आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:फेसबुकी (अ)नीतिमत्ता

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील ‘वॉल स्ट्रीट जर्नल’सारख्या अत्यंत प्रतिष्ठित वृत्तपत्राने फेसबुक भारतात सत्ताधारी भाजपच्या बाजूने पक्षपातीपणा करीत असल्याचा गंभीर आरोप करीत त्याच्या पुष्ट्यर्थ काही दाखलेही दिले आहेत. तेलंगणातले भाजप आमदार टी. राजा यांनी केलेले ‘हेट स्पीच’ हटवण्यात फेसबुकने जाणूनबुजून दिरंगाई केल्याचे प्रसिद्ध झाले आहे. फेसबुकचा ‘अल्गोरिदम’ अशी चिथावणीखोर विधाने त्वरित पकडतो. परंतु, ती काढून टाकण्याचा अधिकार मात्र फेसबुक व्यवस्थापनाकडे असतो. टी. राजा यांचे भडक विधान तातडीने काढायला हवे होते. पण, फेसबुकच्या भारतीय धोरणविषयक संचालक आंखी दास यांनी ते केले नाही. तसे केल्यास फेसबुक आणि भाजप यांचे संबंंध बिघडू शकतील आणि त्याचा परिणाम कंपनीच्या भारतातील व्यवसायावर होईल, अशी धास्ती त्यांना होती. एवढेच नव्हे, तर याच दास यांनी निवडणूक काळात भाजपला आपल्या पद्धतीने मदत केल्याचा आक्षेपही आहे. एरवी सातासमुद्रापार बसून काम करणाऱ्या कंपनीच्या धोरणाला महत्त्व द्यायचे कारण नव्हते. पण, डिजिटल युगाचे संदर्भ लक्षात घेता फेसबुकची ही (अ)नीती सामान्यांवर मोठा प्रभाव पाडण्यास कारणीभूत ठरते. फेसबुकचे सर्वाधिक वापरकर्ते भारतात असल्याने सत्ताधारी भाजप व फेसबुकची ही मिलीजुली बरेच काही सांगून जाते. साहजिकच त्यावरून इथले राजकारण तापले आहे. काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी, भाजप आणि संघ भारतात फेसबुक व त्याच्या अंकित असलेल्या व्हॉट्सअॅपवर नियंत्रण ठेवत ‘फेक न्यूज’ आणि ‘हेट स्पीच’ पसरवतात, असा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी करतानाच काँग्रेसने फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना पत्रही लिहिले. त्यावर अपेक्षेनुसार भाजप आणि फेसबुक दोघांनीही असे काही नसल्याचे सांगत हात झटकले आहेत. सामान्य फेसबुक वापरकर्त्यांनी हा प्रश्न राजकारणापुरता आहे, असे म्हणून सोडून देणे योग्य नाही. कारण मुद्दा केवळ राजकीय नसून अप्रत्यक्षपणे वापरकर्त्यांच्या बुद्धीचा ताबा घेण्याचा आहे. तसे झाल्यास काळ सोकावल्याशिवाय राहणार नाही. समाजमाध्यमांचा वापर करताना प्रत्येकाने अत्यंत सजग राहण्याची गरज पुन्हा एकवार अधोरेखित झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...