आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:‘होय’ की ‘नाही’?

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काळ्या मातीत राबणारा शेतकरी ज्या ज्या वेळी रस्त्यावर उतरला, त्या प्रत्येक वेळी सरकारला त्याची दखल घ्यावी लागली. गेल्या वर्षी दिल्लीत देशभरातील शेतकरी जमले आणि त्यांचे “संघटन’ झाले. त्या वेळी शेतीच्या प्रश्नावर सरकारने स्वतंत्र अधिवेशन घ्यावे, ही मागणी पहिल्यांदा पुढे आली. तिची दखल घेणे दूरच, पण सरकारने परस्पर तीन कायदे करून शेतकऱ्यांवर लादले. कोणताही कायदा करण्यापूर्वी दोन्ही सभागृहांत त्यावर सारासार चर्चा होणे, जनतेच्या हरकती व शिफारशी मागवून घेणे आणि राज्यांशी संबंधित विषयांवर त्यांना विश्वासात घेणे, हे लोकशाही संकेत धुडकावल्याने शेतकऱ्यांचे आंदोलन आता सरकारसाठी आव्हान बनले आहे. आजवर अनेक घटकांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारसाठी शेतकऱ्यांना गप्प करणे कठीण होऊन बसले आहे. खरे तर, “भारत बंद’चे फोटो सोशल मीडियात शेअर करणाऱ्यांवर फौजदारी खटले भरण्याची धमकी सरकारला द्यावी लागली, यातच सारे आले. कोणत्याही मार्गाने हे आंदोलन आटोक्यात येत नाही, हे लक्षात येताच देशाच्या गृहमंत्र्यांनी शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी आमंत्रित केले. सरकार आणि शेतकरी यांच्यातील चर्चेच्या सहाव्या फेरीआधी त्यांनी ही बैठक घेतल्याने सरकार एक पाऊल पुढे आल्याचे स्पष्ट झाले. पण, तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याबाबत सरकारपुढे ‘होय” किंवा ‘नाही’ एवढाच पर्याय असल्याचे सांगत चर्चेला निघालेल्या शेतकरी नेत्यांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवला. ही चर्चा सुरू असतानाच बुधवारच्या फेरीआधी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आल्याने तोडग्याची शक्यता दिसू लागल्याचे मानले जात आहे. मात्र, कायदे मागे घेण्याच्या मागणीवर सरकार कशी भूमिका घेते, यावरच तोडग्याचे व पुढील आंदोलनाचे भवितव्य अवलंबून असेल. बुधवारी विरोधी पक्षांचे नेतेही राष्ट्रपतींना भेटतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या आंदोलनातून विरोधकांच्या हाती राजकीय श्रेयाचे लोणी पडू नये, म्हणून सरकार सक्रिय झाले आहे. त्यातूनच लवचिक भूमिका घेत चर्चा पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. गृहमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीतून निर्णायक तोडगा निघाला नाही, तर पुढच्या चर्चेला चाल तरी नक्कीच मिळेल. त्यासाठी सरकारला यापुढेही संयमाची भूमिका घेत शेतकऱ्यांना संवेदनशीलतेने प्रतिसाद द्यावा लागेल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser