आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:चीन शांत नाही बसणार...

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: संपादकीय
  • कॉपी लिंक
  • भारत आणि चीन यांच्यातील ३४८८ किलोमीटरची सीमारेषा वादग्रस्त आहे. ही जगातील सर्वात मोठी वादग्रस्त सीमारेषा

भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष ताबारेषेवर गेल्या १५ दिवसांत दोन वेळा संघर्ष झाला. यंदा गोष्टी थोड्या पुढे गेल्या. चीनने वादग्रस्त भागात हेलिकॉप्टर्स उडवली. प्रत्युत्तर देताना भारताचे फायटर जेट गेल्यानंतर त्यांचे चॉपर माघारी गेले. भारत आणि चीन यांच्यातील ३४८८ किलोमीटरची सीमारेषा वादग्रस्त आहे. ही जगातील सर्वात मोठी वादग्रस्त सीमारेषा. प्रत्यक्ष ताबारेषा कोणती? हे स्पष्ट नसल्याने तणाव निर्माण होतात. १९६२ च्या युद्धानंतर दोन्ही देशांत याच मुद्द्यावर नेहमी संघर्ष होत राहिले. दोन्ही सैनिकांमध्ये हाणामारी, दगडफेक, यात दोन्ही बाजूचे सैनिक जखमी होणे असे प्रकार होतात. ताबारेषेच्या जवळ सिंचन कालवा, निरीक्षण चौकी, रस्ते बांधणीस एकमेकांना विरोध, ही संघर्षाची कारणे असतात. संघर्षानंतर तिथले भारतीय व चीनचे कमांडर यांच्यातील आमने-सामने चर्चेनंतर तणाव निवळतो. रस्ते बांधणीस चीनला विरोध, या मुद्द्यावरून २०१७ मध्ये डोकलामचा तणाव ७३ दिवस लांबला होता. दोन्ही राष्ट्र प्रमुखांच्या भेटीनंतर तणाव कमी झाला होता. आता लडाखच्या पूर्वेला तिबेटची सीमा लागून असलेल्या पेंगोंग सरोवराजवळ तणाव निर्माण झाल्यानंतर सैनिकांमध्ये झटापट झाली. त्यानंतर चारच दिवसांनी सिक्कीमला खेटून असलेल्या सीमेवरही संघर्ष झाला. चीन शांत नाही बसणार. त्याचे मुख्य कारण म्हणजे कोरोना विषाणूच्या वैश्विक संसर्गानंतर जगात चीनविरुद्ध विविध देशांची फळी तयार होते आहे. त्यात भारत चीनच्या बरोबर नाही. विरोधात आहे. त्याची झलक केंद्र सरकारच्या एका छोट्या पण अतिशय व महत्त्वाच्या निर्णयाने झाली. भारतामध्ये येणारे परदेशी गुंतवणुकीचे प्रस्ताव केंद्र सरकारची थेट मंजुरी असल्याशिवाय त्याला मान्यता देऊ नये, असे आदेश कोरोना प्रारंभानंतर काढले आहेत. या आदेशाचा रोख थेट चीनकडे बोट दाखवतो. याअगोदर चीनने एचडीएफसी बँकेचे शेअर घेतल्यानंतर केंद्राला जाग आली. काही अमेरिकी कंपन्यांचे भाग चीनने खरेदी केले. ते भारतीय कंपन्यांच्या बाबतीत होऊ शकते. ते देशहिताचे नाही. सध्या भारत आणि सगळे जग कोरोनाविरोधाच्या लढाईत गंुतले असताना चीन मात्र औद्योगिक उत्पादन व व्यापार वाढीत गर्क आहे. याअगोदरच्या दोन जागतिक महायुद्धांत जेवढे आर्थिक नुकसान झाले त्यापेक्षा किती तरी पटींनी अधिक नुकसान चीनने लादलेल्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत झाले, असा समज चीनविरोधी देशांचा आहे. चीन भारताविरुद्ध ‘हायब्रीड वॉर” लढतो आहे. त्यात तो सीमेवर सैनिकांचा वापर करतो. माओवाद्यांना, नक्षलवाद्यांना मदत करत देशात अशांतता निर्माण करतो. ईशान्य भारतातही बंडखोर गटाला मदत करतो. शिवाय चीनचे भारताच्या विरोधात राजनैतिक युद्ध चालूच असते. युनोमध्ये भारताला विरोध, पाकिस्तानचे समर्थन हे नेहमीचे उद्योग आहेत. शिवाय व्यापारयुद्ध सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर चीनची वागणूक सुधारणार नाही. भारताला सर्वच स्तरांवर अधिक सावध व कोणत्याही प्रकारच्या लढाईत कणखर उत्तर देण्याच्या तयारीत सतत राहावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...