्णसंघर्ष शांत करण्याच्या भानगडीत ट्रम्प फारसे पडले नाहीत. त्याच दिशेने त्यांनी आणखी एक चाल केली. अमेरिकेत ‘एफ वन व्हिसा’च्या आधारे उच्च शिक्षणासाठी आलेल्या विदेशी विद्यार्थ्यांना त्यांनी लक्ष्य केलं. अमेरिकेत दहा लाखांहून अधिक असलेले विदेशी विद्यार्थी म्हणजे ट्रम्प यांच्या दृष्टीने बुद्धिबळातली प्यादी आहेत. कोरोनामुळे सारेच विद्यार्थी विद्यापीठातल्या वर्गात न जाता ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. हार्वर्ड, स्टॅनफोर्ड, एमआयटी अशा अनेक जगप्रसिद्ध विद्यापीठांतून सध्या हीच पद्धत चालू आहे. या विद्यार्थ्यांना अडचणीत आणू पाहणारा आदेश ट्रम्प यांनी काढला. तुम्ही जर ऑनलाइन शिक्षण घेत असाल, तर अमेरिकेत राहता कशाला? तुमचा एफ वन व्हिसा आम्ही रद्द करत आहोत, असा त्या आदेशाचा अर्थ आहे. अमेरिकेत कोरोना कमी होतोय. अर्थव्यवस्था सुरळीत होते आहे. विद्यापीठे, महाविद्यालये सुरू होत आहेत. कोरोनानंतर अमेरिका खुली होत आहे, हे दाखवण्याची घाई ट्रम्प यांना झाली आहे. विदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारत, चीन, कोरियाचे विद्यार्थी जास्त आहेत. भारताचे जवळपास दोन लाख विद्यार्थी अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी आहेत. ट्रम्प यांचा आदेश विद्यार्थ्यांबरोबरच विद्यापीठांनादेखील नुकसान करणारा आहे. विदेशी विद्यार्थी माघारी गेले की, त्यांना परतणे मुश्किल होणार. त्यामुळे अमेरिकेतल्या विद्यापीठांना मिळालेले हुशार विद्यार्थी निघून जातील. शिवाय विद्यार्थ्यांकडून मिळणारा पैसा थांबल्यास त्यांचे प्रचंड नुकसान होईल. विद्यापीठाच्या बजेटच्या जवळपास २० टक्के पैसा विदेशी विद्यार्थ्यांकडून मिळतो. त्यामुळेच १७ मातब्बर विद्यापीठांनी न्यायालयात धाव घेतली. तेथे टिकाव लागत नाही म्हटल्यानंतर ट्रम्प यांनी हा आदेश मागे घेतला. तरीही प्रश्न संपलेला नाही. मागे घेतलेला आदेश अमेरिकेत सध्या असलेल्या विद्यार्थ्यांना लागू आहे. ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या नव्या वर्षात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची स्थिती सध्या तरी अधांतरी आहे. राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीतील ते अवलंबून असेल.