आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:खडसे आणि पवारनीती

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अस्वस्थतेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद बनवता येते का, याची चाचपणी खुद्द शरद पवारांनीच सुरू केली आहे. बुधवारी त्यासाठी त्यांनी जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. असे काही घडल्याचे नाकारण्यात येत असले, तरी अशा गोष्टी लपून राहात नाहीत. खडसे यांची भाजपने, विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी पक्षांतर्गत पुरती कोंडी करून ठेवली आहे. महाराष्ट्र भाजप फडणवीस यांच्या ताब्यात आहे, तोपर्यंत खडसे यांचे राजकीय पुनरुज्जीवन अशक्य आहे, हे उघड आहे. खडसे यांनाही हे कळत असल्यामुळे आपल्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर त्यांनी पहिल्यांदाच फडणवीसांचे नाव घेऊन टीका केली. तेव्हाच त्यांनी आता भाजप सोडण्याची तयारी केली आहे, असे संकेत मिळाले. अर्थात, आपण पक्ष सोडणार नाही असे ते आजही सांगतात. राष्ट्रवादीत जाण्याची तयारी खडसे यांनी महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर काही महिन्यांतच दाखवली होती. पण त्यावेळी त्यांना जे हवे होते ते देण्यात शरद पवारांनी असमर्थता व्यक्त केली होती. त्यामुळे आताही खडसे राष्ट्रवादीत गेले तर त्यांना फार काही मिळेल, असे चित्र नाही. ज्या विधिमंडळातील प्रवेश आपल्याला नाकारला गेला, तिथे जाऊन त्याचा जाब विचारायचा, असे त्यांनी ठरवलेले दिसते. त्यासाठी विधान परिषदेचे सदस्यत्व मिळाले तरी खडसे ते स्वीकारतील, अशी परिस्थिती आहे. पवार आणि त्यांच्या पक्षासाठी ते फायद्याचेच असल्याने हा सौदा पक्का होण्याची चिन्हे आहेत. तो करण्याआधी पक्षाच्या जुन्या, निष्ठावान कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याचे चित्र पवारांना उभे करायचे आहे. खडसे राष्ट्रवादीत आले तर ते फडणवीसांचा बुरखा फाडण्याचे काम नियमितपणे करतील, हे तर उघडच आहे. पण त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे, खडसेंच्या भाजप सोडण्याने त्या पक्षातील असंतोषाच्या बांधाला छिद्र पडेल आणि त्या छिद्राचे खिंडार व्हायला वेळ लागणार नाही, असे पवारांचे गणित असावे. तसे झाले तर अजित पवारांना फोडणाऱ्या फडणवीसांचे ‘पुन्हा येण्याचे’ स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, अशी ही पवारनीती दिसते आहे.

बातम्या आणखी आहेत...