आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:आणखी एक ‘निर्भया’

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सामूहिक अत्याचार झालेल्या तरुणीच्या मृत्यूनंतर देशातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. या घटनेतील चारही नराधमांना पोलिसांनी अटक केली, राज्य सरकारने तरुणीच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत दिली आणि हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याचा निर्णयही घेतला. दुसरीकडे, राजकारण्यांनी आणि माध्यमांनी पीडितेच्या जातीपासून सरकारच्या नीती-नियतीपर्यंत अनेक मुद्द्यांवर बेजबाबदार भाष्य करून आपल्या नेहमीच्या वृत्तीचे प्रदर्शनही केले. एकंदरितच, या घटनेनंतरही निर्ढावलेली सरकारी औपचारिकता आणि सामुदायिक बेफिकिरी दिसून आली. २०१२ मध्ये दिल्लीत झालेल्या निर्भया प्रकरणानंतर कायदे बदलण्यात आले. अशा अत्याचाराच्या गुन्ह्यासाठी फाशीची तरतूद करण्यात आली. या वर्षीच्या २० मार्चला त्या प्रकरणातील चारही आरोपींना फाशी देण्यात आली. कायदा मजबूत होऊनही हे प्रकरण आठ वर्षे इतके ताणले गेले की लोकांचा न्यायावरचा विश्वासच ढळावा. कायद्यातील तरतुदींचा गैरफायदा घेत चारही आरोपींची फाशी टाळण्याचे प्रयत्न शेवटपर्यंत होत राहिले. दरम्यानच्या काळात उन्नावपासून हैदराबादपर्यंत अत्याचाराच्या घटना घडतच राहिल्या. काही पोलिस ठाण्यापर्यंत, काही न्यायालयापर्यंत पोहोचल्या. पण, किती तरी घटना अशा असतील ज्या ना कागदावर उमटल्या, ना कुणाला ऐकू गेल्या. कायद्याने न्याय मिळण्यात होणाऱ्या विलंबामुळे लोक हैदराबादमधील घटनेसारख्या बंदुकीने होणाऱ्या झटपट फैसल्याचे समर्थन करू लागले. कायदा सर्वोच्च असल्याचे सिद्ध करण्यात, लोकांमध्ये तसा विश्वास निर्माण करण्यात लोकशाहीचे चारही स्तंभ कमी पडत असल्याचेच यातून दिसले. अशा घटना न घडण्यासाठी सामाजिक मानसिकता बदलण्यात सारेच अपयशी ठरले आहेत. संसदेत बहुमताने कायदे बदलणे, ते सोयीने वापरणे आणि असलेल्या कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीतून लोकांमध्ये त्यांच्याविषयीचा आदर वाढवणे यांमध्ये खूप फरक आहे. तो समजून न घेता अशा घटना घडल्यावर साचेबद्ध घोषणा व हिणकस राजकारण होत राहते. दिल्लीच्या घटनेशी साधर्म्य आहे म्हणून हाथरसमधील अभागी तरुणीलाही निर्भया संबोधले गेले. म्हणजे तिचीही न्यायासाठी तशीच फरपट होणार, हे आपल्याला अभिप्रेत असावे. तसे असेल तर जिवंतपणी मरणयातना सोसल्यानंतरही मृत्यूपश्चात न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आणखी एक ‘निर्भया’ उभी राहिली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser