आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:शेम… शेम...

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: संपादकीय
  • कॉपी लिंक
  • सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही त्यांच्या बेजबाबदारपणाचा जाब विचारावा, अशी ही स्थिती आहे

महाराष्ट्रात कोरोनाचा गुणाकार सुरू आहे. रुग्ण वणवण भटकत आहेत. लोक असे भयंकराच्या दरवाजात उभे असताना महाराष्ट्रातील सरकार अन् विरोधक जमाखर्चाच्या याद्या वाचून दाखवत आहेत. या दोघांनाही त्यांच्या बेजबाबदारपणाचा जाब विचारावा, अशी ही स्थिती आहे. हा तमाशा कशासाठी चालू आहे? तर त्याचे असे आहे, की केंद्रातील मोदी सरकारने कोरोना उपाययोजनांसाठी दिलेले मदतीचे आकडे भ्रम करणारे असल्याचे आघाडी सरकारला दाखवायचे आहे, तर विरोधी भाजपला मोदींच्या भक्तीत यथेच्छ डुंबायचे आहे. पण, हे सर्व ज्या जनतेसाठी चालले आहे, तिच्याशी त्यांचे काही देणेघेणे नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. भाजप म्हणतो, केंद्राने महाराष्ट्राला २८ हजार कोटींची मदत केली. सत्ताधारी आघाडी म्हणते, ६६०० कोटीच मिळाले. विरोधक म्हणतात, २० लाख कोटींच्या पॅकेजमधून राज्याला २ लाख ७० हजार कोटी मिळतील. सरकार म्हणते, यात कर्जाची रक्कम असून, २० हजार कोटीच मिळतील. विरोधक सांगतात, की जीएसटीचे पैसे आगाऊ दिले. सरकार सांगते, १८ हजार कोटी थकीत आहेत. इकडे आमच्या लोकप्रतिनिधींचे असे सवाल-जवाब रंगले असताना तिकडे जनतेचे प्राण कंठाशी आले आहेत. राज्यातील बहुतांश खासगी दवाखाने बंद आहेत. कोरोना चाचण्यांसाठी अव्वाच्या सव्वा पैसे मागितले जात आहेत. रुग्णांसाठी खाटा शिल्लक नाहीत. आयसीयू बेड मिळवायला वशिला लावावा लागतो आहे. काही केल्यास अॅम्ब्युलन्स मिळत नाही. शवागृहे भरलेली आहेत. अंत्यसंस्काराला लोक नाहीत. विरोधकांनी महाराष्ट्रातील आरोग्याची हेळसांड दाखवली की सरकार गुजरातमधल्या व्यवस्थेकडे बोट दाखवते. विरोधकांनी आंदोलन पुकारले की सत्ताधारी त्यांना महाराष्ट्रद्रोही ठरवतात. यांनी पत्रकार परिषद घेतली की ते घेतात. विरोधक राजभवनावर गेले की सरकार अस्थिर केल्याची आवई सत्ताधारी उठवतात. हे लाजिरवाणे खेळ किमान महामारीच्या काळात तरी करायला नको, हेच आपले श्रेष्ठीजन विसरले आहेत. शरपंजरी पडलेल्या पितामह भीष्मांनी युधिष्ठिराला राजधर्म सांगितला होता. तशी वेळ कोरोनाच्या जबड्यात अडकलेल्या जनतेवर ओढावली आहे. विरोधकांनी आपले सरकार म्हणून केंद्राची किती कड घ्यावी, यालाही काही ताळतंत्र हवे. आपद्धर्म म्हणून तरी महामारीच्या काळात महाराष्ट्रधर्म पाळा, असे त्यांनाही सुनावण्याची वेळ आली आहे. मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील प्रमुख शहरे रुग्णशय्येवर असताना राजकारण खेळणाऱ्या दोन्ही बाजूंचा निषेध करावा तितका थोडा आहे.

बातम्या आणखी आहेत...